मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मलबार हिल येथील सह्याद्री शासकीय विश्रामगृहात सोमवारी (२ नोव्हेंबर २०२६) शासकीय अधिकारी आणि आंबेडकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सोयी-सुविधांसोबतच दादर येथील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचा प्रलंबित विषय जोरदार गाजला.
ही आढावा बैठक केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले आणि मुंबईचे पालकमंत्री ना. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.
अनुयायांसाठी सोयी-सुविधांचा आढावा
बैठकीदरम्यान महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी आणि मुंबईत येणाऱ्या देश-विदेशातील अनुयायांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून आरोग्य, निवारा, स्वच्छता, पाणी आणि वाहतूक व्यवस्था यांसारख्या आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
इंदू मिल स्मारकावरून एमएमआरडीएला जाब
या बैठकीत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. “महाराष्ट्रातील संपूर्ण महापुरुषांचे पुतळे आणि स्मारके यांच्या योग्य संगोपन व देखभालीसाठी शासनाचे स्पष्ट परिपत्रक निघाले पाहिजे,” अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
तसेच, “इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाला होणारा विलंब आणि सातत्याने वाढणारा खर्च (रेट) या दोन्ही मुद्द्यांवर MMRDA आयुक्त स्वतः समोर येऊन स्पष्टीकरण का देत नाहीत?” असा रोखठोक सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. या मागणीला बैठकीतील सर्व आंबेडकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी जोरदार पाठिंबा दिला.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीला भारतीय बौद्ध महासभेचे प्रतिनिधी प्रदीप कांबळे, भिकाजी कांबळे, रवी गरुड तसेच समन्वय समितीच्या वतीने नागसेन कांबळे यांच्यासह विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More Stories
अस्तित्व आणि धोरण यांच्या दरम्यान: भूतानच्या अलीकडील बौद्ध धर्मीय उपक्रमांचे विश्लेषण
कोलकाताच्या प्रसिद्ध पुजा पंदालमध्ये भारत आणि चीनच्या बौद्ध वास्तुकलेचा अनोखा संगम; अजिंठा लेणी आणि लुमंग गुहेची कलाकुसर ठरतेय आकर्षणाचे केंद्र
तेलंगणातील ऐतिहासिक नेलाकोंडापल्ली बौद्ध स्थळाचा कायापालट; जागतिक पर्यटन केंद्र बनवण्यासाठी ४.२६ कोटी रुपयांची तरतूद