पुणे येथील डी. सी. मिशनमध्ये आगामी असेंब्लीच्या निवडणुकीसाठी विचारविनिमय करण्यासाठी पुण्यातील शंभर-दिडशे पुढारी व इतर मंडळी समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….
डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिनांक ७ सप्टेंबर १९३६ रोजी काही कामानिमित्त सकाळच्या एक्स्प्रेसने दुपारी बारा वाजता पुण्यास पोचले. त्यावेळी स्टेशनवर अस्पृश्य पुढारी मंडळीकडून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागतासाठी मे. सुभेदार आर. एस्. घाटगे, राजाराम भोळे, डी. जी. जाधव, आर. के. कदम, सुभेदार, दुबे, सावंत, मातंग समाजाचे श्री. लांडगे वगैरे मंडळी हजर होती. मातंग समाजातर्फे फोटो व पुष्पहार अर्पण करण्याचा समारंभ झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आपल्या खाजगी कामाकरिता गेले. नंतर डाॅ. बाबासाहेबांना दीड वाजता डी. सी. मिशनमध्ये आणण्यात आले. त्यावेळी डॉ. बाबासाहेबांबरोबर डॉ. सोळंकीसाहेबही होते. आगामी असेंब्लीच्या निवडणुकीसाठी विचारविनिमय करण्यासाठी पुण्यातील शंभर-दिडशे पुढारी व इतर मंडळी समोर डी. सी. मिशनमध्ये असेंब्लीच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांकरिता ज्या राखीव जागातील उमेदवारांची जी नावे स्वतंत्र मजूर पक्षातर्फे जाहीर केली होती त्याविषयी आगामी निवडणुकीसंदर्भात पहिले भाषण केले.
असेंब्लीच्या निवडणुकीसंदर्भात पुणे येथील डी. सी. मिशनमध्ये केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
प्रिय बांधवहो,
मी निवडलेल्या उमेदवारांबद्दल जी काही थोडीशी टीका केली जात असेल त्याबद्दल मला मुळीच खंत वाटत नाही किंवा आश्चर्य वाटत नाही. कारण त्या मानाने प्रतिकूल असे मत फारसे दृष्टोत्पत्तीस येत नाही. यावरून माझी उमेदवारासंबंधीची निवड समाजास पसंत पडली आहे, असे म्हणावयास मुळीच हरकत नाही. मी ज्या माणसांची निवड केली त्यात कोणी माझे नातेवाईक, चुलते, मुलगे, जावई किंवा व्याही वगैरे कोणी नाहीत. मी त्यांचा सर्वप्रकारचा विचार करून, तीन गोष्टींची कसोटी लावून त्यात जे कसोटीस उतरले त्यांचीच निवड केली आहे. पहिली कसोटी म्हणजे इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान. कारण तेथे सर्व कामकाज इंग्रजीतूनच चालणार आहे. आपापल्या जिल्ह्यातर्फे, तालुक्यातले जाच-त्रासादी गाऱ्हाण्यांचे प्रश्न असेंब्लीमध्ये इंग्रजीतून विचारता आले पाहिजेत. म्हणून उमेदवार इंग्रजी जाणणारा पाहिजे. दुसरी गोष्ट म्हटली म्हणजे उमेदवार वयाने तरूण असला पाहिजे. म्हाताऱ्या मंडळींना काही तेथे पालखीतून बसवून न्यावयाचे नाही. एखाद्या असेंब्लीच्या सभासदाला असेंब्लीचे कामकाज चालू असताना एखाद्या खेड्यातून निकडीची तार आली तर त्याला तेथे वेळ पडल्यास पायी चालत जाता आले पाहिजे. रात्री-बेरात्री आपल्या जिल्ह्यातील लोकांसाठी फिरता आले पाहिजे. ते कार्य एखाद्या म्हाताऱ्या, संधीवाताने जखडलेल्या कौन्सिलरच्या हातून कदापिही होणार नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे, आपल्या पक्षाचा उमेदवार पक्षाच्या शिस्तीखाली राहिला पाहिजे. पक्षाच्या नियमानुसार वागून त्याच्या अंगात कार्य करण्याची धमक पाहिजे आणि तो पक्षाकरिता निस्वार्थबुद्धीने काम करणारा पाहिजे. स्वार्थी माणसाला मी कवडीचीही किंमत द्यायला तयार नाही.
तुमच्या जिल्ह्यातर्फे निवडलेले श्री. राजाराम भोळे यांचे उदाहरण घ्या. त्यांच्यापेक्षा कोणताही जास्त शिकलेला व तितका लायक मनुष्य पुण्यात नाही. मला भाऊबंदकीकडे किंवा जिल्ह्याच्या दुराभिमानाकडे अथवा वतनदारीकडे लक्ष द्यावयाचे नाही. नुसत्या नावावर लायकी किंवा महत्त्व अवलंबून नाही, तर ते कामावर अवलंबून आहे. श्री. भोळे जर बिनविरोध निवडून आले तर आपल्या पदरात एकंदर तीन जागा पडतील. त्यांना जर विरोध नसला तर ते सहज निवडून येतील व त्यांना न दिल्या गेलेल्या मतांनी आपल्या पक्षाचा दुसरा उमेदवार निवडून येईल आणि दुसऱ्या भागात देखील आपल्या पक्षाचा उमेदवार आपल्या दुसऱ्या भागातील मतांनी सर्वसाधारण निवडणुकीत निवडून येईल. अशा तऱ्हेने आपण शिस्तीने वागलो तर आपणास एकट्या पुण्यात तीन जागा मिळविता येतील. तेव्हा आपण तालुक्याचा, गावचा किंवा जिल्ह्याचा दुराभिमान सोडून तुम्ही आपल्या पक्षाच्या हिताकरिता लायक माणसालाच निवडून दिले पाहिजे. कौन्सिले म्हणजे म्हारकी नव्हे की, बाप मेला म्हणजे ती मुलाला मिळेल !
सध्या माझी प्रकृती ठीक नाही. ब्लडप्रेशर झाले असल्यामुळे, थोडे अंतर देखील चालून जाता येत नाही. तेव्हा प्रत्येक ठिकाणी जाऊन मला शंकाकुशंका सोडवावयास वेळ सापडणार नाही. माझ्या कसोटीस उतरलेल्या उमेदवारांच्या विरूद्ध जर कोणास काही करावयाचे असल्यास ते त्यांनी नीट विचार करून आणि जबाबदारी ओळखून करण्याचे धाडस करावे. मी त्यांच्या स्वार्थी कृतीची चूक सिद्ध करून दाखवीन. दिवसेंदिवस माझ्या शिरावर अनेकप्रकारच्या जबाबदाऱ्या येऊन पडत आहेत. आपल्या समाजाच्या स्वातंत्र्याच्या कार्यात मला हितशत्रू उत्पन्न झालेले आहेत. या आजच्या लढ्यात माझ्यावर कोणते प्राणांतिक प्रसंग उत्पन्न होतील ते मलाच सांगता येत नाहीत. अशाही बिकट परिस्थितीत मी तुम्हाबद्दलची सर्वप्रकारची जबाबदारी घ्यावयास तयार आहे. माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही मी निवडलेल्या लायक माणसालाच आपली मते देऊन निवडून आणून समाजाचे हित साधावे. सगळ्याच ठिकाणी म्हाताऱ्यांना जर हक्क आहे तर सगळी म्हाताऱ्यांचीच भरती होईल. मला स्वतःलाही कोठेच जागा राहणार नाही. माझ्यापेक्षा सुभेदार घाटग्यांनी ५० वर्षे जास्त काम केले आहे. श्री. शिवराम जानबा कांबळ्यांनी ६० वर्षे जास्त काम केले आहे. त्यांच्या वयाच्या मानाने मला देखील काम करता येणार नाही. तेव्हा या असल्या वादविवादात मला पडण्याचे काहीच कारण नाही. जोपर्यंत तुमचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी तुमचे पुढारीपण स्वीकारीन. आपणाला यावेळी मोठा समुद्र ओलांडून जावयाचे आहे. तेव्हा मी म्हणेन तेच नावाडी व चांगली नाव मला मिळाली पाहिजे. तरच मी नावेत पाय टाकीन. मोडकी नाव व कुचकामाचे नावाडी दिलेत तर मी नावेत मुळीच पाय ठेवणार नाही. मलाही तुमचा पुढारीपणा नको आहे. यासाठी तुम्ही सर्वांनी पूर्णपणे ध्यानात ठेवा की, प्रत्येकाला लायकी पाहिजे. ” नामसे नही, कामसे है ” ही गोष्ट लक्षात ठेवा.
🔹🔹🔹
✍️ संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर