जेंव्हा पाण्यालाही लागते आग,
जेंव्हा मुर्दाडांनाही येऊ लागते जाग,
आणि आत्मसन्मानाचा सळसळू लागतो नाग,
तेंव्हा निश्चित समजावे की…..,
भीम येतो आहे !
जेंव्हा आंधळा, पांगळा, मुका बहिरा लढू लागतो,
लूत भरलेल्या कुत्र्यासारखा जेंव्हा मनू रडू लागतो,
आणि दिवसा ढवळ्या काळाराम सुध्दा मंदिरामध्ये दडू लागतो,
तेंव्हा निश्चित समजावे की…..,
भीम येतो आहे !
जेंव्हा शतकानुशतकांचे अडाणी आपल्या पोराला सांगतात ‘शिक’,
जेंव्हा गावकुसाबाहेरील वस्त्यांमध्ये सुध्दा येऊ लागतं अक्षरांच पिक,
आणि तथाकथित महात्म्यांनाही मागावी लागते भीक,
तेंव्हा निश्चित समजावे की…..,
भीम येतो आहे !
जेंव्हा शहाणपणाचा बनू लागतो माहौल,
जेंव्हा सम्यक क्रांतीची जाणऊ लागते चाहूल,
आणि वाजू लागते सम्यक संबुध्दाचे पाऊल,
तेंव्हा निश्चित समजावे की…..,
भीम येतो आहे !
जेंव्हा रथयात्रांची, गौरवयात्रांची सोगंढोंगं कळू लागतात,
जेंव्हा मानवतेसाठी शेकडो आयुष्यांच्या मशाली जळू लागतात,
आणि धर्मांधांच्या विरोधात कोवळ्या मूठीसुध्दा संतापाने वळू लागतात,
तेंव्हा निश्चित समजावे की…..,
भीम येतो आहे !
भीम येतो आहे……,
म्हणजे तो येणार नाही आभाळातून,
भीम येतो आहे…..,
म्हणजे तो येणार नाही पाताळातून.
तो येणार आहे…..,
नांगराच्या फाळातून,
कामगारांच्या बळातून,
झोपडपट्ट्यांच्या गाळातून आणि…..,
विद्रोहाच्या जाळातून!
जेंव्हा खदखदू लागेल ज्वालामुखी तुमच्या माझ्या रसातळातून…….,
तेंव्हा निश्चित समजावे की…..,
भीम येतो आहे !
– विवेक मोरे
मो. ८४५१९३२४१०
More Stories
बुद्धपौर्णिमेचं चांदणं
रात्र ती वैरीण
माझं काम मी केलं…..