November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

वर्षावास

वर्षाॠतुध्ये कोणत्याही भिक्षुंच्या तीन महिन्यांपर्यंत एकाच विहारात अथवा राहण्यायोग्य परिसरात वास्तव करण्याला वर्षावास म्हणतात. वर्षावासाचा शुभारंभ स्वतः भगवान बुद्धांनी केलेला असुन आजपर्यंत ती परंपरा नित्य नियमाने चालु आहे. विनयपिटकानुसार वर्षावासाचा कार्यकाळ हा आषाढ पोर्णीमेपासुन अश्विन पोर्णीमेपर्यंतचा असतो. नंतरचा एक महिना हा वर्षावास समापन उत्सवाचा असतो. वर्षावास सुरुवातीपासून ते समापन पर्यंत एकुण चार महिने पुर्ण होतात. यामुळे यांना चार मास असेही म्हणतात.
वर्षावासाच्या सुरुवातीला भिक्षुगण पुढील गाथा म्हणुन वर्षावासाला प्रारंभ करतात.
इमस्मीं विहारे इमं ते मासं वस्सं उपेमि अधिट्ठामी
भिक्षुंचे संपुर्ण जीवन हे यात्रा व भटकंतीवरच निर्भर असते.
भगवान बुद्धांनी वाराणसी येथुन बहुजनांच्या हितासाठी व सुखासाठी अनेक अरहंत भिक्षुंना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धम्म देसना देण्यास सांगितले व स्वतः सुद्धा पायी प्रवास करुन सद्धम्माचा प्रसार केला. सद्धम्माचा प्रसार करत असताना त्यावेळी अनेक अडचणी येत असत. खराब रस्ते व जंगलातील हिंसक प्राणी, चोर दरोडेखोर यांसोबत सामना होत असे. पावसाळ्यामधे तर सतत पाउस पडत असल्याने भिक्षटन करण्यास अडचणी येत असत. नदी नाले पाण्याने तुडूंब भरून वाहत असल्याने दुसर्या गावात जाणे शक्य होत नसे, अशा या परिस्थितीत प्रवास करताना साप, विंचु व ईतर विषारी जीवजंतुंचा अतिशय उपद्रव होत असे. पावसाळ्यात वातावरण शांत असते. अतिवृष्टीमुळे त्या दिवसांत शेती व मजुरीची कामे शक्य नसतात. त्यामुळे उपासकांजवळ पुष्कळ वेळ उपलब्ध असतो. त्यामुळे उपासकांना धम्माचे अध्ययन करणे सोपे जाते. याच कालावधीत भिक्षुंना ध्यान भावनेचा अभ्यास करण्यासाठी प्रसन्न वातावरण असते. अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून तथागत बुद्धाने वर्षावासाचा नियम अनिवार्य केला होता. आपल्या 80 वर्षाच्या आयुष्यात बुद्धत्व प्राप्तीनंतर भगवान बुद्धानी एकुण 46 वर्षावास केले आहेत.
भगवान बुद्धानी आपले एकुण 46 वर्षावास व ते परिपूर्ण केल्याची स्थळे पुढीलप्रमाणे आहेत
1) ॠषिपतन,
2 ते 4) राजगृह
5) वैशाली
6) मंकुल पर्वत- बिहार
7) त्रायंतीश दिव्यलोक
8) सुमांरगीरी-चुनार
9) कौशांबी
10) पारिलेयक वन
11) नालाग्राम
12) वेरंजा ग्राम
13) चालिय पर्वत
14) श्रावस्ती
15) कपीलवस्तु
16) आलवी ग्राम अरवल
17) राजगृह
18 व 19) चालिय पर्वत
20) राजगृह
21 ते 45) श्रावस्ती 46) वैशाली
वर्षावासाच्या वेळी सात धम्म कार्यांसाठी भिक्षु बाहेर जाऊ शकतात.
भगवान बुद्धाचा शिलससंपन्न उपासक कौशांबीचा राजा उदयन याने भिक्षुसंघासाठी एक भव्य बुद्ध विहार बांधला व तो विहार भिक्षुसंघास समर्पित करण्यासाठी त्याने भिक्षुसंघास संदेश पाठविला की,
“भिक्षुसंघाने माझ्या दानाचा स्वीकार करून माझ्या पुण्य कर्मास अनुमोदन द्यावे ”
पण वर्षावास चालु असल्याने आदरणीय भिक्षुंनी उदयन राजास वर्षावास समाप्त होईपर्यंत वाट पहावी असा संदेश पाठविला. भिक्षुसंघाचा वर्षावास संपेपर्यंत वाट पाहण्याची सुचना मिळताच राजा उदयन प्रचंड दुःखी झाला. राजा उदयन दुःखी झाल्याची गोष्ट जेव्हा भगवान बुद्धांना कळली तेव्हा त्यांनी वर्षावासाच्या नियमामधे परिवर्तन केले व आदरणीय भिक्षुंना सांगितले की वर्षावासाच्या काळात सात धम्म कार्यासाठी भिक्षुंना विहार सोडून बाहेर जाण्याची परवानगी आहे.
1) वर्षावासी भिक्षु भिक्षुसंघाच्या कामानिमित्त बाहेर जाउ शकतात.
2) वर्षावासी भिक्षु भिक्षुणी संघाच्या कामानिमित्त बाहेर जाउ शकतात.
3) वर्षावासी भिक्षु धम्म जाणनारे माणवक(विद्यार्थी)व त्यांच्या कार्यासाठी बाहेर जाउ शकतात.
4) वर्षावासी भिक्षु श्रामनेर संघाच्या कार्यासाठी बाहेर जाउ शकतात.
5) वर्षावासी भिक्षु श्रामनेरी संघाच्या कामानिमित्त बाहेर जाउ शकतात.
6) वर्षावासी भिक्षु उपासक संघाच्या कामानिमित्त बाहेर जाउ शकतात.
7) वर्षावासी भिक्षु उपासिका संघाच्या कामानिमित्त बाहेर जाउ शकतात.

वर्षावासामुळे निर्माण झाला आनंद बोधिवृक्ष
भगवान बुद्ध जेव्हा श्रावस्तीमधील जेतवन विहारात रहायचे तेव्हा लोकं त्यांच्या संपर्कात राहून अतिशय आनंदित व्हायचे, पण तथागत वर्षावासामुळे किवा अन्य कामासाठी जेव्हा बाहेर भिक्षु संघासोबत जायचे तेव्हा जेतवन विहारात भिषन विषन्नता पसरायची. तथागताच्या दर्शनासाठी आलेले उपासक अतिशय नाराज होऊन वापस जायचे. जेतवन विहाराचे हे सुनेपण पाहुन अनाथपिंडक श्रेष्ठी अतिशय दुःखी कष्टी व्हायचे. अनाथपिंडक श्रेष्ठी यांना नेहमी वाटायचे कि भगवान बुद्ध बाहेर गेल्यावर विहारात एखादी मुर्ती किंवा प्रतिमा बसवावी जेणेकरून उपासक आपली श्रद्धा व्यक्त करतील, पण त्यांना हे देखिल माहिती होतं की तथागत यासाठी मान्यता देणार नाही, म्हणून त्यांनी यावर मार्ग काढण्यासाठी भंते आनंद यांना प्रार्थना केली. आनंद यांनी बुद्धांना विचारले की,
“चैत्य किती प्रकारचे असतात?”
बुद्ध म्हणाले की,
“चैत्य तीन प्रकारचे असतात आनंद,
एक शारीरीक, जे तथागताच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या शारिरीक अवशेषांवर बनते.
दुसरे उद्देशिक, ज्यात कल्पनेचा समावेश असतो, ज्याला तथागत फार चांगले मानत नाही.
तिसरे पारिभोगीक, ज्या वस्तू तथागत बुद्धानी उपयोगात आणल्या किंवा वापरल्या असतील. या सर्वात उत्तम बोधिवृक्ष आहे, ज्याचा उपयोग करून तथागतानी सम्यक संबोधी प्राप्त केली.

त्यामुळे आनंद यांनी बुद्धांना सांगितले की, “बुद्धगया तेथुन बोधिवृक्ष आणून जेतवन विहाराच्या द्वारावर लावले जावे. हेच सर्वात श्रेष्ठ पारिभोगीक चैत्य असेल.”
या बोधिवृक्षाचा प्रबंध भंते आनंद यांनी केला त्यामुळे तो बोधिवृक्ष आनंदबोधि या नावाने प्रसिद्ध झाला.

भगवान बुद्धाचा सर्वात कठीण वर्षावास
वेरज्जाग्राम येथे भगवान बुद्धांनी आपला 12 वा वर्षावास संपन्न केला. याच गावात भिक्षुंसंघाला एकाही घरात भिक्षा मिळाली नाही, कारण त्यावेळी गावात भिषण दुष्काळ पडला होता.
वेरंजक हा तथागत गौतम बुद्धासोबत वाद घालण्यासाठी आला होता व त्याने तथागतास वेडेवाकडे प्रश्न विचारले,
परंतु बुद्धांनी त्याच्या सर्व शंकांचे निरासन केले. वेरंजक तथागतास म्हणाला की, “मी तुम्हाला उग्र व कठोर भाषेत अनेक प्रश्न विचारले पण तुम्ही एकदम शांत राहुन, न रागवता प्रश्नांची उत्तरे दिली.”
तथागत वेरंजकास म्हणतात की,
“वेरंजक आपण जेव्हा मुर्खासोबत वाद घालतो त्यावेळी त्याठिकाणी दोन मुर्ख असतात.”
वेरंजक ब्राह्मण तथागतावर अतिप्रसन्न झाला व त्यांना 500 भिक्षुंसंघासहित एक वर्षावास आपल्या येथे वेरज्जाग्राम मधे करावा अशी नम्रता पुर्वक विनंती करतो. तथागत विनंतीस स्वीकारुन जेव्हा वेरज्जाग्राम येथे गेले होते तेव्हा तिथे भयानक दुष्काळ पडला होता. दुष्काळामुळे वेरंजक तथागतास व भिक्षुंसंघास अन्नदान देउ शकला तल नाहीच, पण संपुर्ण गावामध्ये सुद्धा भिक्षुंसंघास कुठेही भिक्षा मिळाली नाही. विनय पिटकाच्या नियमानुसार तथागतास व भिक्षुसंघास वर्षावास वेरज्जा ग्राममधेच व्यतीत करावा लागणार होता. तथागत बुद्ध कठीण परिस्थितीतही विनयाचे नियम पाळायचे त्यामुळे त्यांना विनायक म्हटले जायचे. विनयाचे पक्के तथागत वेरज्जा ग्राम सोडून कुठे ही जाऊ शकत नव्हते.
योगायोगाने त्या गावात दुष्काळ असुनसुद्धा घोडे विक्रीचा बाजार दरवर्षीप्रमाणे भरला होता. घोड्यांचे व्यापारी यांजवळ घोड्यांना चारण्यासाठी जौ गहु पुष्कळ प्रमाणात होते. जे माणसांना खाण्यायोग्य अजिबात नव्हते.
भंते आनंद हे त्या गव्हाची भिक्षा मागुन आणत व ते गहु भिजवून, उखळात कुटुन खाण्यायोग्य करुन त्याची पेज तयार करून तथागतास पिण्यासाठी देत असत. तथागत सुद्धा हेच अन्न घेत असतं.
जेव्हा ते जौ गहु कुटल्या जायचे, वाटल्या जायचे तेव्हा एक विशिष्ठ प्रकारचा आवाज यायचा, तो आवाज ऐकुन तथागत बुद्धांना आश्चर्य वाटायचे. एक दिवस त्यांनी भंते
आनंद यांना विचारले की,
“आनंद, हा आवाज कसला आहे?”
तेव्हा आनंद यांनी तथागतास सगळी परिस्थिती सांगितली. यावर तथागत भिक्षुसंघास म्हणाले की तुम्ही सर्वांनी अतिशय विपरीत व वाईट परिस्थिती वर विजय मिळवला आहे. तुमच्या मनात लोभ व लालच नाही, जेवणाप्रती उपेक्षा भाव ठेऊन तुम्ही दुष्काळावर विजय मिळवला आहे तेव्हा तथागत उदान म्हणतात की सत्पुरुष कुठेच आसक्त होत नाही. सुख- दुःख, मान-अपमान सर्व परिस्थिती मधे एकसमान राहतात व आपल्या मनाचा चढउतार प्रदर्शित करत नाही.
वर्षावासाच्या या सुरम्य वातावरणात शिलससंपन्न उपासक व उपासिका देखिल अष्टशिलाचे परिपूर्ण पालन करुन उपोसथ व्रत धारण करु शकतात. वर्षावासाच्या या पोषक वातावरणात बुद्ध धम्म व संघाला वंदन करून शिलपालन, सुत्रपठण व ध्यान भावनेचा अभ्यास केल्यास भावनामई प्रज्ञेचा विकास होतो. कितीही महत्त्वाच्या कारणास्तव वर्षावासी भिक्षु वर्षावासाच्या नियमाचे उलंघन करू शकत नाही. अगदी प्राणाचीही पर्वा न करता. याच कालावधीत आदरणीय भिक्षुंना, उपासक व उपासिका यांना आदर्श बौद्ध आध्यात्मिक क्षेत्रातील श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी व अरहंत अशा महान संपदा प्राप्त होतात.
त्यामुळेच भगवान बुद्धांनी वर्षावासाला असाधारण महत्व दिले आहे.

You are in Dhamma 
✍️ राहुल खरे नाशिक
9960999363