July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

PM Narendra Modi : आनंदी, सुखी, समृद्धि जगासाठी हवेत बुद्धाचे विचार; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जागतिक बौद्ध परिषदेच्या उद््घाटनाच्या सत्रात ते बोलत होते. बुद्धाची शिकवण सांगणाऱ्या काही प्राचीन ग्रंथांचा संदर्भ देऊन मोदी पुढे म्हणाले की, लोकांनी तसेच देशांनी आपल्याबरोबरच जगाच्या हिताला प्राधान्य देणे ही काळाची गरज बनली आहे.

सारे जग युद्ध, आर्थिक अस्थिरता, दहशतवाद, धर्मांधता, हवामान बदल अशा असंख्य समस्यांना सामोरे जात आहे. त्या सोडविण्यासाठी भगवान बुद्धाचे विचार हा उपाय आहे. हे विचार आनंदी तसेच स्थिर जगाकडे जाण्याचा मार्ग आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

त्याकरिता बुद्धाच्या तत्त्वज्ञानापासून प्रेरणा घेता येईल. स्वकेंद्रीत जगापासून व्यापक विश्वाकडे, संकुचित दृष्टिकोन झटकून अखंडत्वाकडे वळण्यासाठी हे आवश्यक आहे. जगाला गरीब तसेच स्रोतांची उणीव असलेल्या देशांचा विचार करावा लागेल.

मोदी यांनी काही वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर एक भाषण केले होते. भारताने जगावर युद्ध लादले नाही, तर बुद्ध दिला असे उद्गार त्यांनी काढले होते. याचा उल्लेख त्यांनी याप्रसंगी केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या १४० कोटी लोकसंख्येच्या देशाकडे जग पाहात आहे, या देशाला ओळखत आहे आणि त्याचा स्वीकार करीत आहे, असेही ते पुढे म्हणाले.

सांस्कृतिक मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘समकालीन आव्हानांचा सामना ः तत्त्वज्ञान ते सक्रिय अवलंब” अशी परिषदेची संकल्पना आहे. यात ३० देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. त्यात बौद्ध भिक्खू, विद्वान, दूत तसेच राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात शांतता, पर्यावरण, नैतिकता, आरोग्य आदी विषयांवर परिसंवाद होतील.

वडनगर, वाराणसी अन्् बुद्ध : बुद्धाच्या विचारांचा प्रसार करण्याचा ध्यास आपल्या सरकारने घेतल्याचे नमूद करून मोदी म्हणाले की, गुजरातमधील वडनगर या माझ्या जन्मगावी बौद्ध धर्माशी संबंधित प्राचीन कलाकुसरीच्या वस्तू सापडल्या आहेत. वाराणसी या माझ्या मतदारसंघापासून सारनाथ हे ठिकाण, जेथे बुद्धाने सर्वप्रथम धम्माची शिकवण दिली, ते अगदी जवळ आहे.

बुद्धामुळे विश्वाच्या कल्याणासाठी पुढाकार : भगवान बुद्ध यांच्या शिकवणुकीपासून प्रेरणा घेत भारताने विश्वाच्या कल्याणासाठी पुढाकार घेतल्याचे नमूद करून मोदी म्हणाले की, भारत आता बुद्धाने दाखविलेल्या मार्गावरून वाटचाल करीत आहे. भारत इतर देशांसाठी मदतीचा हात पुढे करीत आहे. यात तुर्कीसारख्या भूकंपाचा हादरा बसलेल्या देशाचाही समावेश आहे. प्रत्येक मनुष्यप्राण्याची वेदना म्हणजे आपली वेदना होय अशी यामागील भावना आहे.

Buddhism | Buddhist Bharat | India