पौष पौर्णिमेला पाली भाषेत ‘फुस्समासो’ म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः जानेवारी महिन्यात येते. या पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या जीवनातील काही घटना घडल्यात. उदा. भगवान बुद्धाची राजगृहाला भेट, राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा, श्रीलंकेत पौर्णिमेचे महत्त्व, चैत्यपूजेचे महत्त्व. या पौर्णिमेला ज्या घटना घडल्यात, त्यांचा संक्षिप्तपणे परिचय असा
१) भगवान बुद्धाची राजगृहाला भेट
यो च वन्तकसावस्स, सीलेसु सुसमाहितो।
उपेतो दमसच्चेन, स वे कासावमरहित।। (धम्मपदं : १०)
( ज्याने स्वतःच्या मनाच्या मळाला दूर केले आहे, जो सदाचारी आहे, असा सत्य आणि संयमयुक्त व्यक्ती काषाय वस्त्राचा अधिकारी बनतो. )
सिद्धार्थ गौतमाने कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी येथे जाण्याचा विचार केला. राजा बिंबिसार हा तेथे राज्य करीत होता. मोठमोठे तत्त्वज्ञ आणि विचारवंत यांनी ‘राजगृह’ हे आपले मुख्य निवासस्थान बनविले होते. हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाहाची तमा न बाळगता सिद्धार्थ हा नदीचे पात्र ओलांडून पलीकडे गेला. राजगृह
दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर पाच टेकड्यांनी वेढलेल्या पर्वतराजींनी रक्षिलेल्या व सुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळां झालेल्या राजगृह नगरीत गौतम येऊन पोहोचला. पुनीत
राजगृहास आल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी एक जागा त्याने निवडली. तेथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्णकुटी त्याने तयार केली. कपिलवस्तू ते राजगृह हे ४०० मैलांचे अंतर आहे. एवढा लांबचा पल्ला गौतमाने पायीच गाठला.
दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ गौतम उठला आणि भिक्षेकरिता शहरात जाण्यासाठी निघाला. तेव्हा त्याच्या भोवती प्रचंड जनसमुदाय होता. त्यावेळी मगधापती श्रेणीय बिंबिसार राजाने हा प्रचंड जनसमुदाय पाहिला.
सिद्धार्थ मिळेल ती भिक्षा स्वीकारून तो पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन बसला आणि तिथे अन्नसेवन करून तो पांडव टेकडीवर चढून गेला. राजसेवकांनी राजाला सर्व हकिकत सांगितली. लवाजमा घेऊन टेकडी चढून गेला. त्यानुसार बिंबिसार राजा मोजकाच
शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मनःशांती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमाला राजाने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्ण आदरभावाने तो त्याच्याजवळ गेला. राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपल्या मनःस्थितीची कल्पना देण्याच्या हेतूने तो म्हणाला-
“धर्म, संपत्ती आणि सुख यांच्या नियमांना अनुसरून तू वाग. प्रेम आणि इतर गुण यांना तू अनुसर. जीवनाची ही तीन उद्दिष्टे आहेत. जेव्हा माणसे मरतात. तेव्हा केवळ या जगापुरताच त्यांचा अंत होतो.”
याप्रमाणे मगध राजाने गौतमाला योग्य आणि खंबीर शब्दात उपदेश केला. तो ऐकल्यावर राजपुत्र डळमळला नाही. तो पर्वताप्रमाणे अचल राहिला आणि म्हणाला-
“जगातील कलहामुळे मी घायाळ झालो आहे आणि शांतता मिळविण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे. या दुःखाचा अंत करण्याऐवजी या पृथ्वीचेच राज्य काय पण स्वर्गलोकाच्याही राज्याची मी अपेक्षा करणार नाही.” शेवटी बिंबिसार राजाने हात जोडून उत्तर दिले, “तुझी इच्छा तू पूर्ण करण्यास
माझी हरकत नाही. तुला जे जे काही करावयाचे आहे ते ते सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर “३ पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन गौतमाकडून घेतल्यावर राजा आपल्या सेवकांसह राजवाड्याकडे परतला.
राजगृह सुखीसमृद्ध हे मगध साम्राज्याची शेकडो वर्षे राजधानी राहिलेले वैभवशाली, असे महानगर व मुख्य बाजारपेठ होते. इ.स.पू. ५४३ ते ४९९ या कालखंडात राजगृह नगरी बिंबिसार राजाची राजधानी होती.
बिंबिसार राजाच्या वेळी तथागताच्या धम्माचा प्रभाव संपूर्ण मगध राज्यात वाढला होता. त्यावेळी अनेक राज्यांचे राजे भगवान बुद्धाचे निष्ठावंत उपासक झाले होते. राजगृह हे भगवान बुद्धाच्या धम्मप्रचाराचे प्रमुख केंद्र होते. राजगृह व त्याच्या आसपास बौद्ध धम्माची १८ साधना केंद्रे होती. राजगृह हे बौद्ध धम्माचे प्रमुख केंद्र होते. भगवान बुद्ध हे राजगृहाला एकूण २४ वेळा गेले होते,’ असा उल्लेख आहे.
तथागतांनी ‘राजगृहातील सर्व स्थळे फार रमणीय व सुंदर आहेत,’ अशी प्रशंसा केली होती. ही सर्वच ठिकाणे तथागताना आवडत असत.
भगवान बुद्धाचे महापरिनिब्बाण झाल्यानंतर कुशीनाराहून भगवंतांच्या पावन अस्थींचा एक भाग राजगृहाला आणण्यात आला आणि त्यावर नवीन राजगृहाच्या वेशीच्या दरवाजाच्या बाहेर एक भव्य अस्थिस्तूप बांधला गेला. त्यावेळी महाकाश्यपांनी त्याचे धातुनिधान केले होते. त्यांनी स्वर्णपत्रावर लिहिले होते, “पुढे भविष्यात प्रियदर्शी नावाचा राजकुमार राजछत्र धारण करून तो धर्मराजा होईल आणि तोच भगवंताच्या पवित्र धातूंचा जम्बुद्वीपात सर्वत्र विस्तार करेल.”
अशाप्रकारे, सुरुवातीला बिंबिसार राजाचा अर्ध राज्य देण्याचा प्रस्ताव सिद्धार्थाने नाकारला होता आणि सम्यक सम्बुद्ध झाल्यानंतर पुन्हा राजगृहाला भेट देण्याचे वचन दिले होते. तो दिवस इ.स.पू. ५३४ मार्गशीर्ष पौर्णिमेचा होता आणि ज्ञानप्राप्तीनंतर जेव्हा सम्यक संबोधी बनून जेव्हा तथागत वचनपूर्तीसाठी राजगृहास आले, तो दिवस पौष पौर्णिमा इ.स.पू. ५२७ चा होता.
२) राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा
अक्कोच्छि मं अवधी मं, अजिनि मं अहासि मे । ये च तं उपनहन्ति, वेरं तेसं न सम्मति ॥ (धम्मपदं : ३)
( ‘मला शिवी दिली’; ‘मला मारले’; ‘मला हरविले’; ‘मला लुबाडल अ गोष्टींचा जो विचार करीत असतो, त्याचे वैर कधीच शमन पावत नाही. ) राजगृह ही मगधराज श्रेणीय बिंबिसाराची राजधानी होती. त्या राजधानी फार मोठ्या संख्येने जटिलांनी धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे प्रत्येकजण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला.
राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले. अत्यंत सनातनी आणि दुराग्रही जटिलांना धर्मांतर करण्यास लावणारा माणूस निश्चितच अर्हत किंवा सम्यक सम्बुद्ध असला पाहिजे, असा विचार राजाने आपल्या मनाशीच केला.
राजा बिंबिसार मगधातील दशसहस्त्र ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह भगवान बुद्धाकडे गेला. भगवंतांच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन केले आणि हात जोडून तथागतासमोर बसले. बुद्धाच्या बरोबर असलेल्या भिक्खूंमध्ये उरुवेला काश्यप देखील होता.
त्यावेळी उरुवेला काश्यप आपल्या आसनावरून उठला. आपले उत्तरीय वस्त्र त्याने एका खांद्यावर नीट ठेवले. भगवंतांच्या चरणी नतमस्तक झाला आणि म्हणाला, “तथागत माझे गुरू आहेत. मी त्यांचा शिष्य आहे.’
याचा परिणाम तेथील उपस्थित द्वादश दशसहस्त्र ब्राह्मणांच्या आणि गृहस्थांच्या मनावर झाला. भगवंताने त्या सर्वांना धम्माचा उपदेश दिला. त्यावेळी एक हजार लोकांनी बुद्धाचे उपासक असल्याचे जाहीर केले.
भगवान बुद्धाने प्रतिपादन केलेला धम्म समजल्यावर मगधराज श्रेणीय बिंबिसार भगवंतांना म्हणाला, “भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या पाच इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत.’ त्या पाच इच्छा अशा आहेत-
भगवान, मी पूर्वी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला, माझा राज्याभिषेक झाला तर किती छान होईल. एखादा अर्हन्त सम्यक सम्बुद्ध माझ्या राज्यात आला तर किती चांगली गोष्ट होईल. भगवंताची सेवा करणे मला शक्य झाले तर किती चांगली गोष्ट होईल, भगवंतांने मला आपला धम्म शिकवावा, आणि शेवटी भगवंताचा धम्म मला कळावा, या पाचही इच्छा माझ्या पूर्ण झाल्या आहेत.
या पाचही इच्छा पूर्ण झाल्यावर मगधराज श्रेणीय बिंबिसार म्हणाला, ” आश्चर्य, हे भगवन, आश्चर्य! जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसवावी. जे गुप्त होते ते प्रगट करावे. वाट चुकलेल्याला मार्ग दाखवावा. ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे, त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली. हे केवढे आश्चर्य!”
असे म्हणून राजा बिंबिसार म्हणाला, “भगवन, मी भगवान बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण येत आहे. भगवंतांनी आजपासून मला आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा.
असे म्हणून राजा बिंबिसाराने तेथेच धम्माची दीक्षा घेतली. तेथे उपस्थित सर्व नागरिकांनीही धम्मदीक्षा घेतली. तो जनतेचा धम्म झाला. राजासह सर्व नागरिक बौद्धधम्माचे उपासक झाले, तो दिवस पौष पौर्णिमेचा होता. इ.स.पूर्व ५२७.
३) महाराणी खेमा यांची धम्मदीक्षा
ये रागरत्तानुपतन्ति सोतं,
सयंकतं मक्कटकोव जालं ।
एतम्पि छेत्वान वजन्ति धीरा अनपेक्खिनो सब्बदुक्खं पहाय || ( धम्मपदं : ३४७ )
( जे लोक रागात रत आहेत, ते स्वतः निर्माण केलेल्या जाळ्यात माकड़ी जशी सापडते तसे सापडतात, पण धीर पुरुष याला छेदून, अपेक्षारहित होऊन, सर्व दुःखांचा त्याग करून वाटचाल करतात. ) ”
मगधराज श्रेणीय राजा बिंबिसाराने भगवान बुद्धांना त्यांच्या भिक्खूसंघासह दुसऱ्या दिवशी भोजनाचे निमंत्रण दिले. भगवंतांनी ते मूक संमती देऊन स्वीकारले. भोजनानंतर राजा बिंबिसाराने राज्य परिवारातील सदस्यांना धम्मदीक्षा देऊन उपासक करावे, अशी विनंती केली.
भगवंताच्या सान्निध्यात येऊन आणि त्यांच्या मार्गनिर्देशनामुळे महाराजा बिंबिसारचे जीवनच बदलून गेले होते. राजा बिंबिसारावर एवढा परिणाम झाला होता की, राजा बिंबिसारास स्त्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली.
परंतु राजा बिंबिसारास एकच चिंता होती की, त्याची राणी खेमा ही भगवान बुद्धाला आदर देत नव्हती. ती अत्यंत देखणी होती. तिचा जन्म मध्यराष्ट्र सागल नावाच्या नगरात राजकुळात झाला होता. तिचे लग्न मगध देशाच्या बिंबिसार राजाबरोबर झाले होते.
राजगृहाजवळ वेळुवनात भगवान बुद्ध रहात असता बिबिसार राजा वारंवार त्यांच्या दर्शनास जात असे. ‘रूपावर आसक्त होऊ नका,’ असे वैराम्यपर उपदेश भगवान करीत असतो, असे खेमाच्या ऐकण्यात आल्यामुळे ती वेळुवनात जाऊ इच्छित नव्हती.
राजाने आपल्या पदरच्या कवीकडून वेळुवनातील वनश्रीवर काव्य रचून ते तिच्या समोर म्हणावयास लाविले. उद्यानश्रींची ती रसभरित वर्णने ऐकून खेमेला तिकडे जाण्याची उत्कट इच्छा झाली. राजाची तिने परवानगी मागितली. राजा म्हणाला, “बेळुवनात जाऊन भगवंताचे दर्शन घेतल्याशिवाय येता कामा नये. ”
खेमा वेळुवनाची शोभा पाहून बुद्धदर्शन घेतल्यावाचून माघारी येऊ लागली. तेव्हा तिला दिलेल्या राजाज्ञेची आठवण आली. त्यामुळेच नाखुशीनेच तिला भगवंताचे दर्शन घेणे भाग पडले.
भगवंताजवळ येऊन पाहते, तर त्याच्या मागे एक अत्यंत लावण्यवती स्त्री चारा घालीत उभी होती. तिला पाहून खेमा आपल्या मनात म्हणाली, ‘अशा दिव्य स्त्रिया ज्या महर्षीच्या सेवेला तत्पर असतात, त्याच्या दर्शनाची मला लाज वाटावीना ? धिक्कार असो मला आणि माझ्या आढ्यतेला ! ह्या अप्सरेची मी दासी देखील शोभणार नाही.”
हे विचार खेमेच्या मनात चालले असताना ती सुंदर स्त्री क्रमाक्रमाने पालटत चालली. ती प्रौढ, म्हातारी व मरून पडलेली दिसली. हे पाहून आपला रूपाविषयी खेमेचा अभिमान नाहीसा झाला.
तेव्हा भगवान म्हणाले, “कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे आपल्या भोवती जाळे विणून त्यात कामासक्त मनुष्य बद्ध होतात. परंतु हेही तोडून आणि कामसुखाचा त्याग करून (सत्पुरुष) निरपेक्षपणे परिव्राजक होतात. ७
हा उपदेश कानी पडल्याबरोबर खेमा तिथल्या तिथे अर्हतपदाला पावली. पुढे राजा बिंबिसाराच्या परवानगीने ती भिक्षुणी झाली. ती केवळ भिक्खुणीच झाली नाही तर प्रज्ञावती भिक्खुणीत तिला अग्रस्थान मिळाले.
४) स्तूपाची पूजा
सद्धो सीलेन सम्पन्नो, यसोभोगसमप्पितो। यं यं पदेस भजति, तत्थ तत्थेव पूजितो || (धम्मपदं ३०३)
(जो श्रद्धावान आहे, जो सदाचारी आहे, जो यशस्वी आहे, जो संपत्तीशाली आहे, तो जिथेजिथे जातो तिथेतिथे तो पूजित होतो.)
श्रीलंकेच्या इतिहासात पौष पौर्णिमेला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी भगवान बुद्धाचे श्रीलंकेत आगमन झाले होते, अशी त्यांची मान्यता आहे.
श्रीलंकेच्या ‘उवा’ भागातील ‘महियांगण’ या परिसराला बुद्धाच्या प्रथम पादस्पर्शाचे भाग्य लाभले. भगवान बुद्धाच्या केशधातूवर भव्य स्तूपाची निर्मिती झाली. भगवान बुद्धाच्या शारीरिक अवशेषांना अतिशय पवित्र मानले जाते. त्या प्रति पूज्य आदरभाव व्यक्त केला जातो.
दीघनिकायातील ‘महापरिनिब्बाण सुत्तात’ असा उल्लेख आहे की, भगवान बुद्धाच्या अंत्यसंस्कारानंतर मल्ल राजाने एका स्वर्णपात्रात बुद्धावशेष गोळा करून सन्मानाने अत्यंत आदरपूर्वक कुसीनारा येथे सात दिवस ठेवले. त्यानंतर त्याचे आठ भागात विभाजन करून आठ विभिन्न राज्यात पाठविले. त्यावर भव्य स्तूप उभारण्यात आले. सम्राट अशोकाने त्यांच्या राज्याभिषेकाच्या आठव्या वर्षी या स्तूपांचे उत्खनन करविले आणि त्यात सापडलेल्या बुद्धावशेषावर चौऱ्यांशी हजार स्तूपांची निर्मिती केली.
सम्राट अशोकपुत्र अर्हत महेन्द्र थेरो यांच्या श्रीलंका भेटीने आणि श्रीलंकेतील धार्मिक राजांच्या सहयोगाने बुद्धाचे जवळ जवळ सर्व प्रकारचे अवशेष श्रीलंकेने जतन करून ठेवले आहेत.
भगवान बुद्धाच्या पश्चात बौद्धजगत तीन प्रकारच्या चैत्यांची पूजा करते. आनंदाच्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल भगवान बुद्धाने तीन प्रकारच्या चैत्यांचा उल्लेख केला. १) बुद्धाचे शारीरिक अवशेष, २) पारिभोगीका (भगवान बुद्धाने) वापरलेल्या वस्तू ३) उद्देसिका,
बुद्धावशेष ज्या चैत्यात, स्तूपात ठेवले जातात अशा चैत्याची वा स्तूपाची
पूजा केली जाते. बुद्ध प्रतिमास पाहून प्रसिद्ध तत्त्ववेत्ता काऊंट केसलिंग लिहितो-
“बुद्धरूपापेक्षा जगात आणखी काही भव्य असेल असे मला वाटत नाही. डोळ्यांनी पाहता आलेले आध्यात्मिकतेचे ते परिपूर्ण मूर्तरूप आहे. “”.
पौष पौर्णिमेला श्रीलंकेत जशी स्तूपांची पूजा करतात तद्वत भारतात देखी स्तूपाची वा प्रतिमेची पूजा केली जाते.
संदर्भ :
१. धम्मपदं, संपा. डॉ. धनराज डाहाट, संकेत प्रकाशन, नागपूर, द्वि.आ. २०११, पृ.११
२. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉ. भी. रा. आंबेडकर, सिद्धार्थ प्रकाशन, मुंबई आवृत्ती १९८०, पृ. ५०
३.तथागत आणि बौद्ध स्थळांचा इतिहास, पी.जी. रायबोले, ‘शीलवंश,’ नभ प्रकाशन , अमरावती, प्र.आ. २०११, पृ. १७४
४. धम्मपदं, पृ. १०.
५. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, पृ. ११४
६. धम्मपदं, पृ. ९९
७. बौद्धधर्मावरील चार निबंध, धर्मानंद कोसंबी, म.रा. साहित्य संस्कृती मंडळ, मु पुनः प्रकाशन १९८२, पृ. ३०५
८. धम्मपद, पृ. ८७
९. बौद्ध पौर्णिमा, अनु. सु.नि. बोरकर, साक्षी प्रकाशन, नागपूर, प्र. आ. २०१२, पृ ६१.
१०. बौद्धधम्म आणि पौर्णिमा डॉ . धनराज डाहाट अभ्यास संग्रह साभार .
Paush Purnima ! पौष पौर्णिमा ! buddhist bharat !
More Stories
अश्विन पौर्णिमा – अस्सयुज मासो Ashwin Purnima
भाद्रपद पौर्णिमा – पोट्ठपाद मासो Bhadrapada Poornima – Potthapada Maso
आषाढ पौर्णिमा Ashadha Purnima