बुद्ध जयंती निमित्त अखिल भारतीय बौद्धजन समितीची दिल्ली येथील शाखा ‘ बौद्धजन महासभा ‘ तर्फे आयोजित सभेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….
अखिल भारतीय बौद्धजन समितीची दिल्ली येथील शाखा ‘ बौद्धजन महासभा ‘ तर्फे दिनांक २३ जून १९५६ रोजी दिल्ली येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी बुद्ध जयंती निमित्त सभेचे आयोजन केले होते. बुद्ध जयंती निमित्त आयोजित केलेल्या या सभेसाठी दिल्ली आणि आसपासच्या विभागातील निवडक अस्पृश्य आणि बौद्धजन उपस्थित होते.
प्रचंड मिरवणूक
सभेच्या पूर्वी दिल्ली शहरातून भगवान बुद्धाच्या प्रतिमेची आणि त्यांच्या जीवन प्रसंगावरील लहान मुलांनी अभिनित केलेल्या सजीव दृश्यांची प्रचंड मिरवणूक काढण्यात आली होती.
मिरवणुकीत भाग घेऊन ती यशस्वी करणाऱ्या सुयोग्य कार्यकर्त्यांना व बालक अभिनेत्यांना डॉ. बाबासाहेबांच्या हस्ते रौप्य पदके व भगवान बुद्धाच्या प्रतिमा वितरण समारंभ झाला.
बुद्ध जयंती निमित्ताने आयोजिलेल्या या समारंभ सभेत उपस्थितांना संबोधित करतांना प. पू. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
बंधु आणि भगिनींनो,
बौद्ध धर्म हा वास्तववादी धर्म आहे. नुसत्या काल्पनिक गोष्टींवर बुद्धाने आपल्या धर्माची उभारणी केली नाही. त्याचमुळे ईश्वर आणि आत्मा किंवा अशाच भलभलत्या गोष्टी बुद्धाला मान्य नव्हत्या. जे मानवाला अनुभवता येत नाही किंवा ज्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही, अशा कोणत्याही गोष्टीवर बुद्धाचा विश्वास नव्हता.
प्रत्येक धर्माला दोन बाजू असतात. एक विचारावर आधारलेली तात्त्विक आणि दुसरी नीती नियम. यातील एक अधिक महत्त्वाची व दुसरी कमी महत्त्वाची आहे, असे म्हणता येणार नाही. ब्राह्मण धर्माच्या या दोन्ही बाजू पडताळून पाहिल्या तर हा धर्म विघातक असल्याचे आपल्याला आढळून येईल. कारण मानवा-मानवात असमानता व विषमता ही हिंदू धर्माची वैचारिक बैठक आहे. ब्राह्मण भ्रष्ट असो की महामूर्ख असो तो सर्वश्रेष्ठ आहे, ही या धर्माची शिकवण ! ब्राह्मणापेक्षा क्षत्रिय कनिष्ठ, क्षत्रियापेक्षा वैश्य आणि वैश्याहून शूद्र. शेवटच्या तीन वर्णांना अध्ययनाचा अधिकार नाही. ब्राह्मणाला अध्ययनाचा अधिकार असल्यामुळे साहजिकच सर्व वर्गासाठी विचार करण्याचे राखीव अधिकार ब्राह्मणांकडे होते. एकट्या क्षत्रियाने देशाचे रक्षण करावे. कशी आत्मघातकी व्यवस्था होती ? एकाच्या हाती तलवार देऊन त्याच्यावर विसंबून राहाण्यास सर्वांना सांगण्यात आले. याचा परिणाम हा झाला की जेव्हा जेव्हा क्षत्रियांचा पराभव झाला तेव्हा तेव्हा सर्व देशच्या देश शत्रुंनी पादाक्रांत केला.
माझ्या या विधानाला इतिहास साक्ष आहे. १९३९ ते १९४५ या दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात युरोपात देखील उण्यापुऱ्या १०० लढाया झाल्या. त्यातील काहीत पराभव झाला तर काही जिंकल्या गेल्या. परंतु सर्व युरोपभर हिटलर कधीच स्वामित्व गाजवू शकला नाही. सरते शेवटी, हिटलरचा पराभव होऊन सर्व युरोपचे रक्षण झाले. कारण भारतासारखी तेथे एकाच वर्णावर देशरक्षणाची जबाबदारी टाकण्यात आलेली नव्हती. जेव्हा जेव्हा मुसलमानांनी भारतावर आक्रमण केले आणि रजपुतांचे शिरकाण केले तेव्हा तेव्हा जणूकाही सर्व देशच निर्वीर्य झाला.
ज्यांचे ध्येय फक्त नफा मिळविण्याचे व संपत्ती गोळा करण्याचे आहे, असा एक वर्ग आहे. त्यांना आपण ‘ वाणी ‘, ‘ बनिया ‘ अथवा उत्तरेकडे ‘ लाला ‘ या नावाने ओळखतो. देशाच्या कल्याणाची अथवा इतर कोणाच्या भलाईची चिंता ते कधीच करीत नाहीत. संपत्ती जमा करण्यात त्यांच्यासारखा हावरा आणि महालोभी माणूस सापडणार नाही. देश तिकडे युद्धात हरला तरी चालेल पण हा युद्ध साहित्यात देखील नफा उकळल्याशिवाय राहाणार नाही.
प्रत्येक पौर्णिमेला असे समारंभ घडवून आणण्याचा समितीचा मनोदय आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पौर्णिमेच्या प्रशांत वातावरणात पूर्ण चंद्राच्या शीतलतेत माणसाला आपल्या कार्याचे सिंहावलोकन शांततापूर्वक आणि गांभीर्याने करण्याची संधी मिळते, हेच पौर्णिमेचे वैशिष्ट्य होय.
गत काळात दैनंदिन्या, रोजनिशा, कॅलेंडर्स नसायची. तेव्हा कालगणना करण्यासाठी लोक पौर्णिमेच्या दिवशी उपवास करीत असत. इतर धर्मीयांप्रमाणे उपवासामुळे आपली सर्व पापे धुवून जातील आणि आपल्याला स्वर्गलाभ होईल अशी बुद्ध धर्माची शिकवण नाही. बौद्ध धर्मात अनाकलनीय वस्तु अथवा वर (बक्षिस) यांना स्थान नाही. ज्या वस्तुंची माणसाला जाणीव होऊ शकेल, ज्यांना स्पर्श करू शकेल, ज्यांच्याविषयी बोलू शकेल आणि ज्यांचा माणूस नाश करू शकेल अशाच वस्तु किंवा गोष्टींविषयी बुद्धाने उपदेश केला आहे.
प्रत्येकाला धर्माची परीक्षा करुन त्याची तपासणी करता आली पाहिजे. बाजारात सराफाच्या दुकानी आपण सोन्याचा दागिना खरेदीसाठी जातो. तेव्हा तुम्ही काय करता ? तुम्ही हे पाहाता की, हे सोने खरे आहे की खोटे ? हे समजून घेण्यासाठी कसोटीवर त्या दागिन्याला कस लावून पाहाण्यात येतो. तसेच धर्माला ‘ कस ‘ लावून त्याची परीक्षा पाहिली पाहिजे, धर्म तत्त्वांची छाननी करून, सिद्धांत आणि आचार पडताळून आपण पाहू या की कोणता धर्म माणसाला सुखसमाधान देऊ शकेल ?
या दृष्टिकोनातून पाहिल्यास मानव समाजाच्या अस्तित्वाला ब्राह्मणी धर्म नुसता विघातकच नाही तर भयंकर विषारी आहे. महाराष्ट्रात देवगिरीच्या रामराव यादवांचा पंतप्रधान हेमाडपंत नामक ब्राह्मण होता. त्याने आचारविधी कर्मकांडांचे सातशे प्रकार आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहेत. एका वर्षात दिवस ३६० च असतात. मग हे सातशे विधी कशासाठी ? हेमाडपंत ब्राह्मण असल्यामुळे त्याने हे सातशे ‘ आचार ‘ लिहून ठेवून ब्राह्मणांच्या पोट भरण्याची परस्पर सोय करून ठेवली आहे.
दुसरा तसाच प्रकार सत्यनारायण कथेचा ! ही ‘ सत्यनारायणाची कथा ‘ दुसरे तिसरे काही नसून ब्राह्मणांच्या शिधा/भोजनाची सोय करून ठेवण्यासाठी कोणा ब्राह्मणाच्या सुपीक मेंदुतून निघालेला शोध आहे. सत्यनारायण पूजेचा समारंभ पाहिला तर तुम्हाला आढळून येईल की सत्यनारायणाला अर्पण करण्यासाठी जी मेवामिठाई आणि फळफळावळे असतात ती फक्त ब्राह्मणांच्याच खाण्याच्या उपयोगी असतात. एखाद्या जातीबरोबर पंगतीत आपण जेवावे की नाही हे ठरविण्याचा अधिकार ब्राह्मणाचा. आपल्यापेक्षा नीच समजून ब्राह्मणाने त्या जातीने तयार केलेले भोजन जेवण्यास नकार दिला तर ब्राह्मणाला त्या बदली अंदाजे वीस रुपये आणि काही फळफळावळे प्राप्त करून घेता येतात. तो ब्राह्मण ते जेवण्याच्या बदली मागतोच. शूद्राने तयार केलेले जेवण त्याला चालत नाही. परंतु त्याच्याऐवजी स्वतःच्या घरी शिजविता येईल अशी सर्व शिधासामग्री ब्राह्मण त्या शूद्राच्या घरून गोळा करून घेऊन जातो. शूद्राने कितीही पवित्र सोवळ्याने त्याच शिधासामग्रीचा उपयोग करून जेवण तयार केले तर ते चालत नाही. कारण अशी शिधासामग्री त्याच्या पाच दहा दिवसांची सोय करून देण्याइतपत असते.
जर ‘ नारायण ‘ स्वतःच खरा असेल तर ‘ सत्य ‘ हा शब्द आणखी का जोडण्यात आला आहे ? यांचा हा ‘ नारायण ‘ नाहीच. ब्राह्मण-पंडितासारखाच तो पिळवणूक करणारांचा रक्षणकर्ता आहे एवढेच. हे सर्व फोल आचारविधी आहेत.
काही लोक गंगेवर स्नानासाठी जातात. गंगेच्या किनाऱ्यावर ब्राह्मण बसलेले असतातच ! स्नानासाठी जाणाऱ्या प्रत्येक माणसाकडून दक्षिणा (पैसा) उकळण्यासाठी ब्राह्मण तयार असतो. गंगा ही नदी अविरत वाहत आहे. गंगा काही स्नानासाठी पैसे मागत नाही किंवा कोणाला घ्यायला सांगत नाही. ब्राह्मणाला एक आणा देऊन ब्राह्मणाने काही मंत्र पुटपुटावे आणि नंतर गंगास्नानासाठी परवानगी द्यावी, याची काही आवश्यकता आहे काय ? भोळ्या लोकांची समजूत अशी की अशारितीने ब्राह्मणाला दक्षिणा देऊन गंगा नदीत स्नान केल्यास सर्व पापे धुवून जातात. काय मूर्ख आहेत ते सारे ! गंगा नदी आणि लोक यांच्यामध्ये ब्राह्मण हा दलाल मानण्यात येतो, हे मोठेच आश्चर्य आहे.
जर पाप गंगा स्नानाने व ब्राह्मणांना दक्षिणा वगैरे दिल्याने धुवून जात असेल, नाहिसे होत असेल तर माणूस माणसाविषयी मुळीच सहानुभूती बाळगणार नाही. परस्परांवर प्रेम करणार नाही. अशा अवस्थेत कायद्याची आवश्यकताच उरत नाही आणि सरकारचेही महत्त्व शिल्लक राहात नाही. परंतु हे स्वीकारण्यास कोणीही तयार नाही.
मी मंत्री असताना एकदा हरिद्वार येथे गेलो होतो. मंत्री असल्यामुळे मला तेथे चारी बाजूंना पाणी असलेले एक लहान मंदीर दाखविण्यात आले. त्याला ‘ हर की पायरी ‘ म्हणतात. तेथील पाण्यात माणसाची हाडे आणि इतर सर्व घाणेरड्या वस्तू जमा झाल्या होत्या. एखादे गटार त्यापेक्षा बरे असे वाटत होते. अशा त्या ‘ हर की पायरी ‘ च्या घाण पाण्यात प्रत्येक स्त्री-पुरुष आंघोळ करीत होते. त्या पाण्यामध्ये मृतांच्या अस्थी टाकल्यावर ब्राह्मणांच्या मध्यस्थीने त्यांचे आप्त-नातलग स्वर्गाला जातील आणि तेथे स्नान केल्यावर हे सगे-सोयरे पवित्र होतील, ही खुळचट श्रद्धा का असावी, हे मला कळत नाही. मला वाटते, या सर्व गोष्टींचा विचार केलाच पाहिजे.
सोने कसोटीवर खरे उतरल्याशिवाय विकत घेत नाहीत तसेच धर्म देखील मानवाला उपयोगी आहे किंवा नाही या कसोटीवर घासून, पारखून पाहिला पाहिजे. जोपर्यंत धर्माची अशी परीक्षा होत नाही तोपर्यंत तो स्वीकारणीय ठरणार नाही. आमचे जुने लोक अशिक्षित असल्यामुळे ब्राह्मणांच्या प्रत्येक शब्दावर त्यांनी भोळेपणाने विश्वास ठेवला. आता काळ बदलला आहे ; तुम्ही संपूर्ण विचाराअंती धर्माचा स्वीकार केला पाहिजे.
हिंदू आणि बौद्ध धर्मात महान अंतर आहे. मी ते सर्व तुम्हाला समजावून देतो. मिलिन्द राजाने भिक्खु आचार्य नागसेनाशी केलेली चर्चा प्रश्नोत्तर रुपाने ‘ मिलिन्द पन्ह ‘ ग्रंथात दिलेली आहे. त्याची आठवण मला या प्रसंगी झाली आहे. मला लोक विचारतात भारतातून बौद्ध धर्म का विलयाला गेला ? असाच एक प्रश्न मिलिंद राजाने भिक्खु नागसेनला विचारला होता. मिलिंद राजा म्हणाला, धर्माचा ऱ्हास का होतो ? तेव्हा आचार्य नागसेन यांनी उत्तर दिले होते की धर्म ऱ्हासाची तीन कारणे आहेत :–
(१) जो धर्म तात्कालिक (सामयिक) असतो, म्हणजे त्या काळापुरता असतो तो विलयाला जातो. ज्या काळापर्यंत धर्म जनमनाची पकड घेतो, तोपर्यंत तो धर्म राहातो.
(२) जर धर्मोपदेशक विद्वान नसतील आणि जर चर्चेच्या प्रसंगी ते आपल्या धर्माचे उत्तमरितीने प्रतिपादन करून यशस्वी होऊ शकत नसतील, तर तो धर्म विलयाला जातो.
(३) जेव्हा सर्वसाधारण माणूस खऱ्या धर्मावर विसंबून राहात नाही केवळ नक्कल करतो त्यामुळे धर्म विलयाला जातो. कारण नक्कल चिरंतन नसते.
भारतातून बौद्ध धर्माच्या ऱ्हासाची जी कारणे आहेत त्यांच्याशी या कारणांचा सरळ संबंध नाही. मी या संबंधात कोणाशीही चर्चा करायला तयार आहे.
मी तुम्हाला सांगतो की जगातील अखिल मानवाच्या कल्याणासाठी सदासर्वकाळ फक्त बौद्ध धर्मच राहील. मुसलमानांनी या देशावर आक्रमण करून बौद्ध विहारांचा नाश करून बुद्ध मूर्ती फोडल्यामुळे त्यांना ‘ बुत शिकन् ‘ म्हणजे मूर्ती फोडणारे म्हटले जाते. यातील ‘ बुत ‘ हा मूर्तीसाठी शब्द आहे. तो ‘ बुद्ध ‘ या मूळ शब्दाचे विकृत (अपभ्रंश) रूप आहे. मुस्लिमांच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाबाबत मी एक पुस्तक लिहीत आहे.
एके काळी अफगाणिस्तान हा संपूर्ण बौद्ध देश होता. आक्रमक मुसलमानांना तेथे पिवळी वस्त्रे परिधान केलेले लोक इकडून तिकडे जाताना आढळले. मुसलमान सरसेनापतीने त्यांना इस्लामी धर्माचा स्वीकार करण्याचा निरोप पाठविला. पण भिक्खुंनी तसे करण्यास नकार दिला. एक दिवस हा सरसेनापती अरण्यातून जात असताना त्याला तेथील झाडावर माणसांची मुंडकी लटकलेली आढळून आली व आश्चर्य वाटले. जवळजवळ सातशे बौद्ध भिक्षुंची कत्तल करून त्यांची डोकी झाडावर टांगण्यात आली होती. हे पाहून आपल्या हुकूमाची चुकीची अंमलबजावणी झाल्याचे पाहून त्या सरसेनापतीला फार खेद झाला. तोपर्यंत आपला जीव व धर्म वाचविण्यासाठी सर्व भिक्खु पुढे चीन, तिबेट आणि इतर देशात पळून गेले होते. तेच भिक्खु पुढे जपानला गेले.
मुसलमानांनी बौद्ध व हिंदू धर्मावर आक्रमण केले होते, ही गोष्ट खरी आहे. त्यांनी हिंदू व बौद्ध दोन्ही धर्माची मंदिरे उध्वस्त केली परंतु बौद्ध धर्माचा जो संबंध आहे त्याबाबतीत एवढेच सांगता येईल की बऱ्याच भिक्खुंची कत्तल होऊन काही उरलेल्यांनी देशांतर केल्यामुळे बौद्ध अनुयायांना आपण कोणाचे अनुसरण करावे ते कळेनासे झाले. बौद्ध अनुयायी अन्धःकारात चाचपडत होते. कारण भिक्खु हा जन्मतः भिक्खु होत नाही ; तो घडविला जातो. त्याच्यावर अनेक संस्कार होतात. असे भिक्खु मुस्लिम आक्रमणानंतर देशात उरले नव्हते.
भिक्खु विद्वान आणि तावून सुलाखून निघालेला असावा लागतो. मिक्खुंच्या शिक्षणाच्या निरनिराळ्या पायऱ्या असत. अठरा वर्षाचा विद्यार्थी ज्येष्ठ भिक्खुकडे पाच वर्षे उच्च धार्मिक विद्यार्जनासाठी पाठविण्यात येत असे. तेथे चांगला अभ्यास केल्यावर वयाच्या पंचविसाव्या वर्षी तो ‘ श्रामणेर ‘ होण्याची योग्यता संपादन करीत असे. ‘ श्रामणेर ‘ पुढे पाच वर्षे धकाधकीच्या आयुष्यातून गेल्यावर त्याची भिक्खु म्हणून ‘ उपसम्पदा ‘ होत असे. म्हणजे साधारणतः पंचवीस वर्षे वयापर्यंत योग्य विद्याध्ययन करून, चांगले आचरण ठेवण्यास उतरलेलाच भिक्खु होऊ शकत असे.
ब्राह्मण पुरोहितांचे तसे काहीच नव्हते. ब्राह्मणाच्या घरात जन्माला आला की झाला तो पुरोहित, त्याला विद्याध्ययनाची, सद्वर्तनाची किंवा दुसरी कसलीही अट नव्हती. त्यामुळे जरी ब्राह्मण धर्मावर हल्ला झाला, त्यांची मंदिरे नष्ट झाली. तरी ब्राह्मण जन्माला येऊ लागले आणि ते आपल्याला ब्राह्मण धर्माचे म्हणवू लागले.
भिक्खुंचे अस्तित्व न राहिल्याने साधारण जन अशा ब्राह्मणांच्या तडाख्यात सापडले. या ब्राह्मणांना त्यामुळे मोकळे रान मिळाले व ते आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करू लागले.
ईश्वर आहे काय ? गरीब लोकांची पिळवणूक करून धर्माच्या नावाखाली ज्यांना लुटावयाचे आहे, त्यांनीच ईश्वराचे बुजगावणे उभे केले आहे.
महिलाही या सभेला उपस्थित आहेत ही चांगली गोष्ट आहे. परंतु स्वतःचे चेहरे पदराने झाकून ठेवणे चांगले नाही. निर्भयतेने जीवन जगण्यास शिका. अस्पृश्य स्त्रियांची सर्वांगीण सुधारणा झाल्याखेरीज अस्पृश्य समाजाची सुधारणा पूर्ण होणार नाही.
🔹🔹🔹
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर