January 16, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

झालो धरतीच्या हवाली –  प्रा. नंदू वानखडे

‘बहिष्कृत : त्यांना जगण्याचा अधिकार नाही..
बोलण्याची मुभा नाही…
भटका ,फुटका ,उन्हाचा चटका
दारिद्रयाचा फटका,
गावापासून कोसो दूर …
कसला निर्धोक कसला ऊर..?
कसला चेहरा कसला नूर ?
जन्मलो आकाशाच्या खाली
झालो धरतीच्या हवाली..
पिढ्यान्यूपिढ्या अंधारात
हा कोणत्या जन्माचा शाप…?
हिंडलो निर्जन कड्या-कपारी
प्रत्येक पाऊल घेत उभारी
कसे जगलो सांगवत नाही
चित्र आधीचे बघवत नाही….
विस्थापित राहून प्रस्थापितांचे झालो भक्ष ..
पोट-फुग्यांचे झालो लक्ष….
नाही पुढारी ना कैवारी
बघाआठवून बहिष्कृत ते नर-नारी..
जंगल ,झाडे इतकेच ते धन
कुठे असेल हे त्यांचे ते मन,
पिढ्या पिढ्यांची होरपळ जगलो
फिनिक्स होऊन तरीही तगलो
वादळवारे ,पुरांच्या लाटा
वास्तव्याला चिखलगाटा
जन्माआधीच
उधळीची वारूळ नेस्तनाबूत करून गेली…
जितेपणी मरण भोगले
आशा, आकांक्षा मरून गेली…

हृदय विदारक मानहानीचे
भोगले का मी काहीतरी क्षण ?
बहिष्कृत वा भटक्यासाठी
हळहळले का माझे मी पण ?

–प्रा. नंदू वानखडे, मुंगळा जि.वाशिम —
9423650468