मार्गशीर्ष पौर्णिमेला पाली भाषेत ‘मागसिर मासो’ म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः डिसेंबर महिन्यात येते. या पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या जीवनातील ज्या घटना घडल्यात त्या अशा राजा बिंबिसाराची प्रथम भेट, देवदत्ताची ईर्षा, संघमित्राचा श्रीलंकेत प्रवेश. या पौर्णिमेला ज्या घटना घडल्यात, त्यांचा संक्षिप्तपणे परिचय असा-
१) राजा बिंबिसाराची प्रथम भेट
सुखाकामानि भूतानि, यो दण्डेन न हिंसति ।
अत्तनो सुखमेसानो, पेच्च सो लभते सुखं।। (धम्मपदं : १३२)
(सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्याची जो कोणी स्वतःच्या सुखासाठी दंडाने हिंसा करीत नाही, त्यास मेल्यानंतरही सुख मिळते.)
सिद्धार्थ गौतमाने कपिलवस्तू सोडल्यावर तो मगध देशाची राजधानी राजगृह येथे आला. राजा बिंबिसार तेथे राज्य करीत होता.
सिद्धार्थाचे आकर्षक व्यक्तिमत्त्व, उदात्त वागणूक आणि इतर सर्व पुरुषांना मागे टाकणारे त्याचे विलोभनीय सौंदर्य पाहिल्यावर त्या प्रदेशातील लोक त्याने अंगावर संन्यासाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले.
त्याच्या भुवया, त्यांचा भालप्रदेश, त्याचे मुख, त्याचे शरीर, हात-पाय किंवा त्याची चालण्याची ढब यापैकी त्याच्या कोणत्याही भागाकडे नजर गेली की त्याक्षणीच त्यांची दृष्टी तेथे खिळून राही.
राजगृहाला आल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी त्यांने पर्णकुटीत मुक्काम केला.
दुसऱ्या दिवशी तो उठला. भिक्षेसाठी शहरात जाण्यासाठी निघाला. फार मोठा जमाव त्यावेळी त्याच्या भोवती जमला.
त्यावेळी मगधापती श्रेणीय बिंबिसार राजाने राजवाड्याच्या बाहेर लोकांचा तो प्रचंड जनसमुदाय पाहिला. त्याने एवढे लोक जमण्याचे कारण विचारले. तेव्हा एका राजसेवकाने त्याला पुढील हकिकत सांगितली.
“ज्यांच्याजवळ ब्राह्मणांनी असे भविष्य वर्तविले होते की, हा एक तर उच्चतम ज्ञान प्राप्त करून घेईल किंवा या पृथ्वीचा सम्राट होईल. तोच हा शाक्यांचा राजाचा पुत्र आहे. त्यालाच पाहण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत.”
सिद्धार्थ गौतम मिळेल ती भिक्षा स्वीकारून तो पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन बसला. तेथे अन्नसेवन करून तो पांडव टेकडीवर चढून गेला.
ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम आसनस्थ झाला होता त्याठिकाणी राजा बिंबिसार गेला. त्याच्या शेजारी बसून त्याच्या शरीर स्वास्थ्याविषयी विचारपूस केली. आणि म्हणाला, “बाळ, तुझ्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे. ती वंशपरंपरागत असून तिची दृढता चांगली सिद्ध झालेली आहे. म्हणूनच तुला काही सांगावे अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे. माझे प्रेमाचे शब्द तू ऐक.”
“धनुष्याची दोरी खेचण्यास लायक असलेले तुझे दोन बलवान बाहू निरुपयोगी राहू देऊ नकोस. ते ही पृथ्वीच काय पण त्रैलोक्य जिंकण्यास अधिक समर्थ आहेत.”
“याचकांचे जीवन जगू इच्छिणाऱ्या गौतमा, नामवंत अशा तुझ्या वंशाला साजेसे तुझे सौंदर्य, वार्धक्य येऊन नष्ट होण्यापूर्वी वेळ गेली नाही तोपर्यंत, आताच सर्व सुखांचा उपभोग घे.”
अशाप्रकारे, राजा बिंबिसाराने सिद्धार्थ गौतमाला समजाविण्याचा खूप प्रयल केला. तेव्हा गौतमाने आपल्या शांत आणि स्नेहपूर्ण चेहऱ्यात बदल न करता खंबीर शब्दाने व खणखणीत वाणीने अनेक उदाहरणे देऊन उत्तर दिले. आणि म्हणाले, “आपण जे मला सांगितले ते आपले चारित्र्य, आपला जीवनमार्ग आणि आपले कूळ यांना शोभेल असे आहे. आणि माझा निश्चय पार पाडणे हे देखील माझे चारित्र्य, माझा जीवनमार्ग आणि माझे कूळ यांना शोभेल असेच आहे.”*
शेवटी राजा बिंबिसार म्हणाला, “तुझी इच्छा तू पूर्ण करण्यास माझी हरकत नाही. तुला जे काही करावयाचे आहे ते सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर.” स्वतः राजाने आपले दोन्ही हात जोडून उत्तर दिले. आणि पुन्हा भेटण्याचे आश्वासन गौतमाकडून घेतल्यावर राजा आपल्या सेवकांसह राजवाड्याकडे परतला.
२) देवदत्ताची ईर्षा
यस्स अच्चन्तदुस्सील्यं, मालुवा सालमिवोत्थतं ।
करोति सो तथत्तानं, यथानं इच्छती दिसो ।। (धम्मपदं : १६२)
(शाल वृक्षावर आच्छादित मालुवा लतेप्रमाणे ज्याचा दुराचार पसरला आहे, तो स्वतःसाठी तसेच करतो, जसे त्याचे शत्रू इच्छितात.)
देवदत्त हा सिद्धार्थ गौतमाचा आतेभाऊ आणि यशोधरेचा मावसभाऊ होता. तो बालपणापासूनच हेकेखोर व दुष्ट प्रवृत्तीचा होता. तसेच तो सिद्धार्थ गौतमाचा विरोधकही होता.
सिद्धार्थाच्या बालपणीची ही गोष्ट. एके दिवशी उद्यानात उडणाऱ्या एका हंसाला देवदत्ताने बाण मारून जखमी केले होते. तो जखमी राजहंस नेमका सिद्धार्थासमोर येऊन पडला. सिद्धार्थाने त्याच्या शरीरातून बाण काढला. जखमेवर पट्टी बांधली आणि त्याला जीवनदान दिले. देवदत्त आपली शिकार केलेल्या हंसाच्या शोधात तिथे आला. आणि म्हणाला, “मी या हंसाची शिकार केली. म्हणून त्यावर माझा अधिकार आहे.” सिद्धार्थाने त्याला जीवनदान दिले म्हणून तो आपला अधिकार सांगू लागला. हा भाग न्यायालयापर्यंत लवादाकडे गेला. मारणाऱ्यापेक्षा जीवनदान देणाऱ्याचा अधिकार श्रेष्ठ, असा निवाडा सिद्धार्थाच्या बाजूने लागला. या घटनेपासून देवदत्ताची सिद्धार्थाप्रती दुष्ट प्रवृत्ती अधिक वाढली.
भगवान बुद्धांनी गृहत्याग केल्यानंतर यशोधरेशी लगट करण्याचा प्रयत्न देवदत्ताने केला होता. एकदा यशोधरा झोपण्याच्या तयारीत असता दरवाजावरच्या सेवकांना चुकवून भिक्खूच्या वेशात देवदत्त तिच्या शयनागारात आला. तेव्हा देवदत्त म्हणाला, “यशोधरे, तू मला ओळखले नाहीस? मी तुझा प्रियकर देवदत्त !”
त्यावेळी यशोधरा म्हणाली, “देवदत्ता! तू फसवा व दुष्ट आहेस हे मला माहीत होते. तू कधी श्रमण झालास तरी वाईटच होईल, असे मला वाटत होते; पण तू इतका अधम वृत्तीचा असशील असा मला संशय आला नव्हता.”
शेवटी यशोधरा ओरडली, “देवदत्ता, चालता हो इथून.” आणि देवदत्त तिथून निघून गेला.*
कपिलवस्तूच्या राज्य परिवाराने जेव्हा बुद्धधम्माची दीक्षा घेतली तेव्हा त्यांच्याबरोबर देवदत्तनेही प्रव्रज्या घेतली. त्याचा उद्देश वेगळा होता. तथागताचे आपण नातलग आहोत, त्यामुळे भिक्खूसंघात आपणास उच्चपद मिळेल आणि आपला आदर सत्कार वाढेल, असे त्यास वाटले. परंतु आपल्याला संघप्रमुख न करता सारिपुत्त आणि मोग्गलान यांना ते स्थान दिले; याबद्दल देवदत्ताचा भगवान बुद्धांवर रोष होता. त्यामुळे देवदत्ताने भगवान बुद्धांवर तीनदा प्राणघाताचे प्रयत्न केले. पण तो एकदाही यशस्वी झाला नाही.
भगवान बुद्धांना धम्मप्रचारासाठी राजा बिंबिसाराच्या राजाश्रयाचे संरक्षण होते, तेही देवदत्ताला मान्य नव्हते. त्याने आपली दुष्ट बुद्धी वापरून राजा बिंबिसार आणि पुत्र अजातशत्रू यांच्यात फूट पाडली. अजातशत्रू मगध राज्याचा सम्राट झाल्यानंतर तथागताच्या जागी आपण विराजमान व्हावे, ही अभिलाषा देवदत्ताच्या मनात पल्लवित होऊ लागली. भगवान बुद्धालाच आता संपविले पाहिजे, हे षडयंत्र त्याच्या डोक्यावर स्वार झाले. त्याने काही मारेकरी तथागतांची हत्या करण्यासाठी पाठविले होते. परंतु ते हत्यारे भगवान बुद्धाचे अनुयायी बनले आणि देवदत्ताचा प्रयत्न निष्फळ झाला.
एकदा भगवान बुद्ध गृध्रकुट पर्वताच्या खालच्या मैदानात प्रातःकाळी मोकळ्या हवेत फिरत होते. तेव्हा देवदत्त १४-१५ फूट उंचीच्या पर्वत कडेवर चढला आणि भगवान बुद्धाचा निशाणा साधून एक मोठा दगड खाली लोटून दिला. पण तो दगड एका दुसऱ्या दगडाशी टकरावला आणि तिथल्या तिथे थांबला. त्यापैकी एक तुकडा तथागताच्या पायाला लागला व पायास जखम झाली. ती जखम जीवकाने औषधोपचार करून बरी केली.
देवदत्ताने तथागतांना मारण्याचे षडयंत्र मात्र थांबले नाही. त्याने नवीन प्रयत्न केला.
त्यासमयी राजगृहात नालागिरी नावाचा एक क्रूर, नरघातक हत्ती होता. देवदत्त राजगृहातील हत्तीच्या तबेल्यात गेला. तेथील रक्षकांना म्हणाला, “माझ्या मित्रांनो, जेव्हा श्रमण गौतम ह्या सडकेवर येतील, तेव्हा नालागिरीला मुक्त करा आणि सडकेवर जाऊ द्या.”
अशाप्रकारे अजातशत्रूच्या गजशाळेतील नालागिरी नावाचा हत्ती तथागताच्या दिशेने सोडला. तो हत्ती उग्र रूप धारण करून तथागताच्या दिशेने धावला. तथागतांना पाहताच त्याचे उग्र रूप शांत झाले. तो तथागतापुढे थांबला आणि तथागतांना प्रणाम केला. ही सर्व प्रक्रिया तेथे जमलेल्या लोकांनी पाहिली. सर्वांनी भगवान बुद्धाचा जयजयकार केला. तो दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा होता.
भगवान बुद्धाला मारण्याचे देवदत्ताचे मनसुबे उघडकीस आले. त्यामुळे अजातशत्रूनेही त्याच्याशी भेटीगाठी नाकारल्या. अजातशत्रूकडून मिळालेली नजराणे फार काळ टिकू शकले नाहीत. नालागिरी प्रकरणानंतर देवदत्ताचा प्रभाव संपूर्ण नष्ट झाला होता.
आपल्या दृष्ट कृत्याने अप्रिय झाल्यामुळे देवदत्त मगधदेश सोडून कोशल देशात गेला. राजा प्रसेनजीतही त्याला तुच्छतेने वागवत होता. भगवंताचा निवास श्रावस्तीच्या जेतवनात आहे, असे समजताच देवदत्त श्रावस्तीच्या वाटेने भगवंताना क्षमा मागण्यासाठी निघाला, परंतु रस्त्यातच त्याचा अंत झाला.
३) संघमित्राचा श्रीलंकेत प्रवेश
धम्मारामो धम्मरतो, धम्मं अनुविचिन्तयं ।
धम्मं अनुस्सरं भिक्खु, सद्धम्मा न परिहायति ।। (धम्मपदं : ३६४)
(धर्मात रममाण असणारा, धर्मात रत असणारा, धर्माचे चिंतन करणारा, धर्माप्रमाणे वागणारा भिक्खू सद्धम्मापासून दूर होत नाही.)”
सम्राट अशोकाची पुत्री अर्हत थेरी संघमित्रा हिचे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी श्रीलंकेत आगमन झाले होते. ज्या सौम्य शीतल बोधिवृक्षाखाली सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्राप्त झाली होती, त्या पवित्र बोधिवृक्षाची शाखा, इतर बरेच धार्मिक साहित्य व सहकारी घेऊन संघमित्रा थेरी हिने श्रीलंकेत प्रवेश केला होता. त्या प्रीत्यर्थ मार्गशीर्ष पौर्णिमेला मोठा स्मरणोत्सव साजरा केला जातो.
थेरी संघमित्रा हिच्या श्रीलंका भेटीमुळे पवित्र बोधिवृक्षाची अनुराधापूर येथे स्थापना झाली. तसेच भिक्खुणी संघाची स्थापना झाली. या दोन अतिशय महत्त्वाच्या प्रसंगामुळे स्त्रियांच्या आध्यात्मिक उत्थानाला प्रेरणा आणि बळ मिळाले. मानसिक निष्क्रियता आणि आध्यात्मिक उदासीनता यामधून त्यांची निश्चितच मुक्तता झाली. आंतरिक उंची आणि नैतिक उन्नती साधण्याकरिता त्यांना धैर्य प्राप्त झाले.
भगवान बुद्धाच्या विचाराच्या सुप्रसिद्ध शिष्येने अर्थात थेरी संघमित्राने जो भिक्खुणी संघ निर्माण केला, त्यामुळे अनेक स्त्रियांना भिक्खुणी बनण्याची प्रेरणा मिळाली. थेरी संघमित्राने श्रीलंकेतील स्त्रियांमध्ये जो अथक उत्साह आणि आध्यात्मिक ऊर्जा संचारित केली, त्यामुळे अनेक स्त्रियांनी भिक्खुणी संघात प्रवेश केला. त्यांनी उच्च आदर्शाचे जीवन अंगीकारून उत्कृष्ट धम्मोपदेशक म्हणून नावलौकिक मिळविला. बुद्धाच्या पुरुष शिष्यांपेक्षा त्या कोणत्याही बाबतीत कमी नाहीत, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखविले.
थेरी संघमित्राने श्रीलंकेतील अनुराधापूर येथे लावलेला बोधीवृक्ष आध्यात्मिक आदेशांचे मूर्त रूप आहे. तो जनतेमध्ये धम्मभावना चेतविण्यास कारणीभूत ठरला आहे. बुद्धाच्या अतुलनीय गुणांचे स्मरण आणि चिंतन अनेक स्त्रियांना आणि भिक्खुणींना करून देण्याची प्रेरणा ही बोधीवृक्षामुळे मिळाली आहे.”
बोधीवृक्षाने अनेक दुःखितांना, संतापग्रस्त लोकांना त्यांच्या दुःखकाळात शांती व सांत्वन देण्याचे काम केले आहे. श्रीलंकेच्या इतिहासात बोधीवृक्ष आणि त्याचा आसपासचा परिसर हे राष्ट्राचे सन्माननीय आध्यात्मिक केन्द्र राहिले आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक राजाने सोने, हिरे, जडजवाहीर, दागदागिने वाहून या स्थानाप्रति आदरभाव व्यक्त केला आहे.
श्रीलंकेच्या सर्वात मोठ्या श्रद्धास्थानात बोधीवृक्षाची व तेथील अतिविशाल महाविहाराची गणना होते. श्रीलंकेतील काळोख्या कालखंडात उत्तरेकडील राजांनी आक्रमण केले होते, त्या काळात भिक्खू आणि भिक्खूणींनी बोधिवृक्षाची महत्ता जोपासली. दरवर्षी देशोदेशीचे धार्मिक प्रवासी या स्थळाला भेट देतात आणि आपला आदरभाव श्रद्धेने व्यक्त करतात.
धेरी संघमित्रा हिचे सोबत स्थापत्य शास्त्रातील पारंगत, मूर्तिकार, चित्रकार, रंगकर्मी, वैद्यक आणि बुद्धशासनात प्रतिष्ठित असे साधक यांचे श्रीलंकेत आगमन झाले. त्यामुळे श्रीलंकेत सांस्कृतिक जागृती झाली. श्रीलंकेतील तरुण वर्ग, सम्राट अशोककालीन कला व विज्ञान या क्षेत्रात पारंगत झाला. त्यांनी केवळ भारतीय कलाकारांची नक्कल न करता श्रीलंकेतील वातावरणाशी जुळणारी कला निर्मित केली. शेवटी थेरी संघमित्रा हिचे धम्मकार्ये आणि जनतेच्या हितासाठी महामंगल कार्य करतानाच श्रीलंकेच्या हत्थाळ हक विहारात परिनिब्बाण झाले.
सम्राट अशोकाने ज्या पद्धतीने भारतात बुद्धशासन प्रत्यक्षात आणले होते, त्याचीच पुनरावृत्ती श्रीलंकेच्या परिक्षेत्रात दिसेल. सर्व क्षेत्रात त्यांची प्रगतीची धडपड सुरू आहे. यामागची प्रेरणा थेरी संघमित्रा आणि तिने अनुराधापूर येथे लावलेला बोधीवृक्ष आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पवित्र पौर्णिमेला थेरी संघमित्रा हिचे स्मरण केले जाते.
सदर माहिती इंटरनेट च्या माध्यमातून उपलब्ध झालेले आहे, आम्ही धम्म प्रचार प्रसार करिता प्रसिद्ध करत आहोत या करिता कॉपीराईट आमच्या कडून नाही
More Stories
अश्विन पौर्णिमा – अस्सयुज मासो Ashwin Purnima
भाद्रपद पौर्णिमा – पोट्ठपाद मासो Bhadrapada Poornima – Potthapada Maso
आषाढ पौर्णिमा Ashadha Purnima