कुलाबा जिल्हा उत्तर भाग व ठाणे जिल्हा दक्षिण भाग अस्पृश्यांच्या संयुक्त परिषदेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण….
कालगतीचे चक्र फिरले असून हजारो वर्षापासून गांजून गेलेल्या हतभागी दलित वर्गाच्या भाग्यशाली काळाचा अरुणोदय झाला आहे, असे वाटायला लावेल अशीच ही कुलाबा जिल्हा उत्तर भाग व ठाणे जिल्हा दक्षिण भाग अस्पृश्यांची संयुक्त परिषद झाली.
अशा या संस्मरणीय परिषदेची सविस्तर अशी माहिती समस्त वाचकवर्गाला मिळणे आवश्यक आहे, म्हणून या परिषदेची माहिती देत आहोत —
कुलाबा जिल्हा उत्तर भाग व ठाणे जिल्हा दक्षिण भाग अस्पृश्यांची संयुक्त परिषदेची पूर्वतयारी करण्याकरिता श्री. गणपत महादेव जाधव उर्फ मडकेबुवा हे मुद्दाम १५-२० दिवस परिषदेच्या भागात प्रचाराकरता खेड्याखेड्यातून हिंडत होते. तसेच परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. रामकृष्ण गंगाराम भातनकर, (कुलाबा जिल्हा लोकल बोर्डाचे सभासद) यांनी पूर्वतयारी मोठ्या उत्साहाने व कसोशीने केली आणि या दोघांच्या श्रमाचे फळ त्यांना मिळाले व परिषदेचे अधिवेशन दिनांक २९ फेब्रुवारी १९३६ व दिनांक १ मार्च १९३६ या दोन दिवशी अगदी यशस्वीरीतीने पार पडले.
परिषदेचे नियोजित अध्यक्ष अखिल हिंदुस्थानातील अस्पृश्य वर्गाचे एकमेव पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परिषदेचे अध्यक्षपद भूषविणार असल्यामुळे परिषदेच्या अधिवेशनास फारच महत्त्व आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले सहकारी मे. सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर, वयोवृद्ध श्री. संभाजी तुकाराम गायकवाड, सी. ना. शिवतरकर, वनमाळी मास्तर, प्रि. मो. वा. दोंदे (बी. ए.), कमलाकांत चित्रे, आर. डी. कवळी (बी.ए., एलएल.बी. वकील), रेवजी बुवा डोळस, दिवाकर पगारे, धुंडिराम गायकवाड, मडकेबुवा जाधव वगैरे मंडळींसह दिनांक २८ फेब्रुवारी १९३६ रोजी मुंबईहून स्पेशल मोटारने निघाले.
पनवेलनजीक तळोजे येथील मंडळींनी मुद्दाम मंडप उभारून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करण्याकरिता व्यवस्था केली होती. स्वागताध्यक्ष श्री. रामकृष्णराव भातनकर हे तेथे सामोरे आले होते. स्थानिक मंडळींनी डॉ. बाबासाहेबांस हारतुरे अर्पण केल्यावर मोटार पुढे चालू लागली. पनवेल गावात शिरल्यावर मुसलमान व्यायाम शाळा व अंजुमन इस्लाम या संस्थेतर्फे हार अर्पण करण्यात आले. नंतर सिद्दिकबुड्डा शेट या मुसलमान गृहस्थांनी बाबासाहेबांस पुष्पहार अर्पण केले. नंतर चांभार समाजातील श्री. महादेव लक्ष्मण व महादेव मारुती या गृहस्थांनी त्यांचा सन्मान केला. अशारीतीने प्रेमादराने दिलेल्या पुष्पहारांचा स्वीकार करीत संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पनवेल येथील सुभेदार वाड्यात दाखल झाले. या ठिकाणी त्यांच्या सोईकरिता एक खास मंडप उभारण्यात आला होता. या मंडपात डॉ. बाबासाहेबांचे आगमन झाल्याबरोबर महिलांनी वात्सल्यपूर्ण भावाने त्यांचे स्वागत केले. सौ. लक्ष्मीबाई अर्जुन शिरावले यांनी महिलांतर्फे बाबासाहेबांना कुंकुम तिलक व अक्षता लावून त्यांच्यावरून आरती ओवाळली. हा सुमंगल विधी पाहून प्रेक्षकांच्या हृदयात आनंदलहरी उचंबळू लागल्या व युवकांचा उत्साह द्विगुणित झाला व त्यांच्या मुखातून बाबासाहेबांच्या जयघोषाची वचने स्फूर्तीने बाहेर पडली. नंतर पाहुणे मंडळींचे चहापाणी झाल्यावर ठिकठिकाणहून आलेले प्रतिनिधी व इतर कार्यकर्ते यांच्या भेटी सुरू झाल्या. प्रत्येक ठिकाणची मंडळी आपली दुःखे निवेदन करीत होती. त्यात प्रामुख्याने भोर संस्थानातील सुधागड तालुक्यातील लोक होते.
एका गावच्या महारवाड्यावर स्पृश्य हिंदूंच्या अनेकविध कारवायांमुळे सध्या चालू असलेल्या छळासंबंधी माहिती गोळा करावी व तेथील लोकांना मार्गदर्शन व्हावे म्हणून श्री. बी. टी. तांबे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खास रवानगी केली होती. श्री. तांबे हे एक उत्साही व शिपायी बाण्याचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांच्या येण्याने लोकांच्या मनातील भीती नाहीशी होऊन ते संकटास तोंड देण्यास तयार झाले. या गावच्या काही लोकांना बरोबर घेऊन बाबासाहेबांचा सल्ला घेण्याकरता ते पनवेल येथे आले होते.
प्रथम विषयनियामक कमिटीची बैठक होऊन दुसऱ्या दिवसाच्या अधिवेशनाकरिता नऊ ठराव मुक्रर करण्यात आले. गावोगावची मंडळी शुक्रवार पासून येत होती व शनिवारी रात्री लोकसमुदाय सुमारे २,००० वर जमला होता. पनवेल व नजीकच्या प्रदेशात अस्पृश्य लोकसंख्या अगदी थोडी आहे. गावात एखाद दुसरे घर या मानाने दोन हजार ही संख्या फार मोठीच होय. या लोकसमुदायाचे मनोरंजन करण्याकरिता पोवाडे व जलसा यांची योजना करण्यात आली होती. श्री. घेगडे यांचा नाशिक सत्याग्रहावरील हृदयस्पर्शी पोवाडा श्री. द्वारकाकांत शेजवळ यांनी आपल्या सुस्वर स्फूर्तीदायक आवाजात गायिला. लोकशिक्षण हेच ध्येय पुढे ठेऊन ज्या काही जलसा मंडळींनी आपली समाज सेवा अव्याहत व परिश्रमपूर्वक चालविली आहे असे दोन फड मुंबईहून मुद्दाम बोलावून आणले होते. ते म्हणजे दलितोद्धारक सुस्वर जलसा व नाशिक जिल्हा युवक संघ जलसा. या दोन मंडळींनी रात्रभर आपली कामगिरी आळीपाळीने चालू ठेवली होती.
दुसरे दिवशी सकाळी ९-३० वाजता जमलेल्या मंडळींची मिरवणूक काढण्यात आली. आरंभी श्री. वसंतराव भातनकर यांनी लोकांना शिस्तीचे महत्त्व समजावून दिले व मिरवणूक शांततेने पार पाडण्याची विनंती केली. नंतर तीन-तीन माणसांची एक अशारीतीने रांगा लावण्यात आल्या. मुंबईचे श्री. अर्जुनराव साळवी यांनी सर्व लोकांस शिस्तीने उभे केले व नंतर मिरवणुकीस सुरवात झाली. अग्रभागी पनवेल हनुमान व्यायाम शाळेचा स्काऊटचा बॅंड व मध्यभागी स्थानिक वाद्ये वाजत होती.
मिरवणूक कायस्थ आळी, ब्राह्मण आळी. बाजार वगैरे गावातील प्रमुख वस्तीतील रस्त्यावरून सभेच्या ठिकाणी सुमारे ११-३० वाजता हजर झाली. वाटेत मिरवणूक एकसारखी वाढत जात होती. ” आंबेडकर जिंदाबाद”, ” हिंदू समाजाचा धिक्कार असो “, ” भटशाही नष्ट होवो “, “आंबेडकर कौन है ? दलितोंका राजा है “, ” डॉ. बाबासाहेब आंबेडकरकी जय ” वगैरे जयघोष रस्त्यात एकसारखे चालू होते. मिरवणुकीच्या अग्रभागी श्री. संभाजी गायकवाड, श्री. कमलाकांत चित्रे, दादासाहेब पगारे, वनमाळी मास्तर, भिकाजी धोंडेराव, वसंत भातनकर, गोविंद बिवकर, भीमराव कर्डक, रूपाजी पगारे वगैरे मंडळी होती. श्री. साळवी व त्यांचे इतर तरुण मित्र फिरते राहून मिरवणुकीचे व्यवस्थित स्वरूप कायम ठेवीत होते. पनवेलसारख्या लहानशा शहरात ही मिरवणूक म्हणजे एक अद्भुत गोष्ट होती. काही काळापूर्वी गटाराच्या बाजूने थबकत थबकत व भीतभीत पावले टाकीत चाललेला महार आज बिनदिक्कत छातीठोकपणे आपल्या परमप्रिय पुढाऱ्याचा व आपल्या वर्गाचा जयघोष करीत राजरस्त्यातून मिरवताना पाहून लोकांच्या हृदयात धडकी उत्पन्न झाल्याशिवाय राहिली नाही. महाराच्या सावलीस उभे न राहणारे लोक व गाड़ी-घोडे या जमावास पाहून वाटेत थबकत होते व गटाराजवळ उभे राहून महारास रस्ता देत होते. हे दृश्य पाहून कालगतीचे चक्र फिरले असून हजारो वर्षे गांजून गेलेल्या हतभागी दलित वर्गाच्या भाग्यशाली काळाचा अरुणोदय झाला आहे, असे वाटल्यास त्यात नवल ते काय ?
सभामंडप गावानजीकच्या आंबराईत गाडेश्वरी नदीच्या काठावर उभारला होता. मिरवणुकीनंतर सर्व लोकसमुदायास शिस्तवार बसविण्यात आले. सभा सुरू होण्यापूर्वी सभामंडप चिक्कार भरून गेला होता. गावातील ४०-४५ स्पृश्य हिंदू गृहस्थ हजर होते. थोड्याच वेळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या मित्रमंडळीसह सभास्थानी हजर झाले. श्री. अनंतराव चित्रे महाडहून व गोविंदराव वरघरकर मुद्दाम परिषदेकरिता यावेळी हजर झाले. बाबासाहेबांना सर्व मंडळींनी उत्थापन देऊन त्यांच्या जयजयकारात त्यांचे स्वागत केले. लागलीच मुलींचे कर्णमधुर स्वागतपर गायन झाले आणि स्वागताध्यक्षांनी आपल्या भाषणास सुरवात केली.
हे भाषण आटोपल्याबरोबर नियोजित अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब बोलण्यास उभे राहिल्याबरोबर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट सुरु झाला. नंतर परिषदेचे अध्यक्षस्थान दिल्याबद्दल आभार व्यक्त करून त्यांनी आपल्या भाषणास आरंभ केला.
कुलाबा जिल्हा उत्तर भाग व ठाणे जिल्हा दक्षिण भाग अस्पृश्यांच्या संयुक्त परिषदेत बोलताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले,
भगिनींनो आणि बंधुजनहो,
हा भाग मुंबईच्या नजीक असूनही मला सभेकरिता म्हणून इकडे येता आले नाही याबद्दल मला खेद वाटतो. अनेक व्यवसायामुळे मी आपली भेट घेऊ शकलो नाही. हजारो ठिकाणाहून लोकजागृतीच्या कामाकरिता मला आमंत्रणे येतात, परंतु सर्वांचे समाधान करणे मला एकट्याला अशक्य आहे. मी काही शतमुखी रावण नाही किंवा अंगास राख फासून संन्यासी झालेला नाही. तुमच्याप्रमाणेच मला स्वतःला पोटाचा उद्योग करावा लागतो. तुमच्या सारखाच परिस्थितीशी झगडणारा मी माणूस आहे.
आजचा प्रसंग जरी महत्त्वाचा असला तरी फार पाल्हाळीक भाषण करून आपल्याला मी तिष्ठत बसविणार नाही. मी फक्त थोड्या मुद्यांविषयी बोलणार आहे. विशेषतः तुमचे कर्तव्य काय आहे व तुमचा वाटाड्या म्हणून माझे काय कर्तव्य आहे हे मी आज सांगणार आहे.
सद्गृहस्थहो, तुम्ही आज हजारो वर्षे या देशात वास्तव्य करीत आहा. तसेच तुमचे शेजारी म्हणून इतर लोकही येथे नांदत आहेत. तुमच्या स्थितीचे अवलोकन करून तुमच्या शेजाऱ्यांची स्थिती तुम्ही नीट ध्यानात आणा. तुमच्या दोघांच्या परिस्थितींची तुलना करा. तुम्हाला पहिली गोष्ट दिसून येईल ती ही की, तुम्ही इतर समाजापेक्षा दरिद्री आहात. इतर समाजांना नानाप्रकारचे उद्योग करून भाकरी मिळविण्याचे मार्ग मोकळे असल्यामुळे, त्यांची स्थिती तुमच्यापेक्षा अधिक चांगली आहे. सभेला जावयाचे म्हणून तुम्ही आज आपली नेहमीची लक्तरे बाजूला ठेवून जरा बऱ्यापैकी कपडे अंगात घालून आलेले दिसता. तुम्ही सभेकरिता नीटनेटके आलात याबद्दल मला संतोष वाटतो, पण तुमची खरी स्थिती काय आहे याची तुमच्याच हाडामासाच्या मला पूर्ण जाणीव आहे. आठवड्यातून तीन दिवस पोटभर अन्न मिळण्याची तुम्हाला मारामार. अंगावर एखादा फाटका सदरा व एक लंगोटी. ती लंगोटी देखील लवकर बदलता येत नाही, अशी तुमची कंगाल स्थिती. त्याच्या उलट पांढरपेशा वर्गाची काय स्थिती आहे ? तुमच्या मानाने ते शतपट सुखी आहेत. त्यांच्या घरावर कौले, तर तुमच्या झोपडीवर पुरेसे बांबू किंवा झावळ्याही टाकावयास तुम्हाला मिळत नाहीत. त्यांच्या घरात पितळेची भांडी, तर तुमच्या घरात मातीची मडकी, अशी तुमची दैनावस्था ! याचे पहिले कारण त्यांना जी उपजीविकेची साधने खुली आहेत ती तुम्हाला खुली नाहीत. तुम्हाला आज डेप्युटी कलेक्टर, मामलेदार किंवा पोलीस ऑफिसर वगैरे बड्या पगाराच्या जागा मिळत नाहीत. का ? तर तुमच्यामध्ये सुशिक्षित तरुण नाहीत म्हणून. असे जरी गृहीत धरले तरी या अंमलदारांपेक्षा कमी दर्जाच्या अनेक नोकऱ्या आहेत. त्या देखील तुम्हास मिळत नाहीत. तेथेही तुम्हास मज्जाव आहे. साधी पोलिसांची नोकरी घ्या. ती तुम्हास का मिळत नाही ? ह्या जागेची जबाबदारी पार पाडण्यास काही फार शिक्षण लागत नाही. २-३ इयत्ता शिकणाऱ्या स्पृश्य समाजातील कोणाही माणसास ती नोकरी मिळू शकते, पण तुम्हास ती जागा मिळत नाही. तुमच्यात प्रामाणिकपणाचा किंवा सचोटीचा अभाव आहे असे म्हणावे तर आज लाखो रुपयांचा वसूल महाराकडून केला जात आहे. या वसुलाची ने-आण महारच आज कित्येक वर्षे करीत आले आहेत. पण महाराने या वसुलात अफरातफर करून दगलबाजी केली आहे, असे कोणाच्याही ऐकिवात आले का ? याच्याउलट मामलेदारी सारख्या वरिष्ठ दर्जाच्या नोकऱ्या करणाऱ्या स्पृश्य समाजातील लोकांकडून अनेक दगलबाज्या झाल्या आहेत. त्याचे दाखले दाखविता येतील. हे झाले नोकऱ्यासंबंधी. इतर लहानसहान धंदे घ्या. तुम्ही दुधाचा, दह्याचा किंवा लोणी विकण्याचा धंदा करू म्हणाल तर तुमचे दूध कोणी घेणार नाही व तुमच्या हातच्या लोण्याने गि-हाईकांचा धर्म बुडेल. तुम्ही भाजी विकण्याचा धंदा करावयास जा. तरी तीच गत. तुम्हाला डोके वर करावयास म्हणून कोठेच जागा नाही. अशी तुमची आज शोचनीय परिस्थिती आहे. तुम्ही या स्थितीचा कधी विचार केला आहे का ? असा मी तुम्हास प्रश्न विचारतो. इतर लोक आपल्या मुलाबाळांची नीट निगा राखून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करतात व त्यामुळे ते आपली स्थिती सुधारू शकतात. तुम्हाला तसे का करता येत नाही ? तुमचा सर्व बाजूंनी कोंडमारा होतो. या प्रश्नांचा तुम्ही आज विचार करावयास पाहिजे. तुमच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा दूर करता येतील हे तुम्ही पाहिले पाहिजे. तुम्हास मला असे विचारावेसे वाटते की, तुम्हास आपली स्थिती सुधारावयाची आहे की नाही ? आजपर्यंत तुम्ही या चिखलात लोळत पडला तसेच तुम्हास राहावयाचे आहे का ? ज्या ठिकाणी पायातील जोड्याइतकी तुमची किंमत नाही त्याच ठिकाणी तुम्हास कुजत राहावयाचे आहे का ? थोडक्यात सांगावयाचे म्हणजे तुम्हाला गुलामाप्रमाणे राहावयाचे आहे की स्वतंत्र माणसाप्रमाणे जगावयाचे आहे ? याचा आज तुम्हाला विचार करावयाचा आहे. तुमच्या मार्गात येणाऱ्या अडचणी कशा दूर करता येतील हे तुम्हास पाहावयाचे आहे.
प्रामुख्याने आज तुमच्यापुढे तीन अडचणी आहेत. पहिली, तुमचे दारिद्र्य. दुसरी, तुमची असहाय्यता. तिसरी, तुमचे मनोदौर्बल्य, मनाचा कमकुवतपणा. तुम्ही सर्वजण दारिद्र्याने गांजून गेला आहा आणि त्यामुळे परावलंबी बनला आहात. स्वतंत्रवृत्तीने तुम्हास काहीच करता येत नाही. तुम्ही साध्या माणुसकीकरिता झगडावयास लागला तर स्पृश्य लोकांकडून तुम्हाला जोराचा विरोध होतो आणि तुमचे जीवित सर्वस्वी त्यांवरच अवलंबून असल्यामुळे तुमच्या लढ्यापासून परावृत्त करण्याकरता ते तुम्हास हरएक प्रकारे नाडतात. त्यांनी भाकरीचा तुकडा दिला तर तुम्हास पोटास अन्न मिळणार, म्हणून हे परावलंबी जिणे नाहीसे करण्याच्या उद्योगास तुम्हास लागले पाहिजे.
दुसरी गोष्ट म्हणजे तुमची असहाय्य स्थिती. तुम्हास कोणाचे सहाय्य नाही. मित्र म्हणून तुमच्या पाठीमागे उभे राहण्यास आज कोणीच तयार नाही. तुमच्यात व गावकऱ्यात तंटा उपस्थित झाल्यास तुमच्या मदतीस कोणीच धावून येत नाही. या देशात हिंदू समाजाशिवाय मुसलमान, ख्रिस्ती व शीख असे समाज आहेत, पण मुसलमान किंवा ख्रिस्ती तुमच्या मदतीस धाऊन येत नाहीत. ते का धावून येत नाहीत याचा तुम्ही नीट विचार करा. ज्या धर्मात आपण जन्मास आलो, ज्या धर्माची तत्त्वे आपण पाळतो व ज्या धर्माला आपण आपला म्हणून म्हणतो तोच आपल्याला आज गांजीत आहे. त्याची गांजणूक आपण असहाय्य स्थितीत किती दिवस सहन करणार ? तुम्हाला मी विचारतो की, कोणाचीही मदत न घेता तुम्ही हिंदुंच्या लढ्यात कधी तरी यशस्वी होऊ शकाल का ? ज्यांच्या बरोबर तुम्ही जगता ते तुम्हाला कधीतरी माणुसकीचे हक्क देतील अशी आशा बाळगण्याचे तुम्हास कारण नाही. मी तुम्हास खात्रीपूर्वक असे सांगतो की, हिंदुंपासून तुमचा कधीही फायदा होणार नाही. मुलाच्या प्रत्यक्ष बापाने त्यास विहिरीत ढकलून दिल्यावर त्यास हात देऊन बाहेर काढणारा मनुष्य त्या मुलाचा मित्र की जीव घेण्यास प्रवृत्त झालेला बाप त्याचा मित्र ? तेव्हा अशा प्रकारे हात देणारा मित्र तुम्हास शोधून काढावयाचा आहे.
आज मुसलमानांच्या वाटेस हिंदू का जात नाहीत ? ते त्यांच्या धर्माचा द्वेष करतात, निंदा करतात पण गावातील दोन मुसलमानांच्या घरातील पोरास हात लावण्याची हिंदुंची ताकद नाही. याचे कारण काय ? या मुसलमानाच्या पोरास जर हात लावला तर हिंदुंना माहीत आहे की, हिंदुस्थानातील सर्व मुसलमान समाज त्याचे मदतीस धावत येईल व हिंदुंचा समाचार घेईल. पण हिंदु लोक तुम्हास गांजतात याचे कारण हेच की, तुमच्या मदतीस आज कोणीच धावून येत नाही. पुष्कळ लोक तुम्हाला सांगतात की, तुम्ही स्वतःच्या पायावर उभे रहा, परंतु ज्याचे दोन्ही पाय कापले आहेत तो उभा कसा राहणार ? तुम्ही कोणाचा तरी हात धरूनच उभे राहिले पाहिजे आणि तेव्हाच तुम्ही सामर्थ्यवान बनाल. तुमच्या आजच्या असहाय्य परिस्थितीत जो तुम्हाला हात देईल तोच तुमचा खरा मित्र व वाली आणि म्हणून मी म्हणतो की, या करताच तुम्हाला धर्म बदलणे प्राप्त आहे. माणसाला धर्म प्रिय नाही. माणसाला माणुसकी प्रिय आहे.
कातकऱ्यासारखी अत्यंत मागासलेली जात ; पण तिलादेखील हिंदू धर्मात माणुसकी आहे. त्यांना स्पृश्यांच्या घरात जाता येते, पण तुम्हाला मात्र दारात देखील मज्जाव. तुमच्या हातचे दूध देखील घ्यावयास कोणी तयार नाही. नोकऱ्या करून किंवा इतर धंदे करून आपली उन्नती करून घेण्याच्या जेवढ्या म्हणून वाटा आहेत त्या सर्व तुम्हाला बंद आहेत. मुसलमान किंवा खिस्ती या धर्मातील लोक ज्या नोकऱ्या करतात त्या तुम्ही करू म्हटल्यास तुम्हास मात्र हिंदुंचा विरोध, म्हणून तुम्हाला मी पुन्हा सांगतो की, या हिंदू धर्मात राहून तुम्हाला आपली उन्नती करून घेणे शक्य नाही. तुम्ही हिंदू आहात म्हणूनच तुमची ही कुचंबणूक. तुम्ही मुसलमान असता, ख्रिस्ती असता किंवा शीख असता तर या सर्व वाटा तुम्हास खुल्या असत्या व तुम्ही काही अंशी आपली आर्थिक सुधारणा करू शकला असता, पण जोपर्यंत तुम्ही हिंदू आहात तोपर्यंत जाचणुकीची ही पकड व त्यांचे वर्चस्वही कधीच दूर होणार नाहीत आणि यामुळे तुम्ही जिवंत नरकात खितपत पडला आहात. म्हणून तुम्ही या परिस्थितीचा नीट विचार करा. तुम्ही या आत्मघातकी धर्माला किती दिवस कवटाळून बसणार ? मेल्यानंतर तुम्हाला स्वर्ग पाहिजे की जिवंतपणी स्वर्गीय सुख तुम्हाला हवे ? मला तर याच जन्मी मोक्ष म्हणजे माणुसकी पाहिजे. दुसऱ्या जन्माशी किंवा काल्पनिक स्वर्गाशी मला काही कर्तव्य नाही. तिसरी गोष्ट अशी की, या हिंदू धर्माच्या खुळचट शिकवणुकीने तुमची मने मारली गेली आहेत. ज्याप्रमाणे सर्प पाहिल्याबरोबर एखादा मनुष्य गर्भगळीत होतो आणि त्याच्या नाड्या आखडतात, त्याचप्रमाणे तुमची आज स्थिती आहे. तुम्हाला असे वाटते की, आपण अगदी नीच आहो. हलके आहो. तुम्हाला हिंदू धर्म अतिशूद्र मानतो आणि तुम्ही आपल्या स्वतःला शूद्र मानता. त्यामुळे रस्त्याने चालताना देखील तुम्ही स्पृश्यांजवळून न जाता बाजूस होता. याचे कारण तुमचे मन मेलेले आहे. तुमचा स्वाभिमान निजलेला आहे. तुम्हाला आपण माणूस आहो असे वाटत नाही. त्यामुळे आपल्यावर जुलूम करणाऱ्या हिंदुंबरोबर झगडा करणे हा विचार तुम्हाला शिवत नाही. तुम्हाला मी निक्षून सांगतो की, तुम्ही जोपर्यंत हिंदू धर्माच्या चौकटीत आहात, जोपर्यंत तुमच्या हातापायात या बेड्या आहेत, जोपर्यंत तुमच्या मनावर या धर्मातील शिकवणुकीचा पगडा आहे, तोपर्यंत तुम्ही अगदी कुचकामीच राहणार.
तुम्ही सर्वजण शेतकरी आहात. झाडे कोणत्या परिस्थितीत फोफावतात हे तुम्ही चांगले जाणता. तुम्हाला माहीत आहे की, एका झाडाच्या सावलीखाली दुसरे झाड जगत नाही व जगले तर खुरटे झाल्याशिवाय राहत नाही. आंब्याचे कलम लावावयाचे झाले तर एकएका कलमामध्ये १५-२० फुटांचे अंतर ठेवावे लागते, तरच त्या कलमांचा चांगला मोहोर फुटून गोड फळे येतात. याचे कारण काय ? मोठ्या झाडाच्या छायेखाली लहान झाडाला पुरेसा उजेड मिळत नाही. त्यावर सूर्याचा पूर्ण प्रकाश पडत नाही. इतर पोषक द्रव्येही त्यास पुरेशी मिळत नाहीत. या लहान झाडाप्रमाणेच तुमची गत झालेली आहे. तुम्ही हिंदू लोकांच्या छायेखाली राहिल्यामुळे तुमची वाढ झाली नाही. तुम्ही खुरट्या झाडाप्रमाणे झाला आहात. सद्गृहस्थहो, इतके दिवस तुम्ही झोपलेले होता. इतर लोकांनी या जगात काय लुटालूट केली याचा आता आपण विचार केला पाहिजे.
मी सांगितलेल्या तीन अडचणी दूर करण्याचा तुम्ही जर मनापासून प्रयत्न केलात तर तुमची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. आता पहिली अडचण म्हणजे तुमचे ‘ दारिद्र्य. ‘ हे दारिद्र्य घालविणे तुमच्या हाती नाही. पण, आपण दोघांनीही ते दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या बाबतीत तुमच्यापेक्षा माझ्यावर अधिक जबाबदारी आहे. मी व माझे इतर सहकारी यांचेवर ती जबाबदारी आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याकरता राजकीय हक्क आपल्याला मिळविले पाहिजेत. आज तुम्हाला कायदेमंडळात १५ जागा मिळाल्या आहेत. त्या जागांवर जाणाऱ्या प्रतिनिधींवर हरएक प्रकारे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी आहे. तुम्ही मात्र आपल्या स्थितीची पूर्ण जाणीव देऊन या तुमच्या म्होरक्यांना आपले कर्तव्य पार पाडण्यास भाग पाडले पाहिजे.
दुसरी व तिसरी अडचण म्हणजे तुमची ‘ असहाय्यता ‘ व तुमच्या ‘ मनाचा कमकुवतपणा ‘. हा दूर करणे मात्र सर्वस्वी तुमच्या हातात आहे. मी माझे कर्तव्य म्हणून ती अडचण कशी दूर करता येईल ते सांगेन. त्याप्रमाणे वागणे न वागणे हे तुमच्या हातात आहे. माझ्या मताप्रमाणे या दोनही अडचणी तुम्ही हिंदू धर्म सोडल्याने दूर होणाऱ्या आहेत. मी तुम्हाला सांगितले आहे की, तुमची असहाय्यता दूर करण्याकरिता तुम्ही दुसऱ्या धर्मातील समाजास मित्र करावयास पाहिजे. तसेच तुमचे मनोदौर्बल्य नाहिसे करण्याकरिता तुम्हाला दुसऱ्या धर्माच्या शिकवणुकीची कास धरल्याशिवाय गत्यंतर नाही. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे या दोनही अडचणींवर तोडगा म्हणजे ” धर्मांतर “. ते करण्यास तुम्ही आता तयार झाले पाहिजे. केव्हा धर्मांतर करावयाचे, कोणत्या धर्मात जावयाचे हे मी योग्य वेळी सांगेन. माझे म्हणणे तुम्हाला योग्य वाटत असेल तर माझ्या मागे या. नसेल तर खुशाल याच धर्मात राहा व खितपत पडा. ज्याअर्थी मी तुमच्या जातीत जन्माला आलो आहे त्याअर्थी माझे कर्तव्य म्हणून हे मी तुम्हाला सांगत आहे. तुमच्या बऱ्यावाईटाची जबाबदारी जर तुम्ही माझेवर टाकीत असाल तर मी सांगेन तसे वागण्यास तुम्ही तयार झाले पाहिजे व मी जिकडे जाईन तिकडे माझ्यामागे आले पाहिजे.
शेवटी तुम्हास माझे असे सांगणे आहे की, हा प्रसंग फार आणीबाणीचा आहे. आपण काय करावयाचे हे आज निश्चित केले पाहिजे. ५-१० वर्षांची मुदत तुम्हा सर्वास दिली आहे. त्याचे कारण एवढेच की, हा प्रश्न फार मोठा आहे, म्हणून त्याची वासलात लागणे सोपे नाही. तुमच्यापैकी निम्मे अर्धेच लोक जर धर्मांतर करावयास तयार झाले तर आपला फायदा होणार नाही. सर्व जणांनीच ते केले पाहिजे आणि त्या करताच ही ५-१० वर्षाची मुदत दिली आहे. या अवधीत तुमच्या मनावर बसलेला हा हिंदू धर्माचा पगडा दूर केला पाहिजे. एक गोष्ट ध्यानात ठेवा. ज्या वेळेस मला वाटेल की, तुम्ही धर्मांतर करावयास तयार नाही त्या वेळेस असे समजा की, तुमची व माझी फारकत झाली. मी मात्र या कुचकामी व निरुपयोगी धर्मातून जाणार हे खास.
🔹🔹🔹
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर