चैत्र पौर्णिमा ( चित्तमासो ) संदर्भात मान्यवर साहित्यिक यांच्या लेखाचे संदर्भ :
१. धम्मपदं, संपा. डॉ. धनराज डाहाट, संकेत प्रकाशन, नागपूर. च. आ. २०१४, पृ.३५
२. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉ. भी.रा. आंबेडकर, सिद्धार्थ प्रकाशन, मुंबई-१, पृ. ५२
३. पूर्वोक्त, पृ. ५५
४. पूर्वोक्त, पृ. ५७
4. धम्मपदं, डॉ. धनराज डाहाट, संकेत प्रकाशन, नागपूर, पृ. ३४
६. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, पृ. ७१
७. धम्मपदं, पृ. १०५
८.भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, पृ. ९०
चैत्र पौर्णिमेला पाली भाषेत ‘चित्तमासो’ म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः एप्रिल महिन्यात येते. या पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण घटना घडल्यात. उदा. सिद्धार्थाचा अभ्यास, (भृगु ऋषी, रामपुत्त, सांख्य), सुजाताचे खिरदान या पौर्णिमेला ज्या घटना घडल्यात, त्यांचा संक्षिप्तपणे परिचय असा-
सिद्धार्थाचा अभ्यास
यो च गाथा सतं भासे, अनत्थपदसंहिता ।
एक धम्मपदं सेय्यो, यं सुत्वा उपसम्मति ।। (धम्मपदं : १०२) (निरर्थक पदांनी युक्त शंभर गाथा म्हणण्यापेक्षा एकच धम्मपद श्रेष्ठ असते, जे ऐकून मन शांत होते. ) ‘
सिद्धार्थाचे गृहत्यागाचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोलीय आणि शाक्य यांच्यातील संघर्ष. परंतु गृहत्यागानंतर त्या पाच परिव्राजकांनी जी बातमी आणली. त्यामुळे गौतम फार अस्वस्थ झाला. ती बातमी होती, कोलीय आणि शाक्य यांच्यात झालेला समेट. युद्धाला त्यांचा विरोध असल्यामुळे त्यांनी घर सोडले होते. आता युद्ध तर थांबले. काय करावे?
यावर सिद्धार्थ गौतमाने सखोल विचार केला आणि स्वतःशीच म्हणाला- “युद्धामुळे मी घर सोडले हे खरे. पण शाक्य व कोलीय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की माझ्यापुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे. या सामाजिक संघर्षांच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे. ११
हे उत्तर शोधण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने जुन्या प्रस्थापित तत्त्वज्ञानाचा आणि सामाजिक तत्त्वज्ञानाचा चिकित्सक अभ्यास केला, तो पुढील प्रमाणे-
अ) भृगुऋषीच्या आश्रमात
नव्या प्रकाशाच्या शोधात सिद्धार्थ गौतमाने आलारकालाम यांची भेट घेण्यासाठी राजगृह सोडले. मार्गात त्यांनी भृगु ऋषीचा आश्रम पाहिला. त्या आश्रमात प्रवेश करताच सिद्धार्थाचा आश्रमवासियांनी सत्कार केला आणि सिद्धार्थ गौतमानेही गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले. तो आश्रम निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेला होता. त्या पवित्र तपोवनात चालविलेल्या तपश्चर्यांचे निरनिराळे प्रकार त्याने प्रथमच पाहिले.
त्यानंतर तपश्चर्येचे तंत्र आत्मसात असलेल्या भृगुऋषींनी तपश्चर्यांचे निरनिराळे सर्व प्रकार व त्यांची फळे समजावून सांगितली.
भृगुऋषींच्या आश्रमात चाललेली तपश्चर्या ही अत्यंत कठोर स्वरूपाची होती. अशी तपश्चर्या काही काळ केल्यानंतर उच्च तपश्चर्येने स्वर्गप्राप्ती, तर निम्न तपश्चर्येने मृत्युलोक मिळतो, दुःखमार्ग अनुसरल्यामुळे शेवटी सुखप्राप्ती होते, दुःख हेच पुण्याचे मूळ आहे. हा भृगूऋषीचा विचार सिद्धार्थाला पटला नाही. तेव्हा सिद्धार्थ म्हणाला,
“या वेळी मी इतकेच सांगू शकतो की, ही आपली तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे. तर ऐहिक जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा, अशी माझी इच्छा आहे. “”
सिद्धार्थाचा निश्चय पाहून भृगुऋषी म्हणाले, “तू जे म्हणालास तेच जर तुझे उद्दिष्ट असेल तर तू ताबडतोब विंध्यकोष्ठास जा. आलारकालाम ऋषी तेथे राहात आहेत. त्यांच्याकडून तुला त्या मार्गाचे ज्ञान प्राप्त होईल.”
पुढे भृगुऋषी म्हणाले, “त्यांच्या सिद्धान्ताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्याच्याही पलीकडील आहे, असे तुला दिसून येईल.” गौतमाने भृगुऋषीचे आभार मानले आणि सर्व मुनिजनांना वंदन करून, तो पुढे निघाला. तो दिवस चैत्र पौर्णिमेचा होता.
रामपुत्त ऋषीकडे अभ्यास
भृगुऋषीचा आश्रम सोडल्यानंतर गौतम आलारकालाम यांच्या वैशाली येथील आश्रमात आला. ‘आपल्या सिद्धान्ताचा अभ्यास करण्याची इच्छा आहे,’ असे मनोगत गौतमाने व्यक्त केले. गीतमाच्या विनंतीनुसार आलारकालामांनी सांख्य तत्त्वज्ञानाची तत्त्वे स्पष्ट
करून सांगितली. तसेच त्यांनी ध्यान मार्गाची माहिती दिली. ध्यान मार्गाचे तीन पंथ होते, १) आनापानसति २) प्राणायम ३) समाधी.
आलारकालामांनी ध्यान मार्गाचे तंत्र गीतमाला शिकविले. त्याच्या एकूण सात सिद्या होत्या. गौतम त्या तंत्राचा दररोज अभ्यास करू लागला. त्या तंत्रावर प्रभुत्व मिळविल्यावर आणखी शिकण्यासारखे काही आहे काय ? असे गौतमाने आलारकालामांना विचारले. आलारकालमांनी उत्तर दिले, ‘नाही.’ नंतर गौतमाने आलारकालामांचा निरोप घेतला.
आलारकालामांनी जे ध्यानतंत्र संशोधिले होते; त्याच्यापेक्षा वरची एक पायरी ध्यान पुरुषाला गाठता येईल, असा एक ध्यानविधी शोधून काढण्याबद्दल उद्दक रामपुत्त यांची ख्याती होती. म्हणून गौतम त्या ध्यानविधीचा अभ्यास करण्यासाठी उद्दक रामपुत्ताच्या आश्रमात गेला. तिथे ध्यानविधी शिकण्याचा आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला. त्यानुसार उद्दक रामपुत्ताच्या आश्रमात त्याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला.
थोडक्याच काळात उद्दक रामपुत्ताच्या ध्यानविधीची आठवी पायरी त्याने आत्मसात केली. रामपुत्ताच्या ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळविल्यावर गौतमाने आलारकालामांना जो प्रश्न विचारला होता, तोच प्रश्न उद्दक रामपुत्तालाही विचारला, “आणखी काही शिकण्याजोगे आहे काय ?” आणि उद्दक रामपुत्ताने तेच उत्तर दिले, “नाही, मित्रा! तुला शिकविता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही.
आलारकालाम आणि उद्दक रामपुत्त हे ध्यान मार्गावरील प्रभुत्वासाठी कोशल देशात प्रसिद्ध होते. पण गौतमाने असे ऐकले की, मगध देशातही असे ध्यानमार्ग संपन्न योगी आहेत. त्यांच्या पद्धतीने शिक्षण मिळावे असा गौतमांनी विचार केला. असा विचार करून गौतमाने उद्दक रामपुत्ताचा निरोप घेतला, तो दिवस चैत्र पौर्णिमचा होता…
कपिलाचे सांख्यदर्शन
सन्तं तस्स मनं होति, सन्ता वाचाच कम्म च।
सम्पदा विमुत्तस्स, उपसन्तस्स तादिनो । (धम्मपदं : ९६ )
(सम्यक ज्ञानामुळे जो विमुक्त आणि उपशांत झाला आहे अशा स्थिर चिता (पुरुषा) चे मन शांत होते, वाणी आणि कर्म शांत होते.) सिद्धार्थ गौतमाने उद्दक रामपुत्ताच्या ध्यान विधीचे पूर्ण ज्ञान मिळविल्यानंतर तो मगध देशात गेला. तिथे श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याची साधना होती. या साधनेत त्याला टोचणारे तीव्र आवाज त्याच्या कानातून बाहेर पडत होते. तीक्ष्ण सुरीने त्याचे डोके टोचले जात आहे, असे त्याला जाणवत होते. ती दुःखदायक प्रक्रिया गौतमाने आत्मसात केली.
त्यानंतर गौतमाने कपिलाच्या सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. आलारकालामांनी सांख्य तत्त्वज्ञान समजावून सांगितले होते.
सांख्य तत्त्वज्ञानाचे पहिले तत्त्व आहे सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे व क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे.
सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलाने दोन मार्ग सांगितले– १) प्रत्यक्ष ज्ञान, आणि अनुमान, प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोरील वस्तूचे आपल्या मनाला होणारे आकलन.
अनुमान तीन प्रकारचे आहे– १) कारणावरून कार्य ओळखणे, २) कार्यावरून कारण ओळखणे, ३) साम्य, जसे मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो, असे अनुमान काढतो.
सांख्य तत्त्वज्ञानाचे दुसरे तत्त्व आहे, देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही.
याचे स्पष्टीकरण असे की, हे विश्व निर्माण करणारा कोणी तरी निर्माता आहे, हा सिद्धान्त कपिलाने अमान्य केला. मातीपासून मडके तयार होते. यामध्ये मडके तयार करण्यासाठी माती हे कारण असते. वास्तविक नवे असे काहीच उत्पन्न होत नाही. सुष्ट वस्तू ही ज्या ज्या पदार्थापासून बनते, त्यापेक्षा ती निराळी नसते.
सांख्य तत्त्वज्ञानाचे तिसरे तत्त्व आहे जगात दुःख आहे.
याचे स्पष्टीकरण असे की, अनुत्क्रांत वस्तूच्या विकासाची प्रक्रिया सत्त्व, रजस आणि तमस या तिच्या तीन घटकांमुळे घडत असते. यांना तीन गुण असे म्हणतात. जेव्हा या तीन गुणात समतोल असतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होत नाही, तेव्हा हे विश्व अचेतन होते व त्याची उत्क्रांती थांबते. परंतु याउलट प्रक्रिया होते, तेव्हा त्याची उत्क्रांती सुरू होते. गुणांचा समतोल का जातो, याचे कारण दुःखाच्या अस्तित्वामुळे या तीन गुणांचा समतोल बिघडतो, असे कपिल म्हणतो.
अशाप्रकारे, गौतमाने सांख्य आणि समाधी मार्ग यांची कसोटी घेतली होती. परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने भृगु ऋषीचा आश्रम सोडला होता. त्यामुळे वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी गौतम गया नगरीस गेला. उरुवेल येथे गयेचे राजर्षी नेगरी यांच्या आश्रमात त्यांनी वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वसती करण्याचे स्थान निश्चित केले.
सुजाताचे खिरदान
नत्थि झानं अपञ्ञस्स, पञ्ञा नत्थि अझायतो। यम्हि झानञ्च पञ्ञा च स वे निब्बानसन्तिके ।। (धम्मपदं ३७२)
(अप्रज्ञाला ध्यान नाही. (आणि) ध्यान न करणाऱ्याला प्रज्ञा नाही. ज्याच्याठायी ध्यान आणि प्रज्ञा दोन्ही आहेत, असाच पुरुष निब्बाणाच्या जवळ असतो ) *
सिद्धार्थ गौतमाने सांख्य व समाधीमार्ग यांचा अभ्यास केल्यानंतर तो वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यास प्रवृत्त झाला. वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी नेरंजना नदीच्या काठी एक निर्जन आणि एकांतातील स्थळ निवडले.
या स्थळी गौतमाने तपश्चर्या सुरू केली. त्याच्यासोबत पाच परिव्राजक होते. ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते. ते नम्रतेने गौतमासोबत होते.
गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश याचे स्वरूप अतिशय उग्र होते. त्याने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले. उभे राहून आसन तो बसण्यासाठी कधीही सोडून देत नसे. मांडी घालून बसल्यावर तो कधी उठत नसे. मांडी घालून बसलेल्या स्थितीतच तो हालचाल करीत असे. दररोज तो फक्त वाटीभर अन्नावर जगत असे. घेतलेले
अशाप्रकारे, निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या पराकोटीला पोचला की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच तो जगू लागला.
तो एवढ्या किळसवाण्या अवस्थेला पोचला की त्याच्या अंगावर चिखल आणि घाण याचे थर साचले होते. अरण्याच्या भयाण अशा अंतर्भागात त्याने आपली वस्ती केली होती. जळलेल्या हाडांची उशी करून तो स्मशानात झोपत असे. त्याने एवढी उग्र तपश्चर्या केली की, त्याचे पाठ-पोट एक झाले होते. दररोज एक फळ खाऊन राहू लागला, तेव्हा त्याचे शरीर अतिशय क्षीण झाले होते.
सिद्धार्थाची अशी आत्मक्लेश असणारी तपश्चर्या सहा वर्षांपर्यंत चालली. त्याचे शरीर एवढे क्षीण झाले होते की, त्याला हालचालही करता येत नव्हती. तेव्हा तो स्वतःशीच विचार करू लागला, ‘हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा निश्चितच नाही.’
त्याला कोणताही नवीन प्रकाश दिसला नाही. ऐहिक दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्याला यत्किंचितही उलगडा झाला नव्हता.
मग त्याने मनाशीच विचार केला, ज्याची शक्ती नष्ट झाली आहे. भूक, तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे, थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही, त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही. मग त्यांनी निर्णय घेतला की, खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते. त्यामुळे शेवटी त्याने वैराग्याचा त्याग केला.
त्यावेळी उरुवेला येथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता. त्याला सुजाता नावाची एक कन्या होती.’ सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता. तो असा की तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो नवस फेडण्याचा तिने संकल्प केला होता. तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दासीला नवस फेडण्याची जागा तयार करण्यासाठी पाठविले.
सध्याच्या बुद्धगया याच्या शेजारील गावात वैराग्याचा त्याग करून सहाव्या चैत्र पौर्णिमेला भगवान एका वटवृक्षाखाली खिन्न मनाने व अस्थिपंजर झालेल्या देहाने बसलेले होते. त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की तो वटवृक्षच अवतरला आहे.
सुजाताची मनोकामना पूर्ण झाली होती म्हणून ती चैत्र पौर्णिमेच्या दिवशी खीर घेऊन दासीसोबत तिथे आली होती. साक्षात वटवृक्ष मानवी रूप धारण करून बसलेला आहे असे समजून तिने नैवद्याची खीर अर्पण केली.
सिद्धार्थ गौतमाने त्या पात्राचा स्वीकार केला. खीर ग्रहण केली. त्याच्या शरीराला तजेला आला. बुद्धी प्रगल्भ आणि तल्लख झाली. तो दिवस चैत्र पौर्णिमेचा होता. इ.स.पू. ५२८ चा. नंतर सिद्धार्थाने प्रसन्न मनाने बुद्धगया येथे बोधीवृक्षाखाली सतत चार आठवडे ध्यानसाधना केली तेव्हा त्यास ज्ञान प्राप्ती झाली. सुजाताची खीर गौतमाच्या जीवनाला वेगळेच वळण देऊन गेली.
Chaitra Purnima | Chittamaso | चैत्र पौर्णिमा | चित्तमासो
More Stories
अश्विन पौर्णिमा – अस्सयुज मासो Ashwin Purnima
भाद्रपद पौर्णिमा – पोट्ठपाद मासो Bhadrapada Poornima – Potthapada Maso
आषाढ पौर्णिमा Ashadha Purnima