August 1, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

सांगली जिल्ह्यातील बौद्ध लेणी.

सांगली जिल्ह्य़ाच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारी प्राचीन बौध्दलेणी मिरज-कवठेमहांकाळ तालुक्याच्या सीमेवर असणाऱया गिरीलिंग डोंगरावर असून त्यांचे जतन व्हायला हवे. उंदरोबा आणि तिघई या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱया या लेण्यांचा शोध सात वर्षांपूर्वी मिरज इतिहास संशोधन मंडळाचे मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी लावला होता. त्यानंतर राज्यातील अनेक अभ्यासकांनी या लेण्यांना भेट देऊन त्यांची माहिती घेतली होती. इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱया शतकात या लेण्या कोरल्या असाव्यात. जिल्हय़ाच्या प्राचीन इतिहासाचे साक्षीदार असणाऱया या लेण्यांचे सरंक्षण करून त्यांचा अधिक अभ्यास व्हायला हवा.
महाराष्ट्रात इसवी सनाच्यापूर्वीपासून लेणी आढळतात. ही लेणी बौध्द, शैव आणि जैन अशा प्रकारची आहेत. दक्षिण महाराष्ट्रात आजवर सातारा आणि कोल्हापूर जिल्हय़ात आजवर बौध्द लेणी आढळून आली होती. मात्र, सांगली जिल्हय़ात बौध्द लेणीसमूह आढळून आला नव्हता. मात्र, मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि सातारा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. गौतम काटकर यांना सांगली जिल्हय़ातील दंडोबा डोंगराच्या पूर्वेला असणाऱया गिरिलिंग (जुना पन्हाळा) या डोंगरावर नव्या लेण्यांचा शोध लागला. ही लेणी अप्रसिध्द होती. या शोधामुळे सांगली जिल्हय़ाच्या प्राचीन इतिहासात नवीन भर पडली. गिरिलिंग डोंगरावरील लेण्यांमुळे सांगलीत जिल्ह्य़ात पहिल्यांदाच बौध्द लेण्यांचे अस्तित्त्व आढळून आले आहे. त्यामुळे सांगली जिल्हय़ातील प्राचीन बौध्द परंपरा उलगडण्यास मदत होणार आहे.