December 24, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

कोणत्याही निष्णात पंडिताने बौद्ध धर्माच्या तत्त्वाविषयी माझ्याशी चर्चा करावी मी त्याचा पराभव केल्यावाचून राहाणार नाही – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

दिनांक ४ डिसेंबर १९५४ रोजी रंगून येथे भरलेल्या तिसऱ्या जागतिक बौद्ध धर्माच्या अधिवेशनात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

दिनांक ४ डिसेंबर १९५४ रोजी रंगून येथे श्री. फुन्ग, व्हीचार्न ऑफ थायलंड यांच्या अध्यक्षतेखाली तिसऱ्या जागतिक बौद्ध धर्माच्या अधिवेशनास रीतसर सुरूवात झाली. या अधिवेशनात अमेरिका, इंग्लंड, सिलोन, मलाया, जर्मनी, फ्रांस, इन्डोनेशिया इत्यादी राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी बौद्ध धर्म व त्याची शिकवण या विषयावर उद्बोधक भाषणे केली. अध्यक्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ओळख हिंदुस्थानातील प्रतिनिधींचे पुढारी व तेथील सात कोटी दलितांचे नेते या नात्याने करून देऊन त्यांचा गौरव केला.

या अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुमारे पन्नास मिनिटे अस्खलितपणे भाषण केले. आपल्याला या पवित्र ठिकाणी अधिवेशनास बोलाविल्याबद्दल त्यांनी येथील चालक मंडळीचे प्रथम आभार मानले.

रंगून येथे भरलेल्या तिसर्‍या जागतिक बौद्ध धर्माच्या या अधिवेशनात बोलतांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
या ठिकाणी जमलेले आपण सर्व बुद्धअनुयायी आहोत. जगातील इतक्या राष्ट्रातून बौद्धधर्म प्रचलित असला तरीदेखील त्याचा प्रचार जितक्या झपाट्याने व्हायला पाहिजे तितका झालेला नाही हे मला मोठ्या खेदाने म्हणावे लागते. आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व राष्ट्रांमध्ये सिलोन आणि ब्रह्मदेश ही दोन राष्ट्रे बौद्धधर्माभिमानी या दृष्टीने बरीच आघाडीवर आहेत असे दिसते. परंतु माझ्या दृष्टीने या दोन्ही राष्ट्रांची बौद्धधर्माच्या प्रचाराची कार्यपद्धती अगदीच वाखणण्याजोगी नाही.

येथील श्रीमंत स्त्रियादेखील खूप पैसे दान देतात. धर्माच्या नावाने जमा होणारे हजारो रुपये ते धार्मिक उत्सवप्रसंगी निरर्थक खर्च करतात. घरादारांना व झाडांना विजेचे दिवे लावून हवी ती आरास करण्यात हे पैसे खर्च होतात. त्याऐवजी धर्मासाठी खर्च होणारा पैसा बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी खर्च झाला पाहिजे, असे माझे स्पष्ट मत आहे. ऐश्वर्य नि शोभा या गोष्टी भगवान गौतम बुद्धांना मुळीच पसंत नाहीत. ज्या देशात या धर्माचे नावही नाही अशा देशात धर्म प्रचाराच्या संस्था निर्माण करून त्यांच्यामार्फत भगवान गौतम बुद्धाच्या शिकवणुकीचे बी पेरावे. हे आपले सिलोनी बंधु असे का करीत नाहीत, त्याचे मला मोठे नवल वाटते. तसेच या ब्रह्मदेशातील लोकही धार्मिक उत्सवाप्रित्यर्थ हजारो रुपये खर्च करतात. ते त्यांनी मी वर सांगितल्याप्रमाणे खर्च केले तर अल्पावधीत आपणाला बौद्ध धर्माचा प्रसार करता येईल.

भारत देशाविषयी बोलावयाचे झालेच तर मला मोठ्या दुःखाने म्हणावे लागते की, ज्या देशात गौतम बुद्धाचा जन्म झाला त्याच देशात त्याच्या धर्माचा लोप व्हावा अशी विचित्र घटना का घडावी ? तुमच्यापैकी फारच थोड्या राष्ट्रांना याची कल्पना असेल की, हिंदुस्थानात ब्राह्मणांनी आपले हिंदू धर्माचे वर्चस्व पुष्कळ वर्षापासून अबाधितपणे चालू ठेवले आहे. परंतु ब्राह्मणांना मी आव्हान देतो की, कोणत्याही निष्णात पंडिताने बौद्ध धर्माच्या तत्त्वाविषयी माझ्याशी चर्चा करावी. माझी खात्री आहे की मी त्याचा पराभव केल्यावाचून कधीही राहाणार नाही. (टाळ्या )

प्राचीन काळी हिन्दू धर्मात यज्ञविधिमध्ये गाईंचा बळी दिल्याने स्वर्गप्राप्ती होते, असे ब्राह्मण म्हणत असत. माझा त्यांना उघड सवाल आहे की, अशा रीतीने जितक्या कालावधीत स्वर्गप्राप्ती होत असेल त्यापेक्षाही लवकर आपल्या वडिलांचा बळी दिल्याने स्वर्गप्राप्ती होईल. मग हे लोक आपल्या बापाचा बळी का देत नाहीत. एकेकाळी अशारितीने वागणारे ब्राह्मण आता गोहत्या प्रतिबंधक प्रचार करीत आहेत. हा एक गौतम बुद्धाच्या अहिंसा तत्त्वाचा मोठा विजय होय.

ब्राह्मणाव्यतिरिक्त ब्राह्मणेतर पक्ष भारतात संख्येने बराच मोठा आहे. धर्माच्याविषयी त्यांचीही स्थिती केविलवाणी झाली आहे. हजारो देव देवता या देशामध्ये ब्राह्मणांनी निर्माण केल्या आहेत. कोणत्या देवाची उपासना केल्याने मोक्ष-मुक्ती मिळेल हे त्यांनाही समजत नाही. आपल्या बौद्ध धर्मात मोक्ष-स्वर्ग या खुळ्या कल्पनांना स्थान नाही. उलट मानवी जीवित सुखसमाधानाने घालवावयाचे असेल तर मानवाने शुद्धाचरण, अहिंसा, समता आणि बंधुत्व या गोष्टींचाच अवलंब करावा. त्याशिवाय त्याला दुसरा मार्गच नाही. या गोष्टी गौतम बुद्धाच्या धर्मातील तत्त्वे म्हणून प्रसिद्ध आहेत आणि हीच तत्त्वे मी माझ्या सहा कोटी अनुयायांना सांगितली आहेत. ती त्यांना पटली आहेत पैशाच्या अभावी मी त्यांच्यासाठी आज काहीच करू शकलो नाही ; तरी पण उद्या अल्पावधीतच मला योग्य ती साधने उपलब्ध झाली की बौद्ध धर्माचा प्रसार भारतात केल्यावाचून मी कधीही राहाणार नाही. (टाळ्या)

मी पार्लमेंटमध्ये असताना बौद्ध धर्माच्या पुनरूत्थानाविषयी काही गोष्टी करून टाकल्या आहेत. भारताच्या घटनेचा मी शिल्पकार आहे. मी ती घटना तयार केली. तीत पाली भाषेच्या उत्थानाची योजना करून ठेवली आहे, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्राध्यक्षाच्या राजवाड्यावर गौतम बुद्धाच्या शिकवणुकीतील पहिलेच चरण-धम्मचक्र प्रवर्तन घातले असून ते मी ब्रह्मदेशाचे अध्यक्ष डॉ. जी. पी. मललशेखर यांच्या दृष्टोत्पत्तीस आणले आहे. हे पाहून त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले.

तिसरी गोष्ट म्हणजे भारतीय पार्लमेंटच्या निशाणावर अशोक चक्र हे भारत सरकारचे प्रतीक म्हणून घटनेत मान्य करून घेतले आहे. हे सर्व करताना मला हिंदू, मुसलमान, खिश्चन व पार्लमेंटच्या इतर सभासदांचा विशेष विरोध झाला नाही. इतके स्पष्ट नि मुद्देसूद विवेचन मी पार्लमेंटमध्ये केले होते.

या तिसऱ्या अंतरराष्ट्रीय अधिवेशनाला जमलेल्या या अठ्ठावीस राष्ट्रांपैकी एखाद्या राष्ट्राने तरी असे केले आहे का ? एवढेच करून मी थांबलो नाही, तर मुंबई शहरात सिद्धार्थ नावाचे एक मोठे कॉलेज मी स्थापन केले आहे. तसेच अजिंठा, वेरूळ इकडे जाताना वाटेत औरंगाबाद येथेही दुसरे कॉलेज स्थापन केले आहे. मुंबईतील कॉलेजमध्ये २९०० व औरंगाबाद येथे ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

या विद्यार्थ्यांकडून गौतम बुद्धाच्या चरित्रावर प्रबंध लिहून घेऊन ज्याचा प्रबंध सरस ठरेल त्याला एक हजार रुपये देण्याचा माझा विचार आहे. हा प्रबंध लिहून घेण्याचा हेतू हा की, बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास त्यांनी करावा म्हणजे आपोआप बौद्ध धर्म प्रचाराचे काम होईल. या चढाओढीत पारशी, मुसलमान, हिंदू वगैरे धर्मातील विद्यार्थ्यांना भाग घेता येईल.

तसेच पुरेसा पैसा जमा झाल्यास दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्रास या शहरात बुद्ध विहार स्थापन करून प्रत्येक रविवारी लोकांच्या उपासनेची सोय करण्याचा माझा मानस आहे. मी स्थापन केलेल्या दोन्ही कॉलेजसाठी भारत सरकारकडून २२ लाख रुपये कर्ज घेतले आहे. हे कर्ज मी मरेपर्यंत फेडीन की नाही याची मला मोठी शंकाच वाटते. (हशा)

अशारितीने माझा या धर्माच्या बाबतीत प्रयत्न चालू आहे. जगात भारत हा असा एकच देश आहे की, जेथे बौद्ध धर्माचा प्रसार फारच थोड्या काळात करता येईल. शेतकरी जमीनीचा मगदूर पाहूनच तीत बी पेरतो, तद्वतच या भारत देशात बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी आवश्यक अशा अनुकूल गोष्टी आहेत. त्याचा आपण सर्व राष्ट्रांनी आर्थिक सहाय्य करून उपयोग करून घ्यावा, अशी माझी विनंती आहे. कोणी सहाय्य करो वा न करो, माझा मार्ग मी आक्रमिल्यावाचून राहाणार नाही, असे या सभागृहास मी आश्वासन देतो. (टाळ्या)
🔹🔹🔹

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण चालू असताना जगातील अठ्ठावीस राष्ट्रांचे प्रतिनिधी हे भाषण शांत चित्ताने ऐकत होते.

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे