छत्रपती संभाजीनगर : भीम टेकडी येथे सुरू असलेल्या जागतिक धम्म परिषदेचा दुसरा दिवस मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. धम्म, समता आणि जागतिक शांततेचा संदेश देणाऱ्या या परिषदेत देश-विदेशातील भिक्खू , भिक्खूनी व आंबेडकरी अनुयायांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
उद्घाटन सत्रात भिक्खूनी धम्मदर्शना महाथेंरी, भन्ते हर्षबोधी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार कल्याण काळे, डॉ. अरविंद गायकवाड, अनिलकुमार बस्ते, मिलिंद शेळके, बाबुराव कदम, विजय मगरे, किशोर थोरात तसेच उपगुप्त महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माताजींच्या जीवनप्रवासावर आधारित व्हिडिओ चित्रफीत दाखविण्यात आली, ज्यामुळे सभागृहातील वातावरण भावूक झाले.
परिषदेतील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे भीमटेकडीच्या विकासासाठी निधीची तरतूद. खासदार कल्याण काळे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की,“मी खासदार झालो ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादामुळे,” माताजी धम्मदर्शनाजी यांचे काम खूप मोठे आहे, त्यांचे काम बघून मी प्रभावित झालो आहे, असे सांगत भीमटेकडीच्या विकासासाठी २५ लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. तर यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खासदार निधीतून टप्प्याटप्प्याने ७५ लाख रुपये देण्याची घोषणा केली. त्यामुळे एकूण १ कोटी रुपयांचा निधी भीमटेकडी विकासासाठी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले. या घोषणेमुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
आपल्या भाषणात आठवले म्हणाले, “बहुमताने निर्णय घेणे हीच खरी लोकशाही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘एक मत, एक अधिकार’ देत देशात लोकशाहीची भक्कम पायाभरणी केली.” त्यांनी १९९८ साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारविरोधातील अविश्वास ठरावाचा उल्लेख करत एक मत किती महत्त्वाचे असते हे पटवून देत, लोकशाही प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित केले.
देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “देशाचे श्रीलंका किंवा बांगलादेशसारखे हाल करण्याचा प्रयत्न झाला, तर आंबेडकरी जनता गप्प बसणार नाही.”
परिषदेतील सर्वाधिक दाद मिळालेला मुद्दा म्हणजे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी. आठवले यांनी ठाम शब्दांत सांगितले, “कोण म्हणतं देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही.” देशभरात यासाठी आंदोलन सुरू असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच संबंधित ट्रस्टमधील सर्व सदस्य बौद्ध समाजातीलच असावेत, अशी भूमिका मांडत त्यांनी सवाल उपस्थित केला – “तुमच्या ट्रस्टमध्ये आम्ही नाही, तर आमच्या ट्रस्टमध्ये तुम्ही कशाला हवेत?”
३० देशांतील भन्तेजींचा सहभाग; ‘आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवाय’
या जागतिक परिषदेत सुमारे ३० देशांतील भन्तेजी सहभागी झाले आहेत. समता, बंधुता आणि शांततेचा संदेश जगभर पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. “आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवाय” हा संदेश जागतिक स्तरावर नेण्याची प्रतिज्ञा करण्यात आली.
भीम टेकडी येथे भविष्यात ५० एकर जागेत भव्य स्मारक उभारण्याची संकल्पनाही मांडण्यात आली. संबंधित जमीन संस्थेच्या नावावर करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन मान्यवरांनी दिले.
प्रास्ताविक करताना मुख्य संयोजिका प्रा. धम्मदर्शना महाथेरी यांनी अत्यंत मनोगतपूर्ण आणि स्पष्ट भूमिका मांडली. परिषद उभारणीमागील संघर्ष, आर्थिक अडचणी आणि संघटनात्मक आव्हाने त्यांनी उपस्थितांसमोर प्रामाणिकपणे मांडली.
निधीअभावी परिषदेच्या तयारीत अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः मंडप व शामियानासाठी ठेकेदाराने ऐनवेळी हात काढून घेतल्यामुळे मोठी तारांबळ उडाली. काही काळ कार्यक्रमच संकटात येईल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अशा कठीण प्रसंगी दत्ताभाऊ बनसोडे आणि गणेश सुरडकर यांनी पुढाकार घेत साथ दिली. त्यांच्या सहकार्यामुळेच हा भव्य पेंडोल उभा राहू शकला, असे सांगत त्यांनी दोघांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
ही परिषद केवळ एका व्यक्तीची किंवा समितीची नसून संपूर्ण धम्मसमाजाची आहे, असे ठामपणे नमूद करत त्यांनी सर्वांनी “सढळ हाताने मदत” करण्याची गरज अधोरेखित केली. केवळ आर्थिक नव्हे तर श्रमदान, वेळ आणि संघटनात्मक जबाबदारी स्वीकारणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्या म्हणाल्या. उपासक-उपासिकांनी दिलेल्या भरभरून मदतीबद्दल त्यांनी मनापासून आभार मानले. मात्र त्याचवेळी एक वेदनादायी वास्तवही त्यांनी मांडले. “एका एका उपासकाच्या घरी दहा-दहा वेळा जावे लागते; ही वेळ कोणत्याही भंतेवर किंवा भिक्खूंनीवर येऊ नये,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. धम्मकार्य करणाऱ्यांना वारंवार मदतीसाठी जावे लागणे ही समाजासाठी लाजिरवाणी बाब असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
भंते आणि भिक्खूंनी धम्मप्रसार, शिक्षण व समाजजागृतीचे कार्य करावे; त्यांना दारोदार जाऊन विनंती करण्याची वेळ येऊ नये. उपासक-उपासिकांनी स्वयंस्फूर्तीने कूटीवरच दान आणून द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. धम्म टिकवायचा असेल तर त्यासाठी संघटित आणि जबाबदार समाज उभा राहणे गरजेचे आहे, असा स्पष्ट संदेश त्यांच्या भाषणातून उमटला.
प्रा. धम्मदर्शना महाथेरी यांच्या या मनोगतातून धम्मकार्याची तळमळ, संघर्ष आणि समाजाबद्दलची अपेक्षा प्रकर्षाने जाणवली. त्यांच्या शब्दांनी उपस्थितांना केवळ परिस्थितीची जाणीव करून दिली नाही, तर धम्मकार्यात अधिक सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही केले.
विकासाला नवे बळ : जागतिक धम्म परिषदेच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या या महत्त्वपूर्ण घोषणांमुळे भीमटेकडीच्या विकासाला नवे बळ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. धम्म, समता आणि शांततेचा जागतिक संदेश देणारी ही परिषद आगामी काळात अधिक व्यापक रूप धारण करणार, अशी चिन्हे दिसत आहेत.
More Stories
नागपूर येथे बामियानच्या बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारणार Replica of Bamiyan Buddha statue to be built in Nagpur
🌼 दिवस ३ – धम्मपद महोत्सव (मुख्य दिवस) फग्गुण पुन्नमी – पूज्य आचार्य बुद्धरक्षित महाथेर यांची १०४ वी जयंती
पिप्रहवा येथील अवशेष दिल्लीतील लाडो सराई येथे आले