February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

निवडणुकीतील कर्मचाऱ्यांना करता येणार त्याच केंद्रांवर मतदान; पोलिसांसाठी असणार पोस्टल वोटिंग सेंटर

सोलापूर व माढा या लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान आहे. १२ ते १९ एप्रिल दरम्यान उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान, निवडणुकीसाठी नियुक्त पोलिस व इतर कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी मतदान करता येणार असून त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.

सोलापूर : सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान आहे. १२ ते १९ एप्रिल दरम्यान उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान, निवडणुकीसाठी नियुक्त पोलिस व इतर कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी मतदान करता येणार असून त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्या नियोजनानुसार अंदाजे ३० ते ३५ हजार कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सीमेवरील सैनिकांना मात्र ऑनलाइन मतपत्रिका पाठविल्या जातात आणि त्यांनी मतदान केल्यानंतर त्या मतपत्रिका टपालाने जिल्ह्याला येतात. त्यांच्याच मतपत्रिका पोस्टाने आणल्या जातात, इतरांच्या नाही असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी सांगितले.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिक्षकांसह सर्वच शासकीय विभागांकडील १८ ते २२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. दुसरीकडे शहर व जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने १५ हजारांचा पोलिस बंदोबस्त देखील नेमला जाणार आहे. सध्या ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग व ८५ वर्षांवरील ज्येष्ठांना घरी बसून की केंद्रावर येऊन मतदान करायचे आहे, यासंदर्भातील अर्ज भरून घेतले जात आहेत. निवडणुकीत प्रत्येकांनी मतदान करावे, अशी जिल्हा प्रशासनाची अपेक्षा आहे. त्यासाठी मतदान केंद्रांवरील शासकीय कर्मचारी व पोलिसांना देखील त्याच ठिकाणी मतदान करता येणार आहे. त्याची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार असल्याचीही माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली.

मतदान केंद्रांवरील अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी…

  • १) मतदान केंद्रांवरील अधिकारी- कर्मचारी त्याच लोकसभा मतदारसंघातील असल्यास त्यांना ज्या केंद्रावर ते कर्तव्य बजावत आहेत, त्याठिकाणी ‘ईडीसी’अंतर्गत मतदार यादीत नाव समाविष्ट करून ‘ईव्हीएम’द्वारे मतदान करता येणार आहे.
  • २) निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांसाठी मतदान केंद्रांवर पोस्टल वोटिंग सेंटर उभारून त्याठिकाणी त्यांना पोस्टल बॅलेट पेपर दिले जातील. त्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान करून तो बॅलेट पेपर त्याठिकाणी जमा करायचा आहे.
  • ३) लोकसभा निवडणुकीसाठी परजिल्ह्यातून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस किंवा इतर कर्मचाऱ्यांना देखील मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यासाठी त्यांना ज्या जिल्ह्यातून (मतदारसंघ) आलेले आहेत त्याची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर येथील निवडणूक अधिकारी तो कर्मचारी ज्या मतदारसंघातील आहे, तेथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संपर्क करतील. त्यानंतर तेथून पोस्टल बॅलेट पेपर मागवून याठिकाणी संबंधित कर्मचाऱ्याचे मतदान घेतील आणि तो लिफाफा त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पोच केला जाईल.

दिव्यांग व‌ ज्येष्ठ ५४ हजार मतदारांना अर्ज : जिल्ह्यातील दिव्यांग व ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांना घरी बसून मतदान करण्याची सोय उपलब्ध असणार आहे. त्यासाठी त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांकडून एक अर्ज दिला जात असून त्यात त्यांनी मतदान केंद्रावर येऊन की घरी बसून मतदान करणार, यापैकी एक पर्याय निवडायचा आहे. त्या अर्जाचे वाटप सुरु असून १७ एप्रिलपर्यंत ते अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यानुसार संबंधित मतदारांच्या मतदानाची व्यवस्था केली जाणार आहे.