कार्तिक पौर्णिमेला पाली भाषेत ‘कत्तिक मासो’ म्हणतात. ही पौर्णिम साधारणतः नोव्हेंबर महिन्यात येते. या पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या जीवनातील काही घटना घडल्यात, त्या अशा काश्यप बंधूची धम्मदीक्षा, सारिपुत्तार्च धम्मदीक्षा, महामोग्गलायन यांची हत्या, महाप्रजापतीचे चीवर दान. या पौर्णिमेल ज्या घटना घडल्यात, त्यांचा संक्षिप्तपणे परिचय असा-
१) काश्यप बंधूची धम्मदीक्षा
असद्धो अकतञ्जू च सन्धिच्छेदो च यो नरो। हतावकासो वन्तासो, स वे उत्तमपोरिसो ।। (धम्मपदं : ९७) (जो (अंध-) श्रद्धारहित आहे, ज्याने निर्वाण समजून घेतले आहे, ज्या बंधने तोडली आहेत, ज्याला पुनर्जन्माची संधी नाही, ज्याने ( विषयभोग ) आशेचा त्याग केला आहे, तोच निःसंदेह उत्तम पुरुष होय.)
वाराणशीमध्ये काश्यप नावाचे एक कुटुंब राहात होते. त्या कुटुंबात तीन पुत्र होते. हे तीन भाऊ उरुवेला काश्यप, नदी काश्यप, गया काश्यप या नावाने ओळखले जात. ते विद्याविभूषित आणि कर्मठ जीवन जगत होते. ते सगळे अग्नोहोत्री किंवा अग्नीपूजक होते. त्यांनी लांब केस ठेवले असल्यामुळे त्यांना ‘जटिल’ असे म्हणत.
यापैकी उरुवेला काश्यपाचे पाचशे जटिल अनुयायी होते. नदी काश्यपाचे तीनशे जटिल अनुयायी होते आणि गया काश्यपाचे दोनशे अनुयायी होते. उरुवेला काश्यप हा प्रमुख होता.
उरुवेला काश्यपाची कीर्ती ऐकल्यामुळे त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास धम्माची दीक्षा देण्याचा तथागतांनी विचार केला.
तथागतांनी त्याची भेट घेतली आणि त्याच्या आश्रमात रात्रभर राहू देण्याची विनंती केली.
काश्यप अनेक अडचणी सांगू लागला. काश्यप म्हणाला, “या प्रदेशावर मुचलिंद नावाचा एक रानटी नागराजा आहे, तो रात्री आश्रमात येतो आणि सर्व अग्नीपूजा करणाऱ्या संन्यासांना भयंकर त्रास देतो.”
तथागताच्या आग्रहास्तव काश्यपानी संमती दिली. संमती मिळताच तथागताने अग्नीशाळेत प्रवेश केला. तेथे ते जाऊन बसले.
काश्यप काळजीने अस्वस्थ झाला. तथागताला बहुधा भस्मसात केले असावे, या शंकेने तो रात्रभर झोपला नाही. नंतर उजाडल्यावर काश्यप आणि त्याचे अनुयायी बघतात तर आश्चर्य ! मुचलिंद तथागताची पूजा करीत असल्याचे त्यांना आढळले.
या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपाने तथागतांना त्याचेजवळ राहण्याची व आश्रम स्थापन करण्याची विनंती केली.
एके दिवशी तथागताने काश्यपाला विचारले, “तुम्ही अर्हन्त आहात काय?” काश्यपाला हा प्रश्न समजला नाही. तेव्हा भगवंत म्हणाले, “अष्टांग मार्गापासून च्युत करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अर्हन्त. अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही.”
काश्यप अहंमन्य पुरुष असला तरी तथागताच्या विधानातील सामर्थ्य त्याला जाणवले. त्याने अत्यंत नम्रतेने भगवंताचा सिद्धान्त मान्य करून उरुवेला काश्यप त्याचा अनुयायी झाला. काश्यप आणि त्याचे अनुयायी यांना धम्माची दीक्षा देण्यात आली.
आपल्या भावाने असे केले तर आपणही त्याचे अनुकरण करावे, या हेतूने ते दोघे बंधू उरुवेला काश्यप जवळ आले. भगवान बुद्धाने त्यांना प्रवचन दिले. ते म्हणाले, “काम, क्रोध व अविद्या हे अग्नीप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींना भस्मसात करतात… म्हणून एकदा माणसाच्या अंतःकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तिच्यापुढे तृष्णा नाहीसी होते आणि तृष्णा नाहीसी झाली की मनुष्य श्रमण बनतो. “”
भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकून त्या महर्षीचा अग्नीपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि त्यांनी बुद्धाचा शिष्य होण्याची इच्छा व्यक्त केली. बुद्धाने त्यांना धम्मदीक्षा दिली. तो दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता.
शेवटी, जेव्हा उरुवेला काश्यपांना असे वाटले की, आपली अंतिम वेळ आली आहे. तेव्हा त्यांनी भगवान बुद्धाच्या जवळ अनुमती मागितली. त्या दिवशी त्यांना निर्वाण प्राप्त झाले, तो दिवसही कार्तिक पौर्णिमेचा होता.
२) सारिपुत्त आणि मोग्गलान यांची धम्मदीक्षा
तथागत राजगृहात राहात असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहात होता. सुमारे अडीचशे परिव्राजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहात होते. त्याच्या शिष्यवर्गात सारीपुत्त आणि मोग्गलान या नावाचे दोन तरुण ब्राह्मण होते. संजयच्या उपदेशाने त्यांचे समाधान झाले नव्हते. ते यापेक्षा चांगल्या तत्त्वज्ञानाच्या शोधात होते.
एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खूंपैकी स्थविर अश्वजीत चीवर परिधान करून आणि भिक्षापात्र हाती घेऊन राजगृह नगरीत भिक्षेसाठी आला.
अश्वजीताची धीर-गंभीर चाल पाहून सारिपुत्त चकित झाला. काही वेळानंतर अश्वजीताच्या जवळ उभा राहून परिव्राजक सारिपुत्ताने विचारले, “मित्रा, आपली मुद्रा शांत आहे, आपले रूप शुद्ध व तेजस्वी आहे. आपला गुरू कोण? आपण कोणता धम्म मानता?”
अश्वजीत म्हणाला, “मित्रा, शाक्य कुळात जन्मलेला एक महान श्रमण आहे. त्याच्या नावाने मी ही प्रव्रज्या धारण केली आहे. तोच माझा गुरू आहे, आणि त्याच्याच धम्माला मी अनुसरले आहे.”
“वंदनीय महाराज, आपल्या गुरूचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश दिला आहे?” असे सारिपुत्ताने विचारले.
नंतर अश्वजीताने सारिपुत्ताला भगवान बुद्धाच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला. त्याने सारिपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले.
सारिपुत्त आणि मोग्गलान हे जरी सख्खे भाऊ नसले तरी ते सख्ख्या भावाप्रमाणे राहात असत. त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते. ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे, असे त्यांचे परस्परात ठरले होते.
एकदा सारिपुत्ताला पाहून मोग्गलान म्हणाला, “मित्रा, तुझी मुद्रा शांत आहे, तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे; सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय?”
“होय मित्रा, मला सत्याचे ज्ञान झाले आहे.” ते कसे झाले याचा वृत्तांत सारिपुत्ताने मोग्गलान यास सांगितला.
तेव्हा मोग्गलान सारिपुत्ताला म्हणाला, “मित्रा, चल, आपण तथागताला भेटू. तेच आपले गुरू होतील.
“हा निर्णय घेण्यापूर्वी सारिपुत्त आणि मोग्गलान यांनी त्यांच्या सोबत असलेल्या अडीचशे परिव्राजकांशी भेट घेतली. त्यांना यासंबंधी सांगितले. नंतर संजयला हे सर्व सांगितले, तेव्हा त्यांनी त्यास जाण्यास नकार दिला.
परंतु सारिपुत्त आणि मोग्गलान यांनी संजयचा नकार न जुमानता अडीचशे परिव्राजकांना घेऊन भगवान बुद्ध जेथे राहात होते त्या राजगृहातील वेळूवनात गेले.
सारिपुत्त आणि मोग्गलान दुरूनच येत असताना तथागताने पाहिले. त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले, ‘ते पहा, भिक्खूहो, दोन सोबती येत आहेत.”
सारिपुत्त आणि मोग्गलान यांच्याकडे बोट दाखवून तथागत म्हणाले, हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यद्वय होतील.”
वेळूवनात पोहोचल्यावर सारिपुत्त आणि मोग्गलान आपल्या शिष्यांसह जेथे भगवान बुद्ध होते तेथे गेले. त्यांच्या समोर जाऊन त्यांना वंदन केले. भगवंतांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवून ते भगवंतास म्हणाले,
“भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी.”
भगवंत म्हणाले, “एहि भिक्खवे” (भिक्खूनो, या) असे म्हणताच सारिपुत्त, मोग्गलान आणि अडीचशे शिष्य बुद्धाचे शिष्य झाले.
सारिपुत्त आणि मोग्गलान हे भगवान बुद्धापेक्षा वयाने मोठे होते. ते धम्मप्रचारात प्रमुख सेनानी होते. भगवान बुद्धासोबत त्यांची नेहमी सोबत राहायची. जणू ते त्यांचे डावे-उजवे हात होते. राहुलचे धम्मगुरू हे सारिपुत्त होते. सारिपुत्त आणि मोग्गलान यांनी ज्या दिवशी धम्मदीक्षा घेतली, तो दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता.
३) धम्मसेनापती महामोग्गलानची हत्या
ते झायिनो साततिका, निच्चं दळ्ह-परक्कमा । फुसन्ति धीरा निब्बानं, योगक्षेम अनुचरं ।। ( धम्मपदं : २३ )
( ध्यान करणारे, जागृत, नित्य दृढ पराक्रमात रत असणारे धीर पुरुषच अनुत्तर योगक्षेम निब्बाणाला प्राप्त करतात )
राजगृहाजवळचे कोलित गाव हे महामोग्गलानची जन्मभूमी. गावाच्या नावावरून सर्वजण त्यास ‘कोलित’ या नावानेच बोलवित. प्रव्रज्येनंतर थोड्याच दिवसात भगवंतांनी महामोग्गलान यास ‘द्वितीय धम्मसेनापती’ घोषित केले.
असे म्हटले जाते की, महामोग्गलानची कांती निळ्या कमळासम होती. आजही श्रीलंकेमध्ये त्याची प्रतिमा निळ्या रंगाची बनविली जाते. महामोग्गलान व सारिपुत्त यांचे वय भगवंतापेक्षाही अधिक होते. महामोग्गलानाचा प्रभाव तत्कालीन समाजमनावर अधिक होता.
तेव्हा बौद्ध धम्माच्या प्रभावामुळे ब्राह्मणी व जैन धर्माचा प्रभाव क्षीण झाला होता. त्यामुळे जैन लोक भगवान बुद्धांचा आणि त्यांच्या धम्माचा व संघाचा द्वेष करून तथागतांना कलंकित करण्याचे व भिक्खूनांही जीवे मारण्याचे षडयंत्र रचत होते.
राजगृहच्या धर्मशाळेत जेव्हा प्रसेनजीत राजाचा मृत्यू झाला, त्याच कालावधीत मोग्गलान हा राजगृहामध्येच एकांतात असलेल्या कालशिला पर्वताच्या गुहेत वास्तव्य करीत होता.
ही संधी साधून जैनांनी वध करणाऱ्या मारेकऱ्यांना १००० कार्षापण देऊन मोग्गलानची हत्या करण्यास पाठविले. त्यानुसार मारेकऱ्यांनी कार्तिक अमावश्येचा अंधाऱ्या रात्री त्या एकांतात असलेल्या गुहेत घुसून मोग्गलानची निर्दयतेने हत्या केली आणि इतर भिक्खूंनाही मारहाण केली. या घटनेमुळे भिक्खुंसंघात फारच चिंतेचे व धास्तीचे वातावरण पसरले.*
मोग्गलायनच्या हत्येचा समाचार कळल्यानंतर राजा अजातशत्रूने सर्व गुन्हेगारांना व जैन तीर्थकांना पकडून त्यांना नाभीपर्यंत खड्यात दाबून जिवंत जाळण्यास लावले.
भगवान बुद्ध दोन महिन्यानंतर राजगृहला आले. तेव्हा त्यांना प्रसेनजीत राजाच्या निधनाची आणि मोग्गलानच्या निघृण खुनाची बातमी कळली. ते फारच व्यथित झाले. त्यावेळी भगवंत म्हणाले-
“भिक्खूंनो! त्या मारेकरी व जैन तीर्थकांनी माझ्या निर्दोष पुत्राला अनेक दोष लावून ठार मारले, हे त्यांनी भयंकर मोठे पाप केले आहे. त्यामुळे त्यांचाही भयंकर दुःखद मृत्यू होऊन ते दुर्गतीस प्राप्त झाले आहेत.”
त्यांनतर तथागतांच्या सांगण्यावरून राजगृहला मोग्गलानच्या अवशेषावर भव्य स्तूप उभारण्यात आला. सांचीचा जो भव्य स्तूप आहे, तिथेही सारिपुत्त व महामोग्गलान यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या आहेत. दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी त्या अस्थी जनतेसाठी खुल्या असतात.
४) महाप्रजापती गौतमीचे चीवर दान
तिणदोसानी खेत्तानि, इच्छादोसा अयं पजा।
तस्मा हि विगतिच्छेसु, दिन्नं होति महफ्फलं ।। (धम्मपदं : ३५९)
(शेतांचा दोष तृण आहे, मनुष्याचा दोष इच्छा करणे हा आहे; म्हणून इच्छा-रहित मनुष्याला दिलेले दान महान फलदायक होते.)”
एकदा भगवान बुद्ध कपिलवस्तूच्या न्यग्रोधाराम मध्ये विहार करीत होते. तिथे महाप्रजापती गौतमी स्वतः विणलेले दोन शेले घेऊन तथागताकडे गेली. तथागतांना वंदन करून ती बाजूला बसली. ती तथागतांना म्हणाली, “भन्ते! मी स्वतः कातलेले, विणलेले हे दोन शेले आपणास अर्पित करीत आहे. भगवंतांनी त्याचा कृपा करून स्वीकार करावा.”
असे म्हणताच भगवंतांनी महाप्रजापतीला म्हटले, “गौतमी! हे संघाला दे. संघाला दिल्यास मी पूजीत होईल आणि संघ सुद्धा.”
भगवंतांनी हीच गोष्ट महाप्रजापतीला दोन वेळा – तीन वेळा सांगितली.त्यानंतर आयुष्मान आनंद भगवंताला म्हणाले,
“भन्ते, भगवान, महाप्रजापती गौतमीने आणलेल्या शेल्याचा स्वीकार करावा. भन्ते, महाप्रजापतीचे अनंत उपकार भगवंतांवर आहेत. मातेच्या मृत्यूनंतर तिनेच भगवंताला दूध पाजले होते. भगवंत सुद्धा महाप्रजापतीसाठी महोपकारक आहेत. भगवंतामुळे महाप्रजापती बुद्ध, धम्म आणि संघाच्या शरण आली. भगवंतामुळे महाप्रजापती पंचशीलाचे पालन करीत आहे. भगवंतामुळे महाप्रजापती बुद्ध, धम्म, संघ यावर श्रद्धायुक्त झाली आहे. भगवंतामुळे महाप्रजापतीला चार आर्य सत्यांचे ज्ञान प्राप्त झाले आहे.”६
आयुष्यमान आनंदने भगवंतांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. त्यावेळी भगवंतांनी आनंदला दान-दक्षिणा कशी करावी, याचा उपदेश केला. शेवटी भगवंताने आनंदाला सांगितले, “संघविषयक दक्षिणेपेक्षा व्यक्तिगत स्वरूपाने दिलेली दक्षिणा अधिक फलदायक आहे, असे मी मानत नाही.”
शेवटी, महाप्रजापती गौतमीने स्वतः तयार केलेले शेले संघाला दान दिले. तिने अत्यंत परिश्रमाने वर्षावासाच्या तीन महिन्याच्या काळात ते तयार केले होते. ज्या दिवशी शेले दान करण्याची इच्छा तिने तथागतांजवळ केली होती ती कार्तिक पौर्णिमा होती. ती पौर्णिमा कठीण चीवरदानासाठी प्रसिद्ध आहे. या दिवशी भिक्खूंना कठीण चीवरदान देण्यात येते.
संदर्भ :
१. धम्मपदं, संपा. डॉ. धनराज डाहाट, संकेत प्रकाशन, नागपूर, द्वि.आ. २०११, पृ. ३४
२. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉ. भी.रा. आंबेडकर, सिद्धार्थ प्रकाशन, मुंबई, आवृत्ती १९८०, पृ. ११०
३. धम्मपदं, पृ. १४
४. तथागत आणि बौद्ध स्थळांचा इतिहास, पी.जी. रायबोले शीलवंत, पृ. १६५
५. धम्मपदं, पृ. १०२
६. बुद्धचर्या, राहुल सांकृत्यायन, भारतीय बौद्ध समिती लखनऊ, १९९५, पृ. ७१
More Stories
अश्विन पौर्णिमा – अस्सयुज मासो Ashwin Purnima
भाद्रपद पौर्णिमा – पोट्ठपाद मासो Bhadrapada Poornima – Potthapada Maso
आषाढ पौर्णिमा Ashadha Purnima