July 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

Dhamma Chakra Pravartan Diwas : दीक्षाभूमीवर २२ प्रतिज्ञांचा जयघोष; जपानच्या उपासकांना दिली दीक्षा

नागपूर – दीक्षाभूमीच्या प्रांगणात जपानचे उपासक-उपासिका डोक्यावरचे केस काढून उपस्थित झाले होते. श्रामणेरची दीक्षा घेण्यासाठी सर्व उपासक रांगेनी हजर होते. त्यांच्या मागे जपानचे प्रतिनिधी बसले होते. उपासकांनी ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतल्यानंतर भदंत ससाईंचे आशीर्वाद घेतले. अंगावर काशाय वस्त्र धारण केल्यानंतर ससाई यांच्याकडून त्रिशरणसह दशशील ग्रहण केले. सोबतच आयुष्यभर तथागत गौतम बुद्धाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आयोजित धम्मदीक्षा सोहळ्यात जपानहून आलेल्या उपासक उपासिकांनी आज श्रामणेरची दीक्षा घेतली. यावेळी त्यांनी काशाय वस्त्र म्हणजेच चिवर परिधान केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी जपानच्या अनुयायांसह हजारो बांधवांना धम्मदीक्षा दिली. यावेळी २२ प्रतिज्ञांचा जयघोष करण्यात आला.

यावेळी नागा बिकूनी, नागा पुरू, नागा दावई, नागा किर्रा, नागा सेवक, नागा चंद्रा, नागा सदक, नागा सॅम्युनेल, नागा बादल, नागा पवित्रा, नागा बालिश, नागा उत्कुलश, नागा इसामू, नागा चामकादल यांचा समावेश होता. मंचावर भदंत ससाई यांच्यासह भदंत धम्मसारथी, नागवंश, प्रज्ञा बोधी, भीमा बोधी, नागसेन, महानामा, राहुल, धम्मविजय, कश्यप, भदंत धम्मप्रकाश, संघप्रिया, विशाखा गौतमी, पुंडलिक उपस्थित होते. धम्म दीक्षेच्या दुसऱ्या दिवशी १५ हजारांवर अनुयायांनी धम्मदीक्षा घेतली. सर्वांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी जपान, थायलंड, मलेशिया आणि देश विदेशातील बौद्ध भिक्खू उपस्थित होते.

Dhamma Chakra Pravartan Diwas