महाड तालुका महार हितसंरक्षक संघातील मंडळीकडून केलेल्या स्वागत समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….
महाड तालुका महार हितसंरक्षक संघातील मंडळीने गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर १९४० रोजी परेल, मुंबई येथील आर. एम. भट हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चहा पार्टी देण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात प्रथम डॉ. बाबासाहेबांबरोबर महाड तालुका महार हितसंरक्षक संघाच्या सभासद व कार्यकारी मंडळीसह आमदार भाई चित्रे, दादासाहेब संभाजी गायकवाड, लोखंडे, सवादकर इत्यादी कार्यकर्त्यांचा ग्रूप फोटो काढण्यात आला. त्यानंतर चहा पार्टीचा कार्यक्रम उरकण्यात आला. संघाचे अध्यक्ष श्री. आर. व्ही. मोरे यांनी कबूल केल्याप्रमाणे ‘ जनता ‘ ला ४० रुपये रोख दिले व १० रुपये मागाहून देण्याचे जाहीर अभिवचन दिले. डॉ. बाबासाहेबांनी काही बोलावे अशी सर्व जनसमूहामार्फत आग्रहाची विनंती करण्यात आली. या विनंतीला मान देऊन डॉ. बाबासाहेब टाळ्यांच्या गजरात बोलावयास उठले.
महाड तालुका महार हितसंरक्षक संघातील मंडळीकडून केलेल्या स्वागत समारंभात केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
ज्या महाड तालुक्याने अस्पृश्यांच्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवण्याबाबत पुढाकार घेतला त्याच तालुक्यातील मंडळीनी मला ५० रुपये देऊन सभेला बोलविण्याची प्रथा अस्पृश्य समाजात घालून दिली याबद्दल ते स्तुतीस पात्र आहेत. मुंबई येथे अस्पृश्य समाजासाठी एक भव्य इमारत बांधली जाणार आहे आणि ती निव्वळ अस्पृश्यांच्याच पैशावर बांधली जाणार आहे. त्या इमारतीकरिता द्रव्याची आत्यंतिक आवश्यकता आहे. ही मोठी जबाबदारी पार पाडण्याकरिता आपण आपल्या पूर्वीच्या कर्तबगारीला शोभेल अशा रीतीने याही बाबतीत पुढाकार घ्याल अशी मला खात्री वाटते. मला महाड तालुक्यातील मंडळीबद्दल अभिमान वाटतो. अशा प्रकारचे अमोल उद्गार काढून झालेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करुन त्यांनी आपले भाषण संपविले.
🔹🔹🔹
नंतर संघाचे उपाध्यक्ष श्री. विठ्ठल साळवे यांनी प्रमुख मंडळीस हार घातले. शेवटी एस्. एस्. निकम यांनी सर्वांचे आभार मानले व सभा बरखास्त झाली.
⚫⚫⚫
✍️ संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर