भारतीय बहिष्कृत समाज सेवक संघाच्या विद्यमाने रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या दुसर्या अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण….
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड व चिपळूण या तालुक्यांतर्फे भारतीय बहिष्कृत समाज सेवक संघाच्या विद्यमाने रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेचे दुसरे अधिवेशन चिपळूण येथे शनिवार दिनांक १३ एप्रिल १९२९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.
अधिवेशनासाठी उभारलेला प्रचंड मंडप लतापताकांनी शृंगारून तेथली सर्व प्रकारची व्यवस्था इतकी टापटीपपणाची होती की, स्पृश्य म्हणविणारांनाही नवल वाटल्याशिवाय राहिले नाही. ह्या परिषदेसाठी मुद्दाम मुंबईहून देवराव नाईक, संपादक ‘समता’, श्री. एस्. एन. शिवतरकर, द. वि. प्रधान, शं. शा. गुप्ते, भा. र. कद्रेकर वगैरे मंडळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर आली होती. कऱ्हाडवरून सर्व मंडळी चिपळूण येथे येत असता वाटेत अडरे गावी अस्पृश्य मंडळीकडून पानसुपारीचा लहानसा समारंभ झाला. चिपळूण येथे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मुंबईकर पाहुणेमंडळी यांची सोय सरकारी डाकबंगल्यात करण्यात आली होती. शनिवार दिनांक १३ एप्रिल १९२९ ला अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी मंडपात जवळ जवळ ८,००० जनसमुदाय जमला होता. शहरातील इतर समाजातील मंडळीही बरीच आली होती. त्यात खानसाहेब देसाई, श्री. साठे, श्री. विनायकराव बर्वे वकील, स्थानिक म्युनिसीपालिटीचे अध्यक्ष श्री. खातू, श्री. राजाध्यक्ष, श्याम कवि, ॐ स्वामी, पितापुत्र बेंडके प्रभूती प्रामुख्याने दिसत होती. रीतसर अध्यक्षांची निवडणूक होताच परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. रगजी यांचे भाषण झाले. त्यानंतर अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाळ्यांचा प्रचंड कडकडाटात भाषण करावयास उभे राहिले. त्यांच्या भाषणास सुरुवात होताच स्पृश्य व अस्पृश्य लोक मोठ्या आतुरतेने बसलेले दिसत होते.
रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या दुसर्या अधिवेशनात आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
आज जे काही मी माझ्या बांधवांना सांगणार आहे त्याची जबाबदारी माझ्या एकट्यावर नाही. मी आज जरी अध्यक्ष असलो तरी मला जे काही तुम्हाला सांगावयाचे आहे, ते माझे स्वतःचे नाही. मी दोन वर्षापूर्वी माझ्या समाज बांधवांपुढे जे म्हणणे मांडले होते त्याचा संदेश आज तुम्हास सांगत आहे. माझ्या संदेशातील उद्देश समाजाने मान्य केला असल्यामुळे त्याची जबाबदारी माझ्या एकट्याकडे नसून तुम्ही सर्वजण त्या जबाबदारीला बांधले गेला आहात. आजचा संदेश आपल्या जातीचा आहे. एकविचाराने आणि जबाबदारीने मान्य केलेला संदेश आपणही मान्य कराल अशी मला बळकट आशा वाटत आहे. हा जातीने एकमताने पास केलेला संदेश सर्वांना पूर्णपणे बंधनकारक आहे. हा संदेश असा आहे की, आजच्या प्रसंगी आपण काय करीत आहोत व कशा करिता जमलो आहोत, आजच्या संदेशाची जबाबदारी काय आहे याचा विचार करणे जरूर आहे. अखिल हिंदू समाजाने ज्या वंशपरंपरेने काही गलिच्छ चालीरिती आपल्या समाजावर लादल्या आहेत त्या झुगारून देणे हाच आजच्या संदेशाचा मुख्य उद्देश आहे. एकंदर दृष्टीने विचार करता माझा संदेश फार महत्त्वाचा आहे. हिंदुस्थान देशामध्ये अत्यंत घाणेरडी अशी जी कामे आहेत ती ज्यांची त्यांनी न करता व ती व्यक्तिमात्रांच्या खुषीवर न ठेवता जी आपल्या अस्पृश्य समाजावर सक्तीने लादण्यात आली आहे त्या सक्तीला माझा विरोध आहे. आजच्या परिस्थितीत हीनत्वाचा ठसा एखादी व्यक्ती कितीही उच्च दर्जाला चढली तरी निघून जात नाही. हीनत्वाची भावना हाडीमासी भिनली आहे तोपर्यंत स्वाभिमान जागृत होणार नाही. ‘ जन्माप्रमाणे वागणे हाच तुझा धर्म पाळ ‘ अशी शिकवण चांभार, भंगी, महार, मांगादि अस्पृश्यांना दिली जात आहे. अशा परिस्थितीत ह्या समाजात मोठा कर्तृत्ववान पुरुष निर्माण होणे अशक्य आहे. ब्राह्मण वगैरे स्पृश्य जातीत जन्मलेली मुले मुन्सफ, मामलेदार, वकील वगैरे का होतात. मराठे समाजातील मुले पोलीस व पोलीस अधिकारी का होतात ? आणि अस्पृश्य समाजातील मुले अशी का ? अस्पृश्य व स्पृश्य मुलातील भेद कशाने झाला ? ह्या सर्वांचे उत्तर एकच आणि ते म्हटले म्हणजे ‘ सामाजिक परिस्थिती. ‘ घाणेरड्या परिस्थितीचे वातावरण अस्पृश्यांच्या मुलांवर होत गेल्यामुळे गुलामगिरीची दशा त्यांना प्राप्त झाली आहे. ही परिस्थिती म्हणजे खुषीचा सौदा नव्हे. गुलामगिरीची पध्दत नष्ट करणे आमचे कर्तव्य आहे. आणि या करिताच आपल्या समाजातून अगोदर गलिच्छ चालीरितींना मूठमाती मिळाली पाहिजे. कोणी म्हणेल अशा चालरिती समाजातून काढून टाकणे आर्थिकदृष्ट्या अहितकारक आणि मोठे नुकसानी करणारे आहे व आपल्या समाजाच्या उपजीविकेला त्यामुळे अडथळा उत्पन्न होईल. परंतु माझ्या मते ह्या मुद्याने आपल्या सुधारणेच्या मार्गात वरिष्ठ म्हणविणारा समाज आपल्याच लोकांना चिथावून फंदफितुरी उत्पन्न करीत आहे आणि त्यांना सर्वांना माझा सवाल आहे की, वेश्या आपल्या छानछोकीच्या उपजीविकेकरीता आक्रमण करीत असलेल्या मार्गाचा व एखाद्या गृहस्थाश्रमी बाईच्या स्वाभिमानी वृत्तीच्या काबाडकष्टाने मिळविलेल्या अन्नावरील उपजीविकेचा मार्ग याचे कधीतरी साम्य असू शकेल का ? येथे छानछोकीच्या उपजीविकेच्या मार्गात किती घाणेरडा प्रकार असतो याचा कुणी कधीतरी विचार केला आहे का ? अगदी स्पष्टपणे सांगायचे म्हणजे स्वाभिमानशून्यतेने जीवन कंठणे नामर्दपणाचे आहे. जीवनाकरिता स्वाभिमान जागृत ठेवा, आपला आर्थिक तोटा असला तरी आपण प्रथम आपल्या कर्तव्याला जागले पाहिजे. सुख किंवा लौकिक सहजगत्या मिळत नाही. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही. तीच गोष्ट मनुष्यमात्रांच्या संसाराला व व्यवहाराला लागू आहे. आम्ही आमचे योग्य कर्तव्य बजावित असता वरिष्ठ लोक आमच्यावर निष्कारण अत्याचार करतात. ही गोष्ट मी आज नाही म्हणायला तयार नाही. आपणाला मनस्वी त्रास होणार, आपला प्रसंगी छळ होणार ह्या गोष्टी मी पूर्णपणे जाणून आहे. परंतु आपण आपल्या कार्याकरिता टक्केटोणपे सहन केलेच पाहिजेत. कित्येक लोक म्हणतात की, खोतीमुळे आम्हाला आमचे योग्य कर्तव्य बजावता येत नाही. ह्या लोकांना माझे स्पष्ट सांगणे आहे की, खोतीविषयीची योग्य व्यवस्था मी लवकरच घडवून आणणार आहे. अमूक एका अडचणीचा निकाल प्रथम लागत नाही म्हणून आपण स्वस्थ बसून चालायचे नाही. आपण स्वस्थ न बसता कार्य करीत रहा. नुसती खोती पद्धत दूर करून कार्य होणार नाही. वरिष्ठ समाज गावातील गुंड जमा करून तुमच्यावर गदा आणतील याची वाट काय ? गावातील सार्वजनिक विहिरीवर पाणी भरणे हे तुमच्या धैर्यावर अवलंबून आहे. तुमचे न्याय्य हक्क प्रस्थापित करताना वरिष्ठ समाजाच्या बुजगावण्याला तुम्ही भीक घालाल तर, तुमच्या हातून काहीच होणार नाही. तुमच्या सुधारणेसाठी मी जर कोकण प्रांतात आलो, तर मला गोळी घालून ठार मारण्याबद्दलच्या मजकुराची अनेक धमकीची पत्रे आली आहेत. ह्या धमक्यांना मी भीक घातली असती तर आज आपल्यासमोर मी उभाच राहिलो नसतो. परंतु तुमच्यापुढे मात्र माझा निरुपाय झाला आहे. कोकण प्रांत सर्व दुनियेत भिकारी आहे ही गोष्ट मला ठाऊक आहे. हा प्रांत बुद्धीमध्ये श्रीमंत पण सांपत्तिक स्थितीत अगदी मागासलेला. खोत, ब्राह्मण व मराठे वगैरे लोकांनाही या प्रांतात सुख लाभणे अशक्य आहे. व्यापार उद्योगधंद्याकडे आपण लक्ष दिल्यास आपण आपल्या आपत्तीतून सुटू. खोतीच्या जाचातून ज्यांना मुक्त व्हावयाचे आहे, त्यांना सिंध व इंदोरसारख्या प्रांतात जमीनी लागवडीकरिता मिळवून देण्याचा मी प्रयत्न करीन. ह्या बाबतीत आपण आफ्रिकेत वगैरे ठिकाणी व्यापारधंदा करून श्रीमंत झालेल्या मुसलमानांचे उदाहरण दृष्टीसमोर ठेवा. वाडवडिलांच्या जागा सोडणे जिवावर येते खरे, परंतु आपला सामाजिक दर्जा वाढविण्यासाठी ह्या मार्गाचा आपण अवश्य उपयोग केला पाहिजे. मेलेल्या जनावरांचे मांस खाणे, अमंगल कृत्ये करणे वगैरे प्रकाराला तुम्ही धैर्याने आळा घाला. माझ्या आजच्या संदेशातील ह्या गोष्टीचा आपण विचार करून आजच शपथपूर्वक प्रत्यक्ष कार्याला लागा. आजच्या नवयुगात कोणीही गुलाम नाही हे लक्षात ठेवा.
🔹🔹🔹
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर