२६ मार्च १९४६ रोजी मध्यवर्ती विधिमंडळात पंडित गोविंद मालवीय यांनी ‘ सिध्दार्थ काॅलेज ‘ संबंधी कुत्सित बुद्धिने विचारलेल्या प्रश्नाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विधिमंडळात दिलेले उत्तर….
” अस्पृश्यांच्या हक्कांवर दरोडा घालून राजकीय दृष्ट्या त्यांना पुरेपूर नागविल्यानंतर शक्य तिथे वाटेल त्या मार्गाचा अवलंब करून अस्पृश्यांना खच्ची करण्याचे सत्र काँग्रेसने सुरू केल्याचे पुरावे फार मोठ्या प्रमाणात आमच्याकडे येऊ लागले आहेत.
मुंबईत उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अस्पृश्य विद्यार्थ्यांची फारच कुचंबणा होऊ लागल्यामुळे अस्पृश्यांना खास सवलती मिळाव्या म्हणून ” पीपल्स एज्युकेशन सोसायटी ” स्थापून त्यामार्फत ” सिद्धार्थ कॉलेज ” काढण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठरविले. या कॉलेजसाठी मध्यवर्ती सरकारकडून ग्रँट मिळवून मुंबई विश्वविद्यालयाची मान्यताही प्राप्त करुन घेतली. सदर कॉलेज जून मध्ये सुरू होणार आहे. अस्पृश्यांसाठी खास सवलती देणारे कॉलेज प्रस्थापित होऊन ते सुरूही होत आहे, हे पाहून सवर्ण हिंदुच्या पोटात गोळा उठलेला आहे. ह्या द्वेषरुपी गोळ्याची हिंदुधर्मरुपी पोटातील ढवळाढवळ ता. २६ मार्च १९४६ रोजी मध्यवर्ती विधिमंडळात ऐकू आली.
१९३२ साली पुणे कराराचे लोढणे अस्पृश्यांच्या गळ्यात अडकविण्यापूर्वी ज्यावेळेस गांधी शेवटच्या उचक्या देत होते त्यावेळेस बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे उपकुलगुरु पंडित मदन मोहन मालवीय यांनी डॉ. बाबासाहेबांच्या चरणी सपशेल शाब्दिक लोटांगण घातले होते आणि ज्या लोकांच्या शब्दाला मान देऊन डॉ. बाबासाहेबांनी गांधींना जीवदान दिले त्यात पंडित मदन मोहन मालवीय यांचा बराच वर नंबर लागेल. याच मालवीयांचे चिरंजीव पंडित गोविंद मालवीय यांनी ‘ सिद्धार्थ-कॉलेज ‘ संबंधी कुत्सित बुद्धिने प्रश्न विचारला आणि सांगितले की, या कॉलेजची कोणतीही आवश्यकता नाही. अस्पृश्यांच्या शैक्षणिक गरजा हिंदू समाज पुरवीत आहे. पंडित गोविंद मालवीय यांच्या प्रश्नाला डॉ. बाबासाहेबांनी विधिमंडळात जे उत्तर दिले ते आम्ही येथे देत आहोत — संपा. जनता ” (जनता : १३ आणि २० एप्रिल १९४६
पंडित गोविंद मालवीय यांनी ‘ सिद्धार्थ-कॉलेज ‘ संबंधी विधिमंडळात कुत्सित बुद्धिने विचारलेल्या प्रश्नाला ऊत्तर देतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
अध्यक्ष महाराज,
फायनान्स बिलावर चालू असलेल्या चर्चेत भाग घेण्याची मला संधी दिलीत याबद्दल मी आपले आभार मानतो. कारण मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या माझ्या खात्याबद्दल नाहीत. आतापर्यंत जी चर्चा झाली आहे त्यात माझ्या खात्याबद्दल विशेष अशी कोणतीच टीका केली गेलेली नाही याबद्दल मला समाधान वाटते. तरीही मी बोलण्यासाठी उभा राहिलो आहे. त्याचे कारण काल फायनान्स बिलावर बोलताना माझे मित्र पंडित गोविंद मालवीय यांनी अस्पृश्यांकरिता उघडण्यात येणाऱ्या कॉलेजच्या योजनेसंबंधीही सांगितले आहे.
कॉलेजच्या योजनेचे परिक्षण शिक्षण खात्याने करून फायनान्स डिपार्टमेंटन त्याला मान्यता दिली असल्यामुळे तत्संबंधीचा खुलासा या खात्यांना करू देणे बरे झाले असते. मी त्या योजनेला केवळ चालना दिली होती. असे असताही माझे मित्र गोविंद मालवीय यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तर देण्याचे काम उपरिनिर्दिष्ट खात्यांकडे न सोपविता मी माझ्याकडे घेतले आहे. त्याचे कारण एकच की, या कॉलेजच्या योजनेवर टीका करताना तिला राजकीय स्वरूप देण्याचा माझ्या मित्रांनी प्रयत्न केला आहे.
या योजनेसंबंधी बोलताना माझे मित्र सुरवातीसच म्हणाले की, ‘ या योजनेबद्दल मला आश्चर्य वाटते. ‘ आणि मी ज्यावेळेस त्यांचे सबंध भाषण वाचले त्यावेळेस मला आढळून आले की, माझ्या या मित्राला आश्चर्य वाटण्याचे कारण त्यांचा असा समज झालेला दिसतो की, शैक्षणिक क्षेत्रात पक्षांधतेचे भूत घुसडण्यात आले आहे. या बाबतीत माझ्या मित्राला, एका सुविख्यात म्हणीची आठवण करून द्यावीशी वाटते. “काचेच्या घरात राहाणाऱ्या माणसांनी इतरांच्या घरांवर दगडफेक करू नये ” पंडीतजीना ह्या म्हणीचा मतितार्थ उमजेल की नाही ते मला माहित नाही परंतु आश्चर्याची गोष्ट ही आहे की, पंडीतजी राष्ट्रवादाच्या बाता तशा झोकू शकतात. जो साध्या हिंदुंच्या हातून तर पाणी पिणार नाहीच परंतु त्यांच्याशी क्षेत्रगोत्र न जुळणाऱ्या दुसऱ्या ब्राह्मणाच्या हातचेही पाणी पिण्यास धजणार नाही असा पंडीतजीसारखा माणूस राष्ट्रवादाची चर्पट पंजरी या सभागृहातील सभासदांना आणि मला ऐकवतो हे पाहून मला मोठेच नवल वाटते.
धर्मांधतेने बरबटलेल्या पावित्र्याला दुसऱ्या कुणाचाही विटाळ होऊ नये म्हणून खबरदारी वाहणाऱ्याने राष्ट्रवाद-जातीयवाद वगैरे वादांच्या नावाने कोकलत उठून दुसऱ्यावर जातीवाचकतेचा, पक्षांधतेचा-पक्षपातीपणाचा आरोप करण्यापूर्वी बराचसा विचार करायला हवा. बनारस येथील बनारस हिंदू विश्वविद्यालयाशी बऱ्याच प्रमाणात पंडितजींचा संबंध होता, अगर आहे ही गोष्ट पंडितजींनी विसरू नये. पंडितजींना मी असे विचारतो की, बनारस हिंदू विश्वविद्यालय ही जातिवाचक संस्था नव्हे काय ? उलट मी तर असे म्हणतो की, बनारस हिंदू विश्वविद्यालय हे सर्व हिंदुधर्मियांसाठी नसून केवळ हिंदुधर्मातल्या एका विशिष्ट जातीच्या देखरेखीखालील खास त्यांच्यासाठीच चालविण्यात आलेली संस्था आहे. या विश्वविद्यालयाचे अध्यापक वर्गात ब्राह्मणेतर जवळ जवळ नाहीतच ही गोष्ट माझे मित्र नाकारू शकतील काय ?
हिंदू धर्मशास्त्राचे अध्यापकत्व कोणाही, मग त्याची त्या शास्त्रातील शैक्षणिक लायकी कितीही उच्च दर्जाची असली, तरी ब्राह्मणेतराला देण्यात येऊ नये अशा प्रकारचा अभंग ठराव १९१६ साली या विश्वविद्यालयाने केलेला नाही काय ? लांब कशाला अगदी अलिकडे एका कायस्थ मुलीला ब्रह्मज्ञानाच्या अभ्यासासाठी या विश्वविद्यालयाने परवानगी नाकारल्यामुळे उपोषण करावे लागले ही गोष्ट तरी माझे मित्र विसरले नसतील. ही सर्व उदाहरणे काय दर्शवितात ? जात्यंधता-धर्मांधता-पक्षपातीपणा नव्हे का हा ? याला पंडितजीजवळ काय उत्तर आहे ?
अस्पृश्यांकरिता स्वतंत्र कॉलेज स्थापनेच्याबाबतीतील कालच्या चर्चेचा अहवाल वाचीत असता माझे दुसरे मित्र श्री. अय्यंगार ह्यांचे काही उद्गार मला आढळले. श्री. अय्यंगार यांच्या खुद शहरी काय घटना घडत आहेत त्या त्यांनी मुद्दाम दृष्टीआड केलेल्या आहेत असे दिसते. त्यांना मी असे सुचवू इच्छितो की, मद्रास येथील या महिन्याच्या बारा तारखेचे ‘ हिंदू ‘ वर्तमानपत्र वाचावे. त्यात त्यांना आढळेल की, सालेम येथे त्यांच्या जातभाईंनी एक मोठी सभा भरवून खास ब्राह्मणांची अशी एक मोठी संस्था स्थापावी आणि या संस्थेमार्फत ब्राह्मणांचे हितसंरक्षण, ब्राह्मणांचे कॉलेज व ब्राह्मणांसाठी उद्योगधंदे वगैरे गोष्टी करण्याचे ठरविले आहे आणि या ब्राह्मणांच्या परिषदेचा अध्यक्ष कोण तर सर सी. पी. रामस्वामी अय्यरसारखी विभूती.
या देशातील प्रत्येक मनुष्य तोंडाने राष्ट्रवादाचा उदोउदो करीत असतो परंतु कृतीने जात्यंधता, पक्षांधता यांच्याच आहारी गेलेला आढळतो.
ज्या समाजाला आपल्या तीव्रतर हालअपेष्टांची पहिल्यावहिल्यानेच जाणीव झालेली आहे तो अस्पृश्य समाज या हालअपेष्टातून आपली सुटका करून घेण्यासाठी उच्च शिक्षण संपादनार्थ शैक्षणिक संस्था स्थापू लागल्याबरोबर ‘ जनतेच्या कल्याणाचे कंकण बांधून आम्ही येथे आलो आहोत ‘ असे सांगत हिंडणारे सभासद ‘ पक्षांधता-जात्यंधता ‘ असे किंचाळित उठतात.
सर्व सभासदांच्या पुढे मी एक महत्त्वाचा खुलासा करू इच्छितो तो हा की, हे कॉलेज सर्वस्वी अस्पृश्यांचे आहे हे म्हणणे सर्वस्वी चुकीचे आहे. इतर सर्व कॉलेजप्रमाणे या कॉलेजात कोणालाही यायची पूर्ण मुभा आहे. इतकेच नव्हे तर या कॉलेजसाठी अध्यापकवर्गांची जी निवड करावयाची आहे तीत सर्व जातीयांचा समावेश आहे. तीत हिंदू-ब्राह्मण आहेत, ब्राह्मणेतर आहेत, पारशी आहेत, खिश्चन्स आहेत आणि मुसलमानही आहेत. सभासदांच्या नजरेला ही गोष्ट आणताना मला अत्यंत आनंद वाटतो की, ज्यावेळेस या कॉलेजला मान्यता मिळण्यासंबंधी मुंबई विश्वविद्यालयापुढे अर्ज सादर करण्यात आला त्यावेळेस यत्किंचितही शंका-कुशंका न काढता विश्वविद्यालयाने ताबडतोब मान्यता दिली. इतकेच काय पण अशाप्रकारची योजना मुंबई विश्वविद्यालयापुढे कधीही आली नव्हती असाही निर्वाळा देण्यात आला. विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट ही की, या कॉलेजची रचना, अध्यापक वर्ग आणि इतर व्यवस्था विश्वविद्यालयाला इतकी आवडली आहे की, मुंबई विश्वविद्यालयाच्या इतिहासात आजतागायत कोणत्याही कॉलेजला पहिल्याच वर्षी सर्व वर्ग चालविण्याची जी परवानगी मिळाली नव्हती ती परवानगी या कॉलेजला अगदी सुरवातीलाच देण्यात आली आहे. सांगण्याचे तात्पर्य हे की, या कॉलेजला ‘ निव्वळ अस्पृश्यांचे कॉलेज ‘ असे म्हणणे कोणत्याही अर्थी योग्य होणार नाही.
या कॉलेजमध्ये प्रवेश, शिष्यवृत्त्या व हॉस्टेलमध्ये जागा या बाबतीत अस्पृश्यांना विशेष-खास सवलती देण्यात येतील एवढेच. या कॉलेजच्या स्थापनेची आवश्यकता का भासली हे आता सांगू इच्छितो.
मुंबई प्रांतात विद्यार्थ्यांची संख्या इतकी बेसुमार वाढलेली आहे की तिची नीटशी कल्पनाही सभासदांना नसेल. पलिकडे बसलेले माझे मित्र गाडगीळ यांना माहिती आहे की, गेल्याच साली फक्त एकाच वर्षात एकोणीस नवीन कॉलेज उघडण्याची मुंबई विश्वविद्यालयाला परवानगी द्यावी लागली आहे. यावरून तुम्हाला कल्पना येईल की कॉलेजमध्ये प्रवेश मिळविणे विद्यार्थ्यांच्यासाठी किती अवघड काम होऊन बसले आहे आणि या अडचणीची जास्तीत जास्त झळ अस्पृश्य विद्यार्थ्यांना बसली आहे. कारण मॅट्रिक पास झाल्यावर अस्पृश्य विद्यार्थ्यांना कुठल्याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळेनासा झाला आहे. म्हणून अस्पृश्य विद्यार्थ्यांची ही अडचण हिंदुस्थान सरकारच्या नजरेला मला आणावी लागली आणि अस्पृश्य विद्यार्थ्यांची ही अडचण दूर करणारी संस्था स्थापण्याविषयी सांगितले. म्हणून ज्या कॉलेजसंबंधी आपण बोलतो आहोत त्या ‘ सिद्धार्थ-कॉलेज ‘ च्या कल्पने-योजनेसंबंधी जे आक्षेप पुढे करण्यात आले आहेत त्यात काहीच अर्थ नाही.
माझ्या मित्रांनी या चर्चेमध्ये दुसऱ्या एक बाबीला हात घातला होता. त्यानी ही बाब का उपस्थित केली हे कळणे कठीण आहे. ती बाब म्हणजे राजकारण. नुकत्याच झालेल्या निवडणुकीसंबंधी बोलताना माझा पुराच बोऱ्या वाजला असे त्यांनी म्हटले. असे सांगण्यात त्यांना काय साधायचे होते हे तेच जाणीत परंतु मला असे वाटते की, माझ्या म्हणण्याला हिंदुस्थान सरकारने मान्यता द्यायला नको होती असे त्यांना सुचवायचे होते. ते काही असो. माझी स्थिती सुकून गेलेल्या रोपट्याप्रमाणे झाली आहे, असे म्हटले जाते. त्या विरोधकांना मला हे सांगावयाचे आहे की, वसंतऋतू पूर्वीची ही स्थिती आहे. माझी चळवळ अमर आहे.
निवडणुकीच्या निकालाबाबत माझ्या मित्रांनी बोलणे काढले आणि त्यात त्यांनी हे सांगितले की, अस्पृश्यांच्या सर्व राखीव जागा काँग्रेसने जिंकल्या. परंतु मला त्यांना हे विचारायचे आहे की, काँग्रेसने ज्या मार्गांनी या जागा जिंकल्या आहेत ते मार्ग त्यांनी कधीतरी पडताळून पाहिले आहेत काय ? कोणकोणत्या मार्गाचा अवलंब करण्यात आला ते मी सांगतो आणि तेही भक्कम पुराव्यावर आधारभूत असलेल्या गोष्टीनिशी सांगतो.
बऱ्याच ठिकाणी मतदारांना मतदानकेंद्रावर जाऊ देण्यात आले नाही. सातारा जिल्ह्यात हे प्रामुख्याने घडले आहे. पत्री सरकार ज्या ठिकाणी अस्तित्वात होते त्या या सातारा जिल्ह्याची बहुतेक सभासदांना माहिती असेलच. ३६१ गावातील अस्पृश्य मतदारांना गावकऱ्यांनी गाव कचेरीत नेले. ‘ काँग्रेसला तुम्ही मते देणार की नाही? ‘ असे दमदाटी देवून त्यांना विचारण्यात आले. ज्यावेळेस अस्पृश्य मतदारांनी काँग्रेसला मत देण्याचे साफ नाकारले त्यावेळेस त्यांना कचेरीत सक्तीने डांबून ठेवण्यात आले, आणि त्यांनी (अस्पृश्य मतदारांनी) इकडच्या इकडे हालू नये म्हणून त्यांच्यावर सक्त पहारा ठेवण्यात आला. या प्रकारची कितीतरी उदाहरणे मी देवू शकेन. हे तर काहीच नाही परंतु काँग्रेसला विरोध करण्यासाठी उभे राहिलेल्या अस्पृश्य उमेदवारांना मारहाणही करण्यात आली. लांब कशाला अगदी काल-परवा निवडणूक झालेल्या आग्रा शहरातलेच उदाहरण घ्या. निवडणुकीच्या दिवशी अस्पृश्यांची पन्नास घरे जाळण्यात आली. अस्पृश्य मतदार मते देण्यासाठी मतदान केंद्रावर गेलेले पाहून, २० जणांची घरेदारे लुटण्यात आली. नागपूरमध्ये सात जणांचे खून करण्यात आले आणि हे सर्व काँग्रेसवाल्या सवर्ण हिंदुंनी केले. निवडणूका जिंकण्यासाठी उपयोजिलेले मार्ग हे असे आहेत. काँग्रेसने या जागा जिंकल्या किंवा ज्या राजकीय पक्षाचा मी प्रतिनिधी आहे त्या शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनने जिंकल्या हे ठरवावयाचे असेल तर त्याला सर्वसाधारण निवडणुकीच्या निकालावरून ही गोष्ट ठरविणे निव्वळ मूर्खपणाचे ठरेल कारण सर्वसाधारण निवडणुकीत अस्पृश्यांचे प्रमाण शेकडा ५ टक्के आणि हिंदूचे ९५ टक्के पडते. अशा परिस्थितीत कोण कुणाचा प्रतिनिधी हे कसे ठरविता येईल ? म्हणूनच निवडणुकीच्या निकालाची खरी कसोटी प्राथमिक निवडणुकीच्या निकालावरूनच घेतली पाहिजे. कारण अस्पृश्यांच्या प्राथमिक निवडणुकी स्वतंत्र मतदार संघाच्या तत्त्वावर झालेल्या आहेत. या प्राथमिक निवडणुकींचे निकाल कसे लागले ? माझ्या समोर बसलेल्यांना त्याची थोडीशी कल्पना यावी म्हणून काही ठिकाणचे निकाल मी येथे देतो.
पंजाबमध्ये तीन ठिकाणी प्राथमिक निवडणूकी झाल्या. मुंबईत देखील तीन ठिकाणी, मध्य प्रांतात चार ठिकाणी, मद्रासमध्ये दहा ठिकाणी आणि संयुक्त प्रांतात दोन ठिकाणी. येथे सभासदांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, प्राथमिक निवडणुका झाल्याच पाहिजेत अशी सक्ती नसते. जोपर्यंत अस्पृश्यांचे पाच उमेदवार उभे राहात नाहीत तोपर्यंत प्राथमिक निवडणूक होऊ शकत नाही. निवडणुकीत मोकाट उधळण्यास मिळणारा काळ्या बाजारातला पैसा अस्पृश्यांजवळ नसल्यामुळे अस्पृश्यांना प्राथमिक निवडणूक नकोच असते.
एकंदरीत २२ ठिकाणी प्राथमिक निवडणुका झाल्या. प्रत्येकीत काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला होता. या बावीसपैकी एकोणीस ठिकाणी शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या उमेदवारांना सर्वात अधिक मते मिळाली. मुंबईमध्ये दोन ठिकाणी झालेल्या निवडणूकीत भायखळा विभागात शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या उमेदवाराला ११,३३४ मते पडली आणि काँग्रेसच्या उमेदवाराला अवघी २,०९६ पडली, मुंबई जील्हा व उपनगर विभागात शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या उमेदवाराला १२,८९९ आणि काँग्रेसच्या उमेदवाराला २,०८८ पडली. मध्य प्रांतातले मी फक्त दोनच ठिकाणचे आकडे देतो. नागपूर मतदार संघात शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या उमेदवाराला १,९३३ आणि काँग्रेसच्या उमेदवाराला अवधी २७० पडली. भंडारा विभागात शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनला ३,१८७ आणि काँग्रेस व इतर स्वतंत्र उमेदवार या सर्वांना मिळून ९७६, आग्रा विभागात शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनला २,२४८ आणि काँग्रेस व इतर सर्व स्वतंत्र उमेदवारांना मिळून ८४०, पंजाबमध्ये लुधियाना-फिरोझपूर विभागात शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनला १,९०० मते पडलीत व काँग्रेसला अवधी ५०० मते मिळाली. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलत असताना, यावेळेस दिवाण चमनलाल या काँग्रेस पक्षीय आमदाराने मध्येच उठून म्हटले की, “डॉ. आंबेडकर निव्वळ थापा मारताहेत ! ” यावर डॉ. बाबासाहेब रागाने लाल झाले आणि या शब्दांना त्यांनी हरकत घेतली. त्यावेळेस अध्यक्षांनी दिवाण चमनलाल यांना उद्देशून म्हटले की ” ज्यावेळेस नामदार आपले म्हणणे मुद्यानिशी मांडताहेत त्यावेळेस मध्येच उठून असा गोंधळ करणे इष्ट नाही. उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांना उत्तर देताना नामदारांचे म्हणणे शांतपणे ऐकलेच पाहिजे, नामदार बोलताना ते थापा मारताहेत असे कोणत्याही आमदारांना बोलता येत नाही. ” अध्यक्षांच्याकडून या कानपिचक्या मिळाल्याबरोबर दिवाण चमनलाल यांनी आपले उदगार मागे घेतले. नंतर डॉ. बाबासाहेबांनी पुन्हा बोलावयास सुरवात केली.) मद्रास प्रांतातील फक्त एकाच ठिकाणचे मी आकड़े देतो. अमलापुरम् या विभागात शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या उमेदवाराला १०.५४० आणि काँग्रेसच्या उमेदवाराला २.३८३ मते पडली. प्राथमिक निवडणुकींच्या निकालाचे आकडे हे असे आहेत. याच्यावरून एक गोष्ट सहज सिद्ध होते की, प्राथमिक निवडणुकीचे निकाल हीच खऱ्या प्रतिनिधित्वाची कसोटी मानण्यात आली पाहिजे.
या निवडणुकीत काँग्रेसने सप्रमाण सिद्ध करुन दाखविले की ही निवडणूक म्हणजे निव्वळ फसवणूक होती, त्याबरोबरच ज्यासाठी मी आजतागायत लढा देत आलो आहे की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ मिळालाच पाहिजे त्या माझ्या लढ्याला या निवडणुकीने भक्कम बळकटी आणली आहे.
पंडित मालवीय यांनी दुसरी एक गोष्ट सांगितली की, अस्पृश्योध्दाराकडे हिंदू लोक बरेच लक्ष पुरवीत असून अस्पृश्यांच्या नैतिक व महत्वपूर्ण प्रगतीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करीत असतात. यावर मी इतकेच सांगतो की. बाहेरचे बाजूलाच राहू द्या पण या सभागृहाच्या चार भिंतीत ज्या काही गोष्टी घडतात त्याच्यावरूनच ठरवायचे झाले तरी कोणीही निःपक्षपाती माणूस हेच म्हणेल की मालवियांच्या उपरिनिर्दीष्ट उद्गारात काहीच तथ्य नाही. या सभागृहात दाखल होऊन मला थोडे दिवस झाले आहेत खरे, परंतु या सभागृहातील कामकाजाचे अहवाल अगदी नियमितपणे पण लक्षपूर्वक मी वाचीत असतो आणि जे जे वाचनीय आहे त्यापैकी मी काहीच शिल्लक ठेवले नाही. त्यात मला असे आढळून आले की, अस्पृश्यांच्यावर गावोगावी दैनंदिनी होणारे अन्याय, अत्याचार आणि जुलूम यासंबंधी या सभागृहात एकाही सभासदाने एकही प्रश्न कधीही विचारला नाही. अस्पृश्यांसाठी काही तरी केले जावे असा एकही ठराव एकाही सभासदाने मांडल्याचे आजतागायतच्या अहवालात कुठेच दिसत नाही नाही. म्हणायला १९३३ साली समोर बसलेल्या काही सभासदानी अस्पृश्यता घालविण्याचे धाडस केले होते खरे. मंदिर प्रवेशाचे एक बिल मांडण्यात आले होते. ज्यावेळेस या बिलाला व्हॉईसरॉयनी मान्यता देण्याचे नाकारले त्यावेळेस केवढा गहजब करण्यात आला होता. या बिलाला परवानगी देण्यात आली नाही तर आम्ही आत्महत्या करू अशी धमकीही बऱ्याच जणांनी दिली होती. परंतु ज्या वेळेस बिलाला परवानगी देण्यात आली त्या वेळेस ठाऊक आहे तुम्हाला काय झाले ?
ते बिल परत घेण्यात आले. बिचाऱ्या रंगा अय्यरची परिस्थिती अगदी केविलवाणी झाली होती कारण त्यांनीच ते बिल मांडले होते; ज्यावेळेस त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला दगा दिला त्यावेळेस तो गृहस्थ खूप चिडला. त्यांना पुष्कळ शिव्या दिल्या पण अखेर बिचारा तोंडघशी पडला. आणखी दोन प्रसंगी अस्पृश्यांच्याबद्दल प्रश्न निघाल्याचे मला ठाऊक आहे. त्यापैकी एक. १९१६ मध्ये ‘अस्पृश्यांच्या तक्रारीसंबंधी एक चौकशी समिती ‘ नेमण्याबद्दल माणेकजी दादाभाई यांनी ठराव मांडला. त्यावेळी या चर्चेला तोंड फोडणाऱ्या श्री. गोविंद मालवीय यांच्या खुद्द वडिलांनीच या ठरावाला अगदी जोरदार विरोध केला. दुसरा प्रसंग १९२७ सालचा. अस्पृश्य जमात अल्पसंख्यांक असल्यामुळे त्यांना घटनात्मक संरक्षण देण्यात यावे असे ख्रिस्तवासी लॉर्ड बर्कनहेड त्यावेळेस म्हणाले होते. परंतु…..
ज्या ज्या वेळेस आम्ही स्वतः लढा पुकारुन आमचे अस्तित्व दाखवितो त्याचवेळेस फक्त पलिकडे बसलेल्यांना आमचा अगदी अमर्याद पुळका येतो. ज्या ज्या वेळी आम्ही मागणी करतो की आम्हाला : ‘ स्वतंत्र मतदार संघ हवा, नोकऱ्यांमध्ये ठराविक प्रमाणात राखीव जागा हव्या, शिक्षणासाठी ग्रँट हवी ‘ त्याचवेळेस हिंदुंना जाणीव होते की, आम्ही, अस्पृश्य लोक, जिवंत आहोत. नाही तर आम्ही मेलेलोच आहोत असेच हे लोक धरुन चालतात, एरव्ही मात्र हे लोक स्वप्नात देखील आमची वास्तपूस्त करीत नाहीत. आमच्या सामाजिक आणि राजकीय हक्कांना वाटाण्याच्या अक्षता लावताना हे लोक सांगतात, ‘ तुम्ही हिंदूच आहात ‘ बंधुभाव दाखविताना जर पदरचं काही जात असेल त्यावेळेस आम्ही ‘ काकाच्या मामाच्या भाच्याचे पुतणे ‘ आणि काहीच खर्ची होत नसेल, पर्यायाने आमचा उपयोग होत असेल, तर मात्र आम्ही बंधु. अहारे बंधुत्व.
शेवटी इतकेच सांगतो आणि तेही ठासून सांगतो की. हिंदुंच्या दानधर्मावर जगण्याची आता आमची मुळीच इच्छा नाही. त्यांचा दानधर्म आम्हाला नको आहे. आम्ही या देशातले रहिवाशी आहोत. सरकारी खजिन्यावर जसा दुसऱ्या जमातींचा अधिकार आहे तसा आमचाही आहे. आम्हाला गुलामीत राहाण्यास लावणारी, आमची नीती भ्रष्ट करणारी भीक आम्हाला मुळीच नको आहे. आम्ही आमच्या न्याय्य हक्कांसाठी झगडतो आहोत. आम्हाला ते मिळालेच पाहिजेत आणि तुम्हाला मी निक्षून बजावतो की, जर आमच्या न्याय्य लढ्याला विरोध केला गेला तर रक्त सांडून आम्ही आमचे हक्क मिळवू, आमचे ध्येय हस्तगत करू.
🔹🔹🔹
संकलन – संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर