June 4, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बौद्ध धम्मात धर्मांतर

मी बुद्धांचा धम्म (बौद्ध धर्म) सर्वोत्तम मानतो. त्याची कोणत्याही धर्माशी तुलना केली जाऊ शकत नाही. विज्ञान मानणाऱ्या आधुनिक माणसाला जर कोणता धर्म आवश्यक वाटत असेल, तर तो फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे बौद्ध धर्म. मी गेली तीस वर्षे सर्व धर्मांचा अभ्यास करून या निष्कर्षाप्रत आलो आहे की बौद्ध धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रस्तावनेमधून, ६ मार्च १९५६

आंबेडकरांनी हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण हिंदुंची मानसिकता बदलण्यास त्यांना अपयश आले. हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव त्यांना झाली. तसेच अस्पृश्य हे हिंदूंच्या सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही हेही त्यांना जाणवले. त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरले. त्यांनी असा विचार केला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे. आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की – अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही.बाबासाहेबांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, “जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?” डॉ. बाबासाहेबांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला या गावी भरलेल्या परिषदेत हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली.

धर्मांतराच्या या घोषणेनंतर ख्रिश्चन, मुस्लिम, शिख, जैन, बौद्ध, यहूदी इत्यादी धर्मांच्या धर्मगुरूंनी बाबासाहेबांनी त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसह आपल्या धर्मात यावे यासाठी निमंत्रणे दिली तर काहींनी आमिषेही दाखवली. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी जयकरांमार्फत आंबेडकरांनी इस्लाम स्वीकारावा, पाकिस्तानाला यावे व पाकिस्तानाचे गव्हर्नर व्हावे असा प्रस्ताव ठेवला होता. तर त्यावेळेचे जगातील सर्वाधिक श्रीमंत संस्थान असलेल्या निझामाने आंबेडकरांनी अनुयायांसह इस्लाम स्वीकारल्यास प्रत्येक व्यक्ती मागे काही कोटी रूपये देण्याचे कबूल केले होते. परंतु त्यांना भारतभूमीतला, विवेकनिष्ट व मानवी मुल्ये जपणारा धर्म हवा होता म्हणून त्यांनी ह्या दोन्ही प्रस्ताव नाकारले.ख्रिश्चन धर्माच्या विदेशी धर्मगुरूंनी त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याती विनंती केली आणि धर्म स्वीकारल्यानंतर जगातील सारेच ख्रिश्चन देश अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर उंचावण्यास मदत करतील अशी हमी दिली होती. महाबोधी सोसायटीकडून बौद्ध भिक्खूंनी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा अशी तार पाठवली होती. हा धर्म आशिया खंडातील एक प्रमुख धर्म होता. जो तुमचे व तुमच्या अनुयायांची उद्दिष्टे साध्य करेल, असे त्यात लिहिले हाते.

आंबेडकर बुद्धिप्रमाण्यवादी होते, त्यांनी सन १९३५ च्या आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर २१ वर्षे जगातील विविध प्रमुख धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांचा कल मानवतावादी व विज्ञानवादी धर्म म्हणून बौद्ध धम्माकडे वळला. धर्मांतरापूर्वी मुंबईत १९४५ मध्ये मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यावय स्थापन केले.तसेच औरंगाबाद येथे इ.स. १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालय सुरू करुन त्याच्या परिसरास नागसेनवन असे नाव दिले. त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानाला राजगृह असे नाव दिले. त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६, नागपूर हा धर्मांतराचे स्थळ व दिवस जाहीर केला. त्यानंतर भारतातील सर्व राज्यांतून लक्षावधी अस्पृश्य लोक नागपूर येथे धम्म दीक्षेकरिता येऊ लागले.

 

बाबासाहब करे पुकार बुद्ध धम्म का करो स्वीकार..

आकाश पाताल एक करो बुद्ध धम्म का स्वीकार करो…

 

अशा घोषणा देत आंबेडकरवाद्यांनी नागपूरात प्रवेश केला. नागपूर शहरात ५ लक्ष आंबेडकरानुयायी आले तेव्हा नागपूर शहराची लोकसंख्या दुप्पट झाली होती. त्या दिवशी अशोक विजयादशमी होती. सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा याच दिवशी स्वीकार केला होता. हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. श्रीलंकेचे बौद्ध भिक्खू महास्थविर चंद्रमणी यांचेकडून आंबेडकर व सविता आंबेडकर यांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. त्यांनंतर नवदीक्षित बौद्ध आंबेडकरांनी स्वतः आपल्या सुमारे ५ लक्ष अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आंबेडकरांनी १५ ऑक्टोबर रोजी सुद्धा ३ लक्ष अनुयायांना दीक्षा दिली, तर चंद्रपूर येथे १६ ऑक्टोबर रोजी ३ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तसेच अकोला येथे ५०० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तीन दिवसांतच आंबेडकरांनी १० लाखापेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांची संख्या १० लाखांनी वाढवली. मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. बाबासाहेबांनी धम्मदीक्षेसाठी अजब बंगला वस्तुसंग्रहालयातील बुद्धमूर्ती मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते रविशंकर शुक्ला यांच्याकडून मागिवली होती. लक्षावधी अनुयायांसह आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारव्यावर बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन झाले. त्यांचे धर्मांतर जगातील एक सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते. आंबेडकरांना बौद्ध धर्माचे प्रवर्तक तसेच बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवक म्हणले जाऊ लागले. महापरिनिर्वाणापर्यंत आंबेडकरांनी ३० लक्षापेक्षा जास्त लोकांना बौद्ध धर्मात आणण्याचे कार्य केले. सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माचे प्रसार कार्य आंबेडकरांएवढे कोणत्याही भारतीयाने केले नाही.

आंबेडकरांनी बौद्धांना स्वतःच्या २२ प्रतिज्ञा वदवून घेतल्या. या बौद्ध धर्माचे सार आहेत. यांत बौद्ध धर्मात असलेला हिंदू देवी-देवता व संस्कृतीचा त्याग, बुद्धाचे पंचशील, त्रिशरण, अष्टांगमार्ग, दहा पारमिता, मानवी मूल्ये व तत्त्वे आहेत. या प्रतिज्ञा पंचशील, अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता अनुसरण्याच्या आहेत. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारखे आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकीद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाहीत. या २२ प्रतिज्ञा बौद्ध धर्माचा सांस्कृतिक भाग म्हणून महत्वाच्या आहेत.