November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध आणि त्यांचा धम्म – १. बुद्धाचे कूळ

The Buddha and His Dhamma,

📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 लेखक : भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

भाग १ –  जन्म ते प्रव्रज्या. 

१. बुद्धाचे कूळ

१. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात उत्तर भारत हे एकच एक सलग प्रभुत्वसंपन्न राज्य नव्हते.

२. देश अनेक राज्यात विभागला होता. काही राज्ये मोठी होती, काही लहान. त्यापैकी काही राज्ये
राजवटीखाली होती, इतर नव्हती.

३. राजाच्या राजवटीखाली असलेली राज्ये एकूण सोळा होती. त्यांची नावे : अंग, मगध, काशी, कोशल, वृज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाल, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कम्बोज अशी होती.

४. ज्या राज्यात राजाची राजवट नव्हती, त्या राज्यांची नावे: कपिलवस्तूचे शाक्य, पावा आणि कुशिनाराचे मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलीय, अल्लकप्पचे बुली, केसपुत्तचे कलिंग, पिप्पलवनचे मौर्य, आणि ज्यांची राजधानी सुंसुमारगिरी होती ते भग्ग, अशी होती.

५. राजाच्या राजवटीखाली असलेली राज्ये जनपद म्हणून तर एकछत्री राजाच्या राजवटीखाली नसलेली राज्ये संघ किंवा गण म्हणून ओळखली जात.

६. कपिलवस्तू येथील शाक्यांच्या राज्यप्रणालीच्या स्वरूपाविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे तेथे प्रजासत्ताक राज्यपद्धती होती की अल्प लोकसत्ताक राज्य पद्धती होती या विषयी निश्चित सांगता येत नाही.

७. एवढे मात्र पक्के माहीत आहे की, शाक्यांच्या प्रजासत्ताकात त्यावेळी अनेक राजघराणी होती
आणि ती राजघराणी ठराविक क्रमाने एका पाठोपाठ एक अशी राज्य करीत असत.

८. या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा म्हणून संबोधिले जाई.

९. सिद्धार्थ गौतमाच्या जन्मसमयी शुद्धोदन राजा होता. राज्य करण्याची त्याची पाळी होती.
१०. शाक्य राज्य भारताच्या उत्तरपूर्व भागात स्थित होते. ते एक स्वतंत्र राज्य होते. परंतु नंतरच्या काळात कोशल नरेशाने त्या राज्यावर आपली प्रभुसत्ता प्रस्थापित केली होती.

११. या प्रभुसत्तेचा परिणाम असा झाला की, शाक्य राज्य कोशल नरेशाच्या पूर्वानुमतीशिवाय काही विषयांसंबंधात आपल्या सार्वभौम राजकीय अधिकारांचा उपयोग करू शकत नव्हते.

१२. त्याकाळात जी राज्ये अस्तित्वात होती त्यात कोशल हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. त्याचप्रमाणे मगध हेही एक सामर्थ्यशाली राज्य होते. कोशल नरेश प्रसेनजित आणि मगधनरेश बिम्बिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होत.

The Buddha and His Dhamma | भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म | बुद्ध आणि त्यांचा धम्म