📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ
प्रथम खंड: भाग पाचवा : बुद्ध आणि त्याचे पूर्व कालीन
🌼 १. बुद्ध आणि वैदिक ऋषी. 🌼
१. वेद म्हणजे मंत्राचा समुच्चय ऋचा किंवा स्तुती स्तोत्रे म्हणजे वेद, ऋचांचे पठन पाठन करणारे ते ऋपी.
२. मंत्र म्हणजे देवाची प्रार्थना. इंद्र, वरुण, अग्नी, सोम, इशान, प्रजापती, ब्रह्म, महर्षि, यम आणि इतर देवांना उद्देशून केलेली प्रार्थना.
३. या प्रार्थना शत्रूपासून रक्षणासाठी, शत्रूविरुद्ध सहाय्यासाठी, धनधान्य प्राप्तीसाठी, भक्ताद्वारा अर्पित अन्न, मांस, सुरा याची आहुती स्वीकारण्यासाठी केल्या जात असतं.
४. वेदात फारसे तत्त्वज्ञान नाही. परंतु काही वैदिक ऋपींनी तत्त्वज्ञान स्वरूपाच्या कल्पनाविलासात रममाण होण्याचा प्रयत्न जरूर केला.
५. हे वैदिक ऋपी, १ अघमर्पण २ प्रजापती परमेष्ठी, ३ ब्रह्मणस्पती किंवा बृहस्पती ४ अनिल ५ दीर्घतमा, ६ नारायण ७ हिरण्यगर्भ आणि ८ विश्वकर्मा हे होत.
६. वैदिक दार्शनिकांनी ज्या प्रश्नांची चर्चा केली त्यापैकी काही प्रमुख प्रश्न असे: विश्वाची उत्पत्ती कशी झाली ? विविध वस्तूंच्या उत्पत्तीची प्रक्रिया कोणती ? त्यांची एकात्मता आणि त्यांचे अस्तित्व यांचे कारण काय? त्यांना कोणी निर्माण केले ? त्याचे नियमन कोण करतो ? हे विश्व कशातून निर्माण झाले ? आणि कशात विलीन होणार ?
७. अघमर्पणाचे मत होते की, विश्वाची उत्पत्ती ‘तपस’ (उष्णता) या तत्त्वापासून झाली. त्यातून चिरंतन धर्म आणि ऋतू (सत्य) निर्माण झाले. त्यातून तमाची (अंधःकार) उत्पत्ती झाली. तमातून जल उत्पन्न झाले. जलातून काळाची उत्पत्ती झाली. काळातून सूर्य आणि चंद्र निर्माण झाले. त्यातूनच स्वर्ग आणि पृथ्वी यांची उत्पत्ती झाली, अवकाश आणि प्रकाश यांचीही उत्पत्ती त्यातूनच झाली. त्यातून दिवस आणि रात्र यांची व्यवस्था झाली.
८. ब्रह्मणस्पतीने कल्पना केली की, ‘असत्’ यातून ‘सत्’ निर्माण झाले. त्याच्या मते असत् म्हणजेच अनंत. सत् मूळ रूपात असत पासूनच उत्पन्न झाले. समस्त सत् चा मूळाधार असत् हाच आहे. आणि त्या भावी सतचाही जे वर्तमानात असत् आहे. (सत् = अस्तित्वात असलेले)
९. प्रजापती परमेष्ठीने एका प्रश्नापासून आरंभ केला. “काय सत् असत् पासून उत्पन्न झाले ?” त्याच्या मतें हा अप्रस्तुत प्रश्न आहे. त्याच्यामते अस्तित्वात असलेल्या समस्त सृष्टीचा मूलाधार जल आहे. त्याच्या मते जल हेच मूलतत्त्व. तेच या सृष्टीचा मूलाधार ते सत् ही नाही आणि असतही नाही.
१०. परमेष्ठीने जड आणि चेतन या तत्त्वात कोणतीही विभाजन रेषा ओढली नाही. त्याच्या मते काही निहित तत्त्वाच्या आधीन जल विविध वस्तूंचे रूप ग्रहण करते. या निहित तत्त्वालाच त्याने
“काम” म्हणून संबोधिले. ‘काम’ म्हणजे वैश्विक इच्छाशक्ती.
११. अनिल हा एक दुसरा वैदिक दार्शनिक होता. त्याच्यामते ‘वायू’ हेच मूलतत्त्व आहे. वायूत गतिमानता अंतर्निहित आहे. वायूत उत्पत्तीतत्त्व अंगभूत आहे.
१२. दीर्घतमा याच्यामते अंततः सर्व चराचरसृष्टीच्या उत्पत्तीचा मूलाधार सूर्य आहे. ही सृष्टी सूर्यावरच अवलंबित आहे. सूर्य आपल्या अंतर्निहित क्षमतेमुळेच गतिमान आहे.
१३. सूर्य हा करड्या रंगाच्या पदार्थापासून निर्मित आहे. त्याच प्रमाणे विद्युत आणि अग्नीसुद्धा.
१४. सूर्य, विद्युत आणि अग्नी यांच्यात जलाचे बीज विद्यमान आहे. जलात वनस्पतीचे बिजांकुर विद्यमान आहेत. दीर्घतमाची मते अशी होती.
१५. नारायणाच्या मतानुसार पुरुष हाच विश्वाचे आदीकारण आहे. पुरुषापासूनच सूर्य, जल, अग्नी, वायु, अंतरिक्ष, आकाश, क्षेत्र, ऋतु, वायूजन्य जीव, सर्व प्राणिमात्र, चंद्र, पृथ्वी, सर्व वर्गातील मानव आणि सर्व मानवीय संस्था यांची उत्पत्ती झाली.
१६. हिरण्यगर्भाचे स्थान सैद्धांतिक दृष्टीने परमेष्ठी आणि नारायण यांच्या मध्ये होते. हिरण्यगर्भचा अर्थ सुवर्ण बीज ही विश्वाची महानतम शक्ती. या महान शक्तीतूनच पार्थिव तथा दिव्य शक्ती उदयास आल्या.
१७. हिरण्यगर्भ म्हणजे अग्नी. हा अग्नी सौरमंडळाचे निमित्त होय. हा अग्नी विश्वाच्या उत्पत्तीचे मूलतत्त्व होय.
१८. विश्वकर्माच्या मतानुसार “जल हेच सर्व वस्तूंचे मूळ आहे. जलातूनच समस्त विश्वाची उत्पत्ती झाली आणि संचरन हा जलाचा स्वभाव धर्म आहे हे मानणे अपर्याप्त आणि असमाधानकारक आहे.” जल हेच मूलतत्त्व मानले तर प्रथम हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की जलाची उत्पत्ती कशी झाली. जलात ती शक्ती, ती उत्पादक शक्ती कोठून आली. पृथ्वी, आप, तेज, इत्यादी शक्ती, अन्य नियम आणि शेष सर्व काही कसे अस्तित्वात आले.
१९. विश्वकर्त्याच्या मते पुरुष हाच विश्वाचा मूलाधार आहे. प्रेरक शक्ती आहे. पुरुषच प्रथम आणि पुरुष अंतिमही. तो दृश्य सृष्टीपूर्वीही अस्तित्वात होता. एकट्या पुरुषामुळेच सृष्टी अस्तित्वात आली. तोच निर्माता आणि तोच नियंताही आहे. पुरुष एक आणि केवळ एकमेव आहे. तो अज आहे आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचे वास्तव्य त्यातच आहे. पुरुषाची चित्तशक्ती महान आहे. त्याचे सामर्थ्य महान आहे. तोच निर्माणकर्ता आहे आणि तोच विनाशकर्ताही आहे. पिता म्हणून त्याने आम्हाला निर्माण केले आणि विनाशकर्ता म्हणून त्याचा आमच्या अंताशी परिचय आहे.
२०. बुद्ध सर्व वैदिक ऋषींना आदरणीय मानीत नव्हते. त्याने फक्त दहा ऋषींना प्राचीनतम आणि मंत्राचे रचियता मानले होते.
२१. परंतु मंत्रात त्याला असे काहीही आढळले नाही जे मानवाच्या नैतिक उत्थानासाठी उपयुक्त असेल.
२२. बुद्धाच्या मते वेद हे वाळवंटासारखे निष्प्रयोजन आहेत.
२३. बुद्धाने वेदापासून काहीही शिकण्यासारखे नाही किंवा घेण्यासारखे नाही म्हणून वेदांचा धिक्कार केला
२४. त्याचप्रमाणे बुद्धाला वैदिक ऋषींच्या तत्त्वज्ञानात काहीही मोलाचे आढळले नाही. ते सत्याप्रति पोहोचण्यासाठी धडपडत होते. पण त्यांना सत्य गवसले नव्हते.
२५. त्यांचे सिद्धांत म्हणजे नुसता कल्पना विलास. त्यांच्या सिद्धांतांचा तर्काशी किंवा यथार्थाशी काहीही संबंध नव्हता. त्यांच्या दर्शनशास्त्रांच्या योगदानाने कोणतीही सामाजिक मूल्ये प्रस्थापित झाली नाहीत.
१. बुद्ध आणि वैदिक ऋषी. ( समाप्त )….
More Stories
बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग चवथा – ४. बोधिसत्व असलेले गौतम सम्यक् सम्बोधी प्राप्त झाल्यावर बुद्ध झाले.
बुद्ध आणि त्यांचा धम्म -भाग चवथा – ३. नव्या धम्माचा आविष्कार
बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग चवथा – २. बुद्धत्वप्राप्ती