खोतांच्या जुलमी कारभारावर प्रकाश पाडण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाने आखलेल्या दौऱ्यातील सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….
दिनांक १० जानेवारी १९३८ रोजी मुंबई येथील असेंब्ली हाॅलवर कोकणातील शेतकऱ्यांनी आपला मार्च करून आपल्या संघटनेचे बल दाखविले होते. त्याची स्मृती बऱ्याच कालावधीपर्यंत मुंबईकरांच्या स्मरणातून गेली नव्हती. स्वतंत्र मजूर पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शिस्तीने व संघशक्तीने जापला मोर्चा असेंब्लीवर नेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढारीपणाखाली एका शिष्टमंडळाच्या वतीने ना. खेरांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत कोकणातील शेतकऱ्यांना खोतांपासून होणाऱ्या असह्य त्रासाची, जोरजुलुमाची हृदयस्पर्शी कैफियत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी ना. खेरांपुढे निवेदन केली होती. शाब्दिक आश्वासनापलीकडे या मुलाखतीमध्ये विशेष काही घडले नव्हते. शेतकऱ्यांना काँग्रेस सरकारच्या या आश्वासनाविषयी बिलकूल विश्वास वाटत नव्हता. या परिस्थितीतून आपला मार्ग कशा रितीने शोधून काढावा याचा विचार कोकणातील गांजलेला शेतकरी वर्ग व त्यांचे स्थानिक पुढारी करीत होतेच. तसेच स्वतंत्र मजूर पक्षाचे सन्माननीय पुढारी व श्रमजीवी वर्गासाठी धडाडीने कार्य करावयास पुढे सरसावलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोकणात दौरा काढून शेतकऱ्यांची प्रत्यक्ष परिस्थिती अवलोकन करणार ही बातमी कळताच येथील स्थानिक पुढाऱ्यांनी त्यांच्या दौऱ्याची रूपरेषा आखली आणि त्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले सहकारी मित्र मे. भाई चित्रे, सुरेंद्रनाथ टिपणीस, डी. व्ही. प्रधान वगैरे मंडळीसह या दौऱ्यासाठी कोकणात गेले होते.
कोकणातील लोकसंख्या जवळ जवळ १३ लाखांवर असून येथील कुणबी, महार, मराठे ही ८ ते १० लाख शेतकरी जनता खोतीशाहीच्या जुलमी अमलाखाली आपले आयुष्य कंठीत होती. यासाठी या खोतांच्या जुलमी कारभारावर प्रकाश पाडण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाने आखलेल्या या दौऱ्यातील मुख्य व मोठ्या सभा खोतांच्याच बालेकिल्याच्या ठिकाणी घेण्यात आल्या.
कणकवलीची पहिली प्रचंड सभा
यापूर्वी या विभागात लाऊड स्पीकर वगैरेच्या सहाय्याने अशा मोठ्या, प्रचंड समुदायाच्या सभा भरल्याचे कधीच ऐकीवात नाही. परंतु कोकणातील महारादी अस्पृश्यांची पहिली प्रचंड सभा, दिनांक १४ मे १९३८ रोजी मु. कणकवली येथे भरली. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्फूर्तिदायक भाषण केले ते अस्पृश्यांच्या अंगी नवचैतन्य उत्पन्न केल्याशिवाय राहिले नाही.
प्रथम डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला एक दिवस येण्यास उशीर झाल्याबद्दल खुलासा करून सर्वांना एक दिवस तिष्ठत राहावे लागले याबद्दल खेद व्यक्त केला.
नंतर कणकवलीच्या या प्रचंड सभेत बोलताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
या ठिकाणी मला निराळ्या तऱ्हेचे भाषण करावे लागणार आहे. ते असे की ज्या दिवसापासून मुंबईत इंग्रजांचा पाय पडला त्या दिवसापासून आपल्या महार समाजाला नशीब काढायला वाव मिळाला. इंग्रजांच्या राज्यामुळे आपल्याला नशीब काढण्याचा मार्ग मोकळा झाला. इंग्रज परदेशातून आले. त्यांच्याजवळ सैन्य शिपाई नव्हते व सैन्य उभे केल्याशिवाय राज्य मिळण्याची आशा नव्हती. पेशव्यांच्या राज्यात वरच्या वर्गाना मोठेपणा व सुखसंपत्ती मिळू शकत असल्यामुळे इंग्रजांच्या सैन्यात वरचा वर्ग जात नव्हता. अस्पृश्यादी पददलित वर्गाला पेशवाईत अगदी अमानुषपणे वागविले जात होते. मनुष्य म्हणून जगण्याचा त्यांना जणू काय हक्कच नव्हता. शूराची जात असून पददलितपणामुळे त्यांचे चीज पेशवाईत झाले नाही. इंग्रजांच्या सैन्य भरतीमध्ये शिरण्याशिवाय महार, मांग व चांभारांना गत्यंतर नव्हते.
हिंदुस्थानात इंग्रजांनी राज्य कमावले ते महार-मांग-चांभारादी अस्पृश्य वर्गीय शूर सैनिकांच्याच मदतीने. त्याला इतिहासाची साक्ष पटवून द्यायची म्हणजे कोरेगावला जो मनोरा बांधला आहे त्यावरून कळून येईल. नाहीतर इंग्रजांना या देशाचे राज्य कधीच मिळाले नसते. त्याचा परिणाम चांगला की वाईट हे आपणाला माहीत आहेच. पेशवाईच्या काळातील अशी गोष्ट सांगण्यात येते की महारांना राजरोसपणे रस्त्यातून फिरण्याची मुळीच मोकळीक नव्हती. एखादा महार रस्त्यावर थुंकला व त्यावर एखाद्या ब्राह्मणाचा पाय पडल्यास तो विटाळतो, त्याला पुन्हा स्नान करावे लागते. यासाठी महाराच्या गळ्यात मडके बांधीत असत. महार ओळखता यावा म्हणून त्याच्या हाताला काळा दोरा बांधावा लागत असे. कुत्र्या-मांजराइतकीसुद्धा किंमत महाराला नव्हती. परंतु इंग्रजांच्या सैन्यभरतीमुळे महारांच्या परिस्थितीत बदल झाला. त्यांना माणुसकीने वागविले जाते याचा अनुभव मिळाला. अशा इंग्रजांच्या राज्याच्या पहिल्या आमदानीत शे-सव्वाशे सुभेदार, त्याहुन कितीतरी जास्त जमादार-हवालदार होऊन गेले. पूर्वी गावातील मराठा ज्यांची सावली घेत नव्हता तोच सैन्यात दाखल झाल्यावर त्याच्याच गावच्या महार सुभेदाराला त्याला सलाम करावा लागत होता. हा सारा इतिहास आपल्या फुशारकीकरता किंवा बडेजावाकरता मी सांगत नाही. १८९६ साली इंग्रज सरकारने महार लोकांची सैन्यात भरती करणे बंद केले. त्यामुळे हुद्यावर जाण्याची बंदी झाली. ज्या इंग्रज सरकारकरिता भात शिजवून देऊन पेज आपण खाल्ली, आपले रक्त सांडले त्यांनीच आम्हाला बंदी का केली, असा प्रश्न उभा राहतो. परंतु यात इंग्रजांचा काही दोष नसून तुमचा-आमचा आहे. महार जात ही अत्यंत दलित जात. या जातीला कोणत्याच प्रकारचा मानसन्मान नाही. अशाप्रकारचा इसम इंग्रज सरकारच्या अधिकारावर चढल्यास मराठा, क्षत्रिय अशा वरच्या वर्गातील लोकांना त्यांना सलाम करावा लागल्याने बंड-बेबंदशाही माजेल यामुळे त्यांना फलटणीत बंदी झाली. तेव्हापासून करंडी हाती घेऊन भीक मागण्याचा धंदा पत्करावा लागला आहे.
आज येथे आलेल्या सर्व तरुणांनी यापुढे आम्ही मेलेल्या गुरांना हात लावणार नाही व उष्टे खाणार नाही, अशी प्रतिज्ञा केली पाहिजे. बायांनी व तरुणांनी या गोष्टी अंमलात आणण्यासाठी प्राण गेला तरी हरकत नाही, अशी वृत्ती दाखविली पाहिजे. (टाळ्या.) वरिष्ठ वर्गाची याचना करण्याचा दीनवाणा कारभार यापुढे आपण बंद केला पाहिजे आणि यापुढे कायद्याने दिलेले हक्क आम्ही प्राण गेला तरी बजावण्यासाठी तयार असले पाहिजे. आज महारांची वीस लाख वस्ती आहे. यातील अधिकार गाजविण्यासाठी एक लाख माणसे मेली तरी काय बिघडले ? मला म्हाताऱ्यांना सांगण्यापेक्षा तरुणांना सांगावयाचे आहे की, तुम्ही आज न्याय्य हक्कांसाठी मरणाचे द्वारी जाण्यास तयार राहायला पाहिजे.
आता शेवटची एक गोष्ट सांगावयाची आहे. या देशात नवीन राजकारण सुरू झाले आहे. या देशात इंग्रजांचे राज्य सुरू आहे ही भावना खरी नाही. १९३५ सालापर्यंत इंग्रजांची सत्ता होती. परंतु १९३५ सालच्या कायद्याने ती लोकांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. या सत्तेचा फायदा कोणाला होईल हे ज्याच्या त्याच्या राजकारणपटुत्वावर अवलंबून आहे. काही काळापूर्वी तुम्ही प्रसंगानिमित्त कलेक्टरकडे, मामलेदाराकडे अर्ज केल्यास ते त्याचा विचार करीत असत पण आज तसा अर्ज केल्यास ते सांगतील ‘आज सत्ता आमचे हातात नाही, कायदेकौन्सिलच्या हातात आहे.’ ही गोष्ट खरी आहे. कायदेमंडळाच्या कार्यावर बारकाईने लक्ष ठेवा. कोणता ठराव पास झाला, कोणता नापास झाला याची बारकाईने चौकशी करा. अस्पृश्य लोकांकरिता १५ जागा आहेत. हे लोक काय करतात याकडे लक्ष देऊन त्यांना आणखी जास्त लोक कसे येऊन मिळतील व बहुमत कसे होईल इकडे लक्ष दिले पाहिजे. जास्त लोक मिळविण्यासाठी मी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. आहे. तो आज जरी लहान असला, त्याची संख्या कमी असली तरी त्याची वाढ होण्यासाठी प्रयत्न करा. अत्यंत मोठी अशी एक प्रबळ संस्था आपल्या इलाख्यात आहे. ती काँग्रेस होय. काँग्रेस कितीही मोठी असली तरी ती गोरगरिबांचे कल्याण करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. कोणत्या वर्गापासून तुम्हाला हित होते ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ज्यांनी आपली माणूसकी हिरावून घेतली ते शेठजी-भटजी होत आणि आज आपल्याला अन्न मिळत नाही ते याच वर्गामुळे आणि याच वर्गामुळे आपण या स्थितीला पोहोचलो आहोत.
सर्व ब्राह्मणेतर कुणबी वर्गास सांगावयाचे आहे की, तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊ नका. तुम्ही आम्ही त्रासले-गांजलेले लोक एक आहोत. तसेच एक होऊ या. काही लोक असे म्हणतात की, ” मी साम्राज्यशाहीविरुद्ध नाही. मला इंग्रज सरकारला घालवून देण्याची बिलकूल इच्छा नाही. ” पण ते बरोबर नाही. शेठजी-भटजी हे घरचे चोर आहेत. त्यांची लबाडी बंद केली पाहिजे. आपण आपल्या पायावर उभे राहिल्यास त्याला वेळ लागणार नाही. इंग्रज बोटीत बसून जाणार! तेव्हा त्यांना घालविणे आवश्यक की खोत-सावकारांना ? या घरातील चोरांशी आपणाला लढा दिला पाहिजे. तुम्हाला इंग्रज सरकार नको असेल तर ते मलाही नको आहे.
ब्राह्मणेतर वर्ग आज जो काँग्रेसमध्ये सामील होत आहे त्या वर्गाच्या पुढाऱ्यांना माझे हे म्हणणे पटत नाही. त्यांना आज जरी नाही तरी येत्या पाच वर्षात ते पटून ते आमच्या पक्षात सामील होतील हे लक्षात ठेवा. (टाळ्या) खोती पद्धती ही एक गुलामगिरी आहे. याबाबतीत किती अन्याय होतात, किती दुःखे भोगावी लागतात हे तुम्हाला ठाऊक आहे. खोती नष्ट करण्याबाबत काँग्रेसने पुढाकार घेतला नाही. यावरून काँग्रेस कोणाची हे तुमच्या लक्षात येईल. काँग्रेसची बढती यापुढे होणार नाही. स्वतंत्र मजूर पक्ष हे झाड आज लहान असले तरी ते झपाट्याने वाढणार आहे. तुम्ही त्याच्या छायेला बसणार असून सर्व ब्राह्मणेतर श्रमजिवी जनताही बसणार आहे.
🔹🔹🔹
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वरील आशयाचे भाषण झाल्यावर परिषदेत (१) मेलेली गुरे न ओढण्याबद्दल, (२) पाण (पान महार) व बेले (बेले महार) हे महारातील भेद नष्ट करण्याबद्दल, (३) खोती नष्ट करणे व महार वतन या बिलांना पाठिंबा देणे, (४) हॉटेल किंवा उपहारगृह यात स्पृश्य हिंदुप्रमाणे व्यवस्था न झाल्यास त्यावर बहिष्कार घालण्याबाबत, (५) महार सेवासंघाच्या ठिकठिकाणी संघ व शाखा निर्माण करण्याबाबत, (६) महारकीची कामे बंद पाडली गेली असतील ती दुसऱ्याने न करणे, (७) दर गावाने ८ आणे वर्गणी भरून संघाचे पाठबळ वाढविणे हे सात ठराव पास झाले.
⚫⚫⚫
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर