August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

शब्दांनो ! – विवेक मोरे

शब्दांनी शब्दांसाठी बनविलेल्या शब्दांच्या शहरात राहणार्‍या अर्थहीन शब्दांनो!
मनूच्या अखत्यारीत, ब्राह्मणांच्या पोतडीत विलासाने निद्राधीन झालेल्या आळशी शब्दांनो!
फालतू प्रेमाचं, मत्त सम्राटांच्या कौतुकाचं, दिडदमडीच्या कर्मकांडाचं वर्णन करणाऱ्या फाजील शब्दांनो!
तुम्हाला हे सर्व चाळे बंद करुन यावे लागेल माझ्याबरोबर.
प्रेमरस आळऊन लोचट झालेल्या तुमच्या जीभेला आज क्रांतीगीत म्हणावयाला लावणार आहे मी.
मत्त सम्राटांची भाटगीरी सोडून तुम्हाला विदारक वास्तवतेचं माध्यम बनविणार आहे मी.
फालतू कर्मकांडाची पांडित्यपूर्ण भाषा गुंडाळून माझ्या हृदयाच्या वेदनेची भाषा शिकविणार आहे मी तुम्हाला.
राजऐश्वर्य भोगलेल्या शब्दांनो……
यावे लागेल तुम्हाला गावकुसाबाहेरील वस्तीतल्या माझ्या झोपड्यामध्ये.
माझ्या उपेक्षित बांधवांच्या डोळ्यातले तप्त अश्रू दाखविणार आहे तुम्हाला मी.
तुम्हाला व्यक्त करावा लागेल मी अनुभवलेला नग्न अनुभव.
आज यावे लागेल तुम्हाला माझ्या ओठांमध्ये सम्यक क्रांतीचा कल्लोळ होऊन.
माझ्या लेखणीतून उतरुन तुम्हाला व्हावे लागेल ठिणगी सुरुंगाची कोठारे पेटविण्याकरीता.
तुम्हाला लिहावा लागेल माझ्या स्वातंत्र्याचा शिलालेख.
पिढ्यानपिढ्यांची सिंहासने उलथून टाकण्यासाठी मला तुझी गरज आहे.
आलात तर गोडीत नाहीतर जबरदस्तीने ओढित …….,
तुम्हाला मी माझ्यासोबत घेऊन जाईनच!
– विवेक मोरे
मो.८४५१९३२४१०