April 18, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

शील व सौजन्य नसेल तर शिक्षित माणूस हिंस्त्र पशुपेक्षाही क्रूर व भीतीप्रद – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

अखिल जी. आय. पी. रेल्वे अस्पृश्य कामगार परिषदेच्या भव्य मंडपात पार पडलेल्या मुंबई इलाखा अस्पृश्य युवक परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण….

दिनांक ५ फेब्रुवारी १९३८ च्या जनता पत्रात जाहीर केल्याप्रमाणे मनमाड येथे दिनांक १२ आणि १३ फेब्रुवारी १९३८ ला अखिल जी. आय. पी. रेल्वे अस्पृश्य कामगार परिषदेच्या भव्य मंडपात (१) मुंबई इलाखा अस्पृश्य युवक परिषद, (२) अखिल जी. आय. पी. रेल्वे अस्पृश्य कामगार परिषद व (३) महाराष्ट्रीय अस्पृश्य महिला परिषद या तीन परिषदा यशस्वीपणे पार पडल्या. यापैकी
(१) मुंबई इलाखा अस्पृश्य युवक परिषद व (२) अखिल जी. आय. पी. रेल्वे अस्पृश्य कामगार परिषद या परिषदा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या, तर (३) महाराष्ट्रीय अस्पृश्य महिला परिषद ही पुण्याच्या प्रमुख कार्यकर्त्या सौ. मैनाबाई शामराव भोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इलाखा अस्पृश्य युवक परिषद शनिवार दिनांक १२ फेब्रुवारी १९३८ रोजी रात्री ८ वाजता घेण्यात आली. या परिषदेत श्री. मुरलीधर पगारे यांच्या भाषणानंतर निरनिराळे ठराव पास झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले.

मुंबई इलाखा अस्पृश्य युवक परिषदेत बोलतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले,
आजच्या या युवक परिषदेचा मी युवक नसतानाही मला अध्यक्ष केले आहे. कारण माझ्या वयाची ४० वर्षे उलटून गेली आहेत व सर्वसाधारणपणे युवकांची आयुष्यमर्यादा ४० च्या आत असते. असो.

आजची ही परिषद जरी युवकांची असली तरी या ठिकाणी सबगोलंकार झाल्याचे आपणास आढळून येईल. कारण या युवकांच्या परिषदेत म्हातारे आहेत तर माझ्या उजव्या बाजूचा सर्व ब्लॉक भगिनींनी गडगच्च भरला आहे. तेव्हा आजच्या युवक परिषदेतील माझे भाषण युवकेतरांना जरा विसंगत वाटेल. तेव्हा मी आज जे बोलणार आहे ते फक्त युवकांना उद्देशूनच बोलणार आहे.

आजची ही युवक परिषद अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वसाधारण लोकसंख्येत मोठा भाग तरुणांचा आहे. जी म्हातारी माणसे आहेत ती थोडी असून त्यापैकी बऱ्याच जणांच्या गोवऱ्या ओम्कारेश्वरी गेल्या आहेत. त्यांच्या लहानपणापासून ते ज्या परिस्थितीत वाढले आहेत, त्या परिस्थितीतून सुटण्यास त्यांच्यापैकी बरेच जण आज तयार नाहीत. ज्या परिस्थितीत ते वाढले असतील त्या परिस्थितीस चिकटून राहाण्याची त्यांची वृत्ती दिसते. त्यांच्या हातून दुसऱ्या एखाद्या कार्याची आपणास जरी अपेक्षा करता येत नसली तरी आपल्या चळवळीच्या चालत्या गाडीस ते आड न आले तरी त्यांचे आपल्यावर मोठे उपकार होतील.

आजची ही युवकांची सभा युवक संघाच्या विद्यमाने व्हावयास पाहिजे होती. परंतु ती आज स्वतंत्र मजूर पक्षाच्या विद्यमाने होत आहे. ही परिषद युवकांनीच भरविली असती तर फार बरे झाले असते. परंतु युवकांच्यात किरकोळ मतभेद आहेत हे जरी खरे असले, नाशिक जिल्हा युवक संघाच्या विद्यमाने ही परिषद भरणार असे जरी पूर्वी जाहीर झाले असले तरी कार्याकडे लक्ष देऊन त्यांनी आपला हेका न धरीता युवकांची परिषद, मग ती कोणातर्फेही का होईना पण होवो, या उदात्त भावनेने मिळते घेतले ही अत्यंत अभिनंदनीय अशी गोष्ट त्यांनी केली आहे. सार्वजनिक कार्यात काम करू इच्छिणाऱ्यात जर ही भावना नसेल तर त्यांच्या हातून काहीही होऊ शकणार नाही. तेव्हा सार्वजनिक कार्यात पडलेल्यांनी अगर पडू इच्छिणाऱ्यांनी ही भावना सतत मनात बाळगण्यातच समाजहित आहे. युवक संघाच्या मंडळींनी घालून दिलेल्या या स्तुत्य व अनुकरणीय उपक्रमाबद्दल मी पुन्हा त्यांचे अभिनंदन करतो.

युवकांच्या परिषदेत मला जे सांगावयाचे आहे ते मी पुस्तकरूपाने प्रसिद्ध करू इच्छित होतो. तथापि, कामाच्या वाढत्या व्यापामुळे ते आज जरी शक्य झाले नसले तरी मी लवकरच ते सर्व पुस्तक रूपाने प्रसिद्ध करेन. आजच्या प्रसंगी मी फक्त महत्त्वाच्या एकदोन गोष्टी सांगू इच्छितो. माझी चाळीशी उलटून गेली असल्याने मी आता युवक नाही ही कबुली मी दिलीच आहे. मनुष्याने आपल्या आयुष्यात खाणे, पिणे व जगणे ही आयुष्यातील इतिकर्तव्यता मानता कामा नये. खाणे-पिणे हे जगण्याकरिता असावे व जगणे हे मानमरातबाचे व समाजास भूषणभूत होण्यासाठी समाजसेवेचे असावे. ‘ खाण्याला काळ व भूईला भार ‘ असे जगणे असले काय नि नसले काय सारखेच. या बाबतीत प्रसिद्ध नाटककार कै. गडकरी यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, ‘ जोपर्यंत समाज आपली मानमान्यता ठेवतो तोपर्यंतच जगण्यात भूषण आहे ‘ नाही तर समाजास अप्रिय होऊन अगदी म्हातारा होऊन बिछान्यास खिळून अगर घरातील सुनामुलांच्या तिरस्कारास पात्र होऊन झिजून झिजून जगण्यापेक्षा त्या अगोदर आलेले मरण भूषणाचे असते.

मी एकेकाळी तरुण होतो तेव्हा माझ्या अनुभवाच्याच गोष्टी मी आपणास सांगू इच्छितो. तरुणांनी नेहमी आपल्यापुढे उदात्त ध्येय ठेवले पाहिजे. तरुणांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, कोणतीही चांगली गोष्ट संपादन करण्यासाठी तप करावे लागते. म्हणूनच आपल्यात एक म्हण रूढ आहे की, ‘ तपा अंती फळ.’ कार्य आत्मोन्नतीचे असो वा राष्ट्रोन्नत्तीचे असो कशाचेही का असेना

त्यासाठी सतत प्रयत्न करावयास हवे आहेत. माणसाने त्या कार्यास स्वतःस वाहून घेतले पाहिजे. मी अनेक अर्वाचीन तरुण पाहिले आहेत की, जे १५ मिनिटे टेबलावर सतत बसू शकत नाहीत, त्यांना घटकोघटकी विडी ओढावी लागते, चहा प्यावा लागतो, त्याशिवाय त्यांना कामच करता येत नाही. हे योग्य नाही. कोणीही इसम आपल्या उपजत बुद्धीवर पराक्रम करू शकत नाही. जगात खुळी माणसे फारच थोडी निपजतात तसेच बुद्धीचा विकास करणे ही दरेकाच्या हातची गोष्ट आहे. २४ तासापैकी २० तास सतत टेबलावर बसून काम करता आले पाहिजे. मी माझ्या विद्यार्थी दशेत येथे व परदेशातही सतत २० तास टेबलावर बसून काम केले आहे. ज्या कोणास आपल्या बुद्धीचा प्रभाव वाढवावयाचा आहे त्यांनी तप केले पाहिजे, श्रम केले पाहिजेत.

मनुष्य संकटात अगर दारिद्र्यात सापडला म्हणजे तो निराश होत असतो. आपणास यश मिळणार नाही अशी भावना त्याच्या मनात उत्पन्न होते. जर का या भावनेने मनुष्यास घेरले म्हणजे तो मनुष्य आयुष्यात कुचकामाचा ठरतो. हरेक तरुणाने आशा कधीच सोडू नये. ज्या दिवशी तो आशा सोडील त्या दिवशीच तो जगात जगला काय आणि मेला काय सारखाच होईल. हरेक तरुणात महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. महत्त्वाकांक्षेशिवाय मनुष्य धडपड व प्रयत्न करूच शकत नाही. यासाठी अस्पृश्य मानलेल्या तरुणांमध्ये महत्त्वाकांक्षेचे बी प्रथम रुजले पाहिजे. आज आपण जेथे जेथे जाल मग ती मामलेदार कचेरी असो, कलेक्टरचे ऑफिस असो अगर कोर्ट असो. दर ठिकाणी या पांढरपेशा भटा-ब्राह्मणांचाच सुळसुळाट झालेला दिसेल. या सर्व परिस्थितीवरून इतरेजणांना निराश होणे हे जरी स्वाभाविक असले तरी आज आपण निराश न होता मनात उच्च महत्त्वाकांक्षा धरून त्या दृष्टीने प्रयत्नांची शिकस्त करावयास हवी आहे. मला जरी मुंबईचा गव्हर्नर केले तरी ते कमीच होईल असे मानणारा मी आहे. हे सांगण्याचा मतलब इतकाच की, आपल्यापैकी दरेकाने उच्च महत्त्वाकांक्षा बाळगून ती फलद्रूप करण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे.

तरुण बंधुनी आत एक बाहेर एक असली सवय लागू देऊ नये. सत्य सोडू नका. सत्याचा तात्कालिक जरी विजय होत नसला तरी शेवटी सत्याचाच विजय होतो. आपल्यात दुटप्पीपणा असता कामा नये. जगाला जर हा मनुष्य दुतोंडी आहे असे दिसले तर मग जग आपल्यावर विश्वास ठेवणार नाही.

आज विद्येची द्वारे आपणास मोकळी आहेत. आज शिक्षणाच्या ज्या सवलती आहेत त्या आमच्या वेळी मुळीच नव्हत्या. आम्हास त्या काळी कोणाचीच मदत नव्हती. मला येथील विश्वविद्यालयात असता माझे वडील व कुटुंबातील मंडळी, एक बकरी, सरपण, चूल आठवड्याचा बाजार वगैरे सर्व सामान ८×८ च्या लांबी रुदीच्या खोलीत राहून कॉलेजचा अभ्यास करावा लागत असे. तुमच्या सुदैवाने ही स्थिती आज बदलली आहे. साधनांच्या अभावी शिक्षण घेता येत नाही अशी जर आपण तक्रार केली तर ती निराधार ठरेल.

आपल्यापैकी दरेकाने सुविद्य व्हावे अशी माझी फार इच्छा आहे. परंतु त्याच बरोबर आज विद्येची मला मोठी भीती वाटते. शिकलेल्या माणसांची मला जशी भीती वाटते तशी ती सर्वांनी बाळगली पाहिजे. कारण शिक्षण ही तलवार आहे, शिक्षण हे शस्त्र आहे. जर एखादा मनुष्य येथे तलवार घेऊन आला तर आपण सर्व जण त्यास घाबरून जाल. परंतु विद्येचे शस्त्र हे नेहमी वापरणाऱ्यावर अबलंबून असते. हत्याराने अबलांचे संरक्षण मनुष्य करू शकेल. चांगल्या माणसाच्या हातात शस्त्र असणे उत्तम परंतु वाईट माणसाच्या हातात शस्त्र असणे बरे नाही. शिक्षण घेतलेल्या माणसाच्या अंगी शील व सौजन्य नसेल तर तो हिंस्त्र पशुपेक्षाही क्रूर व भीतीप्रद समजण्यात यावा. अज्ञ जनतेस छक्केपंजे, डावपेच करता येत नाहीत. शिकल्या सवरलेल्यांना ते अवगत असतात. एखाद्याच्या कमजोर बाजू (उणीवा) असल्यास तेवढेच काढून त्यास कसा पेचात आणावयाचा याकडे बरेच लोक आपल्या शिक्षणाचा उपयोग करतात. दीनदुबळ्या, गरीब शेतकऱ्यांना शिक्षण नाही. त्यांच्या अज्ञानीपणाचा फायदा शिकले सवरलेले शेठजी, भटजी, वकील वगैरे सर्व लोक घेत आहेत. अशातऱ्हेने गरीब जनतेस नाडण्याकडेच जर या शिक्षणाचा उपयोग होणार असेल तर धिःकार असो अशा या शिक्षणाचा. त्या दृष्टीने पाहता शिक्षणापेक्षा शील फार महत्त्वाचे आहे. अलिकडील तरुणात धर्माबद्दल औदासिन्य दिसते. धर्म हा गांजा आहे असे ते म्हणतात. परंतु माझ्यात ज्या काही चांगल्या गोष्टी असतील व माझ्या शिक्षणाचा जो काही जनतेसाठी उपयोग झाला असेल तो सर्व माझ्यात असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय. मला धर्म हवा आहे, परंतु धर्माचे ढोंग नको. हिंदू धर्म हा नरक आहे ही माझी समजूत अजूनही कायमच आहे. तेव्हा मला तुम्हाला एवढेच सांगावेसे वाटते की, शिक्षणापेक्षा शीलाला अधिक महत्त्व द्या. तसेच आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याच दीनदुबळ्या जनतेच्या उद्धारार्थ न करिता जर शिकून आपली नोकरी भली आहे, आपली बायकामुले भली या भावनेने आजचे शिकलेले तरुण वागणार असले तर त्यांचा समाजाला काय उपयोग? तरुणांवर

आज पडलेली जबाबदारी ओळखून त्यांनी त्या कार्यास लागावयास हवे आहे. जनतेच्या हाडीमासी भित्रेपणा खिळलेला दिसतो. आपले कायदेशीर हक्क बजावण्यास सुद्धा ते धैर्याने पुढे येऊ शकत नाहीत. सार्वजनिक विहिरीवर पाणी भरणे, सार्वजनिक राजरस्त्याने मिरवणुकी नेणे वगैरे लोक मित्रेपणामुळे करू शकत नाहीत. ही परिस्थिती फक्त तरुणच बदलू शकतील. परंतु त्यासाठी प्रथम कंबर कसली पाहिजे. त्यासाठी त्यांनी प्राणयज्ञदल संस्था ठिकठिकाणी स्थापन करावयास हव्या आहेत. निसर्गसिद्ध हक्क मिळविण्यासाठी त्यांनी जोराचे लढे लढविले पाहिजेत. याबाबत एक मनोरंजक व बोधप्रद अशी पौराणिक गोष्ट मला आठवली तेवढी सांगून मी माझे भाषण पुरे करणार आहे.

द्रोण हा अत्यंत गरीब होता. तो श्रीमंतांच्या आळीत राहत असे. त्याला अश्वत्थामा नावाचा मुलगा होता. त्याच आळीतील श्रीमंतांची मुले सोन्याच्या वाटीतून दूध पीत असत हे अश्वत्थामाने पाहिल्यानंतर तोही या *

( डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे संपूर्ण भाषण उपलब्ध होऊ शकले नाही त्यामुळे हे भाषण अर्धवट आहे. )

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे