मुंबई येथे झालेल्या अस्पृश्य वर्गाच्या जंगी जाहीर सभेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण….
दिनांक २८ ऑगस्ट १९३७ रोजी वांद्रे, मुंबई येथील म्युनिसिपल हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य वर्गाची जंगी जाहीर सभा भरून त्या सभेत खालील ठराव पास झाले —
ठराव क्र.१.- मुंबई इलाखा महार परिषदेच्या ठरावाप्रमाणे आपल्या बंधूभगिनींनी हिंदू धर्माचे सणवार, व्रतवैकल्ये वगैरे धार्मिक विधी आणि उपोषण (उपवास) वगैरे धार्मिक आचार पाळू नयेत.
ठराव क्र. २.- वांद्रे म्युनिसिपालिटीत अस्पृश्य वर्गासाठी एक राखीव जागा दिल्याबद्दल मे. कलेक्टर साहेबांचे ही सभा आभार मानीत असून, अस्पृश्य वर्गाच्या लोकसंख्येच्या मानाने एक जागा अपुरी असल्यामुळे अधिक जागा देण्याबद्दल ही सभा मे. कलेक्टर साहेबांना विनंती करीत आहे.
ठराव ३.- स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद होण्याबद्दल सर्व जनतेस या सभेची आग्रहाची विनंती आहे.
ठराव क्र. ४.– श्री. संभाजी तुकाराम गायकवाड यांच्या मानपत्रासाठी वांद्रे पंचायतीकडून २५ रु. देण्यात येत आहेत. तरी इतर ठिकाणच्या पंचायतींनीही या कार्यास सढळ हाताने मदत करण्याची कृपा करावी.
सदर ठरावावर श्री. ठु. तु. शिर्के, स. भि. धोत्रे, अमरसिंग, शं. ल. वडवलकर, ध. सो. जाधव, म. ग. जाधव, चां. ना. मोहिते, शां. अ. उपशाम, ना. भि. असगोलकर, वां. स्कू. बो. मेंबर इत्यादी मंडळीची भाषणे झाली.
त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलावयास उभे राहिले. प्रथम सूचनावजा ते म्हणाले, धर्मांतराबद्दल मुंबई इलाखा महार परिषदेने केलेल्या ठरावाची आठवण देण्याकरिता विशेषतः आजची सभा आहे. म्हणून धर्मांतराबद्दल कोणास काही शंका विचारावयाच्या असल्यास त्यांनी त्या अवश्य विचाराव्यात. शंका विचारावयास कोणीच पुढे न आल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणास सुरूवात केली.
अस्पृश्य वर्गाच्या या सभेत बोलताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
प्रिय भगिनींनो व बंधुनो,
मी या सभेला येणार नव्हतो. परंतु मला समजले की, येथे जुन्या परंपरेला चिकटून राहाणारे असे काही लोक आहेत व ते महार परिषदेने पास केलेल्या धर्मांतराबद्दलच्या ठरावाची अंमलबजावणी पूर्णपणे करीत नाहीत, तेव्हा अशा लोकांच्या शंकानिरसनासाठी मी येथे आलो आहे. माझी मते यापूर्वीच मी अनेकवेळा बोलून दाखविली आहेत.
त्याबद्दल तुमच्या मनात शंका असू नये. १९३५ साली भरलेली मुंबई इलाखा महार परिषद ही महार जातीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखी झाली आहे. ती परिषद अपूर्व, अवाढव्य व पूर्ण प्रातिनिधिक अशी झाली आहे. तेव्हा अशा परिषदेने पास केलेले ठराव वास्तविक सर्व महार जातीने मानावयास पाहिजेत व महार जातीतील बहुसंख्यांक लोक ते ठराव मानतातही. मात्र महार जातीतील काही थोडे लोक अद्याप जुन्या परंपरेलाच घरून आहेत, असे माझ्या कानावर आले आहे. अशा लोकांना मला असे सांगावेसे वाटते की, अल्पमतवाल्या लोकांना नेहमी बहुमतवाल्या लोकांप्रमाणे वागावे लागते. सध्याच्या कौन्सिलचेच उदाहरण घ्या. सध्या कौन्सिलमध्ये काँग्रेसचे बहुमत आहे त्यामुळे ते करतील त्या कायद्यांना मान देणे आपणास भागच पडते. ” जातीसाठी खावी माती ” अशी म्हण आहे. मग जातीने धर्मांतराबद्दल दिलेला निर्णय मानणे आपले कर्तव्य नाही काय ?
अनेक कार्यासाठी जातीकडेच आपणास जावे लागते. मग जातीने ठराव केला तो मान्य का नसावा ? हिंदू धर्माप्रमाणे आपण जे पाळीत होतो ते सर्व धार्मिक सण-वार सोडून दिले पाहिजेत. हे सोडून देण्याचे कारण आज जे मी सांगणार आहे ते मात्र निराळे आहे. हिंदू धर्माप्रमाणे जे काही विधी करतात ते धर्माच्याच नव्हे तर नीतीच्या दृष्टीने रास्त असतात काय याचा आपण विचार केला पाहिजे. काही विधीत तर अतिशय बाष्कळपणा भरलेला असतो. उदाहरणार्थ, शंकराच्या नावाने लोक सोमवारी उपवास करतात व शंकराच्या पिंडीची बहुतप्रकारे पूजा करतात. परंतु शंकराची पिंडी ही काय वस्तू आहे, याचा कोणी विचार केला आहे ? ती दुसरे तिसरे काहीही नसून पुरुष-स्त्रीच्या संभोगक्रियेची प्रतिमा आहे. अशा बीभत्स प्रतिमेचे गोडवे आपण गावे का ? रस्त्यावर श्वानाप्रमाणे जर नर-नारी वाह्यातगिरी करू लागले तर आपण त्यांची फुलाने पूजा करायची की जोड्याने ? मग पार्वती-शंकर यांच्या त्याच क्रियेच्या प्रतिमेला म्हणजे देवाच्या बीभत्सपणाला आपण पूजावे काय ?
गणपतीचासुद्धा तसलाच प्रकार ! गणपतीची कथा अशी आहे की एकदा पार्वती नग्न स्नान करीत होती. त्यावेळेस शंकर कोठेतरी दुसरीकडे गेला होता. म्हणून पार्वतीने आपणास कोणापासून उपसर्ग पोहोचू नये म्हणून आपल्या अंगावरचा मळ काढून त्याचा रक्षणकर्ता गणपती बनविला. तेव्हा मळातून उत्पन्न झालेल्या अमंगळाला देव कसे मानावयाचे ? ईश्वर निष्कलंक, मूर्तीमंत, पवित्र असावयास पाहिजे. परंतु हिंदू धर्मातील देव मोठे विचित्र आहेत ! म्हणून त्यांची पूजा करू नये, अशी माझी प्रामाणिक समजूत आहे.
तिसरी गोष्ट दत्तात्रेयाची. अत्री ऋषीची बायको अनसूया ही महान पतिव्रता आहे, असे ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन देवांच्या बायकांना नारद सांगत गेला. आपल्यापेक्षा कोणी स्त्री अधिक पतिव्रता असावी हे त्यांना पाहावेना. तेव्हा या तिन्ही बायकांनी आपापल्या नवऱ्यांना अनसूयेचे पातिव्रत्य हरण करण्यास सांगितले व बायकांचे म्हणणे ऐकून हे तिघे वीरही त्या कामास तयार झाले. हे तिघेजण अनसूयाच्या घरी गेले. तिच्या नवऱ्याला काही कारण सांगून दुसरीकडे पाठविले व आपण अनसूयेच्या सहवासात राहू लागले. या अवस्थेत तिने एका मुलाला जन्म दिला आणि या बालकाचे जनकत्व कोणाकडे हा विचार पडल्यामुळे त्या तिघांवर सारखीच जबाबदारी टाकण्याकरिता त्याला तीन तोंडे लावली व तोच हा दत्तात्रेयाचा अवतार ! पुष्कळ लोकांचा असा समज झाला आहे की, धर्मांतराची लाट आता थंडावली आहे. परंतु तसे नाही. धर्मांतर हे होणारच आहे. ही चळवळ मी सोडली नाही, हे तुम्ही पक्के लक्षात ठेवा. पुष्कळ हिंदू लोक मला म्हणतात की, ” तुमच्या धर्मांतराच्या प्रश्नाने आमचे डोळे उघडले आहेत. आम्ही आता सावध झालो असल्यामुळे तुमच्या बाबतीतल्या कर्तव्यात आता आम्ही चुकणार नाही म्हणून तुम्ही धर्मांतराची चळवळ परत घ्या. ” परंतु आतापर्यंत मी जे बोललो त्या कारणासाठीच मला चळवळ परत घ्यावयाची नाही. तुम्ही पूर्ण विचार करा. दुसरा धर्म स्वीकारावयाचा तो पूर्ण तावून सुलाखूनच स्वीकारला पाहिजे. मला आशा आहे की, यापुढे महार जातीतील सर्व लोक महार परिषदेने केलेल्या ठरावाप्रमाणेच वागतील.
🔹🔹🔹
डॉ. बाबासाहेबांचे भाषण झाल्यावर आभार प्रदर्शन, हारतुरे होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयजयकारात सभा संपली.
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर