पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पतियाळा येथील जाहीर सभेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….
पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंजाबात धावता दौरा काढला होता. या दौऱ्यावर असतांना दिनांक २९ ऑक्टोबर १९५१ रोजी पतियाळात बाबासाहेबांचे जंगी स्वागत झाले. त्यावेळी श्री. बापूसाहेब राजभोज, शेठ किसनदास, श्री. सुलेख, श्री. मिहानसिंग हे पंजाब मधील दलित फेडरेशनचे प्रमुख पुढारी हजर होते.
पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच्या दौऱ्यात पतियाळा येथील जाहीर सभेत केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
भगिनींनो आणि बंधुंनो,
माझी तब्येत ठीक नाही हे श्री. राजभोज यांनी आपणास सांगितलेच आहे. मी थोडक्यात माझ्या पक्षाची भूमिका स्पष्ट करतो आणि कोणत्या गोष्टींना या राजकारणाच्या आखाड्यात उतरले असताना कसे तोंड दिले पाहिजे ते सांगतो.
अस्पृश्यांवर अत्याचार करण्याच्या व त्यांच्या महत्त्वाकांक्षेला खो घालण्याच्या प्रथेस कॉंग्रेस व सवर्ण हिंदुंनी वेळीच आळा घातला नाही तर आम्हास त्यांचा बिमोड करण्यासाठी वेगळाच मार्ग अवलंबिणे भाग पडेल. कॉंग्रेसने आपले धोरण वेळीच बदलले पाहिजे. अस्पृश्यांना पोषक असेच ते असले पाहिजे.
ही निवडणुकीची वेळ आहे. यातच देशातील सारे पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते गुंतले आहेत. निवडणूक ही महत्त्वाची गोष्ट आहे यात शंका नाही. निदान आम्हाला तरी येती निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची म्हणजे जीवन-मरणाची बाब वाटते. यासाठी या प्रश्नाचा संपूर्ण खल होणे व त्यावर योग्य तो तोडगा काढणे अत्यंत आवश्यक आहे.
काँग्रेस हा मोठ्यात मोठा राजकीय पक्ष आहे. हा पक्ष आज साठ वर्षे टिकून आहे. शिवाय आज तो अधिकारारूढ झालेला आहे. चार वर्षे या पक्षाने राज्योपभोग घेतला आहे. लोकांना या पक्षाकडून दिमाखाने असे सांगण्यात येते की, काँग्रेस शिवाय लोकांचे व देशाचे कुणी भले करू शकणार नाही, त्यासाठी काँग्रेसलाच मतदान केले पाहिजे. काँग्रेसला अधिकार योग परत हवा आहे. यासाठी गरीब लोकांना पिळून खाणाऱ्या काँग्रेसला या लोकांनी निवडून दिले पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. कॉंग्रेसकडे भाडोत्री प्रचारक पुष्कळ आहेत व या पक्षाकडे चिक्कार पैसा असल्यामुळे ते पोसले जातात. त्यामुळे कॉंग्रेस लोकांवर वजन आणू शकते.
यासाठी कॉंग्रेसमध्ये खरा प्रकार काय आहे याचा शोध लावला पाहिजे. एकतर्फी प्रचारामुळे कुणाची दिशाभूल होता कामा नये. अन्न-धान्य व कपड्यांचा प्रश्न काँग्रेस सोडवू शकली नाही हे आपणा सर्वांस माहित आहे. उलट ती एक बिकट बाब होऊन बसली आहे.
निर्वासितांचे प्रश्न सुद्धा अधिकारारूढ असलेली काँग्रेस सोडवू शकली नाही. मग ही कॉंग्रेस परत अधिकारारूढ झाली तर हे निकडीचे प्रश्न कसे सोडवील ? आपली नालायकी तर चार वर्षाच्या राज्यकारभारात सिद्ध करून दाखविली आहे. थोडक्या वेळात एवढे महत्त्वाचे प्रश्न सोडविणे अशक्य होते अशी सबब काँग्रेस सांगेल. तरी पण काँग्रेसच्या मध्यवर्ती व प्रांतिक सरकारांवर हुकूमत गाजविणाऱ्या काँग्रेस हायकमांडने निदान देशाला वशिलेबाजी, लाचलुचपत, नैतिक र्हास या तीन महान रोगांपासून मुक्त केले पाहिजे होते. काँग्रेसच्या मनात असते तर ती या गोष्टींचा नायनाट करू शकली असती. पण ह्या विषाचा अंमल काँग्रेस राजकारणात इतका भिनला आहे की, त्याचे निर्मूलन होणे शक्य नाही, शिवाय लहानापासून थोरांपर्यंत सारे एकाच माळेचे मणी बनले आहेत.
काँग्रेस मंत्रिमंडळाकडून आपले काही कामकाज करून घ्यावयाचे असेल तर लाच ही लावलीच पाहिजे, नाहीतर अशांचा अर्ज फेटाळला गेला म्हणून समजा. हे आरोप मी करीत नाही. खुद्द काँग्रेसच्या गोटातून केले जातात व वशिलेबाजी, लाचलुचपत आणि काळाबाजारातील काही भाग कॉंग्रेस मंत्रिमंडळ घेते असे उघड बोलले जाते.
मद्रासचे प्रमुख मंत्री श्री. टी. प्रकाशन यांना कॉंग्रेसमधील असल्याच अंतर्गत भानगडीमुळे राजीनामा देणे भाग पडले. राजीनामा दिल्यावर त्यांनी काँग्रेस हायकमांडपुढे मद्रासमधील सहकारी मंत्र्यांवर गंभीर आरोप ठेवले. त्यात स्पष्ट म्हटले होते की, काही मंत्र्यांनी नियंत्रणांचा फायदा घेऊन स्वतःची झोळी भरली. शिवाय सरकारी पैशाचा स्वतःच्या खाजगी कामाकरता उपयोग केला गेला. काहींनी आपल्या नातेवाईकांना सरकारी कामे दिली. उत्तर प्रदेशात सुद्धा असाच प्रकार झाला. एककाळ प्रांतिक कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री. त्रिलोकसिंग व आता यु. पी. असेंब्लीमधील विरुद्ध गटाचे पुढारी यांनी पण कॉंग्रेस मंत्र्याविरुद्ध असेच आरोप केले होते. पंजाबमध्ये दोन माजी प्रमुख मंत्री एकमेकांवर वशिलेबाजीचा, अनितीचा उघड आरोप करीत आहेत.
वास्तविक कॉंग्रेस हायकमांडने एक चौकशी कमिशन नेमून या आरोपांची कसून चौकशी केली पाहिजे व गुन्हेगारांना शासन केले पाहिजे. अशी चौकशी केल्याशिवाय चांगले सरकार अस्तित्वात आहे असे म्हणता येत नाही कारण खुद्द मंत्र्यांवर असे गंभीर आरोप आहेत. याबाबतीत अशाच एका ब्रिटिश मंत्र्याच्या बाबतीत घडलेल्या घटनेचा उल्लेख करणे जरूर आहे. एका मंत्र्यावर लाचलुचपतीचा आरोप होता. मजूर प्रमुख मंत्री मि. ॲटली यांनी लगेच चौकशी कमिशन नेमले. चौकशीअंती असे दिसून आले की, एका व्यापाऱ्याने त्या मंत्र्याला नाताळात एक व्हीस्कीची बाटली व काही कापड दिले होते. दोघांचा उद्देश देवघेवीचा नव्हता. बाब क्षुल्लक होती पण ॲटलींनी त्यास मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले.
पण आपल्या देशात काय परिस्थिती आहे पहा ! वेगवेगळ्या प्रांतांतील जवळ जवळ पंचवीस मंत्र्यावर गंभीर आरोप केले गेले आहेत पण कॉंग्रेस हायकमांडने याकडे बुद्धिपुरःसर दुर्लक्ष केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्यावरील आरोपांची चौकशी न होता ते मंत्री बिनबोभाट आपला अनागोंदी कारभार करीत आहेत व अशांच्या हाती आपल्या देशाचे भवितव्य आहे ! सांगा, अशा मंत्र्यांबद्दल आणि काँग्रेसबद्दल विश्वास कसा बरे निर्माण होईल ? सांगा, स्वाभिमानी व नीतीमान पुरुष अशा चोरांबरोबर सहमत कसे होतील की जे उघड लोकांना लुबाडीत आहेत. मी तर स्पष्ट सांगतो की, कॉंग्रेस सरकार हे आचारभ्रष्ट (Corrupt) सरकार आहे. ते चोरांचे सरकार आहे.
पंडित नेहरू हे अशा बदमाश मंत्र्यांच्या कारभाराकडे लक्ष घालतील अशी लोकांची अपेक्षा होती पण त्यांनी आपल्या अनुयायांची मोठी निराशा केली. उलट दिल्लीमध्ये काँग्रेसचे अधिवेशन भरले तेव्हा त्यात इतर देशात लाचलुचपतीचे प्रकार फार मोठ्या प्रमाणात होतात, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे जे मुरब्बी प्रतिष्ठित चोर आहेत त्यांना फावते व जे पक्के चोर होण्याची टंगळ मंगळ करतात, त्यांनाही धीर येतो. जे अशी लाचलुचपत घेऊन गबर होत आहेत, असे मंत्री पंडित जवाहरलाल नेहरू आपले नेते आहेत म्हणून खूष असतील कारण अशा गुन्ह्यांबद्दल शिक्षा न करता त्यांना माफ करणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे पंडितजी आपला धर्म समजतात. ज्यांना असल्या गोष्टी करण्याची शरम वाटत नाही ते देशाचे कधी हित करतील काय ?
जे यापुढे कॉंग्रेसला मते देतील ते अशा गोष्टी चालू राहाव्यात म्हणूनच मते देतील, पण भारतीयांना चांगले कोणते व वाईट कोणते हे ओळखण्याची पात्रता आली आहे.
काँग्रेसचे लोक इतरांना आपापले पक्ष सोडा आणि कॉंग्रेसला मिळा असा आदेश देतात कारण त्यांच्या मते काँग्रेसच देशाचे भले करणार आहे. मी तुम्हाला विचारतो की, मांजर आणि उंदीर एकत्र राहू शकतील का ? साप आणि मुंगूस यांची मैत्री जुळेल का ? ते एक दुसऱ्याचा सत्यानाशच करतील. अशी कित्येक उदाहरणे प्राणिमात्रात आढळतात. माणसामाणसात सुद्धा हाच प्रकार आहे. देशात अशी काही माणसे व विशिष्ट गट आहेत की ज्यांचे कार्य परस्पर विरोधी आहे. शेतकऱ्यांना पिळणारे बनिया आणि शेतकरी हे शांततेने एकत्र नांदतील का ? तशीच स्थिती ब्राह्मण व अस्पृश्यांची आहे. ब्राह्मण वर्ग अस्पृश्यांना नेहमीच डांबून ठेवणार. तो त्यांना कधीच वर येऊ देणार नाही.
अस्पृश्यांना साधे माणुसकीचे जीवन ब्राह्मणवर्ग जगू देत नाही. मग असा पक्ष की, ज्यात अत्याचार करणारे व अत्याचार ज्यांचेवर होतो ते, तसेच लोकांना पिळून खाणारे व जे लोक अशा खाईत पडतात ते या परस्पर विरूद्ध लोकांचा एक पक्ष कसा होऊ शकेल ? ज्या पक्षात अत्याचारी व स्वार्थी लोकांचे प्रतिष्ठित स्थान आहे अशा पक्षाकडून गरीब व अत्याचाराने पिडलेल्या लोकांचे कल्याण काय होणार, कपाळ !
म्हणून अशा अत्याचारापासून गांजलेल्या लोकांची एक प्रचंड विरोधी संघटना असणे ही एक महत्वाची बाब आहे. नाहीतर लोकांच्या सुखाच्या साऱ्या आशांचे हे अधिक निर्मूलन करतील. कॉंग्रेसच्या सापळ्यात, त्यांच्या गोड हुलकावणीने पडू नका. स्वतःच्या पायावर धोंडा घालून घेतल्याचा तुम्हाला पश्चाताप होईल. अशा पक्षात सामील होणे म्हणजे परंपरेने चालत आलेल्या अत्याचारांना आपण होऊन बळी देणे होय.
अशाने देशाला मिळालेले स्वातंत्र्य फक्त सवर्णीय हिंदूच उपभोगतील. जर स्वातंत्र्याचा उपयोग आपणास हवा असेल, जर आपणास आपली भरीव संघटना करावयाची असेल तर दलित फेडरेशन मजबूत करणे हा एकच मार्ग आहे.
काँग्रेसच्या हरिजन मंत्र्यांनी आजच्या सभेला हजर राहू नका असा लोकात जातीने प्रचार केला होता. जर आमच्या फेडरेशनने अस्पृश्यांच्या हितासाठी लढा दिला नसता तर आज हे हरिजन मंत्री कुठे असते ? यांना मंत्री कुणी केले ? मी केले असे स्पष्ट सांगतो. फेडरेशनने मंत्री केले असे ठासून सांगतो. फेडरेशनने लढा दिला नसता तर आज या हरिजन मंत्र्यांना लाजिरवाण्या जिण्याने जगावे लागले असते. या हरिजन मंत्र्यांनी कधी अत्याचार झालेल्या आपल्या आई-बहिणींच्या डोळ्यांतील कारुण्यपूर्ण अश्रू पुसले आहेत का ? त्यांच्या गरजांकडे कधी आस्थापूर्वक लक्ष पुरविले आहे काय ? त्यांना माणुसकीचे जीवन जगता यावे म्हणून धडपड केली आहे का ? या काँग्रेसधार्जिण्या मंत्र्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ साधला, म्हणून राज्यकारभार हाकण्यात आम्हाला आमचीच माणसे हवीत की, जी आपल्या बांधवांवर झालेल्या अत्याचाराचा जाब विचारून त्यांच्या जीवनात सौख्य आणतील व आपले हक्क प्राणाचे बलिदान करून सुद्धा मिळवतील अशाच माणसांना निवडून देणे रास्त आहे. अशा माणसांना लोकसभेत व प्रांतिक राज्यातील असेंब्लीत निवडून दिले पाहिजे की जे स्वतःची बुद्धी गहाण ठेवून वागणार नाहीत. अस्पृश्यांच्या दुःखांना जे वाचा फोडतील अशीच माणसे अशा लोकसभेत योग्य कामे करू शकतील. पेप्सु मधील आताचे अस्पृश्य मंत्री व सभासद हे काँग्रेसचे गुलाम आहेत. ते कुत्र्याप्रमाणे आपल्या धन्याचे पाय चाटीत आहेत ! हे आपल्या बांधवांसाठी काय करणार, कपाळ !
मी काँग्रेसला मिळावे म्हणून माझ्यावर वजन टाकण्यात येत होते. पण जो पक्ष माझ्या अस्पृश्य बांधवांचे कधीच भले करू शकणार नाही त्या पक्षात शिरून मी त्यांचा मिंधा होऊ ? ते कधीच शक्य नाही म्हणून मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मला कुणी राजीनामा देण्यास सांगितले नाही किंवा काही भानगडीमुळे तो मी दिला नाही. वशिलेबाजी, लाचलुचपतीच्या फंद्यात मी कधीच पडलो नाही. अशा पक्षाच्या सरकारात आपणाला प्रामाणिकपणे जनतेची सेवा करता येणार नाही हे जेव्हा मला पुरेपूर कळून चुकले तेव्हा राजीनामा देण्याचा मी मार्ग पत्करला, ते योग्य झाले.
अजूनही आम्हाला वाटते की, आमच्या सवर्णीय हिंदुंनी आमच्या उद्धारासाठी आपल्या अधिकाराचा उपयोग करावा, आम्ही आणखी दहा वर्षे वाट पाहू आणि मग जर आम्हाला कळून चुकलं की यात काही शहाणपणा नाही तर आमच्या हक्कासाठी जे काही अन्य मार्ग आम्हाला पत्करावेसे वाटतील ते जरुर पत्करू.
देशाच्या आपत्तीच्या प्रसंगी आम्ही आघाडीवर राहू. वास्तविक देशासाठी आम्ही खपतो, सवर्ण हिंदू नाही. ते देशाच्या व लोकांच्या नावावर स्वतः मलिदा खात आहेत, हा तर नेहमीचा अनुभव आहे. जेव्हा सैन्य भरतीचा प्रश्न निघतो तेव्हा अस्पृश्य प्रथम पुढाकार घेतो व नावे नोंदवितो. सवर्ण हिंदू लोक फक्त अशा कॅम्पच्या आसपास दुकाने मांडून बसतात. कॉन्ट्रॅक्ट मिळवतात व देशाला आणि लोकांना लूटतात.
गेली दोन तपे मी अस्पृश्यांच्या हक्कांसाठी सारखा लढा देत आलो आहे. यात माझा स्वार्थ नाही. मी गांधी समोर एक साधा प्रश्न टाकला होता.
” देशाच्या स्वातंत्र्याविरुद्ध आम्ही नाही, पण अशा स्वतंत्र भारतात अस्पृश्यांचे स्थान कोणते ? ” पण या प्रश्नाचे उत्तर गांधी किंवा इतर कुणीही समाधानकारकरित्या देऊ शकले नाही. हाच नेमका प्रश्न मी सवर्ण हिंदुंना विचारीत आहे.
आजचे स्वराज्य हे त्यांचे स्वराज्य आहे. आम्ही अजून गुलामच आहोत. सवर्ण हिंदुंच्या अत्याचारांचे हे फळ आहे. हा आमचा गुन्हा नाही. जर आम्हाला माणसात यावयाचे असेल तर आम्हाला आमच्याच पायावर उभे राहिले पाहिजे, हे अस्पृश्य बंधुंनी पक्के ध्यानात ठेवावे.
सवर्ण हिंदुंना आम्ही मिळविलेल्या आमच्या राजकीय हक्कांची अंमलबजावणी करू देण्यास अडथळा करू नका म्हणून सुचवतो. पण कॉंग्रेस आमच्या जमातीतील निमकहराम माणसांना वाव देते व भेद करायला सांगते. हे निवडणुकीचे तिकीट पदरात पाडू पहाणारे स्वार्थी व ढोंगी लोक आहेत. प्रथम ते काँग्रेसकडे जातात. तेथून कंबरेत लाथ बसली की फेडरेशनकडे निवडणुकीच्या तिकीटांची भीक मागायला येतात ! अशामुळे काँग्रेसला आम्ही मिळविलेल्या हक्कांची पायमल्ली करावयाची आहे. म्हणून आताच सावध राहिले पाहिजे व दमदार लढा दिला पाहिजे. निवडणुकीत आमचेच उमेदवार आम्ही निवडून दिले पाहिजेत. यात आम्ही अपयशी ठरलो तर आमचा सत्यानाश झाला असे समजा.
अस्पृश्यांसाठी ज्या राखीव जागा आहेत, त्या फक्त दहा वर्षांसाठी आम्ही मिळवू शकलो. जर एवढ्या काळात आम्ही आमची प्रचंड संघटना करू शकलो नाही तर आमचा घात ठरलेलाच म्हणून समजा. आज वेगवेगळ्या पक्षातील सवर्णीय हिंदू तुम्हाला निवडणुकीच्या तिकीटांचे आमिष दाखवून आपला पक्ष मजबूत करीत आहेत.
पण या दहा वर्षांच्या काळानंतर ते तुमच्याकडे ढुंकून पण पाहणार नाहीत, याची सावधगिरी आता बाळगली पाहिजे व उद्यासाठी आज आपल्या इमारतीचा पाया मजबूत घातला पाहिजे. तुमचाच प्रतिनिधी तुमच्या हक्कांसाठी लोकसभेत झगडू शकेल व तो प्राण गेला तरी मागे हटणार नाही.
आपण अल्पसंख्यांक आहोत ही पण गोष्ट ध्यानात असू द्या. आपली मतदानाची संख्या पण कमी आहे. प्रत्येकाने मतदान करणे ही गोष्ट महत्त्वाची आहे. मतदानाचा हक्क, निवडणुकीच्या दिवशी साऱ्या स्त्री-पुरुषांनी, आपले कितीही महत्त्वाचे काम असले तरी ते बाजूस सोडून बजावले पाहिजे.
जर आम्ही आमच्या तत्त्वाशी सहमत असणाऱ्या पक्षाशी हातमिळवणी केली तर निवडणुकीत आम्हास दुप्पट यश मिळेल. पण अजून अशा कोणत्या पक्षाला सहाय्य करायचे ते निश्चित झालेले नाही. पण जेव्हा असे निश्चित झाले की, त्या पक्षाच्या उमेदवारांनाही मतदान देणे आपणा साऱ्यांचे कर्तव्य ठरेल.
यंदा बरेचसे यश आपल्या पदरात पडेल असे खात्रीने वाटते. कॉंग्रेसची मजबुती आता ढासळली आहे. पंजाबमध्ये दोन कॉंग्रेस गटात लाथाळी सुरू आहे. त्यांच्यात ऐक्य होणे अशक्य आहे. आम्ही काँग्रेसला डरता कामा नये.
म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की, देशात फेडरेशनने उभ्या केलेल्या मतदारांनाच आपली मते द्या. जर आम्ही या लढ्यात यशस्वी झालो तर अनेक भरीव सुधारणा घडवून आणू व आमच्या हक्काआड येणाऱ्या गोष्टींना मूठमाती देऊ.
🔹🔹🔹
✍️ संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर