मुंबई येथील बहिष्कृत वर्गाच्या जाहीर सभेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….
मुंबई येथे शनिवार दिनांक २९ जून १९२९ रोजी रात्री ७ वाजता परळच्या दामोदर हॉलमध्ये रावबहादूर बोले, जे. पी. यांच्या अध्यक्षतेखाली बहिष्कृत वर्गाची जंगी जाहीर सभा भरली होती. सभेस बहिष्कृत वर्गातील अलोट जनसमुदाय जमला होता. व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत मे. डॉ. सोळंकी, मे. शिवतरकर, मे. द. वि. प्रधान, भा. र. कद्रेकर, रा. गुप्ते, ति. गायकवाड, ति. आडरेकर, ति. जाधव, इत्यादि मंडळी होती. ति. गायकवाड यांनी अध्यक्षस्थान स्वीकारण्याची सूचना मांडली व तीस रा. वालावलकर यांनी अनुमोदन दिल्यानंतर नियोजित अध्यक्ष रावबहादूर बोले, जे. पी. हे टाळ्यांच्या कडकडाटात अध्यक्षस्थानी स्थानापन्न झाले.
त्यानंतर अध्यक्षांचे प्रास्ताविक भाषण होऊन, सभेत खालीलप्रमाणे ठराव पास करण्यात आले :—
ठराव क्र. १ — कोकण भागातील विशेषतः चिपळूण, खेड व दापोली तालुक्यातील बहिष्कृत वर्ग आपल्या उन्नतीचा मार्ग आक्रमण करीत असता सोवळ्या हिंदू लोकांकडून त्यांचा अनन्वित छळ होत आहे, या त्यांच्या अधम कृतीबद्दल ही सभा त्यांचा तीव्र निषेध करून आपला संताप व्यक्त करीत आहे आणि वरील गाऱ्हाण्यांची दाद लावून घेण्याकरिता अस्पृश्य पुढाऱ्यांचे एक शिष्टमंडळ नेक नामदार गव्हर्नरसाहेब यांजकडे पाठविण्याची परवानगी देत आहे.
ठराव क्र. २ — कोकणातील बहिष्कृत वर्गाचे हितसंरक्षणाकरिता एक ” कोकण संरक्षक फंड ” उभारण्यात यावा अशी या सभेची सूचना आहे.
ठराव क्र. ३ — बहिष्कृत वर्गातील श्री. चां. भ. खैरमोडे आणि रा. गाडेकर हे दोन विद्यार्थी चालू सालच्या बी. ए. च्या परीक्षेत व रा. कदम हा मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल ही सभा त्यांचे अभिनंदन करीत आहे.
ठराव क्र. ४ — डॉ. पी. जी. सोळंकी, एम. एल्. सी. यांची सरकारने मुंबई म्युनिसीपालिटीमध्ये निवड केल्याबद्दल ही सभा डॉक्टर साहेबांचे अभिनंदन करिते व योग्य नेमणूक झाल्याबद्दल संतोष व्यक्त करिते.
शेवटी लोकाग्रहास्तव आणि अध्यक्षांच्या इच्छेकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलावयास उभे राहिले.
याप्रसंगी बोलतांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
आजच्यासारख्या आणीबाणीच्या प्रसंगी आपण सर्व अस्पृश्यांनी सुसंघटीत झाले पाहिजे. मोठ्या दुःखाची गोष्ट ही की, आपल्यातील काही लोक ‘ महार-महारेतर ‘ हा वाद माजवितात ! महार जरी महाडच्या चवदार तळ्याकरिता आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी झगडले आणि त्यांनी तो तलाव आपलासा करून घेतला तरी त्या तळ्यातील पाणी चांभारांना आणि मांगांना देखील पिता येईल ! तरी आपण सर्वांनी एक झाल्याखेरीज आपला निभाव लागणार नाही ! इतकेच नव्हे तर आपल्या संस्थेतर्फे ह्या इलाख्यात जी जी बोर्डिंग्ज चालू आहेत त्यात कसल्याही प्रकारचा भेदभाव नसून, वाटेल त्या जातीतील अस्पृश्य मुलास त्यात आपला समावेश करून घेता येतो, त्याप्रमाणे बहुतेक सर्व जातीतील मुले त्या बोर्डींगात आहेत.
स्वतःच्या स्वार्थासाठी काही चांभार मंडळी उगाच महारांविरुद्ध डांगोरा पिटून आपणास धन्य मानून घेत आहेत. वास्तविक आमची चळवळ ज्या धर्तीवर चाललेली आहे ; तीजपासून महाराष्ट्रातील इतर चळवळीच्या प्रमुख लोकांनी धडा घ्यावयास पाहिजे. पुणे, सोलापूर येथील म्युनिसीपालिटीच्या निवडणुकीत ह्या दोन्ही ठिकाणी मी स्वतः खटपट करून महार उमेदवारांस आपली नावे परत घ्यावयास लाविली व ह्या दोन्हीही म्युनिसीपालिट्यांमध्ये अस्पृश्यांतर्फे फक्त चांभार मंडळीच निवडून जाऊ दिली. ह्यावरून हे कोणाच्याही लक्षात येईल की, आम्ही अस्पृश्य तेवढा एक समजतो, मग त्यात जाती अगर प्रांतावरून भेदाभेद पाडून घेण्याची आम्हास काही जरूर लागत नाही कारण परिस्थितीचा वरवंटा सर्वांवर थोड्याबहुत प्रमाणावर सारखाच फिरत आहे.
🔹🔹🔹
शेवटी अध्यक्षांचे आभार मानल्यावर हारतुरे झाल्यावर सभा बरखास्त झाली.
***
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर