November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

आपण धडा घालून दिला पाहिजे की, आपण कोणाहीपेक्षा कमी नाही – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

महाड येथे दिनांक २५ डिसेंबर १९२७ पासून सुरू होणाऱ्या सत्याग्रहाबद्दलच्या पहिल्या जाहीर सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण….

महाड येथे दिनांक २५ डिसेंबर १९२७ पासून सुरू होणाऱ्या सत्याग्रहाबद्दल मुंबईच्या एल्फिन्स्टन रोडवरील डेव्हिड मिलच्या चाळीच्या कंपाऊंडमध्ये शनिवार दिनांक ७ सप्टेंबर १९२७ रोजी रात्री ९ वाजता पहिली प्रचंड जाहीर सभा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. सभेच्या सुरूवातीस मेसर्स गणपत जाधव, धोंडीराम गायकवाड, साळुंके बुवा, शिवतरकर मास्तर यांची *सत्याग्रह का करावा* याबद्दल भाषणे झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अगदी सोप्या भाषेत अध्यक्षीय भाषण झाले.

महाडच्या सत्याग्रहाबद्दलच्या पहिल्या जाहीर सभेत केलेल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना आपण सत्याग्रह का करावा हे अगदी सोप्या भाषेत सांगितले.

महाडचा सत्याग्रह का करावा याबाबत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
सद्गृहस्थहो,
आपण सत्याग्रह का करावा या संबंधाने आपणास आता माझ्यापूर्वीच्या वक्त्यांनी सांगितले आहेच. अस्पृश्यता हा आपल्यावरील कलंक नव्हे पण आपल्या आईबहिणीवरील कलंक आहे कारण जे लोक आपणा स्वतःला स्पृश्य समजतात त्यांना असे वाटते की, माझी आई ही अस्पृश्य मनुष्याला जन्म देणाऱ्याच्या आईपेक्षा श्रेष्ठ आहे. परंतु खरे पाहू गेले असता असे आहे की, दरेक स्त्री नऊ महिन्यांनीच प्रसवत असते. तेव्हा कोणतीही स्त्री दुसऱ्या स्त्रीपेक्षा श्रेष्ठ नाही. म्हणून जो दुसऱ्याला आपणापेक्षा कमी समजतो त्याला आपण योग्य धडा घालून दिला पाहिजे की, मी कोणापेक्षाही कमी नाही. मनुष्य म्हटला की त्याचा धर्माच्या दृष्टीने हक्क सारखाच आहे. म्हणून आपणाला सत्याग्रह करून आपले हक्क प्रस्थापित केले पाहिजेत. या सत्याग्रहात ज्यांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी अवश्य घ्यावा, परंतु ज्यांना आपल्या कामधंद्याच्या अडचणीमुळे भाग घेता येणार नाही, त्यांनी फूल ना फुलाची पाकळी तरी द्रव्य रूपाने मदत करावी, अशी माझी आपणास विनंती आहे.

🔹🔹🔹

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणानंतर त्यांचे व आलेल्या मंडळीचे आभार मानल्यावर सभा बरखास्त झाली.

⚫⚫⚫

✍️ संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे