“चातुःवर्णाच्या घाण्याला बांधलेली जनावरे,
शोषित वेठबिगार,
चाकरीवंत गुलाम,
बळीच्या बक-याप्रमाणे मुकाट चितेवर जाणा-या सती
अन् बालपणीच केस कापून विद्रूप केलेल्या विधवा.”
इथल्या विषारी समाजव्यवस्थेचा बळी ठरलेली,
आपल्या उध्वस्त आयुष्याची सतराशे शहाण्णव ठिगळं सावरुन विझलेल्या डोळ्यांनी वाट पाहत होती ही माणसे,
विद्रोही वेदनांची आग ओकणा-या………
एका तळपत्या सूर्याची.
अन् ………….
या अंधारलेल्या दिशांतून बा ज्योतिबा………,
तू साकार झालास एका दिपमान प्रज्ञाज्योतीसारखा.
आपलं जाडंभरडं उपरणं सावरुन तू कंबर कसलीस…
अन्……..
मानवतेच्या राजमार्गात येणारे भिक्षुकशाहीचे विषारी काटे मुळासकट फेकून दिलेस तू.
दुनीयेने बहिष्कृत केलेल्या जिवांना तू जवळ केलेस,
अन्…………
वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या दिशाहीन तारुंना एक भरभक्कम किनारा मिळाला.
स्वतःचा माळी समाज कवटाळत न बसता…….
तू ‘सत्यशोधक समाज’ निर्माण केलास. त्याचवेळी……………,
आता दिशा उजाडत आहेत याची साक्ष पटली.
विसाव्या शतकात मंदिरे खुली होत नसताना,
अठराव्या शतकात तू आपला हौद खुला केलास.
त्याचवेळी मानवतेच्या लढ्यातला सेनापती म्हणून…
बा ज्योतिबा, तुला मी मनापासून सलाम केला.
तू धर्ममार्तडांची पिठे उध्वस्त करुन,
हातात शेतक-यांचा आसूड घेतलास
अन्…………
भविष्यकाळातल्या आंबेडकरांसाठी एक दैदिप्यमान दिपस्तंभ झालास.
आजकाल कुठलातरी नतद्रष्ट गांगल …..,
तू ओढलेल्या आसूडाचा वचपा काढण्यासाठी आपली बालीश जीभ सैल सोडू पाहत आहे.
पण बा !
आज प्रत्येक दलित, पिडीत, शोषित जीव
आपल्या ओशाळलेल्या आयुष्याला लाथ मारुन,
खंबीरपणे सूर्याच्या प्रदेशाकडे आगेकुच करीत आहे.
हे मुक्तीयुध्द असेच चालू राहील निरंतर,
उषःकाल होईपर्यंत.
म्हणूनच बा ज्योतिबा तू बेफिकीर रहा!
म्हणूनच बा ज्योतिबा तू बेफिकीर रहा!
– विवेक मोरे
मो. ८४५१९३२४१०
( क्रांतीबाच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या क्रांतिकारक स्मृतीस विनम्र अभिवादन!)
बा ज्योतिबा !

More Stories
बाबा तुम्ही नसतात तर
बुद्धपौर्णिमेचं चांदणं
रात्र ती वैरीण