बेटा, जेंव्हा तू मला विचारलस…. जयभीम म्हणजे काय?
तेंव्हा मला आठवली काबाडकष्ट करणारी माझी माय.
आता दु:खाची बोच लागली की तोंडातून जयभीम निघते,
आणि पायाला ठेच लागली की तोंडातून जयभीम निघते.
बेटा मला जर विचारलंस तर मी म्हणेन..
माय म्हणजे जयभीम आणि….
जयभीम म्हणजेच माय!
अंगावर धाऊन येतात वैरी अजस्त्र,
त्यांच्या हाती शस्त्र आणि आम्ही मात्र नि:शस्त्र.
आम्ही पाय रोऊन उभे राहतो त्यांच्या उमेदी कोसळून पडतात,
आम्ही फक्त जयभीम म्हणतो त्यांच्या समशेरी गळून पडतात.
बेटा, मला जर विचारलस तर मी म्हणेन..
समशेर म्हणजेच जयभीम आणि जयभीम म्हणजेच समशेर!
माणसाच्या रक्ताचा शिंपून सडा,
चि-यावरती चिरा केला होता खडा.
असा चिरेबंदी बांधला होता मन्याने…
चार माळ्याचा मजबूत वाडा.
मी फक्त जयभीम म्हटले…..,
आणि गेला ना तडा.
कोसळला ना मन्याचा ….,
वाडा धडाधडा.
बेटा मला जर विचारलस तर मी म्हणेन…
परमाणू बाँब म्हणजे जयभीम आणि
जयभीम म्हणजेच परमाणू बाँब.
✍🏻 विवेक मोरे
मो. ८४५१९३२४१०
More Stories
बाबा तुम्ही नसतात तर
बुद्धपौर्णिमेचं चांदणं
रात्र ती वैरीण