January 21, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

महाराष्ट्रातील बुद्ध लेणीं मध्ये राहणारे विविध भिक्खू संघ – एक अभ्यास

महाराष्ट्र मध्ये बुद्ध विचार रुजवण्याचे श्रेय जाते ते सम्राट अशोकाला. सम्राट अशोकाने इ.स.पूर्व २५० मध्ये पाटलीपुत्रमधे तिसरी धम्मसंगिती भरवली होती. या संगिती नंतर अशोकाने वेगवेगळ्या देशात बौद्ध आचार्य पाठविले. अपरान्त (उत्तर कोंकण) मध्ये योनक धम्मरक्खिता तर दक्खन मध्ये महाधम्मरक्खिता यांना पाठविले.

काही ग्रंथांनुसार, योनक धम्मरक्खिता यांनी लोकांमध्ये बुद्ध विचार सांगितल्यानंतर थोड्याच अवधीत अपरान्त प्रदेशात ३७,००० लोक बौद्ध उपासक झाले होते. महाराष्ट्र मध्ये बौद्ध भिक्खूंची संख्या वाढायला लागली आणि मग भिक्खूसंघासाठी जे लेणीं स्थापत्य सम्राट अशोकाने सुरु केले होते, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात अनेक बुद्ध लेणीं कोरण्यात आल्या आणि भिक्खूसंघाला दान देण्यात आल्या. या बुद्ध लेणींतील शिलालेखांवरून येथे कोणता भिक्खूसंघा प्रामुख्याने राहत होता हे लक्षात येते.

सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील या लेणीं समूहामध्ये भद्रायणीय, चेतिका, अपरसेलीय, महासांघिक आणि धर्मोत्तरीय या संघांची नावे खूप वेळा आढळतात. या संघांची थोडक्यात माहिती पाहू यात –
१. भद्रायणीय: हे नाव आपल्याला नाशिकच्या त्रिरश्मी लेणीं क्र.३ आणि कान्हेरी लेणीं क्र ३ आणि ५० मध्ये पाहायला मिळते. यांना काही शिलालेखांत भद्रावणीय, भदावनीय किंवा भद्रजानिज्जा असे म्हटले आहे. हा संघ मूळच्या थेरवाद परंपरेतील वज्जीपुत्त या शाखेतील आहे. आचार्य भद्रायण या संघाचे प्रमुख समजले जातात.

२. चेतिका: नाशिक येथील त्रिरश्मी लेणीं क्र. ८ मध्ये उल्लेख आहे. या संघाला चेतिकीय किंवा चेतियवाद असेही म्हटले जाते. चेतिका हे महासांघिक यांची शाखा आहे. हा संघ नावाप्रमाणेच चैत्य पूजक होता. यांचा प्रमुख, आचार्य महादेव हा डोंगरावर चैत्य तयार करून त्याची पूजा करायचा. चेतिका आणि लोकोत्तरवादी हे दोन्हीही संघ चैत्य पूजक होते. हा संघ दक्षिणेत आंध्रप्रदेश मध्ये प्रामुख्याने आढळत होता.

३. अपरसेलीय: कान्हेरी लेणीं क्र. ६५ मध्ये यांचा उल्लेख आहे. हा संघ महासंघिकांची एक शाखा म्हणून प्रसिद्ध होता. यांचा वावर आंध्रप्रदेशातील कृष्ण खोऱ्यात होता. धान्यकटक हे त्यांचे प्रमुख स्थान होय. एक मत असेही आहे कि सातवाहन राजांबरोबर हा संघ देखील प्रतिष्ठान (पैठण) येथे आला आणि तेथून संपूर्ण महाराष्ट्रभर यांचा वावर राहिला.

४. महासांघिक: सम्राट अशोकाच्या काळात भिक्खूसंघात अनेक गटतट पडले होते. मूळ थेरवाद संकल्पना ज्यांना मान्य होती अशा भिक्खूंना घेऊन अशोकाने तिसरी संगिती भरवली होती. ज्यांना थेरवाद मान्य होता पण काही मतभेद होते त्यांपैकी एक मोठा भिक्खू संघ तेथून बाहेर पडला आणि महासांघिक म्हणून त्यांनी एक परिषद भरवली. पुढे या संघाचे अनेक उपसंघ निर्माण झाले – सर्वास्तिवादी, काश्यपीय, धर्मगुप्तका, महिषासक, इत्यादी. कार्ले बुद्ध लेणींत यांचा उल्लेख आढळतो. हा संघ गांधार (सध्याचे अफगाणिस्तान), मथुरा, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने आढळत होता.

5. धर्मोत्तरीय: कार्ले बुद्ध लेणींत आणि जुन्नर येथील शिवनेरी लेणींत यांचा उल्लेख सापडतो. हा संघ थेरवाद परंपरेतील वज्जीपुत्तक या शाखेची उपशाखा आहे. याचे प्रमुख आचार्य धर्मोत्तर होते.

सर्वसाधारणपणे थेरवाद मधून वैभज्यवादी – भद्रावणीय – धर्मोत्तरीय ही एक शाखा तयार झाली आणि दुसऱ्या बाजूला थेरवाद – महासांघिक – चेतिका – अपरसेलीय ही एक शाखा तयार झाली. त्यांच्यात जरी अगदी थोडेच वैचारिक मतभेद होते तरी महाराष्ट्रातील बुद्ध लेणींमध्ये मात्र आपल्याला त्यांचा एकत्र वावर दिसतो. काही ठिकाणी एक लेणीं भद्रावणीय संघाला दान देण्यात आली होती तर दुसरी लेणीं चेतिका संघाला दान दिलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हे सर्व संघ एकत्र राहत याला पुष्टी मिळते. एवढेच नव्हे तर ज्या उपासकांनी ही लेणीं दान दिली त्यांच्याही मनात कुठली संघभेदाची भावना नव्हती. नंतरच्या काळात आपल्याला अनेक दानदात्यांनी लेणीं “चतुदिसस संघस” म्हणजे चारही दिशांच्या भिक्खूसंघाला दान दिल्याचे दिसते.

वैचारिक मतभेद जरी असले तरी हे सर्व संघ मूळ बुद्ध विचारला मानत आणि म्हणूनच त्यांनी या मतभेदाला बाजूला सारत, अनेक शतके एकत्र राहून बुद्ध विचारांचा प्रसार करीत राहिले.

आज “बौद्ध सांस्कृतिक वारसा” जतन करणारे जे अनेक गट तट आहेत ते यातुन काय धडा घेतील काय?

-अतुल भोसेकर, नाशिक (लेखक – ज्येष्ठ लेणी संशोधक आणि बौद्ध इतिहास अभ्यासक)

संकलन धम्ममित्र :- सुनिल कोबाळकर.
” श्रावस्ती ” बुध्द विहार वासिंद पुर्व

Various Bhikkhu Sanghas Living in Buddha Caves of Maharashtra – A Study