मुंबईतील एच. एम. आय. डॉकयार्डमधील अस्पृश्य कामगारांमार्फत १००१ रुपयांची थैली अर्पण करण्याच्या समारंभात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….
मुंबईतील एच. एम. आय. डॉकयार्डमधील अस्पृश्य कामगारांमार्फत मे. एस्. एस्. मोकळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक २७ मे १९४७ रोजी मुंबईतील सिद्धार्थ काॅलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १००१ रुपयांची थैली अर्पण करण्याचा समारंभ मोठ्या थाटात साजरा झाला. या समारंभास भाई ए. व्ही. चित्रे, मुंबई शहर शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी श्रीयुत भातनकर वगैरे प्रमुख मंडळी हजर होती.
प्रथम अध्यक्षांनी अस्पृश्य कामगार संघाने अस्पृश्य कामगारांसाठी आजपर्यंत काय काय केले ते सविस्तर सांगितले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना थैली अर्पण केली गेली. या समारंभास अडीच ते तीन हजार जनसमुदाय हजर होता.
याप्रसंगी उत्तरादाखल भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
आज माझा भाषण करण्याचा मुळी इरादाच नाही. कारण तुम्ही केलेल्या ह्या कार्याबद्दल मला फारसे समाधान वाटत नाही, परंतु रिवाजाप्रमाणे मला तुमचे आभार मानले पाहिजेत. गोदीमध्ये तीन ते चार हजार अस्पृश्य कामगार असून, फक्त एक हजार रुपयेच समाजकार्यासाठी जमावेत ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. गोदीमधील कामगारांना मी मजूरमंत्री असतानाच पाच-सहा वेळा पगारवाढ मिळालेली आहे. दारु पिणे, सिनेमा व नाटकासाठी पैशाची उधळपट्टी करणे वगैरे व्यसनासाठी तुम्हास हवा तेवढा पैसा मिळतो. पण समाजकार्यास हातभार लावतेसमयी तुम्ही आढेवेढे मात्र घेता. असो !
१९३४ साली मुसलमानांना शेकडा २५ टक्के हे प्रमाण सरकारी नोकऱ्यांमध्ये ठरवून दिले. त्यावेळी अस्पृश्यांना राखीव जागा नव्हत्या पण मी प्रांतिक आणि हिंदुस्थान सरकारशी मोठा झगडा ऊठवून अस्पृश्य वर्गास शेकडा आठपूर्णांक एकतृतीयांश सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधीत्व मिळवून दिले. पुढे १९४२ ते १९४५ अखेरपर्यंत मी मजूरमंत्री पदावर असताना अस्पृश्य वर्गास भरमसाठ नोकऱ्या मिळवून दिल्या. मी माझ्या जागेचा राजीनामा सादर करण्याच्या आदल्या दिवशीच मला समजले की हिंदुस्थान सरकारने अस्पृश्य वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात शेकडा बारापूर्णांक दोनतृतीयांश सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रमाण ठरवून दिले आहे. हे सर्व मी भांडून झगडूनच तुम्हास कायद्याने मिळवून दिले आहे. आता तुम्ही ते पदरात पाडून घ्यावयाचे आहे. त्यासाठी तुम्हास नेहमी संघटित राहिले पाहिजे. तुमची जर संघटना बळकट नसली तर सरकारने तुमच्यासाठी केलेल्या योजना कणवातच राहतील. म्हणून देशातील परिस्थितीकडे लक्ष देऊन अस्पृश्य कामगारांनी अस्पृश्य कामगार हितवर्धक संघाची संघटना अधिक बळकट केली पाहिजे. काँग्रेस, कम्युनिस्ट वगैरे कोणाच्याही थापेबाजीस बळी न पडता गोदीमधील अस्पृश्य कामगार संघाच्या प्रमुख लोकांच्या मार्गदर्शनाखालीच तुमचा लढा यशस्वी करा !
🔹🔹🔹
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण संपल्यानंतर श्रीयुत जी. के. भालेराव व श्री. एस्. बी. शेडवईकर वगैरे पुढाऱ्यांची प्रसंगोचित भाषणे झाली व जयभीमच्या जयजयकारात सभा विसर्जन पावली.
⚫⚫⚫
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर