दुसऱ्या राऊंड टेबल परिषदेला जाण्यापूर्वी अखिल अस्पृश्य मानलेल्या वर्गाकडून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना समारंभपूर्वक दिलेल्या निरोप प्रसंगी भगिनीवर्गाला उद्देशून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….
अखिल अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विलायतेला भरणाऱ्या दुसऱ्या राऊंड टेबल परिषदेला शनिवार दिनांक १५ ऑगस्ट १९३१ रोजी जाणार होते. त्यानिमित्ताने अखिल अस्पृश्य मानलेल्या वर्गाकडून शुक्रवार दिनांक १४ ऑगस्ट १९३१ रोजी कोटामधील सर कावसजी जहांगीर हॉलमध्ये डॉ. पी. जी. सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रेमाचा निरोप देण्याचा समारंभ साजरा करण्यात आला होता.
शुक्रवारी रात्री आठ वाजता प्रथम भगिनीवर्गातर्फे त्यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी अस्पृश्य मानलेल्या असंख्य भगिनीवर्गाच्या समुदायाने कावसजी हॉल फुलून गेला होता.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भगिनीवर्गातर्फे तसेच पुरुषवर्गातर्फे निरोप देण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यावेळी प्रथम भगिनीवर्गाला उद्देशून केलेले हे भाषण आहे. [ डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी याप्रसंगी पुरुषवर्गाला उद्देशून स्वतंत्र भाषण केले. ( पहा – लढा बिकट वाटला तरी पार पाडण्याची जबाबदारी आपलेपणाच्या नात्याने स्वीकारा – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ) ]
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती विशेष सुधारलेली नव्हती. तरी पण त्यांनी याप्रसंगी येऊन भगिनीवर्गाला निरोपादाखल उपदेश केला.
मुख्यतः भगिनीवर्गास आपल्या स्वावलंबी लढ्याची जाणीव करून देताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
आजपासून आपणास आपल्या उन्नतीसाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी विशेष जोमाच्या संघटनेने कार्याला लागले पाहिजे. आपल्या गळ्याभोवती स्पृश्य हिंदूंनी व सरकारने गुलामगिरीचा पाश घातला आहे. तो ताडकन तोडून आपले स्वातंत्र्य मिळविले पाहिजे. आमच्या स्त्रियांनी याकरिता आपल्या राहणीमध्ये व इतर व्यावहारिक गोष्टींमध्ये पुष्कळच सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत. अंगावरील कथल पितळेच्या दागिन्यांचा अगदी प्रथम त्याग करून टाकला पाहिजे. नेसण्यासवरण्यात स्पृश्य समाजाप्रमाणे जो प्रघात पडत आहे तोच कायम ठेवून आम्ही स्वावलंबनाने वाटेल ती क्रांती घडवून आणू हे इतर समाजाच्या नजरेस आणून दिले पाहिजे. तसेच पुरुषवर्गाच्या सहकार्याने आपले कार्य मोठ्या प्रमाणावर चालेल असे सहाय्य तुम्ही करावयास नेहमी तयार झाले पाहिजे. पुरुषवर्गाला त्यांच्या खऱ्या कर्तव्याची जाणीव करून द्यावयाची मोठी जबाबदारी तुमच्या शिरावर आहे. पुरुषवर्गाला व्यसनापासून व इतर विघातक कृत्यापासून अलिप्त ठेवण्याचे प्रयत्न तुम्ही करावयास पाहिजे. भावी पिढीला आजच्या गुलामगिरीचा मागमूसही दिसणार नाही अशी अलौकिक स्वार्थत्यागाची कामे अगदी निर्भयपणे तुम्ही करावयास सज्ज झालात की, माझ्या कार्याची जबाबदारी आपोआपच पार पाडल्याचे पुण्य तुमच्या पदरी पडेल.
🔹🔹🔹
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर