July 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

आदिवासी अजूनही रानटी युगातच आहेत. स्वातंत्र्याने त्यांच्या जीवनात बदल घडवून आणलेला नाही – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

वडसा ( जिल्हा चंद्रपूर ) येथे दिनांक २९ एप्रिल १९५४ रोजी भंडारा संसद पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण…..

वडसा ( जिल्हा चंद्रपूर ) येथे दिनांक २९ एप्रिल १९५४ रोजी आयोजित भंडारा संसद पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत बोलतांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
तुम्ही अस्पृश्यांसाठी काय केले ? या प्रश्नास उत्तर देताना या प्रचंड निवडणूक सभेत डॉ. आंबेडकर यांनी, तत्कालीन ब्रिटिश सरकारकडून अस्पृश्यांसाठी ज्या शैक्षणिक सोयी करवून घेतल्या त्यांचा उल्लेख केला व लेव्हिन कमिशननुसार परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी दर वर्षी पाठविण्यात यावयाच्या विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येच्या साडेबारा टक्के अस्पृश्य विद्यार्थी निवडले जावे अशी तरतूद केल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, ” हिंदुस्थानात अस्पृश्यांबाबत जी गोष्ट कधीही घडली नव्हती, ती आता घडत आहे. ती म्हणजे एकाच वर्षी एकदम १६ अस्पृश्य विद्यार्थी परदेशात पाठविले जाणार ही होय.

लोकशाहीत जो कोणी लोकांचा प्रतिनिधी म्हणून अधिकाराच्या व जबाबदारीच्या जागेवर स्थानापन्न होतो, त्याचे दोष उघडकीस आणून व त्यामुळे होणाऱ्या चुका टाळून पर्यायाने देशकल्याण करण्याचे कर्तव्य प्रत्येक नागरिकाने पार पाडले पाहिजे. त्यासाठी योग्य टीका करण्याचा हक्क प्रत्येक नागरिकास प्राप्त झाला आहे. नेहरू हे कोणी देवाचे अवतार नव्हेत. कुठल्याही जबाबदारीच्या व अधिकाराच्या स्थानावर असलेल्या माणसाचे दोषदिग्दर्शन करण्यासाठी मी टीका करीन. ” घटना परिषदेच्या वेळचे निरनिराळे अनुभव सांगताना डॉ. आंबेडकरांनी स्वतःचे राज्यशास्त्रविषयक ज्ञान किती सखोल आहे हे पटवून दिले व ‘ नेहरू व आंबेडकर यात राजा भोज कोण व गंग्या तेली कोण ‘ हे लोकांनी ओळखावे, असे सांगितले. काश्मीरविषयी ते म्हणाले, ” आपल्या पंतप्रधानांना हिंदुस्थानच्या भवितव्याऐवजी जर काश्मीरचाच मोह सुटला असेल, तर त्यांनी पंतप्रधानाची जागा रिकामी करून खुशाल काश्मीरचा राजा व्हावे. ”

शेवटी ते म्हणाले , ” आदिवासी अजूनही रानटी युगातच आहेत. त्यांच्या जीवनात कुठल्याही प्रकारचा बदल स्वातंत्र्याने घडवून आणलेला नाही. त्याचप्रमाणे सर्वोदयाची कल्पना ही मुक्तेश्वराने वर्णिलेल्या विश्वामित्राच्या सृष्टीची प्रतिकृतीच होय. ”

🔹🔹🔹

[ भंडारा येथे निवडणूक प्रचार सभेत जवळ जवळ दोन लाखाच्या वर हजर असलेल्या जनसमुदायास मार्गदर्शन करतांना दिनांक २१ एप्रिल १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शन करतांना सर्वोदयाच्या कल्पनेबद्दल आणि मुक्तेश्वराने वर्णिलेल्या विश्वामित्राच्या सृष्टीच्या प्रतिकृतीबद्दल सांगितले आहे की, ” सर्वोदय म्हणजे मला ढोंग वाटते. एक माणूस कसा सर्वोदय करू शकेल हे कळत नाही. व्यवहारात ‘ मात्स्य न्याय ‘ आहे. सर्वांचेच हित पाहिले पाहिजे. या म्हणण्यावर तुमचा विश्वास बसतो काय ? सर्वोदयाच्या अनुषंगाने मला विश्वामित्राची आठवण येते. विश्वामित्राने ब्रह्मदेवाशी स्पर्धा करून प्रतिसृष्टी निर्माण केली. तिचे वर्णन करताना मुक्तेश्वराने सांगितले आहे की, या विश्वामित्राच्या सृष्टीत जन्मजात हाडवैरी असलेले मुंगुस आणि साप प्रेमाने क्रीडा करीत होते, उदीर मांजरीचे दूध पीत होते व सिंह आणि हत्ती परस्पर प्रेमाने नांदत होते. वास्तविक हे असे घडणे शक्य नाही. पण कवी मुक्तेश्वराने पुढे सांगितले आहे की, हे सर्व कपटजाल होते. सर्वोदय मजुरांबरोबर श्रीमंतांचे हित पाहाणार असेल, त्यांना प्रेमाने एकत्र नांदवू इच्छित असेल तर ते कपटजाल आहे असेच म्हणावे लागेल.

🔹🔹🔹

(संदर्भ :–
आपला देश दोन राष्ट्रात विभागला आहे. एक वरच्या लोकांचे, दुसरे खालच्या लोकांचे. — भंडारा येथे निवडणूक प्रचार दौऱ्यात दिनांक २१ एप्रिल १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण.) ]

⚫⚫⚫

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे