काँग्रेस वर्किंग कमिटीने अंमलात आणलेल्या अत्यंत विघातक व कोणत्याही लोकशाही राष्ट्रात असम्मत ठरणाऱ्या तत्त्वांविरोधात मध्यप्रांताचे माजी मुख्यप्रधान डॉ. खरे लढवित असलेल्या मुख्यप्रधानाच्या हक्कांच्या लढ्याच्या अनुषंगाने केलेल्या त्यांच्या जाहीर सत्कार समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….
( काँग्रेस वर्किंग कमिटीने अंमलात आणलेल्या अत्यंत विघातक व कोणत्याही लोकशाही राष्ट्रात असम्मत ठरणाऱ्या तत्त्वांविरोधात, मध्यप्रांताचे माजी मुख्यप्रधान डॉ. खरे देत असलेल्या लढ्याच्या निमीत्ताने त्यांचा जाहीर सन्मान करून त्यांच्या
धोरणास पाठींबा देण्यासाठी ज्या जाहीर सभा व सत्कार समारंभ झाले, त्या समारंभापैकी डॉ. खरे यांच्या चाहत्यांनी दिनांक ४ ऑगस्ट १९३८ रोजी सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटीच्या दिवाणखान्यात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मेजवानी दिली होती. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विचारपरिलुप्त भाषण केले होते.
डॉ. खरे यांचा अशाच प्रकारचा हा दुसरा जाहीर सत्कार दिनांक ५ ऑगस्ट १९३८ रोजी श्री. जमनादास मेहता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत केला गेला.
या सत्कार समारंभातही डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिनांक ५ ऑगस्ट १९३८ चे हे भाषण समजून घेण्यासाठी प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदल्या दिवशी म्हणजेच दिनांक ४ ऑगस्ट १९३८ रोजी केलेले भाषण समजून घेणे अत्यावश्यक आहे. म्हणून डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी डाॅ. खरे यांच्या सत्कार समारंभात केलेले दिनांक ४ ऑगस्ट १९३८ रोजी केलेले अध्यक्षीय भाषण – ” महाराष्ट्रीयांची पीछेहाट का ? “ हे पहावे.
वाचकांना दिनांक ५ ऑगस्ट १९३८ च्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाचा अर्थ समजावा यासाठी डाॅ. बाबासाहेबांच्या दिनांक ४ ऑगस्ट १९३८ च्या इंग्रजीत केलेल्या अध्यक्षीय भाषणातील थोडासा भाग देत आहोत. परंतू वाचकांनी संबंधीत भाषण पूर्ण वाचावे ही विनंती.
दिनांक ४ ऑगस्ट १९३८ च्या आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
……….मी येथे आलो याचे कारण हेच की, मुख्यप्रधानाच्या हक्काचा लढा डॉ. खरे हे आज लढवीत आहेत. मुख्यप्रधानाचे हे हक्क मला जनतेच्या, मतदारांच्या व जबाबदार राज्यपद्धतीच्या दृष्टीने अत्यंत बहुमोलाचे वाटत आहेत आणि यासाठीच डॉ. खऱ्यांचे स्वागत करण्याकरिता मी येथे उपस्थित झालो आहे.
मुख्यप्रधान हा जबाबदार राज्यपद्धतीच्या कमानीतला खिळीचा दगड होय असे मी म्हटले होते तेच मला पुन्हा एकदा येथे फिरून सांगावेसे वाटते. माझ्या मते जबाबदार राज्यपद्धतीला दोन गोष्टींची मुख्य आवश्यकता असते. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या प्रतिनिधींच्या कृत्यावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवणारी जनता व दुसरी गोष्ट म्हणजे जनतेच्या मताचा कौल ज्यांनी घेतला नाही अशांना नव्हे, तर ज्यांनी हा कौल घेऊन स्वतःला निवडून दिले आहे अशांनाच फक्त जबाबदार राहणारा मुख्यप्रधान. मुख्यप्रधानाच्या कृत्याची रास्तारास्तता जोखण्यास जनता आपल्याकडे अखेरचा निर्णायक हक्क घेऊन बसलेली असते. तो हक्क तिचा आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीने आपला जो हक्क सांगितला आहे, त्यामुळे जबाबदार राज्यपद्धतीची माझ्या मते सारीपुरी विटंबनाच होत आहे !
काँग्रेस वर्किंग कमिटीने दोन तत्त्वे अंमलात आणली आहेत. ही तत्त्वे माझ्या मते अत्यंत विघातक व कोणत्याही लोकशाही राष्ट्रात असम्मत ठरणारी आहेत. वर्किंग कमिटीने पहिले तत्त्व असे सांगितलेले दिसत आहे की, मुख्य प्रधानाला आपल्या सहकाऱ्यांची निवड करण्याचा हक्क पोचत नसून हे त्याचे सहकारी मंत्री, मतदारांना अथवा कायदेमंडळाशी जबाबदार नसलेल्या अशा एखाद्या बाह्य संस्थेनेच निवडले पाहिजेत ! मंत्रिमंडळाच्या सामुदायिक जबाबदारीचे तत्त्व प्रस्थापित करून घेण्यासाठी गोलमेज परिषदेत आम्ही किती झगडलो आहोत याची, गृहस्थहो, तुम्हाला कल्पना नाही ! सायमन कमिशनने या बाबतीत आपल्या रिपोर्टात अशी शिफारस केली होती की, प्रांतातील राज्यपद्धती पूर्ण जबाबदारीची असावी असे जरी ठरविले असले आणि कायदा व सुव्यवस्था हे खाते जरी राखीव असू नये असे मान्य केले गेले, तरी ते खाते गव्हर्नरकडून नेमण्यात आलेल्या मंत्र्यांच्या बरोबरीने मंत्रिमंडळात समाविष्ट करावे. ही शिफारस हाणून पाडण्यासाठी साऱ्या हिंदी प्रतिनिधींनी एकजुटीने कसा झगडा केला याबद्दलची साक्ष येथे हजर असलेले डॉ. मुंजे हेही देऊ शकतील. सदर शिफारशीने सामुदायिक जबाबदारीचे तत्त्व नष्ट होऊन जाईल असे आमचे म्हणणे होते. सामुदायिक जबाबदारीचे हे तत्त्व मुख्यप्रधानाच्या राज्यघटनेतील स्थानावर अवलंबून आहे. मुख्यप्रधानाच्या स्थानाचे महत्त्व आहे ते येथेच. ह्या तत्त्वाच्या अंमलबजावणीसाठी दोन गोष्टींची जरुरी असते. ह्या विषयाचा मी थोडासा अधिक अभ्यास केला असल्याने अधिकारवाणीने बोलण्याचा थोडासा हक्क मला पोचू शकतो. सामुदायिक जबाबदारीच्या तत्त्वासाठी पहिली जी गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे मुख्यप्रधानाला आपले सहकारी निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. सामुदायिक जबाबदारीचे तत्त्व नांदवावयाचे असेल तर हा अधिकार इतर कोणालाही मिळता कामा नये. दुसरी आवश्यक गोष्ट ही की, एखादा मंत्री आपल्याला नको असेल तर त्याला घालवून देण्यास सांगण्याचा अधिकार मुख्यप्रधानाला असला पाहिजे. मुख्यप्रधानामुळे आपण अधिकारपदावर आरूढ झालो आहोत व आपल्याला अधिकारच्युत करणेही त्याच्याच हातात आहे, ह्या गोष्टी साऱ्या मंत्र्यांच्या मनावर बिंबवल्याखेरीज सामुदायिक जबाबदारीचे तत्त्व नांदणे कदापि शक्य होणार नाही. प्रत्येक मंत्र्याला ती जाणीव असेल तरच फक्त हे महत्त्वाचे तत्त्व चालू शकेल.
मंत्रीमंडळातील मंत्र्यांची निवड करण्याचा हक्क, अधिकार व काम मुख्यमंत्र्यांचे नसून तो अधिकार आपला आहे असे जे तत्त्व वर्किंग कमिटीने घालून दिले आहे ते सामुदायिक जबाबदारीच्या तत्त्वाला सर्वस्वी विसंगत असे तत्त्व आहे. दुसरा जो हक्क वर्किंग कमिटीने आपला म्हणून सांगितला आहे तो म्हणजे मंत्र्याच्या शासनाबाबतचा होय. एखाद्या मंत्र्याला शासन द्यावयाचे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार वर्किंग कमिटीसारख्या बाहेरच्या संस्थेला आहे असे तिचे म्हणणे आहे.
गृहस्थहो, आपल्याला हे ठाऊकच आहे की, जबाबदार राज्यपद्धतीचे मुख्य तत्त्व हेच की, ज्यांनी आपल्याला निवडून दिले, त्याखेरीज इतर कोणालाही मंत्र्याने जबाबदार राहावयाचे नसते. पण वर्किंग कमिटीने ह्या मतदारांना तर पुरेच धाब्यावर बसविले आहे.
मतदार म्हणजे कोणीच नव्हे अशीच वर्किंग कमिटीची वृत्ती दिसते. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे एखाद्या यःकश्चित् उंदराइतकीच वर्किंग कमिटीने मतदारांची किंमत केली आहे. एखाद्या ठराविक दिवशी त्याने यावे, ताकीद दिल्याप्रमाणे मत नोंदावे आणि मग लाथेच्या ठोकरीसरशी परत पिंजऱ्यात जाऊन पडावे एवढेच त्याचे काम. वर्किंग कमिटीने पुकारलेल्या तत्वांचा अर्थ हा असा आहे.
मुख्यप्रधानाच्या मूलभूत हक्कांसाठी डॉ. खरे भांडत आहेत म्हणूनच त्यांचे स्वागत मी करीत आहे आणि या त्यांच्या लढ्यात त्यांना सर्वांनी पाठिंबा देणे कर्तव्यच आहे……
संदर्भ – महाराष्ट्रीयांची पीछेहाट का ? )
मध्यप्रांताचे माजी मुख्यप्रधान डॉ. खरे यांचा जाहीर सन्मान करून त्यांच्या धोरणाला पाठिबा देण्यासाठी डॉ. खरे यांच्या चाहत्यांनी दिनांक ४ ऑगस्ट १९३८ रोजी सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटीच्या दिवाणखान्यात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली डाॅ. खरे यांचा सत्कार समारंभ पार पाडला.
अशाच प्रकारचा डॉ. खरे यांचा हा दुसरा जाहीर सत्कार दिनांक ५ ऑगस्ट १९३८ रोजी परळ येथे श्री. जमनादास मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक प्रचंड सभा भरवून करण्यात आला.
या सभेला सुरवात झाल्यावर प्रारंभी डॉ. खरे यांनी भाषण करून आपला झगडा व्यक्तीसाठी नसून लोकशाहीच्या तत्त्वासाठी आहे, हा मुद्दा स्पष्ट केला व मध्यप्रांतातील कारस्थानांचा पाढा वाचला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण करण्यास उठले.
दिनांक ५ ऑगस्ट १९३८ रोजी डॉ. खरे यांच्या सत्कार समारंभात केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
आजच्या प्रसंगी मला भाषण करण्याचे काही प्रयोजन आहे असे वाटत नाही. कालच सर्व्हंटस् ऑफ इंडिया सोसायटीच्या दिवाणखान्यामध्ये माझ्या अध्यक्षतेखाली एक सभा झाली. तीत माझे सर्व म्हणणे मी सांगितले होते. कालचे माझे भाषण इंग्रजीत झाले. परंतु मराठी वृत्तपत्रांचेही जासूद त्या वेळेला हजर होते. त्यांनी माझ्या भाषणाचा तरजुमा योग्य तोच दिला असेल असे मला वाटते.
मी काँग्रेसचा सभासद नाही हे तुम्हाला परिचित आहे. डॉ. खरे यांनी जी कहाणी सांगितली ती त्यांच्या भाऊबंदकीच्या वादापैकी एक आहे. मी अर्थातच तिऱ्हाईत आहे. या वादात मी का पडावे हा प्रश्न मला कोणी विचारला तर त्यात वावगे काही आहे असे मला म्हणता येणार नाही. माझ्या पक्षातील माणसांनी घरच्या भाकरी खाऊन या उचापती का करता असा प्रश्न करणे साहजिक आहे. म्हणूनच माझा आज भाषण करण्याचा अधिकार नाही. परंतु तिऱ्हाईत असलो तरीही व्यापक अर्थाने डॉ. खरे यांचा शेजारी आहे. एकाच वातावरणात आम्ही जीवन कंठीत आहोत. शेजारच्या घरी आग लागली म्हणजे माझे घर सुरक्षित आहे, त्याला आग लागली नाही म्हणून कोणी स्वस्थ बसत नाही. कारण एकदा आग लागली म्हणजे तिची धग कुणाला लागेल हे सांगता येणार नाही. शिवाय आपणास माहितच आहे की, मुंबई असेंब्लीमध्ये माझी स्थिती पिल्ले पंखाखाली घेऊन त्यांना ऊब देत बसणाऱ्या कोंबडीसारखी आहे. १०-१२ पोरे घेऊन मी असेंब्लीत विरोधी पक्षाला बसलेला असतो. ही मुले हळूहळू मोठी होतील. न जाणे, त्यांची संख्याही हळूहळू वाढेल व कोणी सांगावे मला देखील प्राईम मिनिस्टर होण्याचा योग येईल. डॉ. खरे यांच्यावर आलेल्या आपत्तीविषयी मी जर मुग्ध राहिलो, तर जी आपत्ती डॉ. खरे यांच्यावर आलेली आहे तीच कदाचित् माझ्यावर येणे शक्य आहे. पुढच्या काळाकडे लक्ष देऊन या वादात तिऱ्हाईत म्हणून स्वस्थ न बसता माझे म्हणणे काय आहे हे आपणापुढे मांडावे व डॉ. खऱ्यांशी मैत्री जोडावी असे मला वाटते आणि म्हणून आज मी बोलावयास उभा राहिलो आहे. तथापि या नाटकातील मुख्य पात्र डॉ. खरे रंगभूमीवर येऊन गेल्यावर माझ्यासारख्या दुसऱ्या पात्राच्या बोलण्यात काहीच स्वारस्य नाही, हे मी जाणून आहे.
डॉ. खरे यांच्यावर प्रसंग गुदरल्यानंतर ते आपल्या प्रांतात आले आहेत. त्यांनी जी भाषणे केली ती मी मन लावून वाचली आहेत. प्रतिपक्षातील आपापसातील भांडणे वाचणे किंवा ऐकणे मनोरंजक तर खरेच, पण मी त्यांची भाषणे त्या दृष्टीने वाचली नाहीत. या वादात उत्पन्न झालेले काही मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत व त्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.
या वादामध्ये उत्पन्न झालेली मुख्य तत्वे अशी आहेत. हल्लीच्या राज्यघटनेत प्राईम मिनिस्टरचे अधिकार काय आहेत ? डॉ. खरे यांचे म्हणणे असे आहे की, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री मुख्यप्रधानांनी निवडावयाचे असून बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीने त्यासंबंधात ढवळाढवळ करता कामा नये व मंत्रिमंडळातील एखादा मंत्री नालायक, लुच्चा किंवा भांडखोर ठरला तर त्याला काढून टाकण्याचा अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे हे डॉ. खरे यांचे म्हणणे आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीचे म्हणणे याच्या अगदी उलट आहे. मिनिस्टर कोणाला नेमावयाचा, त्याला कधी काढावयाचा, हा अधिकार आपला आहे, प्राइम मिनिस्टरचा नाही, असे वर्किंग कमिटीचे म्हणणे आहे.
मुख्य प्रश्न असा येतो की, मंत्रिमंडळाचा कारभार जर व्यवस्थित होत नसेल, तर त्यांना शासन करण्याचा अधिकार कोणाचा ? मला असे वाटते की, मंत्रिमंडळाला शासन करण्याचा हक्क ज्यांनी त्यांना निवडून दिले त्यांचा आहे. म्हणजे ज्या हजारो मतदारांनी त्यांना निवडून दिले त्यांचा आहे. वर्किंग कमिटीचे म्हणणे असे की, मंत्रिमंडळाचे शास्तेपण मतदारांकडे नसून ते तिच्याकडे आहे. वल्लभभाईनी गेल्या असेंब्लीच्या निवडणुकीत जे लोक उभे केले ते सर्व दगड आहेत, त्यांना काही हक्क नाही, अधिकार नाही. वल्लभभाई पटेल, गांधी, बजाज, राजेंद्रप्रसाद, जवाहरलाल नेहरू हे लोक निवडणुकीत उभे राहिले नाहीत, मतदारांनी त्यांना कसला अधिकार दिला नाही. हे सर्व उपटसुंभ आहेत. सर्व जबाबदार राज्यपद्धतीचा एकच अर्थ आहे की, न्याय देणारी शेवटची संस्था म्हणजे मंत्रिमंडळाला निवडून देणारा मतदारसंघच होय. या दृष्टीने पाहू गेले म्हणजे असे आढळून येते की, न्याय आणि सत्य हे डॉ. खरे यांच्याकडे असून वर्किंग कमिटीकडे न्यायही नाही व सत्यही नाही.
हे सर्व ठीक आहे. पण पुढे काय हाच प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो. डॉ. खरे यांचे पुढे काय होणार, या प्रश्नाने माझ्या मनात काहूर उठले आहे. या वेळी मला माझ्या लहानपणच्या एका गोष्टीची आठवण होते. ज्या गावी आम्ही रहात होतो, तेथे आमच्या शेजारी एक कुटुंब रहात असे. त्यांना १०-१२ वर्षांची एक मुलगी होती. मुलगी लग्नाची झाल्यानंतर तिच्या आईबापांनी एक चांगलासा मुलगा पाहून तिचे लग्न केले. मुलगी नंतर सासरी राहावयास गेली. व ती तेथे आनंदात आहे या समजुतीवर तिचे आईबाप आपल्या गावी स्वस्थ राहिले. लग्न झाल्याला काही १०-१२ महिने झाले असतील, एके दिवशी चिठ्ठीचपाटी न पाठविता कोणा शेजाऱ्याबरोबर ती मुलगी आपल्या आईबापाच्या दारी दत्त म्हणून उभी राहिली व अगदी वरच्या सुरात ओक्साबोक्शी मोठमोठ्याने रडू लागली. आईबापाला वाटले की, मुलीला झाले आहे तरी काय ? चांगला शिकला सवरलेला मुलगा पाहून दिला, घरदार चांगले बघून दिले, मग अचानक ही काय भानगड झाली ? मुलीच्या आईने आपल्या मुलीला पोटाशी धरली व काय झाले ते विचारू लागली. मुलीने आपल्याला सासुरवाडीस मारहाण, हाल-जाच कसे होतात या दुःखाचा पाढा वाचला. अंगावरून हात फिरवून पाहता मुलीच्या डोक्यात मोठी खोक पडलेली दिसली ! आईने मुलीची चोळी काढून पाहिली तो असे दिसून आले की, मुलीचे अंग मारामुळे चांगलेच सुजून आले आहे व पाठीवर मारामुळे मोठे वळही उठले आहेत. बिचारीने मुलीच्या पाठीला तेल-हळद लाविली. काही दिवसांनी ती मुलगी म्हणू लागली की, ज्या चुलीला आपण मला लाविली आहे तेथे माझे काही बरे वाईट व्हावयाचे असेल ते होईल. मला आपली सासरी पाठवा, असे म्हणून त्या मुलीने हट्ट धरला. आई-बाप यांनी मुलीला चोळी बांगडी केली. कपाळाला शेष भरली, ओटीत नारळ घातला आणि मुलीला लावून दिली. मुलगी पुन्हा सासरी नांदावयास गेली. नवऱ्याकडील माणसे म्हणू लागली की, मुलगी पाहा किती सालस, ती आमच्याकडे नांदावयास कबूल. पण तिचे आई-बापच काही तरी तिला शिकवितात व अशातऱ्हेने मुलगी सासरी झाली गोड आणि तिला तिच्या संकटाच्या वेळी आश्रय देणारे आई-बाप झाले शत्रु. परंतु मुलीची सासू होती कजाग, तिचा एळकोट जाईना. दुर्दैवाने ह्या मुलीला मूल होईना. झाले निमित्त. एक दिवस ती मुलाला म्हणाली की, तू आता दुसरे लग्न कर. मुलीच्या आई-बापाला मोठा प्रश्न पडला. मुलीला पुन्हा आपल्याकडे आणावी तर ती इतकी बेवकूब की, पुन्हा म्हणणार मी जाते आपल्या सासरी. म्हणून त्यांनी तिच्याकडे लक्ष पुरविले नाही. नवऱ्याने दुसरे लग्न केले. मागल्या बाईला मूल झाले. सगळ्यांचे लक्ष अर्थात तिच्याकडे. हिची हेळसांड होऊ लागली. शेवटी तिला क्षय झाला आणि काही दिवसांनी झिजून मेली. डॉ. खऱ्यांची परिस्थिती काही अंशी आमच्या शेजारच्या मुलीसारखीच आहे. त्यांना काँग्रेसमध्ये जाच झाला, त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून ते महाराष्ट्रात त्यांच्या सगेसोयऱ्यांकडे आपले गाऱ्हाणे घेऊन आले आहेत व इतका अन्याय झाला असतासुद्धा ज्याप्रमाणे ती मुलगी सासरीच नांदावयास कबूल, त्याप्रमाणे डॉ. खरे म्हणतात, ” मी आपला काँग्रेसमध्येच राहाणार !” या मुलीप्रमाणे त्यांना झिजवून मारण्याचा प्रसंग येऊ नये म्हणजे झाले !
डॉ. खरे यांना झालेला अन्याय पुसून काढता येत नाही. लोकशाहीची तत्त्वे अशी पुसली जाऊ नयेत हाच विचार या प्रसंगानंतर सर्वांनी केला पाहिजे. ज्या दगडांनी किंवा देवांनी डॉ. खऱ्यांचा बळी घेतला, ते दगड आणखी बळी घेणार नाहीत कशावरून ? डॉ. खऱ्यांचे म्हणणे की, सर्वांनी काँग्रेसमध्ये यावे. काँग्रेसमधीलही काहींचे म्हणणे असे आहे की, काँग्रेसमध्ये घाण आहे ती तुम्ही काँग्रेसला मिळून उपसून टाका. यावर माझे म्हणणे असे आहे की, घाण करणार तुम्ही ! अर्थात तुम्ही केलेली घाण तुम्हीच काढली पाहिजे. मी माझ्या स्वच्छ कपड्यांनी येऊन ती घाण का काढू ? तुमची घाण तुम्ही उपसून टाका म्हणजे मग माझ्या स्वच्छ कपड्यांनी काँग्रेसमध्ये यावयाचे किंवा नाही हे मी पाहून घेईन. यातून असा मुद्दा उपस्थित होतो की, एकच राजकीय पक्ष असणे इष्ट आहे काय ? सर्वांनी आपली शेंडी काँग्रेसच्या हातात अडकवावी हे चांगले आहे काय ? मला असे प्रामाणिकपणे वाटते की, देशामध्ये एकच पक्ष असणे हे देशाच्या उन्नतीला हितावह नाही. ज्या देशामध्ये एकापेक्षा अधिक राजकीय पक्ष नाहीत, तेथे बुद्धीची वाढ होणे शक्य नाही व जेथे बुद्धीची वाढ नाही, तेथे स्वातंत्र्य मिळणे अशक्य आहे.
शेवटी डॉ. खरे यांना मी एक विनंती करणार आहे. कोणी तरी मला सांगितले की, मुंबईच्या प्रभात पत्रात मध्यप्रांत मंत्रिमंडळाविषयी लिहिताना असे लिहिले आहे की, डॉ. खरे हे जात्यात असून मुंबईचे मुख्यप्रधान बाळासाहेब खेर हे सुपात आहेत. मला वाटते, आमचे बाळासाहेब हे कधीच सुपात येणार नाहीत. एखादी चांगली सून असली म्हणजे तिला आपण (Ideal) सुलक्षणी सून म्हणतो. बाळासाहेब खेर यांचे वर्तन सुलक्षणी सुनेप्रमाणे आहे. ज्या प्रमाणे (Ideal) सून दीर आला कर नमस्कार, सासरा-सासू आली कर नमस्कार, नणंद आली कर नमस्कार, जाऊ आली कर नमस्कार, सगळ्यांशी गोड बोलणारी, कोणाला कधी पाय लावायचा नाही, खाली वाकली तर पायाची पोटरी उघडी पडली आहे की काय हे पाहून मग वाकणारी, दररोज नवऱ्याच्या नावाने कुंकू लावणारी. हे काही शांता आपटेंचे कुंकू नव्हे. त्याला यश चिंतणारी, जन्मोजन्मी हाच नवरा मिळो म्हणून सावित्रीसारखी इच्छा करणारी, बाहेरच्या माणसांना सासरच्या माणसांनी शिव्या दिल्या तर त्याबद्दल कष्टी न होणारी अशी असते. आमचे बाळासाहेब खेर हुबेहुब असे वर्तन करीत आहेत आणि म्हणून मला असे वाटते की, १२ महिनेच काय १२ वर्षे देखील आमचे बाळासाहेब कॉंग्रेस अधिकारात राहिले तर मुख्यप्रधान राहतील. अर्थात् सुपात किंवा आंधणात पडण्याची त्यांना कधीच वेळ येणार नाही. एक मुलगी हिंदी घरात दिली. तिचे असे झाले, एक मुलगी गुजरातेत दिली तिचे बरे चालले हे पाहून दुःखात सुख म्हणून समाधान वाटते. पण काळाची गती फार विचित्र आहे. आमचे बाळासाहेब खेर कदाचित कधी काळी जात्यात पडतील. तसे जर घडले तर जसे डॉ. खरे मुंबई-पुण्याकडे आले, तर कदाचित आमचे बाळासाहेब खेर नागपूरास जातील. अशा प्रसंगी डॉ. खरे यांनी त्यांच्या पाठीवर मायेचा हात फिरवावा अशी माझी त्यांना विनंती आहे. (प्रचंड हशा व टाळ्यांचा कडकडाट.)
🔹🔹🔹
यानंतर डॉ. मुंजे व रा. वर्दे यांची भाषणे झाली व नंतर अध्यक्ष श्री. जमनादास मेहता यांनी भाषण केल्यावर सभेचे काम संपले.
डॉ. खरे यांना ठगांच्या टोळीत न्याय मिळाला नाही याबद्दल आपणास नवल वाटत नाही अशा अर्थाचे श्री. जमनादास मेहता यांनी उद्गार काढले. लोकशाही विरुद्ध कारस्थान करणाऱ्या कंपूला डॉ. खरे यांनी अटक करणे जरूर होते, असाही अभिप्राय त्यांनी प्रकट केला.
⚫⚫⚫
✍️ संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर