मनमाड येथे घेण्यात आलेल्या सभेत ” अस्पृश्य मानलेल्या समाजाचे आजचे कर्तव्य ” या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….
मुंबई इलाखा शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष श्री. भा. कृ. गायकवाड यांनी दिनांक १ व ८ डिसेंबर १९४५ च्या ‘जनता’ मध्ये प्रसिद्ध केले की, आपल्या समाजाचे एकमेव पुढारी नेक नामदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एम. ए., पीएच.डी., डी. एससी., बार-ॲट-लॉ, हिंदुस्थान सरकारचे लेबर मिनिस्टर (मजूर मंत्री), यांना कामाच्या व्यापामुळे नाशिक, अहमदनगर, पश्चिम खानदेश व पूर्व खानदेश या प्रत्येक जिल्ह्यास भेट देणे अशक्य झाल्याने या चार जिल्ह्यांच्या विद्यमाने रविवार दिनांक ९ डिसेंबर १९४५ रोजी सायंकाळी ४ वाजता मनमाड सारख्या मध्यवर्ती ठिकाणी सभा घेण्यात येत आहे. ते ” अस्पृश्य मानलेल्या समाजाचे आजचे कर्तव्य ” या विषयावर जाहीर व्याख्यान देणार आहेत. अशा या सुवर्ण संधीचा फायदा सर्व बंधु-भगिनींनी हजर राहून अवश्य घ्यावा, असे आगाऊ जाहीर झाल्याप्रमाणे नाशिक, अहमदनगर, पश्चिम खानदेश व पूर्व खानदेश या चार जिल्ह्यांच्या विद्यमाने रविवार दिनांक ९ डिसेंबर १९४५ रोजी मनमाड येथे प्रचंड सभा झाली. या सभेला पाऊण लाखाच्यावर अस्पृश्य जनसमुदाय जमला होता.
या सभेसाठी मुंबईहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रविवारी सकाळच्या गाडीने निघाले होते.
महाराष्ट्रातील अस्पृश्यांच्या या बालेकिल्ल्याला जवळ जवळ सहा-सात वर्षांच्या कालावधीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेट देणार होते. अस्पृश्य जनता आपल्या या वंदनीय पुढाऱ्याच्या दर्शनासाठी आतूर झालेली होती. बऱ्याच लांबलांबच्या भागातून लोकांच्या झुंडीच्या झुंडी मनमाडकडे कूच करीत असताना दिसत होत्या. उन्हा-तान्हातून, काटे- कणेऱ्यातून लोक मार्ग काढीत होते. पाठीशी शिदो-या बांधून, विजय मार्गावरील अस्पृश्यांच्या चळवळीचा जयघोष करीत फार दिवसातून आज आमचा मोहरा पुन्हा आम्हाला आमच्या भागात दिसणार, ही जाणीव उराशी बाळगून या चार जिल्ह्यातून अस्पृश्य जनता आनंदोत्सुक्याने मनमाड येथे गोळा झाली होती. अगदी प्रचंड संख्येत जवळ जवळ पाऊण लाखांचा अस्पृश्यांचा जमाव जमला होता.
दुपारी बरोबर सव्वा दोन वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गाडी स्टेशनात आली. निनाद, जयघोष, गगनभेदी घोषणांनी सारे स्टेशन हादरत असल्याचा भास होत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कंपार्टमेंट पुष्पहारांनी भरगच्च दिसत होते.
चौकशीअंती कळले की, मनमाडला येईपर्यंत ज्या ज्या स्टेशनवर गाडी थांबली त्या त्या प्रत्येक ठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे हार्दिक स्वागत होऊन त्यांच्यावर पुष्पवर्षाव करण्यात आला होता.
साडेतीन वाजण्याच्या सुमाराला स्टेशनहून टोलेजंग मिरवणूक निघाली. शहरातील मुख्य विभागातून फिरून सुमारे दोन मैलावर असलेल्या अस्पृश्य वस्तीत आल्यावर मनमाड येथील अस्पृश्य विद्यार्थी बोर्डिंगच्या इमारतीच्या कोनशिला समारंभासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर गेले.
( पहा – अस्पृश्य विद्यार्थी बोर्डिंगच्या इमारतीच्या कोनशिला समारंभप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण : शिक्षणाशिवाय माऱ्याच्या जागा काबीज करता येणार नाहीत – दिनांक ९ डिसेंबर १९४५ )
दिनांक ९ डिसेंबर १९४५ रोजी मनमाड येथील अस्पृश्य विद्यार्थी बोर्डिंगच्या इमारतीची कोनशिला बसविल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जाहीर सभेच्या ठिकाणी आले. या सभेला सव्वा सहा वाजता सुरूवात झाली. मुंबई प्रांतिक शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष श्री. भाऊराव कृ. गायकवाड व आंध्र प्रांतिक शाखेचे सेक्रेटरी श्री. सुर्यप्रकाशराव यांची प्रास्ताविक भाषणे झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलावयास उठले. सुमारे पाऊण लाखांच्या अस्पृश्य जनसमुदायासमोर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक तास भाषण केले.
नाशिक, अहमदनगर, पश्चिम खानदेश व पूर्व खानदेश या चार जिल्ह्यांच्या विद्यमाने मनमाड येथे घेण्यात आलेल्या या सभेत बोलताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
बंधु आणि भगिनींनो,
आज सहा-सात वर्षांच्या कालावधीनंतर या ठिकाणी मी आलो आहे. याचे कारण असे आहे की, सर्व हिंदुस्थानात अस्पृश्य समाजाच्या कार्याविषयी, लढ्याविषयी सर्वात जास्त जागृत असा महाराष्ट्र हा एकच भाग आहे आणि म्हणून या भागात वारंवार येण्याची मला तितकिशी जरुरी भासत नाही. तरी पण आज या ठिकाणी येणे विशेष महत्त्वाचे वाटल्यावरूनच मी आलो आहे.
आज या देशात काँग्रेस, मुस्लिम लीग, हिंदू महासभा वगैरे अनेक राजकीय पक्ष आहेत. हा प्रत्येक पक्ष आपापल्या परीने राजकीय मागण्या मागत आहे. मुसलमान लोक पाकिस्तान मागत आहेत. काँग्रेस स्वराज्य मागत आहे. आम्हालाही स्वराज्य पाहिजे आहे. स्वराज्याबद्दल काँग्रेसचा व आमचा मतभेद नाही. काँग्रेसचे लोक ब्रिटिशांना सांगत आहेत की, हिंदुस्थान आमचा आहे. हिंदुस्थानच्या राजकारणाच्या किल्ल्या आमच्या हाती द्या आणि हिंदुस्थानातून चालते व्हा. पण गेली वीस वर्षे काँग्रेसला मी एक प्रश्न विचारीत आहे. त्याचे उत्तर मात्र गांधी अगर काँग्रेसचे लोक देत नाहीत.
तो प्रश्न हा की, तुम्ही जे स्वराज्य मागता त्या स्वराज्यात कोणाचे राज्य कोणावर होणार आहे ? राज्य कोणी करायचे ? आणि ते कोणावर ? हिंदुंनी अस्पृश्यांवर राज्य करावयाचे असे काही आहे काय ? हे जे स्वराज्य मिळणार आहे ते स्वराज्य कोणाचे ? तुम्हाला कदाचित तुमचे स्वराज्य मिळेल परंतु तुमचे स्वराज्य म्हणजे आमची गुलामगिरीच ना ?
हाच प्रश्न मी काँग्रेसच्या लोकांना व गांधींना आज वीस वर्षे विचारीत आहे. या प्रश्नाचे उत्तर ते देत नाहीत आणि ज्याअर्थी ते उत्तर देत नाहीत त्याअर्थी त्यांच्या पोटात काही तरी काळेबेरे आहे हे सिद्ध होते.
हे जे स्वराज्य मिळणार आहे त्या स्वराज्यात आम्हाला काय मिळणार याचा तुम्ही विचार केला पाहिजे.
आज आपल्यावर कोणती कामे लादण्यात आलेली आहेत ? झाडू मारणे, गटारे साफ करणे वगैरे. काँग्रेसच्या हाती राजकारणाच्या किल्ल्या मिळाल्या तर आमच्यावर पूर्वापार चालत आलेल्या गुलामगिरीवर शिक्कामोर्तब होणार आहे. झाडू मारणे, गटारे साफ करणे हीच कामे आमच्यावर लादण्यात येऊन आमची दुर्दशा कोणत्या थरास जाईल हे सांगता येत नाही.
आज मी एवढा खटाटोप करून दरवर्षी ३ लाख रुपये आपल्या समाजातील मुलांना परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याकरिता सरकारातून खर्च होण्याची सोय केली आहे. ३ लाख रुपयाचे ५ लाख करण्याचा मी सध्या प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ आठ टक्के जागा सरकारी नोकऱ्यात आपल्या उमेदवारांना मिळण्याची सोय करण्यात आलेली आहे. आपल्या प्रगतीकरिता आजपर्यंत या व इतर ज्या काही सरकारी सवलती व सरकारी मदत मिळाली व मिळत आहे ते सर्व काही काँग्रेसच्या लोकांच्या हाती राजकारणाच्या किल्ल्या गेल्या की नेस्तनाबूत होणार आहे.
हा सर्व खटाटोप मी का करीत आहे ? आपणाला माऱ्याच्या जागा, अधिकाराच्या जागा हस्तगत करावयाच्या आहेत, किल्ले सर करावयाचे आहेत म्हणून. त्याशिवाय आपणाला तरणोपाय नाही. किल्ल्यावरूनच शत्रुच्या सैन्याची टेहळणी करता येऊन शत्रूवर जोराचा मारा करता येतो. शत्रुने सर्व प्रांत जरी व्यापला तरी जोपर्यंत किल्ले ताब्यात असतात तोपर्यंत कशाचेही भय बाळगण्याचे कारण राहात नाही.
पेशवाईच्या काळात काही इंग्रजांचे राज्य नव्हते, अगर मुसलमानांचेही नव्हते. त्यावेळेस पूर्ण स्वराज्य होते. त्या स्वराज्यात आपली काय परिस्थिती होती ?
अस्पृश्य जातीच्या मनुष्याने रस्त्यावर थुंकू नये म्हणून त्याच्या गळ्यात गाडगे अडकविण्यात आले होते. त्याचप्रमाणे रस्त्याने चालताना त्यांची पावले उमटू नयेत म्हणून त्याच्या पाठीमागे झाडू बांधण्यात येत असे. पेशव्यांच्या स्वराज्यात अस्पृश्यांची जी दैना झाली तशीच दुर्दशा हिंदू लोकांच्या हाती स्वराज्य गेल्याने अस्पृश्यांची होणार आहे, हे कोणीही विसरता कामा नये.
आजही हे भिक्षापात्र अवलंबणारे ब्राह्मण लोक अधिकाऱ्याच्या जागेपासून तो तहत क्लार्कच्या जागेपर्यंत सरकारी जागा व्यापून आपले स्थान कायम राखून आहेत.
कोणत्याही गावात मुसलमानांचे एक घर असले तरी त्याच गावात राहाणारे हजार-पाचशे स्पृश्य हिंदू लोक त्याची किती मनधरणी करतात. त्याच्याकडे ब्र शब्द काढण्याची कोणाची ताकद नसते आणि त्याच गावात, स्वधर्मीय अशा पाच-पंचवीस अस्पृश्य लोकांना हेच स्पृश्य हिंदू ठोकरीने उडवितात. इंग्रज आमदानीत स्वराज्य मागणाऱ्या या स्पृश्य हिंदुंच्या हाती जर स्वराज्य गेले तर आपली दशा काय होईल याचा विचार करा.
हिंदुस्थानात युरोपियन, मुसलमान, शीख, अँग्लो-इंडियन, पारशी, ख्रिश्चन वगैरे अल्पसंख्यांक जाती आहेत. सर्वसाधारण राजकारण जाणणारा कोणताही मनुष्य तुम्हाला सहज सांगू शकेल की, या सर्व जातींपैकी राजकीय संरक्षणाची खरोखर आवश्यकता जर कोणाला असेल तर ती अस्पृश्य समाजातील लोकांनाच आहे. असे असताना काँग्रेसचे लोक आजपर्यंत काय करीत आले आहेत ? १९३०-३२ साली विलायतेला जी राऊंड टेबल कॉन्फरन्स भरविण्यात आली त्यावेळी अस्पृश्य समाजातर्फे मला जाण्याचा प्रसंग आला. अस्पृश्य समाजाकरिता प्राणांतिक उपोषण करणाऱ्या गांधींनी त्यावेळी काय केले ?
गांधींकडे खिश्चन, युरोपियन, पारशी, शीख, मुसलमान या अल्पसंख्यांक लोकांनी राजकीय संरक्षण मिळविण्याकरिता खलिते पाठविले. मुसलमानांखेरीज सर्वांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. मीही अर्ज पाठविला होता. या प्रसंगी गांधींना भीती वाटत होती की, हे सर्व लोक एक होतील. असे झाल्यावर काँग्रेसला सुरुंग लागेल आणि हे लोक आपली रेवडी उडवतील, म्हणून गांधींनी मुसलमान लोकांशी गुप्त करारनामा केला. त्यांना सांगण्यात आले की, तुमच्या ज्या काही १४ मागण्या आहेत, त्या सर्व मला मान्य आहेत परंतु अस्पृश्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सर्वांना तुम्ही विरोध केला पाहिजे. वास्तविक मुसलमान लोकांची लोकसंख्या व अस्पृश्यांची लोकसंख्या जवळ जवळ सारखी असून राजकीय संरक्षणाची आवश्यकता मुसलमानांपेक्षा अस्पृश्य लोकांनाच जास्त आहे. परंतु अशा रीतीने गांधींनी सर्व पक्षांचे अर्ज मंजूर करून मुसलमानांशी गुप्त करारनामा केला आणि माझा अर्ज नामंजूर केला.
अशी ही गांधींची कपटनीती आहे. काही दिवसांपूर्वी सिमला मुक्कामी जी परिषद भरविण्यात आली त्यावेळी तरी गांधींनी काय काय केले ?
परिषदेसंबंधी सरकारचे धोरण जाहीर करणारे पत्रक व्हाईसरॉयसाहेबांनी काढले होते त्यात त्यांनी राजकीय दृष्टीने ‘ अस्पृश्य व अस्पृश्येतर हिंदू ‘ असा हिंदू समाजाचे दोन तुकडे पाडणारा शब्दप्रयोग केला होता. धार्मिक दृष्टीने अस्पृश्य लोक खरोखरीच निराळे आहेत की नाहीत ही गोष्ट जरी दृष्टीआड केली तरी राजकीय दृष्टीने अस्पृश्य समाज स्पृश्य हिंदू लोकांपासून निराळा, भिन्न असा मानण्यात आला होता. परंतु सर्व राजकारणाच्या आंदोलनातून व व्हाईसरॉयसाहेबांच्या पत्रकातून गांधींचा ” आतील आवाज ” जागृत झाला व त्या आवाजानुसार गांधींनी एक पत्रक काढून त्यात जाहीर केले की, ” अस्पृश्य व अस्पृश्येतर हिंदू अगर सवर्ण हिंदू ” हा राजकीयदृष्ट्या हिंदू समाजाचे तुकडे पाडणारा शब्दप्रयोग गैरवाजवी आहे.
याच्या मुळाशी काय आहे ? तुम्हाला कौरव-पांडवांच्या युद्धाची थोडी माहिती असेल. कौरव शंभर होते व पांडव पाच होते. कौरवांनी सर्व राज्य बळकावले होते. या राज्याचा काही भाग पांडवांना मिळावा व हे युद्ध टाळता यावे म्हणून कृष्ण शिष्टाई करण्याकरिता कौरवांचा नेता दुर्योधन याच्याकडे गेला व त्याला सांगितले की, अर्धे राज्य तुम्ही घ्या व अर्धे राज्य पांडवांना द्या. परंतु दुर्योधनाने ते मान्य केले नाही. त्यावर कृष्ण म्हणाला की, या राज्यातील दंडकारण्य तरी पांडवांना द्या. त्यावर दुर्योधनाने उत्तर दिले की, दंडकारण्यच काय पण सुईच्या अग्रावर जेवढी माती राहील तेवढीही जमीन मी देणार नाही.
अशाच प्रकारची गांधींची व काँग्रेसच्या लोकांची अस्पृश्य लोकांविषयी मनोवृत्ती आहे. याचे कारण काय ?
राजकीय दृष्ट्या हिंदू समाजाचे असे दोन भाग पाडल्याने मुसलमानांप्रमाणे अस्पृश्यांना राजकारणात स्वतंत्र अधिकार प्राप्त होणार आहेत, ही गोष्ट गांधी व त्यांचे हस्तक जाणून आहेत.
मध्यवर्ती असेंब्लीच्या निवडणुकीचा निकाल लागून फार दिवस झाले नाहीत. या निवडणुकीत मुसलमान लोकांचा स्वतंत्र मतदार संघ असल्यामुळे मुसलमान लोक मुस्लिम लीगच्या बाजूने प्रचंड बहुमताने निवडून आले. मुस्लिम लीगशी काँग्रेसला लढण्याचे सामर्थ्य राहिले नाही.
परंतु नवीनच उदयास आलेले आणि इतर काही पक्ष, जस्टीस पार्टी, हिंदू महासभा वगैरे, या सर्व पक्षांचा या निवडणुकीत बोजवारा उडाला.
यशापयश येणे जरी सर्वस्वी हाती नसले तरी पण एक गोष्ट निर्विवाद आहे. लढताना अपयश येण्याने निरुत्साही होण्याचे काहीच कारण नसते. परंतु काही पक्षांनी आपला कारभारही आटोपता घेण्याचे ठरविले.
यावरून काय दिसून येते ? आता जी आगामी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीच्या वेळी खरा लढा फक्त दोनच पक्षात होणार आहे आणि तो म्हणजे शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन व दुसरा काँग्रेस पक्ष.
याकरिता तुम्ही काय केले पाहिजे ? तुम्ही मनाशी निश्चय केला पाहिजे, आपणाला अतिशय बलवान शत्रुशी टक्कर द्यावयाची आहे. तुम्हा सर्वांवर ही जबाबदारी आहे. काँग्रेसने सर्व पक्षांना नेस्तनाबूत करण्याचा डाव रचला आहे. सर्व पक्षांना दडपून टाकले आहे. ही वेळ लापसी खाण्याची नाही अगर दोन चार रुपयांनी खिसे भरण्याची नाही.
आपणाला लढा करावयाचा आहे. याकरिता तुम्ही लोकांनी निश्चय, निर्धार केला पाहिजे आणि या निश्चयानेच आपणाला यशस्वीरितीने हा लढा जिंकता येईल. निवडणुकीच्या दिवशी प्रत्येकाने सकाळीच उठून मतदानाचे जे जे ठिकाण नेमून दिले असेल त्या त्या ठिकाणी स्वतः होऊन गेले पाहिजे.
आपणाजवळ मोटारी नाहीत आणि पैसाही नाही. परंतु निश्चय आहे. ज्या ज्या ठिकाणी अशी सोय नसेल त्या त्या ठिकाणी कोणाची वाट न पाहता तुम्ही पायी जाऊन आपल्या फेडरेशनच्या उमेदवारालाच मत दिले पाहिजे.
निरनिराळ्या पक्षातर्फे उमेदवाराला तिकीट देण्यात येते. मध्यवर्ती असेंब्लीत काँग्रेसच्या तिकिटावर नुकतेच गाडगीळ निवडून आले आहेत. त्याचप्रमाणे मराठा लीगचा राजकीय क्षेत्रात टिकाव लागत नाही हे जाणून अशाच प्रकारे कॉंग्रेसच्या तिकिटावर हिरे हेही निवडून आले आहेत. हे तिकीट म्हणून जे म्हणतात याचा अर्थ तरी काय आहे ? गाडगीळांच्या जोडीला हे दुसरे बांडगूळ मिळाले आहे इतकाच त्याचा अर्थ.
मला कोणीतरी सांगितले की, अमृतराव रणखांबे यांना काँग्रेसचे तिकीट मिळाले आहे. हे काँग्रेसचे तिकीट म्हणजे काय ?
म्युनिसीपालिटीकडून कुत्र्याच्या गळ्यात अडकविण्याकरिता एक बिल्ला देण्यात येतो आणि तो कशाकरिता देण्यात आलेला असतो तर त्या बिल्ल्यावरून त्या कुत्र्याचा मालक कोण आहे हे समजते. या बिल्ल्याप्रमाणेच हे काँग्रेसचे तिकीट आहे.
आगामी निवडणुकीकरिता ज्या उमेदवारांची नावे ‘जनते’ तून जाहीर करण्यात आली आहेत त्यांच्याविषयी अनेक लोकांच्या मनात अनेक प्रकारचे तर्क चालू आहेत.
या अमुक उमेदवाराला तिकीट दिले. त्या दुसऱ्याला का दिले नाही. हे पाहण्याचे काम तुमचे नाही.
तुम्ही लोकांनी आपली जबाबदारी, आपले कर्तव्य काय आहे, हे नीट समजावून घेतले पाहिजे.
ज्या पक्षातर्फे हे उमेदवार उभे केले आहेत त्या शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन या पक्षाची भूमिका काय आहे ? त्या पक्षाची दिशा कोणती ? मार्ग कोणते ? ध्येय काय आहे ? हे समजावून घेणे तुमचे कर्तव्य आहे.
मुंबई प्रांतातील बहुतेक सर्व जिल्ह्यातून उभे केलेले उमेदवारच यावेळीही का उभे केले असे कोणी म्हणेल.
तुम्ही सर्व जण जाणता की आपणाला काँग्रेसशी लढा करावयाचा आहे. काँग्रेस जवळ मुबलक पैसा आहे. दोन चार हजार रुपये ओतून कोणाही उमेदवाराला ते सहज वळवू शकतील. ज्याप्रमाणे एखादा लोखंडी खांब जमिनीत रोवला असता ऊन, वारा, पाऊस कशाचाच अपाय त्याला होऊ शकत नाही, तो वाकत नाही अगर मोडत नाही त्याप्रमाणेच हे उमेदवार लोखंडी खांब आहेत. वाकणार नाहीत अगर मोडणार नाहीत ही माझी खात्री झालेली आहे.
यावेळी तुम्ही लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि ती ही की, जबाबदारी एकदोन माणसांची नाही. जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे. माझा भाऊ उभा केला नाही म्हणून एक रुसतो तर कोणी माझा बाप, चुलता वगैरे नात्यातील माणूस उभा केला नाही म्हणून रागावतो.
माझी दोन मुले आहेत, त्यांनीही समाजकार्य हाती घेतले आहे, असे मला आज पुष्कळ लोक सांगत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्यापैकी एकाला तरी निवडणुकीला उभा करा असेही म्हणताहेत. परंतु अधिकाराच्या जोरावर मी माझ्या मुलांना वर चढविले असा माझ्यावर आरोप करायला कोणालाही जागा मिळू नये असा माझा संकल्प आहे.
हे जे उमेदवार येत्या निवडणुकीकरिता उभे केले आहेत त्यांच्यात जरी काही अंशी कमतरता असली तरी ती भरून काढण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे. ज्यादिवशी ही नौका पैलतिराला नेण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही असे मला दिसून येईल त्या दिवशी मी राजकारण सोडून देईन.
🔹🔹🔹
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर