November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

जगाला युद्धाची नाही तर भगवान बुद्धांची गरज आहे; रामदास आठवलेंचे विधान

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जगात सर्वत्र बौद्ध धम्म प्रसारित झाला, त्याचा आम्हाला अभिमान आहे. जगाला युद्धाची नाही तर भगवान बुद्धांची गरज आहे.

डॉ. आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन नवजीवन दिले आहे, धम्म क्रांती घडवली आहे. त्यांचा विचार, त्यांची संकल्पना आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांचे वारसदार म्हणून आपण काम करीत राहू, असा निर्धार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ डिसेंबर १९५६ रोजी महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात ‘धम्म दीक्षा कार्यक्रम’ घेण्याचा संकल्प केला होता; मात्र त्यापूर्वीच त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे अपूर्ण राहिलेला तो संकल्प पूर्ण करण्यासाठी शनिवारी या मैदानात धम्म परिषदेचे आयोजन केले होते.

या वेळी मंत्री आठवले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी हजारो बौद्ध उपासकांच्या साक्षीने जगभरातून आलेल्या बौद्ध प्रतिनिधी आणि भिक्खूंच्या उपस्थितीत मंत्री आठवले यांनी ‘चलो बुद्ध की ओर’चा नारा दिला. या वेळी भिक्खू संघाला आठवले त्यांचे पुत्र जित यांच्या हस्ते चिवरदान आणि धम्मदान करण्यात आले. परिषदेस आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले, भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो, अविनाश कांबळे, पद्मश्री कल्पना सरोज आदी उपस्थित होते.

अनुयायांच्या रांगा

मैदानातील सभास्थळी पोहोचण्यास तीन किलोमीटरचे अंतर अनुयायांना चालावे लागत होते. सभेच्या ठिकाणी खुर्च्यांची व्यवस्था नसल्याने अनुयायी जमिनीवर बसून धम्म परिषदेत सहभागी झाले होते.