मुंबई येथे दिनांक २४ मे १९५६ रोजी २५०० व्या तथागत भगवान बुद्ध जयंती महोत्सवानिमित्त झालेल्या प्रचंड सभेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….
दि. २४ मे १९५६ रोजी मुंबईत बुद्धजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार होती. आपले एकमेव नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पददलीत समाजाला अचूक मार्ग दाखवून अखिल भारतीयांना बौद्ध धर्म स्वीकारण्याचा आदेश दिला आहे. सत्य, अहिंसा, समता प्राप्त करून घ्यावयाची असेल तर बौद्ध धर्म स्वीकारा, असा त्यांचा दिव्य संदेश आहे. त्यांचा हा संदेश शिरसावंद्य मानून भारतातील अखिल अस्पृश्य जनता धर्मांतर करण्यास तयार झाली होती. भारतीय बौद्धजन समितीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केव्हा आणि कोठे धर्मांतर करणार आहेत ? सार्वत्रिक की सामुदायिक ? धर्मांतराचा कार्यक्रम कोठे आणि कसा पार पाडावा ? अशा आशयाची शेकडो पत्रे आलेली होती. याबाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे समितीमार्फत पत्रव्यवहार करण्यात आलेला होता.
या पत्रव्यवहारादरम्यान डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाठविलेल्या पत्राचा आशय सर्व लोकांच्या माहितीसाठी देत आहोत –
“ मी मागे जाहीर निवेदन काढून येत्या वैशाख पौर्णिमेला धर्मांतर करण्याचा माझा मनोदय जाहीर केला होता. त्याप्रमाणे अस्पृश्य समाजातील व इतर वर्गीयांपैकी शेकडो लोक धर्मांतर करण्यास तयार झाले आहेत, हे ऐकून मनाला समाधान वाटते व धर्मांतर करण्यास तयार झालेल्या सर्व लोकांचे मी मनापासून अभिनंदन करतो. तुमची सामुदायिक धर्मांतराची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी अनेक ठिकाणी दौराही काढणार आहे. आपणाप्रमाणेच माझ्याकडे उत्तर भारतीयांचीही शेकडो पत्रे आली आहेत. त्यांच्या शाखा स्थापून त्यामार्फत प्रचंड बहुसंख्येने धर्मांतरास योग्य तो अवसर सर्वांना मिळावा यासाठी आपले धर्मांतर चारपाच महिने पुढे ढकलावे अशी त्यांनी विनंती केल्यावरून मी माझे धर्मांतर येत्या ऑक्टोबर महिन्यात करण्याचे योजिले आहे. आपण इतके दिवस थांबलात तसे काही दिवस थांबाल अशी आशा बाळगतो. येत्या वैशाख पौर्णिमेस तुम्ही सर्वांनी गतवर्षी प्रमाणेच २५०० वी बुद्ध जयंती साजरी करावी. “
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्राचा आशय भारतीय बौद्धजन समितीच्या सर्व शाखांनी लक्षात घेऊन २५०० वी भगवान बुद्ध जयंती आपआपल्या भागात महान प्रमाणात साजरी करावी ही विनंती, असे पत्रक का. वि. सवादकर, बा. कृ. कबीर, भ. स. गायकवाड, चिटणीस, भारतीय बौद्ध जनसमिती, मुंबई यांनी दिनांक १२ मे १९५६ च्या ‘ प्रबुद्ध भारत ‘ च्या अंकात प्रकाशित केले.
” यानुसार मुंबई येथे दिनांक २४ मे १९५६ रोजी २५०० व्या भगवान बुद्ध जयंती महोत्सवानिमित्त भारतीय बौद्धजन समितीतर्फे नरेपार्कवर प्रचंड सभा झाली. सभेला मुंबईतीलच नव्हे तर बाहेर गावाहूनही लोक आले होते. जवळ – जवळ पाऊण लाख स्त्री-पुरुष-बालके सभेला हजर होते.
सभास्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आगमन सायंकाळी साडे सहा वाजता झाले. त्यावेळी समता सैनिक दलाच्या गणवेषातील एक हजार स्वयंसेवकांनी त्यांना शिस्तबद्ध मानवंदना दिल्यानंतर बाबासाहेबांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.
व्यासपीठावर भारतीय बौद्धजन समितीचे सर्व सेक्रेटरीज, मुं. प्र. शे. का. फेडरेशनचे अध्यक्ष श्री. आर. डी. भंडारे, प्राध्यापक व्ही. जी. राव, अन्तुमामा गद्रे, आमदार कांबळे, श्री. निकुंभ, मुं. प्र.शे का फे. चे ज. से., व्ही. एस. पगारे वगैरे प्रतिष्ठित व्यक्ती आणि सौ. माईसाहेब आंबेडकर उपस्थित होत्या. सभेचे अध्यक्ष मुंबईचे माजी मुख्यप्रधान श्री. बाळासाहेब खेर यांनी बुद्धवंदनेनंतर बौद्ध धर्म आणि बुद्ध चरित्र यावर भाषण केले.
बरोबर साडे सात वाजता डॉ. बाबासाहेबांनी आपल्या महत्त्वपूर्ण भाषणाला प्रारंभ केला. सुमारे सव्वा तास त्यांनी आपले बौद्ध धर्मावरील विचार जनसमुदायापुढे मांडले.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
अध्यक्ष महाराज, बंधु आणि भगिनींनो,
आज वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्ध यांच्या २५०० व्या परिनिर्वाण दिनासाठी मला रंगून येथे ब्रह्मदेश सरकारच्या आमंत्रणावरून हजर असावयास पाहिजे होते. परंतु मी आज मुंबईत या सभेला हजर आहे.
गेली पाच वर्षे मी बौद्ध धर्मावर एक पुस्तक लिहिण्यात गुंतलो होतो. त्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या धर्मदीक्षेअगोदर वैशाख महिन्यात व्हावे या हेतूने मी मुंबईला आलो. परंतु मी एका विलक्षण आजाराने जायबंदी झाल्यामुळे मला ते पुस्तक लवकर लिहून संपविता आले नाही. पुस्तकाची ७०० पाने असून तो ग्रंथ इंग्रजी भाषेत असल्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांना तो समजणे अवघड जाईल. म्हणून मी लवकरच त्याचे मराठी भाषांतर करवून घेणार आहे. केवळ याच कामामुळे मला रंगूनला जाता आले नाही. तथापि माझ्यासमोर जमलेला हा जनसमुदाय पाहून मला अत्यंत आनंद होत आहे.
मी १४ वर्षाचा असतानाच एका सभेत श्री. दादासाहेब केळूसकर यांनी मला भगवान बुद्धाचे एक चरित्राचे पुस्तक बक्षीस म्हणून दिले होते आणि तेव्हापासून बौद्ध धर्माचा माझ्या मनावर पगडा बसला आहे.
मी लहान असतानाच माझे वडील आमच्याकडून रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथ वाचून घेतल्याशिवाय आमची सुटका करीत नसत. परंतु रामायण, महाभारत वाचण्याची आमच्यावर सक्ती का ? असे विचारण्याची कोणाची हिंमत नसे. ज्या पुराणात शूद्र आणि अस्पृश्य यांचे पदोपदी वर्णन आढळते त्या पुराणपुरुषांचे जीवन चरित्र वाचण्यात तरी काय तथ्य आहे ? माझ्याइतका धर्मशास्त्रवेत्ता कोणी नाही. मी वडिलांना हे ग्रंथ वाचण्याची सक्ती का ? असा प्रश्न विचारल्यावरून त्यांनी उत्तर दिले की, ” आपण जरी अस्पृश्य असलो तरी रामायण-महाभारतातील पुराणपुरुषांची जीवन चरित्रे वाचल्यानंतर आपल्या मनाचा न्यूनगंड दूर होतो. ” पण ते मला नीटसे समजले नाही.
महाभारतातील द्रोणाचार्य हा अत्यंत पराक्रमी राजगुरू होता. कौरव आणि पांडव दोघांनाही त्याने शस्त्रास्त्रांची विद्या शिकविली. तरीसुद्धा महायुद्धामध्ये द्रोणाचार्य खरी न्यायाची बाजू न धरता कौरवांच्याच बाजूने लढले. कारण कौरवांची ते नोकरी करीत होते. वास्तविक ज्या कुंतीपुत्र कर्णाची हलक्या कुळातला म्हणून अवहेलना केली जाते तो कर्णच खरोखर वीर व नीतीतत्त्व जाणणारा महान पुरुष होता.
रामायणातील रामाला आम्ही एकवाणी, एकपत्नी म्हणून संबोधितो. परंतु वाली आणि सुग्रीव यांपैकी एकाची बायको दुसऱ्याला देऊन त्याने त्याचा बाणाने घात केला. एकपत्नीव्रताच्या गप्पा मारणाऱ्या रामाची सीता जेव्हा रावणाने अशोक वनात नेऊन ठेवली तेव्हा रावणाशी युद्ध करण्यापूर्वी रामाने अशोक वनात जाऊन प्रथम सीतेची चौकशी करावयास पाहिजे होती. परंतु मारुतीच्या वारंवार सांगण्यावरूनसुद्धा रामचंद्राने सीतेची चौकशी केली नाही. रावणाशी द्रोह करून लंकेचे राज्य जिंकण्यास मदत करणाऱ्या बिभीषणाला प्रथम राज्याभिषेक करणे हे कार्य रामाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे होते. तेव्हा अशा पुराण पुरुषांच्या चरित्रापासून काय लाभ होणार ?
माझे हे बौद्ध धर्माचे वेड फार पुरातन कालापासूनचे आहे. वास्तविक १९५१ सालच्या खानेसुमारीत तुम्हाला सर्वधर्मीय व पंथाचे लोक आढळतील पण उभ्या भारतात एकही बुद्धधर्मीय माणूस या खानेसुमारीत तुम्हाला आढळणार नाही. भारतात जर एकही बुद्धधर्मीय नाही तर आज २५०० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या भगवान बुद्धाची आम्हाला उत्कट आठवण का होते ? बौद्धधर्माचे हे मढे उकरून काढून आम्ही त्याची का पूजा करीत आहोत ? भगवान बुद्धाच्या धर्माला सर्वत्र मागणी आहे. बुद्ध धर्माचा प्रचार नुसत्या भारतातच नसून सर्व जगात आहे. धर्म प्रसाराच्या व्यापारात रामकृष्णाला फारसे स्थान नाही.
बुद्ध धर्मावर बरेच लोक खोडसाळपणे टीका करतात. त्यापैकी सावरकर एक होत. वास्तविक त्यांना काय म्हणायचे आहे हेच मला कळत नाही. बुद्ध हा वाईट मनुष्य आहे, असे त्यांना म्हणावयाचे आहे काय ? बौद्ध धर्म प्रचारक राजे वाईट होते, असे त्यांना म्हणावयाचे असेल तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडावी. मी त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे. केसरीत प्रसिद्ध केलेल्या ‘ बौद्धांच्या आततायी अहिंसेचा शिरच्छेद ‘ या लेखातून त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही. सावरकरच काय, पण कुणालाही बौद्ध धर्माबाबत काही विचारावयाचे असल्यास त्यांनी उघडपणे मला विचारावे. त्यांना उत्तर देण्याची माझ्यात हिम्मत आहे.
भगवान बुद्धाचा जो अफाट भिक्षुसंघ होता त्यात शेकडा ७५ टक्के ब्राह्मण होते. हे सावरकरांना माहीत आहे काय ? सारीपुत्त मोग्गलायनसारखे पंडित ब्राह्मण होते, हे सावरकरांनी विसरू नये. सावरकरांना मला असा प्रश्न विचारायचा आहे की, पेशवे कोण होते, ते भिक्षु होते काय ? मग त्यांच्या हातून इंग्रजांनी राज्य कसे हिसकावून घेतले ? तेव्हा अशा नादान व बेजबाबदार लोकांच्या आपण नादी लागू नये. काही लोक म्हणतात सावरकर विष ओकले. पण मी म्हणतो सावरकर आपल्या पोटातील नरक ओकले! कुणी कितीही खोडसाळ टीका केली तरी माझा मार्ग निश्चित आहे. मी बुद्ध धर्म स्वीकारणार! तुम्हाला पटला तर तुम्हीही स्वीकारा. आतापर्यंत हिंसक मार्गाने व अमानुष अत्याचाराच्या जोरावर बुद्ध धर्माची लाट परतवून लावली. परंतु आता बुद्ध धर्माची लाट येईल, ती कधीही परत जाणार नाही. या अफाट सागराला भरती येईल, पण ओहोटी येणार नाही. भगवान बुद्धाच्या संघटनेत काही त्रुटी राहिल्या काही छिद्रे राहिली होती. म्हणून त्या छिद्रांद्वारे बाहेरील पाणी आत येऊन बुद्ध धर्माचा प्रवाह थोडा दूषित झाला होता. परंतु आता मी त्या धर्माची डागडुजी करून ती छिद्रे बुजविणार आहे.
बुद्ध चरित्रावर मी जे पुस्तक लिहिले आहे त्यात बुद्धाचे स्थान काय आहे याचे संपूर्ण विवेचन केले आहे. ख्रिश्चन धर्मात येशू स्वतःला ईश्वराचा पुत्र समजतो. किंबहुना तो बायबलमधून असेही सांगतो की, मी तुम्हाला ईश्वराचा संदेश सांगत आहे. तुम्ही मेल्यानंतर जेव्हा स्वर्गात जाल तेव्हा मला तुमची परमेश्वरापुढे शिफारस, रिकमेंड करावी लागेल, तेव्हा मी असा विचार करीन की, मी पृथ्वीवर असताना तुम्ही मला ईश्वराचा पुत्र मानीत होता काय ? मुसलमान धर्माच्या महंमद पैगंबराचीही तीच स्थिती आहे. महंमदसुद्धा स्वतःला ईश्वराचा प्रेषित समजतो. पण भगवंताच्या उपदेशात तसा आशय नाही. भगवंतानी सांगितले, केवळ मी सांगतो म्हणूनच नव्हे तर तुमच्या विचारशक्तीला पटेल तरच त्याचे ग्रहण करा. बुद्धानी शोधून काढलेला मार्ग (Discovery) हा स्वप्रयत्नाने, स्वकष्टाने व स्वाध्यायनाने तयार केलेला आहे. कुणा दुसऱ्याच्या पुंजीवर भगवंताचा धर्म आधारलेला नाही.
मार्क्सवाद्यांना काय सांगावे ? त्यांनी भगवान बुद्धाचे तत्वज्ञान अवश्य वाचावे. दुःखी, पिडीत लोकांना दुःखातून मुक्त करण्याचा खरा मार्ग भगवंताने शोधून काढला. हजारो पिडीतांना त्यांनी स्वयंप्रकाशाने दुःखमुक्त केले. आलार कालाम यांच्या ज्ञानाने भगवंताचे समाधान झाले नाही. कारण त्याची शिकवण अपूर्ण होती. सांख्य तत्त्वज्ञानवेत्ता कपिल महर्षी यांनी तत्त्वज्ञानाच्या आधारे सांगितले की, पृथ्वी ही जड आहे, हलत नाही. मग तिचा विकास कसा होतो ? ती तऱ्हेतऱ्हेची रूपे कशी घेते ? कपिलाने सांगितले की, पृथ्वीच्या उदरात रज, तम आणि सत्व हे गुण जेव्हा समतोल (Balance) प्रमाणात असतात तेव्हा पृथ्वी जड वाटते. परंतु या त्रिविध गुणांचा समतोलपणा जेव्हा ढासळतो तेव्हा पृथ्वी अस्थिर होते व मग पृथ्वी तऱ्हेतऱ्हेची रूपे घेते. कपिलाने एवढेच सांगितले. परंतु त्यामुळे लौकिक दुःखाचे परिहरण होणार नाही, हे भगवंताच्या लक्षात आले आणि म्हणून त्यांनी चार आर्य सत्यांचा अवलंब केला.
बायबलमधील मोझेससारखी माझी स्थिती होण्याचा संभव आहे. पॅलेस्टाईनमधील गुलामांना सुखी करण्यासाठी मोझेस यास फार परिश्रम करावे लागले. मोझेस इजिप्तमधून गुलाम विकत आणीत असे व त्यांना पॅलेस्टाईनमध्ये नेऊन सुखी व स्वतंत्र करीत असे. या प्रयत्नात मोझेस यास अत्यंत कष्ट सहन करावे लागले. इजिप्तच्या बाहेर जात असताना मोझेसला फार हाल काढावे लागले. कदाचित मजवरही फार हालअपेष्टा सहन करण्याची पाळी येईल पण तरीसुद्धा माझ्या अस्पृश्य समाजास घेऊन मी बौद्ध धर्माचा स्वीकार करणार हे निश्चित.
मी माझे धर्मांतर या ऑक्टोबरमध्ये मुंबईत करणार आहे. त्यापूर्वी या धर्मावर माझे एक पुस्तक मी प्रसिद्ध करणार आहे. भगवंताच्या बुद्ध धर्मात जी त्रुटी आहे त्याचा सविस्तर विचार मी त्या पुस्तकात मांडणार आहे. बुद्ध धर्मात उपासकाला दीक्षा दिली जात नसे. संघ दीक्षेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. उपासकाच्या मनाची परिपूर्ण तयारी झालेली नसते. परंतु माझ्या धर्मात उपासकांनाही धम्म दीक्षा दिली जाईल. तत्पूर्वी धम्म दीक्षेवर मी एक पुस्तक लिहिणार आहे. ते पुस्तक प्रत्येकाला विकत घ्यावे लागेल व त्या पुस्तकातील ठराविक प्रश्नांची उत्तरेही प्रत्येकाला द्यावी लागतील. तरच त्याला बुद्ध धर्मात प्रवेश मिळेल. बुद्ध धर्मात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाने शुभ्रवस्त्र परिधान केले पाहिजे.
धर्म नष्ट का होतो याचा ‘ मिलिंद पन्ह ‘ या ग्रंथात खुलासा आहे. धर्माला जवळजवळ तीन प्रमुख कारणांनी ग्लानी येते. पहिले कारण म्हणजे धर्मतत्त्व अबाधित नसेल किंवा पुरतेपणी विचार न करता धर्मतत्त्वाची बांधणी केली गेली तर धर्माला ग्लानी येते. दुसरे कारण धर्मातील वितंडवाद. ज्या बाजूला वादविवाद पटूंचा भरणा जास्त असतो त्या धर्मपंथाचा नेहमी जय होतो. तिसरे कारण म्हणजे धर्मतत्व हे सामान्यजनांना कळण्याजोगे असले पाहिजे.
अफगाणिस्तान हा सबंध देश एकेकाळी बुद्धभिक्षुकांचा होता. भगवान बुद्धाचा जगामध्ये सर्वात भव्य आणि उंच पुतळा अफगाणिस्तानमध्ये आहे. परंतु धर्मवेड्या मुसलमानांनी ७ हजार बुद्धभिक्षुकांची मुंडकी तोडून रस्त्यावर त्याचा ढीग घातला व म्हणून तेथून बुद्धभिक्षु पळून गेले.
आता बुद्ध धर्माची लाट आली तर ती कधीही परत जाणार नाही. धर्म स्थापनेसाठी देवळांची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु आपल्या स्वकष्टाने मला एक असे देऊळ बांधावयाचे आहे की, जे तुम्ही कधी पाहिले नसेल. पण त्याकरिता मी कोणा धनिकापुढे लाचार होऊन हात पसरणार नाही. तुम्ही पैसे जमवून देत असाल तर बांधीन व चांगले बांधीन. आपल्या स्वपराक्रमाने बांधीन, दुसऱ्याच्या ओंजळीने बांधणार नाही. ”
🔹🔹🔹
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर