मु. नारायणगाव, ता. जुन्नर, येथे भरलेल्या पुणे जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या पहिल्या अधिवेशनात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण….
दिनांक २३ व २४ मे १९३१ रोजी पुणे जिल्हा बहिष्कृत परिषदेचे पहिले अधिवेशन मु. नारायणगाव, ता. जुन्नर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. या परिषदेस पुणे जिल्ह्यातील निरनिराळ्या ठिकाणाहून जवळपास पाच-सहा हजार लोकसमुदाय जमला होता. मुंबईहून श्री. सी. ना. शिवतरकर, श्री. लोटेकर, शंकरराव श्रावण भोसले, श्री. आडरेकर व गणपतबुवा इत्यादी अस्पृश्य वर्गाचे पुढारी तसेच मुन्शीशेठ, देविदास, श्री. रामचंद्र अनाजी, पा. बुट्टे, ऑनररी मॅजिस्ट्रेट व प्रेसिडेंट, ता. लो. बोर्ड, जुन्नर, श्री. दशरथ पांडुजी बनकर, में. डि. लो. बोर्ड, पुणे, श्री. गजानन रावजी पा. भुजबळ, व्हा. प्रेसिडेंट ता. लो. बोर्ड, जुन्नर, श्री. भिमाजी गेनूजी, पा. खेबडे, श्री. डुंबरे, पाटे, खैरे, तांबे, शिंदे मिस्त्री, भुजबळ इत्यादि स्थानिक मंडळी व पुण्याहून सुभेदार घाडगे, थोरात, गायकवाड, चौरे, चंदनशिवे, घोगरे, मधाळे, रणपिसे वगैरे मंडळी प्रामुख्याने हजर होती. याशिवाय मांग व चांभार समाजातील प्रमुख मंडळींनी भाग घेतला होता.
प्रथम स्वागताध्यक्ष श्री. देवजी दगडूजी डोळस यांनी आपल्या भाषणात परिषदेस आलेल्या सर्व मंडळींचे आभार मानून परिषद भरलेल्या गावाचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले. बहिष्कृत समाजाची संघटना बळकट होण्यास प्रथम जातीभेद नाहीसा करण्याचा प्रयत्न व आपली आर्थिक स्थिती बदलण्याचा प्रयत्न या दोन गोष्टीवरच विशेष विवेचन करून त्यांनी आपले भाषण थोडक्यात संपविले. स्वागताध्यक्षांच्या भाषणानंतर परिषदेचे जनरल सेक्रेटरी श्री. शां. अ. उपशाम यांनी परिषदेस आलेले शुभचिंतनपर संदेश वाचून दाखविले. रा. मा. शा. गायकवाड व रा. कों. रा. मास्तर यांनी सूचनेस अनुमोदन दिल्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अध्यक्षस्थान स्विकारले.
पुणे जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या पहिल्या अधिवेशनात परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले,
आपण मला आजच्या परिषदेचे अध्यक्षस्थान दिले, परंतु त्याचा स्वीकार करताना मला संकोच वाटतो. आज या सभेमध्ये आपले परमपूज्य पुढारी रा. कोंडाजी रामजी मास्तर हे हजर आहेत, त्यांच्याबरोबर काम करणारी इतर माणसेही दिसत आहेत. त्याशिवाय जी हजर नाहीत परंतु ज्यांनी माझे अगोदर पुष्कळ वर्षेपावेतो अस्पृश्य वर्गात नेटाने चळवळ केली होती अशी माणसे या जिल्ह्यात आहेत. मला आठवते की, मी मराठी चवथी इयत्तेत होतो तेव्हा पुण्यात श्री. शिवराम जानबा कांबळे, थोरात, रामचंद्रराव कदम इत्यादी माणसे अस्पृश्यांसंबंधी कार्य करीत आहेत, असे माझे वडील सांगत. त्यापैकी श्री. थोरात आज प्रत्यक्ष येथे हजर आहेत. श्री. कांबळे व कदम आजच्या सभेस येऊ शकले नाहीत. अशी जुनी व वयोवृद्ध पुढारी मंडळी असता आजचा अध्यक्षपदाचा मान केवळ तुमच्या अत्याग्रहास्तव मला पत्करावा लागत आहे. असो. आता आपणाला सध्याच्या परिस्थितीत काय करावयाचे आहे याचा विचार अगोदर केला पाहिजे. आपण जरी अस्पृश्य मानले गेलो आहोत तरी आपण माणसे आहोत. इतर समाजाप्रमाणे आपणाला समानतेच्या दर्जाने राहता आले पाहिजे. आपण खर्या मानसन्मानाला पात्र असता इतर समाजाने आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन आम्हाला उलट बहिष्कृत ठरविलेले आहे. हा देश काबीज करून घेण्याकरिता ज्या वीरांचे सहाय्य लाभले ते बहुतेक सारे लढवय्ये वीर आपल्या समाजातले होते. महार सैनिकांच्या बळावर इंग्रजांना आपला येथला अंमल स्थिरावता आला आणि त्याबद्दलचे विजयाचे चिन्ह म्हणून इंग्रजांनी कोरेगावी (भीमा कोरेगाव, पुणे) विजयस्तंभ उभारून आपल्या समाजातील वीर पुरुषांची स्मृती कायम केलेली आहे. त्यावेळचा आपला दर्जा मात्र आज दृष्टोत्पत्तीस पडू शकत नाही. महारांच्या पराक्रमावर इंग्रजांना राज्य मिळाले खरे, परंतु देशातील इतर उच्चवर्णीय लोकांना खूष करण्याकरिता व महारादी अस्पृश्य समजलेल्या लोकांचा दुसरा कोणीच वाली नसल्यामुळे, इंग्रज सरकारने लष्करातील वरिष्ठ दर्जाच्या व इतर जागा महारांना देण्याची बंदी केली. आज अशी परिस्थिती आहे की, लष्करातील महार अधिकार्यांच्या हाताखाली नोकरी करणे हलक्या प्रतीचे समजणारे लोक मुसलनान अधिकार्यांच्या हाताखाली काम करण्यास कोणतीच दिक्कत बाळगीत नाहीत. तीच गोष्ट पोलीस खात्यासंबंधी आहे. परंतु आपल्या गेल्या पाच-सहा वर्षाच्या स्वावलंबी वृत्तीच्या चळवळीमुळे परिस्थितीत थोडाथोडा बदल होत चालला आहे. पोलीस खात्यात आपल्या समाजबंधुंना बऱ्याच सवलती मिळाल्याचे परवाच्या सरकारी पत्रावरून कळून येईल. आपण सर्वांनी यापुढे इतकेच लक्षात ठेवा की, आपणास इतर समाजामध्ये मोठा हुद्दा प्राप्त करून घ्यावयाचा नसून फक्त माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची आहे. आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता हिंदुस्थानातील इतर दरिद्री म्हणविणाऱ्या लोकांपेक्षा आपण अधिक दरिद्री आहोत. दारिद्र्य आपणास का प्राप्त झाले याचा विचार केल्यास ही अस्पृश्यतेची रूढीच आपल्या दुःखाला कारणीभूत आहे, हे दिसून येईल. यासाठी ज्या उपायांनी आपणास आपला माणुसकीचा हक्क प्राप्त करून घेता येईल तो प्रत्येक मार्ग आपण संघटनेच्या बळावर आणि निर्भयपणे आक्रमण करा. नाशिक, पुणे वगैरे ठिकाणची सत्याग्रहाची शस्त्रे पाजळून आपला लढा यशस्वी करण्याची हिंमत बाळगा आणि असल्या सन्मानाच्या व नेटाच्या लढ्याने सर्वजण लढू लागलात तरच आपल्या चळवळीला यश प्राप्त व्हावयास फारसा कालावधी लागणार नाही.
🔹🔹🔹
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्फूर्तिदायक भाषणानंतर परिषदेत स्थानिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय स्वरूपाचे ठराव पास करण्यात आले. विशेषत: लंडन येथे भरलेल्या पहिल्या राऊंड टेबल परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रा. ब. श्रीनिवासन यांनी अस्पृश्य वर्गातर्फे बजाविलेल्या अपूर्व कामगिरीबदल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. निरनिराळ्या ठरावावर श्री. शिवतरकर, हरिभाऊ रोकडे, गायकवाड, कांबळे, दारूळे, ओझरकर, फुलपगार, कोळोखे, विठ्ठल उपशाम, घोगरे, मधाळे, रणपिसे, थोरात, शिशुपाळ, आमोंडीकर, धोत्रे, ठोसर, चौरे, चंदनशिवे, गायकवाड, आडरेकर वगैरे मंडळींची भाषणे झाली.
⚫⚫⚫
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर