September 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

वृत्तपत्र हे चळवळीचे प्रभावी साधन – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

मुंबई म्युनिसीपालिटीत काम करणाऱ्या अस्पृश्य कामगारांच्या सभेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

सोमवार दिनांक २६ ऑगस्ट १९४० रोजी रात्री पोयबावडी, परळ, मुंबई येथील समाज सेवा संघाच्या दामोदर हॉलमध्ये मुंबई म्युनिसीपालिटीत काम करणारे अस्पृश्य कामगार मोठ्या संख्येने जमले होते. हॉल चिक्कार भरून गेला होता. ९ वाजता अस्पृश्यांचे कर्णधार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभास्थानी हजर झाले असता श्रोतृवृंदानी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे प्रेमाने स्वागत केले.

सभेच्या आरंभी म्युनिसीपल कामगार संघाचे चिटणीस भाई प्रधान यांचे भाषण झाले.
त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.

यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
भगिनींनो आणि बंधुनो,
संघाच्या विद्यमाने जरी तुम्ही येथे जमला असलात तरी त्या संघासंबंधी आज मी तुम्हास काही सांगणार नाही. मी आज तुम्हाला अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट सांगणार आहे. ती ऐकून घेण्याकरता व यशस्वीपणे पार पाडण्याकरता मी तुम्हाला आज येथे बोलाविले आहे. आपल्या सर्व चळवळीचे सार आपल्या वर्तमानपत्रात आहे आणि ते वर्तमानपत्र गेली २०-२२ वर्षे कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात तुमच्यासमोर आहे. प्रथम मूकनायक, नंतर बहिष्कृत भारत व आजची जनता ही त्यांची निरनिराळी स्वरूपे आहेत. जनतेस जन्म देणारा भारत भूषण छापखाना आहे. ह्या दोन्ही संस्था मांजरीच्या पिल्लांप्रमाणे मी सांभाळल्या आहेत. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पिल्लांचे संरक्षण करण्याकरिता मांजरीला नाचावे लागते. त्याचप्रमाणे जनता व छापखाना यांना मला अनेक संकटातून वाचवावे लागले आहे. पण अशी स्थिती नित्याची होऊन भागणार नाही.

जनता व छापखाना याजवर परत आज संकट ओढवले आहे. ती ज्या जागेत आहेत ती जागा सोडून जाण्याबद्दल मला नोटीस लागली आहे. म्हणून जनता व प्रेस ह्यांना आता दुसरीकडे निवाऱ्याच्या जागेवर नेणे प्राप्त आहे. ही निवाऱ्याची जागा यापुढे तरी तात्पुरत्या स्वरूपाची असता कामा नये. म्हणून आपली स्वतःची इमारत बांधणे हा अगदी तातडीचा प्रश्न झाला आहे. हा प्रश्न

तुम्ही एकट्याने सोडवावयाचा नाही, हे खरे. तुमच्याप्रमाणे इतरांवरही हा बोजा पडणार आहे आणि इतरांना या कार्यातील आपला योग्य हिस्सा उचलण्याची विनंती करण्यात येईलच. पण तुम्हाला प्रथम बोलाविण्याचे कारण तुम्ही इतर लोकांपेक्षा अधिक संघटित आहात. म्हणूनच तुम्हाला संदेश देणे अधिक सुलभ आहे. तुमच्या संघाचे पाच हजार सभासद आहेत. या सर्व सभासदांकडून प्रत्येकी दोन रुपयेप्रमाणे एकंदर दहा हजार रुपये तुम्ही जमविले पाहिजेत. पहिल्या महिन्यात प्रत्येकाने एक रुपया द्यावा व नंतर एक महिना सोडून दुसऱ्या महिन्यात प्रत्येकाने आपल्या हिश्श्याचा दुसरा रुपया द्यावा.

या कामाकरता एक कमिटी नेमण्यात येईल. त्या कमिटीच्या चिटणीसाचे काम श्री. शांताराम अनाजी उपशाम हे करतील. माझ्या सहीची पावतीपुस्तकें काढण्यात येतील व त्यातील पावत्या घेऊन ज्याने त्याने आपला हिस्सा पुरा करावा. मला येथे एक स्पष्ट खुलासा केला पाहिजे, तो असा, तुम्ही हा जो पैसा देणार तो युनियनचे सभासद म्हणून नव्हे, तर तुम्ही एक अस्पृश्य जातीचे घटक म्हणून तो पैसा देणार आहात. हा पैसा मडकेबुवांच्या मार्फत वसूल केला जाईल, युनियनच्या मार्फत नव्हे. या फंडावर तुमच्या युनियनचा कोणत्याही प्रकारे अधिकार नाही. तेव्हा हे काम जातीचे आहे, असे जाणून तुम्ही या कार्यास ताबडतोब सुरवात करा, असे तुम्हाला माझे आग्रहाचे सांगणे आहे. आज मला अधिक काही बोलावयाचे नाही.

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे