ब्रिटिश पार्लमेंटने निवडलेल्या मतदान चौकशी कमिटीच्या दौऱ्यावर असताना लखनौ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जाहीर सन्मान करण्यात आला. या सन्मान समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या भाषणातील काही भाग….
दुसऱ्या राउंड टेबल परिषदेने ठरविल्याप्रमाणे ब्रिटिश पार्लमेंटने निवडलेल्या मतदान चौकशी कमिटीच्या कामकाजास या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिल्ली येथे लॉर्ड लोथियन यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. प्रथम दिल्ली येथे मतदान कमिटीच्या कामाची सर्वसाधारणरित्या एक ठराविक रूपरेषा आखण्यात आली व त्या रूपरेषेच्या आधारे हिंदुस्थानातील प्रत्येक प्रांतात व त्या त्या प्रांतातील खेडोपाडी सुद्धा जाऊन चौकशी व साक्षी घेण्याचे ठरले. त्या मतदान कमिटीत अस्पृश्य वर्ग व इतर मागासलेल्या समाजाच्या वतीने डॉ. बी. आर. आंबेडकर यांची योजना झालेली होती. बहुजन अशा पददलित आणि मागासलेल्या समाजाच्या समानतेच्या हक्कासाठी या कमिटीच्या वतीने डॉ. आंबेडकर यांनी काम करण्याचे आपले धोरण स्वीकारले होते. दिल्लीहून मतदान कमिटीचा दौरा लखनौ येथे झाला. येथील शहरातील सर्व परिस्थिती स्थानिक मतदान कमिटीच्या सहकार्याने आजमावल्यावर आजूबाजूच्या काही खेड्यापाड्यातून कमिटीचे सभासद चौकशीकरिता गेले.
ब्रिटिश पार्लमेंटने निवडलेल्या मतदान चौकशी कमिटीच्या लखनौ दौऱ्यावर असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जाहीर सन्मान करण्यात आला. या समारंभात केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
अखिल बहिष्कृत समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी बहिष्कृत समाज सेवा संघाचे एखादे मध्यवर्ती मंडळ निर्माण करावयास पाहिजे. शिवाय आपल्या स्वावलंबनाच्या चळवळीचा विस्तृत व सर्व ठिकाणी प्रसार होण्याकरिता निदान प्रत्येक प्रांतात आपले एक तरी वर्तमानपत्र पाहिजे आणि माझी माझ्या सर्व बंधूभगिनींना इतकीच अत्यंत आग्रहाची विनंती आहे की, आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपले राजकीय हक्क मिळविण्यासाठी शक्य तितके जोमाचे प्रयत्न केले पाहिजेत, नाही तर भावी राज्यात आपली फारच शोचनीय अवस्था होईल ही गोष्ट नीट लक्षात ठेवा.
***
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर