July 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

चळवळीचा फायदा सर्वच अस्पृश्यांना झाला – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

कुलाबा जिल्हा उत्तर भाग व ठाणे जिल्हा दक्षिण भाग अस्पृश्यांची संयुक्त परिषद पार पडल्यानंतर पनवेल येथील चांभार लोकांकडून दिलेल्या पानसुपारी समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

कुलाबा जिल्हा उत्तर भाग व ठाणे जिल्हा दक्षिण भाग अस्पृश्यांची संयुक्त परिषद भरली त्याच दिवशी म्हणजेच दिनांक २९ फेब्रुवारी १९३६ रोजी रात्री ९-३० वाजता श्री. राघोबा वनमाळी यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल तालुक्यातील चांभारांची एक सभा पनवेल येथे भरली होती. या सभेत खालील ठराव पास करण्यात आले :–

ठराव १ ला – बादशहा पंचम जॉर्ज यांचे निधनाबद्दल दुःख व नवे बादशहा आठवे एडवर्ड यांचे अभिनंदन.
ठराव २ रा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेवर पूर्ण विश्वास.
ठराव ३ रा – मु. येवले, जिल्हा नाशिक येथील धर्मांतराचे ठरावास पाठिंबा.

या सभेस श्री. शिवतरकर, गवरूजी उरणकर, महादेव कल्याणकर, मारुती मोहोकर, महादेव महाडीक वगैरे वक्त्यांची भाषणे झाली. शेवटी अध्यक्षांनी डॉ. आंबेडकर व त्यांचे धर्मांतराचे धोरण या बाबतीत समारोपादाखल परिणामकारक असे भाषण केल्यावर सभा बरखास्त झाली.

 

पानसुपारी समारंभ

रविवार, दिनांक १ मार्च १९३६ रोजी कुलाबा जिल्हा उत्तर भाग व ठाणे जिल्हा दक्षिण भाग अस्पृश्यांच्या संयुक्त परिषदेचे काम आटोपल्यावर पनवेल येथील चांभार लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पानसुपारीचे आमंत्रण दिले. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आबेडकरांना वेळ नव्हता तरी त्यांनी हे आमंत्रण आनंदाने स्वीकारले. सदर प्रसंगी श्री. वनमाळी यांनी ग्रामस्थ लोकांच्या आग्रहावरून त्यांचेतर्फे छोटेसे भाषण केले.

या भाषणात श्री. वनमाळी यांनी सांगितले की,
” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथील चांभार लोकांच्या आमंत्रणास मान देऊन आपल्या पुण्य दर्शनाचा लाभ त्यांस दिला याबद्दल त्यांना फार आनंद होऊन ते आपले (डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे) फार आभारी आहेत. या ठिकाणच्या चांभार-महारात कोणत्याही प्रकारचा मतभेद नसून येथील चांभारांनी डॉक्टरांना येताना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. तसेच तेथे निघालेल्या मिरवणुकीच्या वेळी त्यांच्या फोटोस हार घालून त्यांच्यावरील आपले प्रेम व्यक्त केले. परिषदेच्या खुल्या अधिवेशनात स्त्री-पुरुषांनी खुल्या दिलाने भाग घेऊन धर्मांतराच्या ठरावास पाठिंबाही दिला आहे. शिवाय काल रात्री येथे एक स्वतंत्र सभा भरवून त्यांच्यावरील विश्वास जाहीर करून धर्मांतराबाबत स्वतंत्र ठराव करण्यात आला. आता आपणास आमची हीच विनंती आहे की, जसे आपण आपल्या समाजाच्या उन्नतीप्रित्यर्थ झटता तसे आमच्याकडेही विशेष लक्ष असू द्या. आमच्यातले काही लोक आपणास विरोध करतात. त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. आपणच आमचे खरे पुढारी आहात.” अशा आशयाचे श्री. वनमाळी यांचे भाषण झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले.

याप्रसंगी बोलताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
आपण मला या ठिकाणी बोलावून माझा जो गौरव केला त्याबद्दल मी आपले प्रथम आभार मानतो. मला आता काही बोलावयाचे नव्हते, पण रा. वनमाळी यांच्या भाषणात जो थोडा ध्वनी निघाला त्यावरून आपणास माझ्याबद्दल थोडी शंका आल्याचे मला वाटते, परंतु मी आपणास असे सांगतो की, माझी चळवळ अमुक एका वर्गाची किंवा अमुक एका जातीच्या उन्नतीकरता आहे असे नसून ती सर्व अस्पृश्यांच्या उन्नतीकरता आहे. दुर्दैवाची किंवा सुदैवाची गोष्ट ही की, ती चळवळ एकट्या महार समाजाने चालविली आहे. इतर जातींनी जर ती हाती घेतली तर मी महार जातीस सांगेन की, तुम्ही स्वस्थ बसा. आतापर्यंत जी चळवळ झाली तिचा फायदा एकट्या महार जातीला न होता चांभारांना व मांगांनाही झाला आहे. शाळा खात्यात सुपरवायझर नेमा म्हणून आम्ही मुंबई म्युनिसीपालिटीस सांगितले. म्युनिसीपालिटीने सुपरवायझर नेमले ते चांभार व सध्या ते गृहस्थ हे माझ्या शेजारी बसले आहेत (मे. शिवतरकरांकडे बोट दाखवून). पोलीस ट्रेनिंग कॉलेजात अस्पृश्य लोक घ्यावे असे सरकारस सांगितले तेव्हा सरकारने घेतले त्यातही महार नसून चांभार व मांगच आहेत. या उदाहरणावरून माझी चळवळ महारांच्याच हिताची कशी हे मला समजत नाही. आता चालू चळवळीबद्दल थोडा खुलासा करतो. अस्पृश्यातील सर्व जातींनी धर्मांतर करावे अशी माझी इच्छा आहे, परंतु इतर जातींनी माझे न ऐकता त्या जर स्वस्थ बसल्या तर माझा नाईलाज आहे, परंतु ज्या जाती मागे राहातील त्यांची स्थिती फार केविलवाणी होईल हेही मी तुम्हास सांगून ठेवतो. कारण मग अस्पृश्यता निवारण्याचा लढा तुम्हास लढावा लागेल व ते फार कठीण काम होईल. कारण महारांची लोकसंख्या ८० टक्के आहे. हे इतके बहुसंख्य लोक तुमच्यातून निघून गेल्यावर बाकीचे लोक काय करू शकतील ? आजच इतक्या चळवळी करूनसुद्धा काही दाद लागत नाही तर पुढे काय लागणार ? तेव्हा तुम्ही बहुजन समाजाबरोबर धर्मांतर करण्यातच तुमचे हित आहे. महार जातीकडून तुमच्याबाबतीत काही अन्याय झाला तर मला सांगा, मी त्याचा योग्य परामर्श घेईन.

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे