July 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बहुसंख्यांक असा शेतकरी व कामकरी वर्ग या देशाचा खरा सत्ताधारी वर्ग बनला पाहिजे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

कोकणातील महारादी अस्पृश्यांच्या कणकवली येथील परिषदेनंतर देवरूख येथे भरलेल्या शेतकऱ्यांच्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

कणकवली येथील कोकणातील महारादी अस्पृश्यांच्या दिनांक १४ मे १९३८ च्या परिषदेनंतर येथून १०० मैलांवर असलेल्या देवरूख येथे शेतकऱ्यांची सभा भरविण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या प्रमुख पुढारी मंडळीसहित दिनांक १५ मे १९३८ रोजी दुपारी एक वाजता मोटारीने आले. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करण्याकरिता ४-५ हजार शेतकरी बांधव मोठ्या उत्सुकतेने त्यांची वाट पाहात होते. या सभेत स्पृश्यास्पृश्य शेतकरी बांधवांबरोबर मुसलमान शेतकरी बांधवही हजर होते ही गोष्ट विशेष होय.

या सभेत भाई चित्रे, डी. व्ही. प्रधान, सुरबा टिपणीस, भास्करराव कोवळे, घाटगे वगैरे पुढारी मंडळींची जोरदार भाषणे झाली.

याप्रसंगी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले की,                                                                     आपला उद्देश खोती बिल पास करणे व शेतकरी वर्गाची गरीब परिस्थिती सुधारणे हा आहे. शेतकऱ्यांनी आपला सनदशीर लढा लढावा व तो लढत असता सर्व बाजूनी शेतकऱ्यांनी आपली संघटना करावी. काँग्रेसने जर खोती बिल नामंजूर केले तर पुढे सत्याग्रहरुपी मोहीमेस शेतकऱ्यांनी सज्ज असावे. कुणबी वर्गाने याहीपेक्षा मोठ्या संख्येने स्वतंत्र मजूर पक्षाला येऊन मिळावे. कारण हाच पक्ष गरीब, कामकरी, शेतकरी वर्गाचे हित साधणारा आहे. उलट कॉंग्रेस ही सावकार, खोत व पांढरपेशे यांची आहे. कारण ती त्यांच्या पैशावर जगत आहे म्हणून तिच्या मार्फत शेतकऱ्यांचे भले होईल अशी आशा शेतकऱ्यांनी बिलकूल बाळगू नये. तेव्हा सर्व जाती, पंथ भेद दूर ठेऊन सर्व शेतकऱ्यांनी हा लढा जोराने व संघटीतपणे व शिस्तीने लढावा. आपला लढा खऱ्या तत्त्वाचा आहे. हिंदी राजकीय सत्ता शेठजी, भटजी, सावकार, जमिनदारादी भांडवलवाल्यांच्या काँग्रेसच्या हाती जाण्यापेक्षा खऱ्या श्रमजिवी वर्गाच्या हाती गेली पाहिजे. बहुसंख्यांक असा शेतकरी व कामकरी वर्ग या देशाचा खरा सत्ताधारी वर्ग बनला पाहिजे आणि याच दृष्टीने आमचा स्वतंत्र मजूर पक्ष घडाडीने कार्य करावयास पुढे सरसावला आहे.

सभा ” जय आंबेडकर ”  व ” खोतीशाही नष्ट हो”  ह्या जयघोषात बरोबर ५.३० ला संपली.

नंतर त्याच दिवशी म्हणजेच दिनांक १५ मे १९३८ रोजी संध्याकाळी अरवली (ता. संगमेश्वर) येथे सायंकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आमदार घाटगे व आमदार चित्रे यांची शेतकऱ्यांना आपला लढा असाच सनदशीरपणे लढावा व स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद व्हावे वगैरे विषयांवर भाषणे होऊन सभा ८ वाजता आटोपली. नंतर सर्व मंडळी डॉ. बाबासाहेबांसहीत चिपळूण येथे डाक बंगल्यात रात्री ९ वाजता पोहचली. तेथे नाईस्कर बंधूंनी सर्व पाहूणे मंडळीला सुग्रास जेवण दिले. नंतर १६ तारखेला सकाळी श्री. गडकरी वकील यांनी पाहुणे मंडळीला अल्पोहार दिला व सर्व मंडळी बाबासाहेबांसहीत स्वतंत्र मजूर पक्षाचे ऑफिस पहाण्यास गेली. स्वतः बाबासाहेबांनी चिपळूण शाखेची ऑफिस तपासणी केली व सर्व व्यवस्था नीट पाहून बाबासाहेब व पाहुणी मंडळी श्री. नाईस्कर यांच्या निवासस्थानी दुपारी जेवणास गेली. तेथे विश्रांती घेतल्यावर मंडळी १.३० ला गुहागर पेठा येथे जाण्यास निघाली. गुहागर येथे २.३० ला डाक बंगल्यात सर्व मंडळी पोचली. श्री. आसगोलकर, पोलीस पाटील यांनी ओले नारळ व आंबे यांचा पाहुणे मंडळीला अल्पाहार दिला. थोडी विश्रांती घेतल्यावर बाबासाहेब व पाहुणे मंडळी सभेच्या ठिकाणी ३.३० ला आली. सभेत आमदार घाटगे, भाई कोवळे, भाई टिपणीस यांची भाषणे झाली व डॉ. बाबासाहेब यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना आपली गरीब परिस्थिती कशी सुधारावी व सर्व शेतकऱ्यांनी संघटीत होऊन ह्या जुलमी खोती पद्धतीला समूळ नष्ट करून टाकले पाहिजे. तरच शेतकऱ्यांची ही दीन अवस्था बदलेल असे सांगून काँग्रेसने जर खोती बिल पास केले नाही तर पुढील लढा कसा लढावा ह्याबद्दल थोडक्यात सूचना दिली. सभा ” आंबेडकर घोषात ”  व  “खोती पद्धती नष्ट होवो ” ह्या घोषात बरखास्त झाली. नंतर बाबासाहेब व पाहुणे मंडळी गुहागर पेठेतील श्री. खोत यांचे घरी अल्पोपहारास्तव थांबली. थोडी विश्रांती घेतल्यावर मंडळी ६ वाजता गुहागरहून निघाली ती थेट चिपळूण येथे सभामंडपात ७.३० ला आली. प्रथमतः भाई कोवळे यांचे भाषण झाल्यावर आमदार घाटगे यांनी शेतकरी बंधुना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सध्या शेतकऱ्यांसाठी दौरा काढण्याचे महत्त्व समजावून दिले व शेतकऱ्यांनी याहीपेक्षा जास्त जमावाने सभेला हजर राहावे व स्वतंत्र मजूर पक्षाचे निशाणाखाली जमून खोती पद्धत नष्ट करण्यास डॉ. बाबासाहेबांस मदत करावी असे सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा घेतल्या नंतर सर्व मंडळी ८ वाजता चिपळूणहून निघाली, वाटेत परशराम देऊळ पाहाण्यास मंडळी गेली, देऊळ पाहून झाल्यावर देवळाचे ट्रस्टी यांचे येथे डॉक्टरसाहेब व पाहुणे मंडळी यास चहा, अल्पोपहार देण्यात आला. नंतर ९.३० ला परशरामहून मुक्काम हलविण्यात आला तो थेट खेड येथे डाक बंगल्यात मंडळी येऊन पोहचली. श्री. जाधव यांनी पाहुणे मंडळीला चहा व अल्पोपहार दिला. तेथे डॉ. बाबासाहेब व पाहुणे यांनी २ वाजेपर्यंत विश्रांती घेतली व सभेचे ठिकाणी (खेड) सभामंडपात दाखल झाली. प्रथमतः श्री. खांबे, तालुका सेक्रेटरी व आमदार घाटगे यांनी भाषणास सुरुवात केली व शेतकऱ्यांनी आपला लढा सनदशीर मार्गाने लढावा व डॉ. बाबासाहेबांच्याच नेतृत्वाखाली विजय मिळवावा, अशा तऱ्हेने थोडक्यात भाषण केल्यावर बाबासाहेबांनी भाषणास सुरवात केली. सभेत  “आंबेडकर की जय “,  “खोतीशाही नष्ट हो ” वगैरे जयघोष होऊ लागले. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांना संघटित होण्यास व पक्षाची सभासद संख्या वाढवण्यास उपदेश केला व त्यांनी मांडलेले खोती बिल जर नापास झाले तर पुढे शेतकऱ्यांनी काय करावे याची त्यांना आगाऊ सूचना दिली व शेतकऱ्यांनी न्यायाने व सनदशीरपणाने वागून आपला सध्याचा लढा लढावा. कारण दुसऱ्या कोणत्याही मार्गानी शेतकरी वर्गाचा लढा यशस्वी होणार नाही. स्वतंत्र मजूर पक्षावर पूर्ण विश्वास असू द्यावा व हाच पक्ष तुम्हा शेतकरी वर्गाचे व गरीब जनतेचे हित करणार आहे, इतर कोणत्याही पक्षावर विश्वास ठेऊ नका. यानंतर श्री चित्रे, टिपणीस, प्रधान यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांनी संघटित व्हावे व डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सध्याचा लढा लढावा अशी उपदेशपर भाषणे करून स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद व्हावे असे सांगून आपली भाषणे संपविली. नंतर सभा संपून बाबासाहेब व पाहुणे मंडळी खेडहून दापोलीस जाण्यास निघाली. वाटेत फूरूस मुक्कामी (आमदार घाटगे यांचे घरी) सुभेदार घाटगे व गावपुढारी, स्काऊट व गावातील काही प्रमुख खोत डॉ. बाबासाहेबांस सामोरे आली. पुढे “आंबेडकर झिंदाबाद” वगैरे जयघोषात फुरूस महारवाड्यात जेवण्यास आली. येथे श्री. सुभेदार घाटगे, पेन्शनर गणपत सोनु गमरे या वृद्ध पुढाऱ्यांनी पाहूण्यांची योग्य ती बडदास्त राखली व जेवण झाल्यावर डॉ. बाबासाहेब व पाहुणे फुरुस गावच्या आखाड्याचे मर्दानी खेळ पहाण्यास थांबले. नंतर डॉ. बाबासाहेब स्काऊट सहित रस्त्यापर्यंत चालत गेले व  “डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार”  व  “खोतीशाही नष्ट हो” अशा जयघोषानी फुरूस गावातील मुसलमान खोत फार हादरून गेले. कित्येक खोत बाबासाहेबांचे दर्शन दडून घेत होते. स्काऊटची व आखाड्याची व्यवस्था श्री. भी. गो. घाटगे व माधवराव फुरीसकर, गमरे यांनी उत्तम रीतीने राखली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दौऱ्यात प्रथमतः ओवाळणी मुक्काम फुरूस येथे सुहासीनी सुभेदारीण लक्ष्मीबाई घाटगे, सौ. गंगुबाई गमरे व सौ. मुक्ताबाई घाटगे यांनी केली व नंतर कु. मुक्ताबाई घाटगे यानी मंगल पद सुस्वर सुरात गाईले. ५.३० वाजता डॉ. बाबासाहेब व पाहुणे मंडळी फुरसाहून निघाली. जातेवेळी सुभेदार घाटगे व पेन्शनर गणपत गमरे यांनी सर्वास निरोप दिला. दापोलीला काळकाईचा कोड येथे डॉ. बाबासाहेबांची व पाहुणे मंडळीची उतरण्याची सोय करण्यात आली होती. तेथे चहा घेतल्यावर अध्यक्ष व पाहुणे मंडळी सभेच्या ठिकाणी ८ वाजता पोहोचली.

 

                                                                                  दापोलीची जाहीर सभा

नंतर सभेस सुरवात झाली. प्रथमतः सेक्रेटरी श्री. खांबे यांनी थोडक्यात डॉ. बाबासाहेबांच्या दौऱ्याबद्दल माहिती देऊन सभेस सुरवात केली. डॉ. बाबासाहेब हे स्वतः भाषण करण्यास उठले. पण मागील सभांच्या भाषणांमुळे त्यांचा गळा एवढा बसला होता की, शेवटी त्यांस बोलता न आल्यामुळे भाई चित्रे हेच आपल्याला मी जे काही सांगणार आहे तेच त्यांच्या तोंडून ऐकावे एवढे बोलून बाबासाहेब खुर्चीवर बसले. नंतर चित्रे ह्यांनी दौऱ्याची सविस्तर हकीगत सांगून डॉक्टरसाहेबांच्या प्रकृतीवर किती परिणाम झाला हे दर्शविले व डॉ. बाबासाहेबांना जे काही शेतकऱ्यांना सांगावयाचे होते ते त्यांनी उत्तम रीतीने जमलेल्या समुदायाला पटवून दिले. शेतकऱ्यांना होत असलेला खोतांचा जुलूम निदान खोती बिलाचा निकाल लागेपर्यंत तरी सोशीला पाहिजे. कारण आज काँग्रेस सरकार, अंमलदार, कोर्ट कचेरी सर्व खोतांच्या, शेठ सावकरांच्या बाजूला आहे. पण आपला हा लढा असाच नेटाने, एकीने लढत ठेवावा व त्यासाठी वेळप्रसंगी प्राणांची आहुतीही देण्याचा प्रसंग आला तरीही मागे हटले न पाहिजे. हेही करून भागणार नाही तेव्हा काँग्रेसप्रमाणे आपणही आपले हक्क शाबीत करण्यासाठी तुरुंगही भोगला पाहिजे. शेवटी पावसाळ्यानंतर ह्या खोती बिलाचा काय निकाल लागतो त्यावर पुढील लढा अवलंबून राहील. तरी सध्या निराश न होता एकी व सहनशीलता ठेऊन सध्याचा लढा लढावा. नंतर भाई टिपणीस, प्रधान, चिटणीस व कोवळे यांची जोरदार व उपदेशपर भाषणे झाली. शेवटी आमदार घाटगे ह्यांनी आपल्या जबाबदारीवर दौरा पार पाडण्याची जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडली. सर्व स्थानिक पुढारी व कार्यकर्ते ह्यांनी ह्या कामी त्यांना मदत केली. त्याबद्दल स्वतंत्र मजूर पक्षातर्फे भाई चित्रे यांनी सर्वांचे आभार मानले व आमदार घाटगे यांनी डॉ. बाबासाहेब व पाहुणे मंडळी यांनी आपला अमूल्य वेळ खर्चून या भागात दौरा काढला ह्याबद्दल आभार मानून अध्यक्षांना पुष्पहार घातला व भगिनी समाजातर्फेही अध्यक्षांना पुष्पहार घातला.

या सर्व सभांमध्ये १० ते १५ हजारांपर्यंत कुलवाडी महार, मुसलमान वगैरे सर्व जातीचे, धर्माचे शेतकरी बांधव मोठ्या प्रेमाने, उत्सुकतेने, आस्थेने आणि संघटनेने हजर राहिले होते. प्रत्येक सभेत २०-२०, २५-२५ मैलांवरून कित्येक शेतकरी आलेले होते.

 

⚫⚫⚫

 

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे