कोकणस्थ महार को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, खार, मुंबई तर्फे नवीन दुमदार घरे बांधल्याच्या आनंदोत्सवाप्रित्यर्थ दिलेल्या टी पार्टी व गार्डन पार्टीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण…
रविवार दिनांक २२ सप्टेंबर १९४० रोजी श्री. चांगदेव नारायण मोहिते, श्री. गणपत विठ्ठल कासारे आणि श्रीमती मुक्ताबाई दगडू साताम्बेकर या तिघांनी खार येथे नवीन दुमदार घरे बांधल्याच्या आनंदोत्सवाप्रित्यर्थ कोकणस्थ महार को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, खार, मुंबई तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना थाटाची टी पार्टी दिली. प्रथम मोहिते मास्तर यांनी स्वगृही डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समवेत सर्व पाहुणे मंडळीचा ग्रुप फोटो घेण्यात आला. फोटोनंतर सर्वांना थाटाची गार्डनपार्टी देण्यात आली. नवीन तीन घरे व कॉलनीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करण्यात आल्यानंतर श्री. मोहिते मास्तर यांनी डाॅ. बाबासाहेबांचे आणि आलेल्या पाहुणे मंडळीचे समयोचित शब्दात आभार मानले. पाहुणे मंडळीतर्फे सुरबा टिपणीस यांनी यजमानांचे आभार मानले. शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलावयास उभे राहिले.
याप्रसंगी बोलतांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
मला तुमची घरे पाहून फार आनंद होत आहे. तुम्ही हे धाडस केल्याबद्दल मला अभिमान वाटतो. त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करितो. हे तुमचे सुख पुत्रपौत्रापर्यंत कायम टिकेल असा प्रयत्न झाला पाहिजे. घराचे हप्ते व्यवस्थित देऊन संसार सुखाचा करा. तद्नंतर त्यांनी दापोली कॅम्प येथील सेवानिवृत्त सुभेदारांचे वैभव आणि जीवनक्रम सांगितला. त्यानंतर त्यांच्या मुलाबाळांची झालेली दुर्दशा वर्णन केली. बाप सुभेदार व मुलगा झाडुवाला हे अत्यंत मोठे दुर्दैव होय. तेव्हा तुम्ही सर्वांनी दूरदृष्टीने आणि काटकसरीने वागून तुमचे हे वैभव भावी पिढीने टिकविले पाहिजे. ज्यांना शक्य असेल त्यांनी अशा तऱ्हेची घरे जरूर बांधावी आणि आपला संसार सुखाचा करावा. तुमच्या शेजारी झोपड्यात जीवन कंठणाऱ्या आपल्या गरीब भाऊबंदांशी गुण्यागोविंदाने वागा. त्यांच्यासाठी चांगली घरे बांधून देण्याविषयी मी सरकार व बांद्रा म्युनिसीपालिटीकडे प्रयत्न चालविला आहे.
🔹🔹🔹
शेवटी यजमानांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले भाषण संपविले. या प्रसंगी प्रो. व्ही. जी. राव, बॅ. एस्. एन. माने, मेसर्स कमलाकांत चित्रे, भाई चित्रे, सुरेन्द्रनाथ टिपणीस, इझिकेल, आर. जी. भातणकर, के. व्ही. सवादकर, टी. टी. शिर्के, एन. बी. आसगोलकर, एस्. एल. वडवलकर, संभाजी गायकवाड, बी. बी. उनबरकर वगैरे प्रमुख मंडळी हजर होती.
*
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर