तो मूर्तीतला विठोबा बुद्ध जरी असला!
शेंदूर फासलेला बुद्ध देव जरी नसला!
तरी धम्माला कुठे फरक पडला आहे?
त्याला मिटवण्याचे लाख प्रयत्न झालेत म्हणा…
तरी तो आज ही मानवतेशी
जोडला आहे!
ते पूजत आलेत…
पूजत राहतील…
जे त्यांना दिसलं आहे!
कधी वाचून ही बघावा इतिहास
हे त्यांना कुठे सुचलं आहे!
भले त्यांनी त्यांना हवं तसं गिरवलं आहे!
भक्तांनी ही नको तितकं मिरवलं आहे!
अनेक लेण्या, बुद्ध विहारं
आज मंदिरं झालीत!
तेहत्तीस कोटीपैकी एक तरी आहे प्रत्येकाच्या खोलीत!
म्हणून…
तुझ्या तर्कसंगत पुराव्याला
येथे कापरा सारखा जाळला जाईल!
तेहत्तीस कोटीपैकीचं एखादा तुझ्यासमोर मांडला जाईल!
तू दिलेस जरी दाखले…
ते नाकारण्यात धन्यता मानतील!
तू सत्यमेव जयते बोलताच
ते पोथी पुराण सांगतील!
तू पेटून सांग…
किंवा रेटून सांग…
हजारो वर्षे टाळ मृदुंगाच्या आवाजाचे कान ही गुलाम झालेत!
ते सहसा सत्य ऐकणार नाही.
कारण…
श्रद्धेच्या नावाखाली सत्य झोपवलं गेलंय!
भोळ्या भाबड्या मनांवर असत्य थोपवलं गेलंय!
म्हणून…
तू लढ विचारांची लढाई…
मूर्त्यांचं राहूदे!
त्या मूळ रूपात येतीलच…
सत्य पुढे जाऊदे!
कारण…
मूर्त्यांवरचा शेंदूर सहज काढता येईल ही म्हणा!
पण बुद्धीवर फासलेल्या शेंदूराच काय?
ते तर ज्याचे त्याचे स्वतःलाच
काढावे लागेल!
सत्य असत्यच्या कसोटीवर
विज्ञान जोडावे लागेल!
तेंव्हा…शेंदूरच्या पलीकडचा
बुद्ध अगदी स्पष्ट दिसेल!
मोक्ष नाही मार्ग दाखवणारा!
स्वर्ग नरकाच्या निरर्थक कथा पायदळी तुडवणारा!
भूत भविष्यात न रमवता वर्तमान समृद्ध करणारा!
प्रेषित व्हा बोलणारा नसून
प्रेरित व्हा बोलणारा!
भक्तीत बुडावणार नसून
स्वयंम प्रकाशित व्हा बोलून
वैचारिक समाज घडवणारा बुद्ध स्पष्ट दिसेल!
अगदीच स्पष्ट दिसेल…
आणि कोणी डोळेझाक केलीच म्हणा!
तरी…
धम्माला कुठे फरक पडला आहे?
कवी/लेखक : सुमेध मधुकर सोनावणे
9967162063
More Stories
बाबा तुम्ही नसतात तर
बुद्धपौर्णिमेचं चांदणं
रात्र ती वैरीण