February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

माणुसकीच्या हक्कासाठी जुलूमाविरूद्ध बंड पुकारा – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

नाशिक जिल्ह्यातर्फे भरविण्यात आलेल्या स्वाभिमान संरक्षक परिषदेच्या अधिवेशनात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण….

रविवार दिनांक २६ मे १९२९ रोजी स्वाभिमानी संरक्षक परिषदेचे अधिवेशन नाशिक जिल्ह्यातर्फे मु. चित्तेगाव येथे भरविले गेले होते. हे अधिवेशन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, बार-ॲट-लाॅ, एम. एल. सी. यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या अधिवेशनात जवळजवळ सहा हजार प्रेक्षक आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते. अधिवेशनाकरिता नाशिकहून प्रो. सबनीस, मेसर्स गायकवाड, शेठ रणखांबे, काळे वगैरे मंडळी व देवळालीहून स्वयंसेवकांचे पथक तसेच मुंबईहून समतापत्राचे संपादक श्री. देवराव नाईक, समाज समता संघाचे मेसर्स द. वि. प्रधान, रा. कवळी (बी. ए.), भा. वि. प्रधान (बी. ए., एलएल. बी.), भो. बा. देशमुख (एम. ए.), शं. शां. गुप्ते (बी. एस्सी.), भा. र. कद्रेकर वगैरे मंडळी आली होती. स्वागताध्यक्ष श्री. रोकडे शेठ आजारी असल्यामुळे त्यांचे भाषण होऊ शकले नाही.

स्वाभिमान संरक्षक परिषदेच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले,
स्वाभिमान संरक्षणाची चळवळ जोरात सुरू करणे आजच्या परिस्थितीत प्राप्त झाले आहे. ह्या चळवळीच्या बळावर स्पृश्य व अस्पृश्य समाजातील भेदाभेदाची जाणीव होईल आणि सर्व समाजात समता प्रस्थापित करण्यास संधी प्राप्त होईल. अस्पृश्योद्धार वगैरे उद्धाराच्या गप्पा मारण्याचा समय निघून गेला असून आज प्रत्यक्ष स्वाभिमान जागृतीचा समय येऊन ठेपला आहे. अस्पृश्य समाजाच्या एकंदर परिस्थितीकडे पाहिले तर त्यांच्या स्थितीबद्दल पूर्ण असमाधान दिसून येईल. जन्माने अस्पृश्य मानलेल्या समाजात समावेश झाल्यामुळे उच्चवर्णीय समाजबांधवांपेक्षाही अंगी अलौकिक गुण असून काही करता येत नाही. उच्चवर्णीयांनी उपस्थित केलेली परिस्थिती आपणास आपल्या स्वाभिमानपूर्वक ध्येयास किंवा कार्यास बाधक होत आहे. देवालय प्रवेश, तळी, विहिरी इत्यादी ठिकाणी प्रवेश करण्यास अस्पृश्यांना मनाई केली जाते. त्यांच्यावर अत्याचार केले जातात. अशा हीन परिस्थितीतून मुक्त होण्यासाठी अस्पृश्य बांधवांना आपला स्वाभिमान जागृत करून माणुसकीच्या हक्कासाठी निकराचा हल्ला चढविला पाहिजे. नुसत्या शिक्षणाने माणुसकी मिळती तर वरिष्ठ वर्गासारख्या सुशिक्षित वर्गाकडून आम्हा अस्पृश्य बांधवांवर ह्या सुधारणेच्या काळात अन्यायाचे अत्याचार झाले नसते. हिंदु समाजाने निष्कारण आपला हीन दर्जा ठरविला आहे. हा हिनत्वाचा कलंक धुवून काढण्याकरिता मला हा स्वाभिमान जागृतीचा मार्ग योग्य असा वाटत आहे. एवढ्याकरिता माझ्या बांधवांनो, स्वाभिमान जागृत ठेवा. आपणावर होत असलेल्या अन्यायी जुलुमाविरुद्ध बंड पुकारल्याशिवाय आपल्याला खऱ्या माणुसकीचे हक्क प्राप्त होणार नाहीत.

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे