August 4, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

सुमेध बोधिसत्व

सुमेध बोधिसत्व – नक्कीच बुद्ध होणार
सीमावर्ती प्रदेशातील रमणीय नगर आज सडा सारवण करून सुशोभित केले आहे. नगरातील सार्वजनीक चौकात उभारलेला अंत्यत भव्य असा सुंदर मंडप नगराची शोभा वाढवत आहे. नगरातील सर्वच लोक नविन वस्र परिधान करून
सुसज्ज आहेत. जणु काही नगरामधे मंगलमय समारंभ असावा अशीच परिस्थिती.
नगरामधे आदल्या दिवशी जोरात पाऊस झाल्याने कच्ची सडक उध्वस्त झाली आहे. नगरातील काही लोकं खडी आणि सुकी माती आणून चिखल बुजविण्यात व्यस्त आहेत. असे असताना एक पाहुणा सन्यासी विचारतो की,
“आज नगरामधे काही सण उत्सव आहे का?”
लोक सांगतात की,
तुम्ही या नगरात नविन आलेले पाहुणे आहात वाटतं, त्यामुळेच तुम्हाला काही माहित नाही. भगवान दिपंकर बुद्ध नगरातील सुदर्शन विहारात थांबले आहेत व लवकरच त्यांचे ईकडे आगमन होणार आहे, ते याच रस्त्याने येणार आहेत. रस्त्यावर चिखल साचला आहे, म्हणुन आम्ही रस्ता दुरूस्त करत आहोत.”
हे ऐकून बोधिसत्व सुमेधला वाटले की यालोकी सम्यक संबद्ध प्रकटले आहेत. मी पण त्यांना भेटुन आशिर्वाद घेतला पाहिजे. असा विचार करुन बोधिसत्व सुमेध देखिल रस्ता दुरूस्तीच्या कामाला लागला. सुकी माती आणुन चिखलावर टाकु लागला पण तेवढ्यात दिपंकर बुद्धाचे आगमन झाले. थोडासा रस्ता अजुनही दुरूस्त करायचा राहिलेला आहे, त्यावर चिखल आहे हे सुमेधच्या लक्षात आले.
म्हणून त्याने त्या चिखलावर आपली संघाटी व मृगजीन टाकले, पण काही जागा अजुनही बाकी होती. हे बघून बोधिसत्व सुमेध मनामधे विचार करतो की,
“भगवान दिपंकर बुद्ध व भिक्षुंसंच्या पायांना जर चिखलाचा स्पर्श होत असेल तर माझा जगुनच काय फायदा. माझ हे शरीर काय कामाचं.”
असा विचार करुन सुमेध चिखलात तोंड घालून पोटावर झोपला जेणेकरून तथागत त्याच्या पाठीवर पाय देउन जातील. चिखलात झोपलेला सुमेध विचार करतो की,
“मी ध्यान समाधीच्या सर्वच आवस्थां प्राप्त केल्या आहेत.
पारमीता पण परिपूर्ण आहेत. जर मी भगवान दिपंकर बुद्धांच्या संघात दिक्षा घेतली तर लगेच अरहंत पदास पोहचुन विमुक्ती सुखाचा लाभ घेऊ शकतो. पण एवढ्यासाठीच पुरूषार्थ करावा का? मी माझ्याच मुक्तीसाठी प्रयत्न करने मोठी स्वार्थी गोष्ट होईल. मी सुद्धा दिपंकर बुद्धाप्रमाणे सम्यक संबद्ध होऊन अनेक लोकांचं कल्याण केलं पाहिजे. अनेकांना दुःखातुन मुक्त करून निर्वाण सुखाचा लाभ करुन दिला पाहिजे. पण त्यासाठी मला मला स्वतः ला सम्यक संबद्ध झालं पाहिजे यासाठी खुपच वेळ लागणार व अपार मेहनत घ्यावी लागणार. कितीही वेळ व मेहनत घ्यावी लागली तरी चालेल अनेकांच्या सुख व हितासाठी मी सुद्धा भगवान दिपंकर बुद्धाप्रमाणे सम्यक संबद्ध होणार. तथागत बुद्ध सुमेधच्या मनातील विचार ओळखून म्हणतात की,
“भिक्षुंनो हा चिखलात झोपलेला उग्र सन्यासी सुमेध हा अत्यंत श्रद्धावान आहे. दृढनिश्चयी आहे. व याचा दृढनिश्चयच आज बोधिबीज बनला आहे.
जनकल्याणासाठी स्वतः च्या विमुक्ती सुखाला दुर सारून बुद्ध होण्याचा दृढसंकल्प करत आहे.”

यानंतर भगवान दिपंकर बुद्धांनी उजवा हात उचलला व मेघगर्जना करत गंभीर वाणीने भविष्य वर्तवले,
“हा नक्कीच बुद्ध होणार!
हा नक्कीच बुद्ध होणार!”
You are in Dhamma
✍️  राहुल खरे नाशिक
9960999363