बहिष्कृत वर्गाच्या मुंबई येथील जाहीर सभेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण ….
दिनांक ४ जून १९२७ रोजी रात्री साडेआठ वाजता चिराबाजार, मुंबई येथे ” बहिष्कृत भारत ” चे संपादक डॉ. बी. आर. आंबेडकर (बार-ॲट-लॉ ) यांच्या अध्यक्षतेखाली बहिष्कृत वर्गाची जंगी जाहीर सभा पार पडली. बहिष्कृत हितकारिणी सभेचे जनरल सेक्रेटरी श्रीयुत एस्. एन. शिवतरकर यांनी महाड परिषदेनंतर स्पृश्य लोकांनी चालविलेल्या गुंडगिरीची इत्थंभूत माहिती सांगितली. ती ऐकून लोकांच्या मनावर खेदजनक परिणाम झाला. नंतर श्री. गंगावणे, तांबे, गिमोनकर, वीरकर, भेसनकर, भातकुडे यांच्या स्फूर्तिदायक भाषणांनंतर अध्यक्षांचे विचारपरिप्लुत भाषण झाले. सध्या अस्पृश्य वर्गाची अवस्था किती शोचनीय आहे, हे त्यांनी लोकांना स्पष्ट शब्दात पटवून दिले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले,
” आपला उद्धार कराया आपणच कंबर कसली पाहिजे. हे काम एका दोघांचे नाही. यात अनेक लोकांनी आपल्या छातीचा कोट करून आपली माणुसकी स्पृश्य लोकांपुढे सिद्ध करून घेतली पाहिजे. या कामात अनेकांचे बळी पडतील. आपल्या पूर्वजांनी रणांगणात आपल्या मनगटातील जोर समशेरीच्या तडाख्यांनी सिद्ध केलेला आहे; आता आपण आपल्या बुद्धिवैभवाने आजच्या सामाजिक दंगलीत आपली श्रेष्ठ जागा पटकाविली पाहिजे ! ”
●●●
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे वरील उद्गार ऐकून दोन-तीन तरुण ताडकन उठले व अस्तन्या सारून उद्गारले, ” बाबासाहेब ! आपल्या झेंड्याखाली आम्ही लढावयास तयार आहोत! ” महाड-अत्याचार निवारक फंडास स्थानिक लोकांनी २० रुपये व भातकुडे, वीरकर यांनी आपल्या स्कॉलरशिपमधून प्रत्येकी ५ रुपये प्रमाणे अध्यक्षांना अर्पण केले. याशिवाय इतरही किरकोळ रकमा मिळाल्या. नंतर अध्यक्षांना टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात हारतुरे अर्पण करण्यात आले आणि त्यानंतर ‘ बाबासाहेब आंबेडकर की जय ‘ या गर्जनेत सभा विसर्जन पावली.
***
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर